बाळासाहेबांचं बोलणं रोखठोक, तसचं लिहिणंही़  पण रोखठोकपणाला सहृदयतेचीही जोड होती़  या त्यांच्या दोन्ही वैशिष्टय़ांची प्रचिती देणारं हे त्यांचं लेखन.. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात बाळासाहेबांना काही काळ तुरुंगवास भोगावा लागला़  त्या काळात त्यांनी लिहिलेल्या दैनंदिनीतील काही अंश..
१७ मार्च १९६९
आज चि. बिंदाची परीक्षा! नित्याप्रमाणे बिंदा,  टिब्बा, डिंगा (थोरला, मधला व धाकटा मुलगा) परीक्षेच्या वेळी आशीर्वाद मागण्यासाठी येत. पाया पडत. ‘पेपर मन लावून सोडवा. यशस्वी व्हा,’ हा आशीर्वाद मी त्यांना देई.
आज मी कारागृहात. मनाने बिंदाला आशीर्वाद दिला ‘यशस्वी हो.’
टिब्बा-डिंगाचीही परीक्षा येणार, तोपर्यंत सुटका दिसत नाही. तेव्हा दोघांनाही इथूनच आशीर्वाद. ‘यशस्वी व्हा!’
हं! साऱ्यांचीच ‘परीक्षा’ आहे!
२ एप्रिल १९६९
संध्याकाळी जेवण आटोपून शतपावल्या घालत होतो. इतक्यात देशपांडे नावाचे इन्स्पेक्टर आले. शुभ बोल रे नाऱ्या तर नाऱ्या म्हणतो, ‘‘तुम्ही काही लवकर सुटणार नाही. अ‍ॅडव्हायझरी बोर्ड हा नुसता फार्स आहे. हेबियसमध्येच निकाल लागला तर लागेल. बोर्ड गुंडांना सोडतं. राजकीय कैद्यांना नाही. सीमा प्रश्न सुटल्याखेरीज सरकार सोडणार नाही.’’ वगैरे, वगैरे.
दत्ताजी तडकले. म्हणाले, ‘‘सीमा प्रश्न आणखी १३ वर्षे सुटणार नाही. म्हणजे काय तेरा वर्षे इथेच!’’ हॅ: हॅ: करीत इन्स्पेक्टर निघून गेले.
३ एप्रिल १९६९
आज सबंध दिवस चर्चा महापौर निवडणुकीची. सायंकाळच्या ७ बातम्यांकडे तिघांचे कान लागले होते. संध्याकाळ झाली. आकाशवाणी! आम्ही श्वास रोखून उभे राहिलो आणि बातमी आदळली. काँग्रेसचे जामियतराव जोशी ७३ मतांनी निवडून आले. वामन पडले. जोशी-साळवी नाराज होणे साहजिकच होते. मी मात्र अलीकडे बेपर्वा-लोफड होत चाललोय. साऱ्याच गोष्टींवरचा विश्वास उडत चाललाय. सर्व आयुष्यच सत्त्वपरीक्षा पाहण्यात जाणार असेल तर मार्ग चुकतोय असेच म्हणावे लागेल. रामशास्त्रांबरोबर राघोबांचेही गुण असायला हवेत असे वाटायला लागते. देव आणि दैव यातील फरक प्रकर्षांने जाणवू लागतो. देव आणि भक्तांत बडवे दलाल नकोत, पण राजकारणात देवच दलाल बनतात की काय? सर्वच नशिबाच्या गोष्टी असतील तर माणसाने देवापुढे लाचार का व्हावे? देवाचे म्हणणे असे आहे की, त्याची भक्ती नि:स्वार्थ बुद्धीने करावी. तुम्ही माणसे संकट आले की, धावा करता. उलट माणूस म्हणतो, मला प्रथम चांगले दिवस दाखव मग पाहा माझी भक्ती. स्वार्थ आहे, पण येथे मोठे मन देवाचे असायला हवे. न पेक्षा दत्ताजीसारख्या खऱ्याखुऱ्या भक्ताला यश का येऊ नये? शेवटी मनगटातील जोष आणि इच्छाशक्ती हेच यशाचे खरे मार्ग!
४ एप्रिल १९६९
लिंबेच लिंबे! उन्हाळा असह्य़ होतो म्हणून शेखरला जास्त लिंबे पाठविण्यास सांगितले. एरवी डब्यात तीन लिंबे असायचीच. दोन दिवस लिंबे तेवढीच असल्याने बहुतेक शेखरला निरोप गेला नसावा. म्हणून तुरुंगाच्या बाजारहाटय़ाला एक डझन लिंबे आणायला सांगितले. आज शेखरनेही डझनभर लिंबे पाठविली तर बाजारहाडय़ानेही एक डझन लिंबे ऑर्डरीप्रमाणे आणली. घ्या हवे तेवढे सरबत!
