दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी घडून गेलेल्या घटनेनंतर प्रत्येक मुलगीच नव्हे, तर तिची जबाबदारी असलेले सर्वच जण एक अनामिक दडपण अनुभवत आहेत. पालक, मित्र, भाऊ.. सगळ्यांनाच ‘तिची’ काळजी वाटायला लागली आहे.. तीही हतबल झाली आहे. वाटणारी भीती अव्यवहार्य आहे, हे कळत असूनही ही भीती सध्या सगळ्यांचाच पिच्छा पुरवते आहे. या वातावरणात समाजातील आंतरप्रवाह बघितले, तर कुठे तरी हा बिघडलेला सामाजिक आरोग्याचा प्रश्न दिसतो आहे, त्यामुळे समाजानेच त्यासाठी पुढे येऊन एक आश्वासक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

नीट जा गं.. काळजी घे.. वेळेवर ये.. या सूचना घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकीला अगदी रोजच्या सवयीच्या; पण आता या सूचनांमागे दिल्लीच्या घटनेनंतर एक अनामिक भीती दडलेली आहे. रोज सात वाजता येणारी ती एखाददिवशी साडेसातपर्यंत आली नाही.. तर येईल इतक्यात.. ट्रॅफिक असतं.. रमली असेल थोडी मैत्रिणींमध्ये.. अशी मनाची समजूत काढली जाते.. ती येण्याआधी तिच्या पालकांच्या मनात भीतीच निर्माण होते. घराबाहेर पडलेली ती घरात व्यवस्थित येईपर्यंत भीती, काळजी आणि त्यातून निर्माण झालेलं दडपण आणि त्यावर काहीच उपाय न मिळाल्यामुळे आलेली हतबलता प्रत्येक मुलीचे पालक थोडय़ा फार फरकाने आज अनुभवत आहेत. काय केलं म्हणजे माझी मुलगी, बहीण सुरक्षित राहील? तिचं घराबाहेर पडणं बंद करू? मित्रांशी बोलणं बंद करू? नोकरी सोडायला लावू? तिचं जीन्स घालणं बंद करू? सोशल नेटवर्किंग साइट्सवर बसणं बंद करू.. नक्की काय करू? या सर्व उपायांमधील अव्यवहार्यता माहीत असूनही हे प्रश्न पालकांना भेडसावत आहेत. या सगळ्यांमागे कारण अर्थातच दिल्लीत नुकतीच घडलेली बलात्काराची घटना!
बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलीवर काही अत्याचार होत नाहीत, अशी बुद्धीला पडणारी समजूत घातली तरी ती मनाला पटत नाही. पालकच नाहीत, तर रोज घरातून बाहेर पडणारी ‘ती’सुद्धा ही भीती अनुभवतेच आहे आणि म्हणूनच कदाचित आईच्या सूचनांची आता तिला कटकट वाटत नाही. बस स्टॉपवर तास-तासभर बसची वाट पाहणाऱ्या तिच्या मनात रोज एकदा तरी भीतीची लहर उमटून जाते आणि त्या वेळी सोबतीला असणाऱ्या भावाचा, मित्राचा आधारही पुरेसा वाटत नाही. खरं तर दिल्लीमध्ये वासनेची शिकार ठरलेल्या त्या मुलीला कुणी पाहिलंही नाही.. तिचं नावही माहीत नाही.. पण तरीही त्या मुलीसाठी सगळ्यांचाच जीव तुटला, कारण प्रत्येकीला त्या मुलीचं आयुष्य आणि स्वत:चं आयुष्य यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं साधम्र्य आढळलं. कुणाशीही वैर नसलेल्या, आपल्या विश्वात रमलेल्या एका मध्यमवर्गीय मुलीवर रात्री नऊ वाजता.. मित्र सोबत असतानाही बलात्कार होतो.. आणि तोही खासगी बसमध्ये.. ही गोष्ट सहजपणे पचवणं प्रत्येकीसाठी अशक्य आहे. दिल्लीतील घटना घडण्यापूर्वीही मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या येतच होत्या. या जगात असंही काही घडतं याची जाणीवही याआधी होती. अत्याचार झालेल्या स्त्रियांसाठी वाईटही वाटत होतं, अत्याचार करणाऱ्यांबाबत रागही येत होता. मात्र, तरीही हे आपल्यापर्यंत पोहोचू शकतं.. उद्या कदाचित अत्याचाराची बळी ठरलेल्या स्त्रीच्या जागी माझी मुलगी, बहीण, मैत्रीण असू शकेल.. किंवा अगदी मी स्वत:! असा विचार कुणाच्या मनात कधी येत नव्हता. आज बाहेर पडताना वाटणारी भीती यापूर्वी कधी वाटली नव्हती. मात्र, आता रिक्षावाला, घरी येणारे सेल्समन, दूधवाला, भाजीवाला, बसमध्ये शेजारी बसलेल्या माणसाबद्दल तिच्या मनात नकळतपणे संशयच निर्माण होतो. याच्या मनात नेमकं काय आहे.. काही वेडंवाकडं असेल तर.. अशा विचारांनी आणखी असुरक्षित वाटायला लागतं. अनेक जणींना सध्या या अनामिक भीतीनं ग्रासलं आहे. ही सगळी ‘ती’ची गोष्ट झाली, पण त्याचं काय? आपली बहीण, बायको, मुलगी, मैत्रीण व्यवस्थित घरी पोहोचेपर्यंत या अनामिक भीतीचा अनुभव सध्या तोही घेतो आहे. या भीतीपोटी ‘कशाला या मुलींना स्वातंत्र्य हवं.. यांचं स्वातंत्र्य म्हणजे आमच्या जिवाला घोर!’ असा विचार त्याच्या मनात डोकावू लागला आहे. मुलगी झाल्याच्या आनंदाचा भर ओसरण्यापूर्वीच, त्याला मुलगी ही एक मोठी जबाबदारी वाटायला लागली आहे. ‘तिला सुरक्षित ठेवायचं तरी कसं,’ या प्रश्नाने त्याचा आनंदही गोठला जातोय. सुरक्षित ठेवण्यासाठी तिला पुन्हा बंधनात जखडून ठेवण्याकडे त्याची मानसिकता झुकायला लागली आहे.
