शिवसेना आणि भाजप यांच्यातील कुरबुरी व टोलेबाजीची मजल आता मुंबई भाजपच्या अध्यक्षांना अप्रत्यक्षपणे पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा देण्यापर्यंत गेलेली आहे. भाजपसारख्या राष्ट्रव्यापी पक्षाला मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता हवी असणे, हे या भांडणाचे आताचे कारण. परंतु दोस्ती/दुश्मनीचा हा खेळ बाहेरून पाहणाऱ्यांनी, लोकसभा निवडणुकीच्या आदल्या काही महिन्यांतदेखील अशाच कुरबुरी विकोपाला गेल्या होत्या हे आठवलेले बरे..
‘वाघ आणि कुत्रा हे एकमेकांचे नसíगक मित्र असू शकतात का’, या प्रश्नाचे स्वाभाविक उत्तर ‘नाही’ असेच येईल. पण अनपेक्षिताच्या दुनियेत कधी कधी असे चमत्कार घडतात. कधी कधी अपरिहार्य गरज म्हणून दोघांची मत्री होते आणि अशी मत्री टिकविण्याची जबाबदारीही दोघांवर पडते. त्यासाठी आक्रमकपणाने आपल्याच मस्तीत वावरणाऱ्या वाघाला आपल्या स्वभावाला मुरड घालावी लागते आणि आपल्या गल्लीपुरता वाघ समजून वावरणाऱ्या कुत्र्यालाही थोडा शहाणपणा दाखवावा लागतो. अशा नाइलाजाच्या मत्रीत कधी कुरबुरी होतात, कागाळ्याही होतात. अशा वेळी वाघाला खंत वाटू लागते. आपण वाघ आहोत, याची जाणीव होऊ लागते. कुत्र्याशी मत्री करून आपण दात आणि नखे गमावत तर नाही ना, अशी भीती त्याला छळू लागते, आणि तो अस्वस्थही होतो. इकडे कुत्र्याला आता वाघाची नेमकी ओळख झालेली असते. त्यामुळे वेळ पडली तर आपण वाघावरही गुरगुरू शकतो, असा त्याला विश्वास वाटू लागलेला असतो. कधी कधी तो तसे करून दाखवतो. मग वाघ चवताळतो. पंजा उगारून गुरगुरू लागतो. कुत्रेही आक्रमक होते. तेही वाघावर गुरगुरू लागते. एकमेकांना पंजे, दात दाखविले जातात.
असे काही घडू लागले, की या मत्रीचा शेवट कसा होणार हे जणू ठरलेले असते. साऱ्या नजरा त्या अपेक्षिताच्या अपेक्षेने उभयतांकडे लागतात आणि आपणास अपेक्षित असलेला शेवट कधी होणार याची उत्सुकता ताणली जाते. पण त्यालाही धक्का बसतो. कालांतराने वाघ आणि कुत्र्याचे भांडण संपते, पुन्हा दोघेही गळ्यात गळे घालून मत्रीचे गाणे आळवू लागतात. इतकेच नव्हे, तर आपली मत्री नसíगकच आहे, असा छातीठोक दावाही करू लागतात..
