इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहाच्या संयुक्त  बैठकीत घणाघाती भाषण केले. नेहमीच्या शत्रूंवरच नेहमीच्या पद्धतीने हा आवाजी घणाघात झाला, पण इस्रायलचे आणि अमेरिकी राजकारणाचेही हसेच व्हावे, अशा प्रकारे हा घटनाक्रम झाला. आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा आवाजीला काही मोल असते का, हा प्रश्न यातून पुन्हा समोर आला..

आंतरराष्ट्रीय व्यासपीठ घरची धुणी धुण्यासाठी वापरावयाचे नसते. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू आणि अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष यांना या मूलभूत तत्त्वाचा विसर पडला आणि त्यामुळे त्यातून मंगळवारी एक हास्यास्पद नाटय़ घडून आले. हे जे काही झाले ते सारेच विस्मयकारक असून सर्वच लोकशाही देशांनी बोध घ्यावा असे आहे. आपल्याकडेही राजकीय मतभेद पराकोटीचे असतात. त्यामुळे आपल्या राजकीय पक्षांना अमेरिकेत जे काही झाले ते काही शिकवून जाणारे असेल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ते मुळातूनच समजून घेणे गरजेचे आहे.
अमेरिकेतील डेमॉकॅट्रिक आणि रिपब्लिकन या पक्षांतील दुसरा हा यहुदींचा आणि इस्रायल देशाचा कडवा समर्थक. अमेरिकी अर्थ, सांस्कृतिक जीवनावर यहुदींचे प्राबल्य असून राजकारणातही त्यांचा मोठा दबावगट आहे. अर्थात रिपब्लिकन्स हे संस्थात्मकदृष्टय़ा यहुदींचे समर्थक असले तरी डेमॉक्रॅट्सना त्यांचे वावडे आहे असे नाही. यहुदी संस्थांच्या अनेक बडय़ा देणगीदारांत प्राधान्याने डेमॉक्रॅट्स आहेत. या दोहोंतील फरक इतकाच की रिपब्लिकनांसारखे डेमॉक्रॅट्स यहुदींच्या मागे ओढले जात नाहीत वा भान विसरून नाचत नाहीत. या दोन पक्षांतील वैचारिक दुफळी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या ताज्या अमेरिका दौऱ्याच्या निमित्ताने उफाळून आली. तीस कारण मिळाले ते अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या मध्यावधी निवडणुकांचे. या निवडणुकांत अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पक्षाचा सपाटून पराभव झाला. परिणामी अमेरिकी प्रतिनिधीगृहात (‘काँग्रेस’मध्ये) असलेले त्या पक्षाचे बहुमत संपुष्टात आले आणि रिपब्लिकन्स वरचढ झाले. या सदनाच्या त्या आधी सभापती होत्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नॅन्सी पलोसी. या निवडणुकांनंतर हे सभापतीपद गेले रिपब्लिकन जॉन बोहनर यांच्याकडे. हे बोहनर राजकीय विचाराने माजी अध्यक्ष रिपब्लिकन जॉर्ज बुश यांच्यासारखे. जगाच्या कल्याणाची, त्या कल्याणाच्या आड येणाऱ्या दुर्जनांना दूर करण्याची जबाबदारी या जगन्नियंत्याने अमेरिकेवर सोपवलेली आहे, असा या रिपब्लिकनांचा समज असतो. त्यामुळे एखाद्या देशावर हल्ला कर, दुसऱ्याला धमकाव आदी अनेक हुच्च कृत्ये हे रिपब्लिकन्स करीत असतात. विचारांत मेंदूपेक्षा मनाला प्राधान्य देणाऱ्या रिपब्लिकनांना त्यामुळे राष्ट्रवादाच्या घनगर्जना करावयास नेहमीच आवडते. आताही अमेरिकेस धाब्यावर बसवू पाहणाऱ्या इराणला धडा शिकवण्यासाठी त्या देशावर अमेरिकेने सरळ हल्ला करावा असे रिपब्लिकनांना वाटते. इराक हल्ल्याने अमेरिकी तिजोरीतील खणखणाटाच्या पाश्र्वभूमीवर सत्तेवर