दिल्लीमधल्या घटनेनंतर सगळीकडेच संतापाची लाट उसळली, अनेक लोकांनी अगदी रस्त्यावर उतरून अत्याचाराची बळी ठरलेल्या त्या मुलीला सपोर्ट केला.. रोज कुठे ना कुठे मोर्चे निघत होते, निदर्शने होत होती. त्यामध्ये मुली मोठय़ा संख्येने होत्या.. मोर्चा झाल्यानंतर एकटीने घरी जाताना, भीती त्यांचाही पाठलाग करत होती. जनतेने केलेल्या सपोर्टवर विश्वास आहे.. हा सपोर्ट वांझोटा नाही याची जाणीव आहे. तरीही ‘उद्या माझ्या बाबतीत किंवा माझ्या जवळच्या कुणाच्या बाबतीत असं काही घडलं तरीही असाच आवाज उठेल? उठेलही कदाचित, पण सगळं घडून गेल्यावर.. कदाचित कायदा आणखी कडक होईल.. माझ्यावर अत्याचार करणाऱ्याला कदाचित अगदी फाशी होईल.. पण माझं काय?’ ही घालमेल ती अनुभवते आहे. अजूनही अगदी रोज कुठे ना कुठे बलात्काराच्या घटना घडत आहेत. त्याच्या बातम्या छोटय़ाशा असल्या तरी त्या आता तिचं लक्ष वेधून घ्यायला लागल्या आहेत. दिल्लीतल्या त्या मुलीला न्याय मिळेलच, पण बाकी अशा अनेक जणींचं काय, हा प्रश्न तिला सतावायला लागला आहे आणि त्या प्रत्येक बातमीबरोबर ‘मी अजूनही अबलाच आहे का?’ या जाणिवेने तिची झोप उडाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘ती’ सबला झाली होती. जगाने तिला सबला झाल्याचं सर्टिफिकेट दिलं होतं. तिच्या सबलीकरणाची महती ऐकतच ‘ती’ मोठी झाली.. घरातही तिला समान वागणूक मिळत होती.. आणि ती खरंच स्वत:ला सबला समजायलाही लागली. बिनधास्त बनली; पण आता स्वत: ‘सबला’ असण्यावरच्या तिच्या विश्वासाला धक्का बसला आहे. तिचा बिनधास्तपणा तिला पोकळ वाटायला लागला आहे. ‘माझ्या आजूबाजूच्या कुणाच्या डोक्यात माझ्याबद्दल वाईट आलं, तर क्षणार्धात माझं विश्व होत्याचं नव्हतं होऊ शकतं. काय केलं म्हणजे मी सुरक्षित राहीन? तिच्या या प्रश्नाला रोज झडणाऱ्या चर्चामधून उत्तरं मिळत आहेत. कराटे शिका, चाकू बाळगा, जवळ तिखट ठेवा, असुरक्षित वाटलं की, जवळच्या माणसाला फोन करा.. इत्यादी.  ‘खरंच चार लोक अनपेक्षितपणे माझ्यासमोर उभे राहिले, तर पर्समधून चाकू काढण्याइतकं बळ माझ्या अंगी असेल,’ असा प्रश्न तिला छळतो आहे. संवादाची, संपर्काची कित्येक साधनं आहेत.. पण तिच्यासमोर अचानक उभ्या राहणाऱ्या संकटापुढे हे सगळं निष्क्रिय ठरतं. विकृत मानसिकतेपुढे ती खरंच हतबल झाली आहे. आपली कर्तबगारी, पद या सगळ्यांचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या तिचा स्वत:वरचा विश्वास ढळत चालला आहे. एकीकडे भीती आणि दुसरीकडे तिची सुरक्षा हा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या तिच्याच माणसांकरवी काळजीपोटी लादली जाणारी बंधनं.. अशा कोंडीत ती अडकत चालली आहे.
छळणाऱ्या ढीगभर प्रश्नांपुढे, भीतीमुळे आणि त्यातून येणाऱ्या असहायतेमुळे तिच्या वाटय़ाला आता रोजचं मरण आलं आहे. पालकांनी या मुलींना अशा असहाय स्थितीत सोडण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या मुलींशी पूर्वीपेक्षाही विश्वासाने संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे. शेवटी चाकू असला तरी त्याचा वापर करण्यासाठी धैर्य लागतं ते तिच्यात निर्माण केलं पाहिजे. जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं हे खरं, पण समाजपुरुषाने कूस बदलली तर सबलेची एका क्षणात अबला झाल्याची ही मानसिकता कुठल्या कुठे पळून जाईल.. त्यासाठी मुलींचा स्वत:शी संवाद, पालकांचा स्वत:शी संवाद व नंतर एकमेकांशी असलेला संवाद हा कधीच नकारात्मक असून चालणार नाही.. तेव्हा हातपाय गाळण्यात अर्थ नाही हेच खरं..