इसापनीतीतील काल्पनिक गोष्टी आणि राजकारणातील वास्तव यांच्यात अनेकदा काही तरी साम्य दिसत असते. त्यामुळे, लहानपणी वाचलेल्या इसापनीतीसारख्या सुरस गोष्टींचा मेंदूत साठविलेला खजिना मोठेपणी राजकारणासारख्या रंगतदार खेळात अनेकांना उपयोगी पडत असला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून अशाच अनपेक्षित, पण रंजक घडामोडी घडू लागल्या आहेत. शिवसेना आणि भाजपची २५ वर्षांची अशीच एक नसíगक मत्री गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तुटीच्या उंबरठय़ावर उभी राहिली. एकमेकांच्या गळ्यात गळा घालून, नसíगक मत्रीचे गाणे गातच महाराष्ट्राचे राजकारण करणारे हे दोन पक्ष अचानक स्वबळाची भाषा करू लागले, आणि ही नसíगक मत्री तुटणार असे छातीठोक आडाखे बांधण्यास अनेकांनी सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीची हवा जसजशी तापू लागली, तसतशी नसíगक मत्रीची ही गोष्टदेखील पुढे सरकू लागली, आणि युती तुटूनच गोष्टीचा शेवट होणार अशी खात्री झालेल्या अनेकांनी आपल्या राजकारणाच्या वाटादेखील निश्चित करून टाकल्या. अखेर निवडणुकीच्या तोंडावर युती तुटलीच, स्वबळाची भाषा करणाऱ्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतविभागणीचा पुरेसा पटका बसला. केवळ सर्वाधिक संख्याबळाच्या भांडवलावर बहुमताचा आकडा सोबत नसतानाही, भाजपने सत्ताग्रहण केले. पुन्हा नव्या आडाख्यांना सुरुवात झाली. युती तुटणार अशी भाकिते करणाऱ्यांनाही नव्या गोष्टीची नवी सुरुवात होणार अशी चाहूल लागली, आणि महिनाभरातच पुन्हा भाजपशी हातिमळवणी करून शिवसेना सत्तेत सहभागी झाली. सत्तेतील जो वाटा पदरी पडला, तो घेऊन पुन्हा नसíगक मत्रीचे समूहगान सुरू झाले.
दोन मित्रांच्या एखाद्या गोष्टीप्रमाणेच, शिवसेना आणि भाजपच्या नसíगक मत्रीतही कुरबुरी सुरूच होत्या. निवडणुकीआधी भाजपचा मोठा भाऊ असलेली शिवसेना निवडणुकीनंतर मात्र, लहान भाऊ झाली. निवडणुकीआधी शिवसेना-भाजप युती होती. निवडणुकीनंतर जुन्या नसíगक मत्रीच्या नात्यातून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेली युती मात्र, भाजप-शिवसेना अशी झाली. राजकारणात लहान भावाची भूमिका जगणे फारच कठीण असते. तो अनुभव अनेकांना व्यक्तिगत पातळीवरही आलेला आहे. लहान भावाला राजकारणात वारसा हक्काने मिळणारी गोष्टदेखील वाटणीस येत नाही. राजकारणातील वारशावर मोठय़ा भावाचाच हक्क असतो. निवडणुकीआधीच्या राजकारणात याचा अनुभव महाराष्ट्रात भाजपला येत होता, निवडणुकीनंतर याच अनुभवातून जाण्याची वेळ शिवसेनेवर आली. नसíगक मत्रीतदेखील, ही वेदना सोसणे सोपे नव्हतेच.
आता महाराष्ट्रात भाजपच्या सत्तेत शिवसेना सहभागी आहे. त्यामुळे, अनेकदा पाणउतारा करून घेण्याची वेळ आता शिवसेनेवर येऊ लागली आहे. सत्तेतील नाइलाजाचा सहभाग शिवसेनेला फारसा आनंददायी नाही, हे वारंवार स्पष्ट होऊ लागले आहे. तरीदेखील सत्तेबाहेर राहून नगण्य राहण्यापेक्षा सत्तेत राहण्यात शहाणपण आहे, याची जाणीव शिवसेनेला आहे. म्हणूनच, सत्तेत राहून विरोधकांसारखे वागण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असा खोचक सल्ला देणाऱ्या भाजप नेत्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून महाराष्ट्रहिताच्या राजकारणाचे कारण देत शिवसेना सत्तेत राहणारच आहे. एवढे टक्केटोणपे खात सत्तेत राहणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवलेच नसते, त्यांनी स्वाभिमानाने सत्ता झुगारून दिली असती, असा खोचक टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला, म्हणून लगेच अपमानित होऊन सत्तेतून बाहेर न पडण्याएवढा राजकीय परिपक्वपणा शिवसेनेत आता आलेला आहे, हे शरद पवारांनाही माहीत असणार. तरीही राजकारणाच्या खेळाला रंगत आणण्यासाठी त्या खेळात अनेक खेळाडूंना आपल्या भूमिका बजावाव्या लागतात. युतीच्या नसíगक मत्रीत जेव्हाजेव्हा कुरबुरी वाढू लागतात, तेव्हा तेव्हा शरद पवार वा अन्य विरोधी नेते त्यांच्या त्यांच्या त्या त्या भूमिका इमाने इतबारे पार पाडण्यास सरसावत असतात. त्यात काहीच गर नाही. उलट या भूमिका निभावल्या गेल्या नसत्या तर राजकारण सपक झाले असते आणि अशा घडामोडींच्या शेवटाचे आडाखे बांधण्यातील मजादेखील निघून गेली असती. अशी गुंतागुंत नसेल, तर शेवटाचे आडाखे बांधण्यात मजाच राहिली नसती.