आलेल्या ओबामा यांचा अर्थातच यास विरोध आहे. इराणशी चर्चा, आíथक र्निबध आदी मार्गाने दबाव आणावा आणि त्यास अण्वस्त्र र्निबध मान्य करण्यास भाग पाडावे असे ओबामा यांना वाटते. अमेरिकेशी जवळच्या असलेल्या अन्य पाच देशांनाही असेच वाटत असल्यामुळे हे देश इराणशी चर्चा करीत आहेत. हे रिपब्लिकनांना मंजूर नसल्यामुळे त्यांना ओबामा यांचे नाक कापायचे होते. त्यासाठी त्यांनी अस्त्र वापरले ते इस्रायलचे. त्या देशाचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे एक युद्धखोर गृहस्थ आहेत. इराणला अणुबॉम्ब तयार करण्यात यश आलेच तर त्याचा सर्वात मोठा धोका इस्रायललाच असेल असे त्यांचे मत आहे. तेव्हा या बॉम्बनिर्मितीची वाट न पाहता इराणवर हल्ला करून त्यांच्या अणुभट्टय़ा नष्ट करून टाकाव्यात असे त्यांना वाटते. तेव्हा नेतान्याहू आपल्याच विचाराचे आहेत हे लक्षात आल्यावर अमेरिकेतील रिपब्लिकनांनी भलताच घाट घातला.
तो म्हणजे नेतान्याहू यांना अमेरिकेच्या दौऱ्यावर बोलवायचे आणि उभय प्रतिनिधीगृहांच्या संयुक्त बठकीसमोर त्यांना भाषणाची संधी देऊन इराणच्या धोक्याची कल्पना साऱ्या जगाला द्यायची. त्यानुसार सभापती बोहनर आणि अन्य रिपब्लिकनांनी नेतान्याहू यांना परस्पर आवताण धाडले आणि त्यांची लबाडी ही की याची पूर्वकल्पनादेखील अध्यक्ष ओबामा यांना दिली गेली नाही. या लबाडीचा इस्रायली आविष्कार हा की नेतान्याहू यांनी आपली ही भेट ऐन निवडणुकीच्या तोंडावर आखली. हेतू असा की अमेरिकी प्रतिनिधी सभेसमोरील भाषणाचा उपयोग निवडणूक प्रचारासाठी व्हावा. इस्रायलमध्ये मुदतपूर्व निवडणुकांत १७ मार्च रोजी मतदान होईल. वास्तविक अमेरिकी व्यवस्थेचा संकेत असा की मायदेशांत निवडणुकांना सामोरे जात असलेल्या कोणत्याही राजकीय नेत्यास प्रतिनिधी सभेसमोर भाषणास बोलवायचे नाही. तशी भाषणाची संधी देऊन त्या नेत्याकडून त्याच्या मायदेशातील प्रचारात अमेरिकेचा वापर होऊ नये हा त्या मागील विचार. परंतु रिपब्लिकनांनी तो धाब्यावर बसवून अध्यक्ष ओबामा, डेमॉक्रॅट्स यांच्या विरोधाची, भावनांची कदर न करता नेतान्याहू यांचे भाषण अमेरिकी प्रतिनिधी सभेसमोर रेटले. वास्तविक या भाषणाच्या निर्णयामुळे नेतान्याहू यांच्यावर खुद्द इस्रायलमध्ये टीकेची झोड उठली. तरीही त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला नाही आणि आपले राणा भीमदेवी थाटातील भाषण त्यांनी अमेरिकी प्रतिनिधीगृहात रेटले. या त्यांच्या कृतीमुळे आलेले अवघडलेपण इतके होते की या कार्यक्रमासाठी अध्यक्ष ओबामा हे सदनाकडे फिरकलेदेखील नाहीत. त्याचप्रमाणे जवळपास पन्नासहून अधिक डेमॉक्रॅट्सनी या भाषणाकडे पाठ फिरवली. परंतु या सगळ्याचा कोणताही परिणाम होऊ न देता नेतान्याहू यांनी आपल्याला आणि रिपब्लिकनांना जे हवे होते तेच केले. इराणशी करार वगैरेचा नाद सोडण्याचा आणि हल्ला करून त्या देशातील अणुभट्टय़ा नष्ट करण्याचा सल्ला त्यांनी अमेरिकेस दिला. त्यांच्या भाषणाचा एकंदर सूर असा की मानवी संस्कृतीवर इराणच्या रूपाने गंभीर संकट आले असून ते तातडीने नष्ट केले तरच मनुष्यप्राणी वाचू शकेल. तेव्हा अमेरिकेने हालचाल करावी. नपेक्षा ती जबाबदारी इस्रायलला पार पाडावी लागेल.
