रॉबर्ट गालब्रेथ या नवोदित लेखकाची ‘द ककूज कॉलिंग’ ही रहस्य कादंबरी एप्रिल महिन्यात प्रकाशित झाली. लंडनमधील मेफेयर जिल्ह्य़ातील एका मॉडेलच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा छडा खासगी गुप्तहेर कशा प्रकारे लावतात असे तिचे कथानक आहे.  तिच्यावरील परीक्षणे चांगली आली होती. मात्र गेल्या तीन महिन्यांत या कादंबरीच्या केवळ १३०० प्रतींची विक्री झाली. परंतु ‘द संडे टाइम्स’ने १३ जुलैच्या अंकात ही कादंबरी ‘हॅरी पॉटर’च्या लेखिका जे. के. रोलिंग यांनीच लिहिली असल्याचा रहस्यभेद केला. त्यानंतर युरोप-अमेरिकेत ही कादंबरी रातोरात बेस्टसेलर ठरली आहे.
लेखकाची नैतिकता असावी ती अशी! रोलिंग या जगातल्या सर्वाधिक खपाच्या आणि सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या लेखिका आहेत. त्यांनी कितीही वाईट पुस्तक आपल्या नावाने लिहिलं असतं तरी ते खपलं असतं. पण आपल्या नावाच्या दडपणाचा पुस्तकावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी टोपणनावाचा मार्ग स्वीकारणं पसंत केलं आणि त्याचा आनंद घ्यायचं ठरवलं. म्हणूनच हे रहस्य जाहीर झाल्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षणीय आहे. त्या म्हणाल्या, ‘हे गूढ आणखी काही काळ तसंच राहिलं असतं तर बरं झालं असतं, कारण तो एक मुक्त अनुभव होता. फारसा गाजावाजा न करता कुठल्याही अपेक्षांचं ओझं न बाळगता लिहिलेल्या व दुसरंच नाव घेऊन लिहिलेल्या पुस्तकावर जेव्हा प्रतिसाद येतो तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो.’ तो त्यांना फार काळ लाभला नाही. रोलिंग यांनी या  कादंबरीचा दुसरा भागही लिहिला असून तो पुढील वर्षी प्रकाशित होणार आहे.
आता ही कादंबरी समीक्षकांसाठी साक्षात्कारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीजण तिचं कौतुक करतील, तर काही जोरदार टीका. गेल्या वर्षी रोलिंग यांची ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्याबाबत असाच प्रकार झाला होता. आता हे हाकारे या कादंबरीला कुठल्या दिशेने हाकारतात ते पाहायचे.