भाजप हा आता खऱ्या अर्थाने राष्ट्रव्यापी पक्ष बनला आहे. केंद्रात भाजपची पूर्ण स्वबळावरील एकहाती सत्ता आहे. त्यामुळे केंद्रातील राजकारणात भाजपला नजीकच्या काळात तरी संख्याबळाची चिंता आणि आव्हानही नाही. शिवसेना हा भाजपप्रणीत रालोआचा घटक पक्ष असल्याने, केंद्रातील सत्ताग्रहणाच्या वेळीच सेनेलाही मंत्रिपद मिळाले. मात्र, महाराष्ट्र ही शिवसेनेची कर्मभूमी आहे. या राज्यातच शिवसेनेला आपले सत्ताकारण फुलवायचे आहे, आणि बालेकिल्ला असलेल्या मुंबई-ठाण्याच्या महापालिकांवर सेनेचा भगवा फडकावत ठेवणे हे या पक्षाचे सततचे ध्येय आहे. भाजपच्या साथीने आजवर मुंबईत महापालिकेवर सेनेने सत्ता गाजविली तरी आता भाजपची भूमिका बदललेली असल्याने, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत संपूर्ण सत्ताग्रहणाचा भाजपचा संकल्प लपून राहिलेला नाही. नेमकी हीच बाब शिवसेनेच्या दृष्टीने दुखरी नस आहे. भाजपची मोच्रेबांधणी मुंबई महापालिका सत्तासंपादनासाठीच आहे, हेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतचा हा नसíगक मित्र असलेला भाजप हाच शिवसेनेचा महापालिका निवडणुकीच्या सत्तास्पध्रेतील प्रमुख प्रतिस्पर्धी असणार, हेही उघड झाले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या खांद्यावरून भाजपने शिवसेनेवर सुरू केलेले शरसंधान ही या नसíगक मत्रीतील कुरबुरीची पहिली पायरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत-पाकिस्तान संबंध अशा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर अभ्यास न करता शेरेबाजी करण्यापेक्षा, मुंबईत तुंबलेली गटारे, नालेसफाई, डासांचा फैलाव अशा बाबींवर लक्ष द्या, हा शेलार यांचा सल्ला म्हणजे, सेनेला त्यांच्या मर्यादांची जाणीव करून देण्याचा श्रेष्ठींच्या आशीर्वादाने केलेला भाजपचा पहिला प्रयत्न आहे, हे स्पष्ट आहे.
आता राजकारणातले हे डास मारण्यासाठी आपण समर्थ आहोत, असा पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने, नसíगक मित्रांचे बिनसणे चव्हाटय़ावर आल्यात जमा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या नव्या कहाणीचा शेवट कसा होणार याचे रंजक आडाखे बांधण्याचा खेळ आता सुरू करावयास हरकत नाही. पुन्हा दोन्ही मित्र समोरासमोर उभे राहणार का, एकत्र लढणार याविषयी तर्क सुरू होतील. शेलार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, त्यांना अप्रत्यक्षपणे पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा सेनेच्या मुखपत्रातून दिली गेली आहे. शिवसेना तर वाघाच्या रूपातच मिरवत असते. त्यामुळे, नव्या कहाणीकडे पाहताना, वाघ आणि कुत्र्याच्या नैसर्गिक मत्रीची ती गोष्ट कुणाला आठवली, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
दिनेश गुणे