त्यांच्या भाषणाला अमेरिकी अध्यक्ष ओबामा यांनी काडीचीही किंमत दिली नाही. उलट संरक्षणमंत्री जॉन केरी यांना त्यांनी ठरल्याप्रमाणे इराणबाबत चर्चा करण्यासाठी धाडले. नेतान्याहू यांच्या भाषणात नवे ते काय आणि त्यांनी काही पर्याय दिला आहे काय, असे प्रश्न विचारीत ओबामा यांनी हा सारा खटाटोप दुर्लक्षित केला. परिणामी या भाषणाचा राजकीय फायदा आपल्याला निवडणुकीत होईल अशी नेतान्याहू यांची अटकळ पार चुकली. उलट या भाषणाच्या उपयुक्ततेपेक्षा इस्रायलला त्याचा तोटाच होण्याची शक्यता अधिक. ओबामा यांनी नेतान्याहू यांच्या इशाऱ्यास केराची टोपली दाखवीत इराणबरोबरील अण्वस्त्र नियंत्रण चर्चा यशस्वी केली तर त्याचा राजकीय फटका नेतान्याहू यांना निवडणुकीत बसेल. २५ मार्चपर्यंत इराणबरोबरील ही चर्चा संपणार असून काही ठोस मार्ग निघेलच निघेल याची ओबामा आणि सहकाऱ्यांना खात्री आहे. तसे झाल्यास नेतान्याहू यांच्या भाषणाचे सगळेच मुसळ केरात. उलट त्याचा अनिष्ट परिणाम होण्याचीच शक्यता अधिक.
इतके दिवस अमेरिका ही इस्रायलची पाठराखी होती. इस्रायलला त्या देशातून मिळणारा हा पािठबा पक्षातीत होता. डेमॉक्रॅट्स असोत वा रिपब्लिकन्स. इस्रायलच्या मागे ते खंबीरपणे उभे राहात. परंतु संयुक्त सदनातील भाषण आणि त्याचा निवडणुकीतील उपयोग या संकुचित उद्देशाने नेतान्याहू यांनी या पािठब्यास पक्षीय रंग दिला. या भाषणामुळे इस्रायलच्या मुद्दय़ावर प्रथमच रिपब्लिकन्स आणि डेमॉक्रॅट्स यांच्यात दरी निर्माण झाली असून तिचा फटका उलट इस्रायललाच बसण्याची शक्यता अधिक. त्याच वेळी अमेरिकेत अशा भाषणासाठी अध्यक्षालाच अंधारात ठेवण्याच्या बोहनर यांच्या रिपब्लिकी वृत्तीवर टीका होऊ लागली आहे.
तेव्हा याचे तात्पर्य हे की आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा वापर करण्यासाठी नुसते वक्तृत्व कामाचे नाही. त्याच्या जोडीला शहाणपणही हवे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्दी म्हणून नावलौकिक मिळवण्याच्या नादात मायदेशातील वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही, हे आपल्याकडे अशी घाई लागलेल्यांनी लक्षात घेतलेले बरे.