आज सौ. मीनाचे पत्र आले. घरची खुशाली कळली की विवंचना नसते. काल मनीऑर्डर मिळाली. सध्या सुटकेचा विचार करणेच सोडून दिलेय. होईल ते होईल.
सबंध दिवस डोके दुखत होते. चक्करही करीत होती, पण पत्ते खेळत दुखणे विसरण्याचा प्रयत्न करीत होतो. उन्हाच्या झळीमुळे झोप नाही. दुपार अशी आणि रात्र बेचैनीत.
६ एप्रिल १९६९
कालची रात्र भयंकर गेली. झोप काही नाही. छाती भरून आली. श्वास कोंडू लागला. पाठीत दुखत होते. छातीत मधूनच चमक मारी. जळजळल्यासारखे होई. वाटले इतरांना उठवावे. पण म्हटले नको. ९.३० ला झोपेच्या आशेने अंग टाकले. कसली झोप येतेय. १० वाजले. ११-१२-१-२-३ वाजले. टोले पडताहेत आणि ‘आऽलऽबेऽल’च्या आरोळ्या ऐकतोय. ३.३० ला डोळा जेमतेम लागला न लागला. सकाळी ५ला उठलो. छातीत कोंडल्यासारखे वाटतच होते.
८ एप्रिल १९६९
आशा ही भयंकर असते. त्यामुळे उगाचच विचारचक्रे जोरात फिरू लागतात. १० तारीख पालयेशास्त्र्यांमुळे भाव खात आहे. उद्या ९ तारीख, पण तीसुद्धा एक महिन्यासारखी वाटते. जिथे ६१ दिवस काढले तिथे एक दिवस जड वाटतो.
शेवटी डोके भणभणायला लागले. दुखू लागले म्हणून मेजर करीमभाई याच्याकडून मालीश करून घेतले. बरे वाटले. एकमेक एकमेकांना प्रश्न विचारीत येरझाऱ्या घालीत असतो. पाय दुखले, तिथेच शेणाने सारवलेल्या ओटय़ावर बसलो. साळवी मात्र अन्यायामुळे भलतेच बेचैन आहेत. अशा अटका आकसानेच होत असतात. तूर्त तरी १० तारखेला चमत्कार काय घडतो याचाच विचार चालू. प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करून स्वत:चे समाधान करीत असतो. यापेक्षा दुसरे काय?
९ एप्रिल १९६९
दोन महिने झाले.
विचारांना रोखण्यासाठी रमी खेळत बसतो आम्ही तिघे. १०चा सुमार असेल. आमचा वार्डर- बाबुराव आला नि ‘‘साहेब, तुम्हांला तयार राहायला सांगितले आहे चौधरीसाहेबांनी. तुमची भेट  आलीय. कोणी तरी पाइपवाला आहे. तुमच्यासारखाच दिसतो.’’ जोशी म्हणाले, ‘‘अहो, श्रीकांत आले असणार’’ चौधरी आले. मी निघालो. पाहतो तो सारी कुटुंबीय मंडळी रांगेने बसलेली. मी फटय़ाळा (श्रीकांतच्या मुलाचे टोपण नाव) उचलले, पण तो मला विसरला होता. ‘मणी, मणी’ करताच माझ्या अंगावर झेपावणारा, माझ्या नुसत्या आवाजाने वेडा होणारा फटय़ा माझ्यापासून दूर होत होता. मला वाईट वाटले, पण पुन्हा लळा लागेल. नंतर डिंगा-मनूला जवळ घेतले. मग इतरांशी बातचीत केली. मीनाच्या डोळ्यांचे पानशेत होत होते. कुंदा तिला साथ देत होती.
मला वाटले भेटीत काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, पण येथे आल्यापासून निराशेने सतत पाठपुरावा केला. रचलेले सारेच विचार वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळतात.
नंतर वसंतराव मराठे भेटीस आले. तिथेही निराशाच. शेवटी २१ ता. भवितव्य ठरवील. देव दैवते शांत झोपलीत!
१० एप्रिल १९६९
सुटले! दत्ताजी सुटले. भविष्याप्रमाणे १० तारीख महत्त्वाची ठरली. आनंद अर्थातच झाला. आम्हा दोघांपैकी दत्ताजी अधिक अस्वस्थ होते. ते सुटले. फार बरे झाले. मात्र आम्ही दुर्दैवी ठरलो.
दुपारचे तीन वाजले आहेत. झोप नाहीच. दोघेही अस्वस्थ आहोत. डबा आला. १ वाजता जेवायला बसलो. दत्ताजींची डिश ठेवली. जेवण जाईना. बाबूराव वॉर्डर म्हणतो. ‘‘साहेब, आज काहीच जेवला नाहीत.’’ मी म्हणालो, ‘‘बाबा रे, घासच घशाखाली उतरत नाही. जा घेऊन तुम्हाला!’’ वाचनाकडे लक्ष नाही. मन रमत नाही. त्याने धूम्रपान मात्र वाढले. कोणी तरी क्रूर डाव आमच्याशी खेळत आहे. १० ता. हा दिवस नसता दाखवला तर? तर तिघेही या अटकेत समाधानी होतो.
सहा वाजलेत. मी, दत्ताजी, जोशी बाहेर यार्डात येरझाऱ्या घालीत असू. आज दत्ताजी बरोबर नाहीत. ते आतापर्यंत मुंबईला पोहोचले असणार. झोपेचा तर खुर्दाच उडालाय. नाही तर दुपारी झापड तरी यायची, पण दत्ताजींसाठी, जोशींसाठी रमी खेळायचा तेही गेले. दोघे चिडलो आहोत या अन्यायी बोर्डाच्या निर्णयाने.
छे! काही सुचत नाही. आम्ही विचार करण्याचे सोडून दिले, पण विचार आम्हांला सोडत नाही. दोघांनी करीमभाईंकडून डोक्याला मालीश करून घेतले. जेवायला बसलो. कसले जेवण जाते! जेमतेम खाल्ले. वार्डात फेऱ्या सुरू! चला, ८.३० वाजले. कोठडीत बंद झालो आहोत.
९ वाजलेत! शेखरने रणजीत देसाई यांनी लिहिलेले शिवचरित्र ‘श्रीमान योगी’ दिले आहे. ते वाचण्याचा प्रयत्न करतोय. बाहेर ब्युगुल वाजत आहे. ‘आलबेल’च्या आरोळ्या सुरू झाल्यात.
११ एप्रिल १९६९
दिवस नित्याप्रमाणे सुरू झालाय. रात्री विचारांच्या ताणाने झोप लागली. आज बरेच हलके वाटत आहे. मात्र दत्ताजींची आठवण येतच आहे. सकाळी सह्य़ाद्री पत्रात दत्ताजींचे पत्रक वाचून समाधान वाटले. नंतर मुंबईची वृत्तपत्रे आली. ती वाचल्याशिवाय वाचल्याचे समाधानच मिळत नाही. ‘नवशक्ति’ने कमालच केली.
प्रकृती कुरकूर करतेय. आज संध्याकाळपासून दिवे गेलेत. ‘प्रभाकर’ केदील आणलेत. हे लिहीत असतानाच दिवे आलेत. रात्रीचे ९ वाजलेत. करीमकडून दोघांनी डोके नि पाठ रगडून घेतली.
१२ एप्रिल १९६९
हवा कुंद आहे, ८ वाजले आहेत आणि ८.०५ ला पाऊस पडून आता गडगडाट सुरू झालाय. येथे आल्यापासून हा तिसरा महिना. तीन महिने तीन ऋतू. आलो तेव्हा हिवाळा, नंतर उन्हाळा आणि हा पावसाळा. आलोही तिघेच. तीन सण झाले. होळी, पाडवा, रामनवमी. अशी तिनाची गंमत. आणखी तीन अक्षरांची आम्ही दोघे वाट पाहत आहोत. सु..ट..का!
पावसामुळे मातीचा वास मनाला उल्हसित करीत आहे. खोलीमध्ये आता घुल्यांचा (बारके सुरवंट) संचार सुरू झालाय. वरच्या कौलांमधून पडतात.
सौजन्य : ‘गजाआडचे दिवस’ (परचुरे प्रकाशन)

काही वेळा डोक्यात विचार चाटून जातात, वाटते सभ्यता, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, सज्जनपणा, आस्तिकता सारे सारे सोडून गुंड बनावे, सर्व सोडून एक बदमाश म्हणून दंड थोपटून ढोंगीजनांना आव्हान द्यावे, कारण सारी पथ्ये पाळून अपयशच पदरी पडणार असेल तर बंडखोर बदमाश म्हणून मिळणारे यश तरी दूर का ठेवावे? हे यश असेल क्षणिक! पण सज्जनांच्या वाटय़ाला तरी तेवढे कोठे येते? मंत्री काय कमी गुंड आहेत! पण सत्तेच्या जोरावर मिरवताहेतच ना ते मानाने समाजात! भगतसिंगाच्या वाटय़ाला काय आले? सुभाषबाबूंच्या वाटय़ाला काय आले? स्वातंत्र्यवीरांच्या वाटय़ाला काय आले? तेच देशाच्या स्वातंत्र्याशी ज्यांचा काडीचा संबंध नव्हता ते आज राज्यकर्ते म्हणून मानाने जगताहेत. हाच जर न्याय देव आणि दैव मिळून देणार असतील तर त्यांना खडसावून सांगावे लागेल, ‘‘बाजूला व्हा! मी माझा न्याय स्वत:च्या कर्तृत्वावर मिळवीन!’’