अन्य पक्षांतील तसेच शिवसेनेतील काही मंडळीही भाजपमध्ये प्रवेश करतील, हे गृहीत धरून महाराष्ट्रात भाजपकडे आजच्या घडीलाच किमान २४० प्रबळ उमेदवारांची यादी तयार आहे. त्यामुळे भाजपला हव्या त्या जागा शिवसेनेने दिल्या नाहीत, तर युती तोडावी लागेल, अशी भाजपची परखड भूमिका आहे..

राष्ट्रीय लोकशाही आघाडी(रालोआ)च्या केंद्रातील सत्ताकारणासाठी प्रादेशिक पक्षांशी युती टिकवून ठेवणे, ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आतापर्यंतची गरज होती. त्यामुळे देशाच्या राजकीय इतिहासात ‘सर्वाधिक काळ टिकलेली युती’ अशी शिवसेनेबरोबरच्या युतीची नोंद झाली. केंद्रात प्रचंड बहुमत मिळविल्यावर आता राज्यात स्वबळावर सत्तास्थापनेचे ‘लक्ष्य’ साध्य करण्यासाठी भाजपची वाटचाल सुरू आहे. प्रादेशिक सहकारी पक्षांच्या ‘कुबडय़ा’ घेऊन चालण्याची त्यांना गरज उरलेली नाही. त्यामुळे भाजप या कुबडय़ा कधी फेकून देईल, याचा नेम राहिलेला नाही. भाजप नेत्यांची शिवसेनाविरोधातील धार तीव्रच होत राहिल्याने, त्याला केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाल्याचे उघड होत आहे.
भाजपच्या राज्य परिषदेत शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची जाहीर मागणी झाल्याने आणि त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. युती टिकणार की नाही, स्वबळावर लढण्याची भाजपची ताकद आहे का, अशा नानाविध चर्चा राजकीय वर्तुळात व कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहेत. एकेकाळी ज्या शिवसेनेच्या वाघाची डरकाळी ऐकू आली, की भाजपचे केंद्रीय नेतृत्व भयभीत व्हायचे आणि त्यांच्या नाकदुऱ्या काढण्यासाठी प्रमोद महाजन यांना ‘मातोश्री’वर धाव घ्यायला लागायची, ती परिस्थिती आता राहिलेली नाही. युतीच्या सुमारे २८ वर्षांच्या वाटचालीत भाजपने पद्धतशीरपणे आपली ताकद वाढविली आहे. केंद्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांशी मोट बांधून ‘रालोआ’ची ताकद वाढविणे, ही भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची त्या वेळची गरज होती. तेव्हा भाजपने हिंदूुत्वाची कास धरली होती आणि त्यामुळे शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाशी वैचारिक व राजकीय सूत जुळले. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, महाजन यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही प्रादेशिक पक्षांना भाजपसोबत आणले. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, जयललिता यांच्यासह अन्य नेत्यांबरोबरचे ‘स्नेहबंधन’ सांभाळताना त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. आता मात्र भाजपची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून ‘कमळ’ हे ‘वटवृक्ष’ बनले आहे. त्यामुळे वटवृक्षाच्या पारंब्या बनून जे प्रादेशिक लहान पक्ष राहतील, त्यांना भाजपसोबत राहता येईल. मात्र स्वत:ची ताकद दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आक्रमक भूमिका भाजपने आता घेतली आहे.  
भाजपमधील हे परिवर्तन केवळ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे नाही. लोढणे झालेली युती तोडण्याची मानसिकता भाजपमध्ये गेली काही वर्षे आहे. अनेकदा तीव्र संघर्ष झाले, पण भाजप नेत्यांनी व्यावहारिक शहाणपण दाखवत ‘स्नेहसंबंध’ राखले. महाजन यांच्या निधनानंतर काही काळातच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी शिवसेनेबरोबर युती तोडण्याचे राजकारण शिजविले होते. मात्र ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नकार देत युती राखली. आता लोकसभेतील घवघवीत यशामुळे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुंडे हयात नसल्याने या प्रयत्नांनी पुन्हा उचल खाल्ली आहे व त्यासाठी पोषक वातावरणही आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या मताला भाजपमध्ये आता फारशी किंमत राहिलेली नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख भिस्त राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यावर आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, अरुण जेटली हे तिघे नेते या आक्रमक भूमिकेला अनुकूल असल्याने राज्यातील भाजप नेत्यांचे बाहू आता फुरफुरत आहेत.  
मुंडे यांनी युतीचा विस्तार करीत महायुतीचीही मोट बांधली. पण ते आज हयात असते, तरीही विधानसभेसाठी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू झाली असती. पायातील बळ वाढल्यावर कोणाच्याही आधाराने चालण्याची गरज नसते आणि काही काळासाठी घेतलेल्या ‘कुबडय़ा’ फेकूनच द्याव्या लागतात, हा निसर्गनियमच आहे. गेल्या काही वर्षांत भाजपची ताकद वाढल्याने देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे या नेत्यांना आता मुख्यमंत्रिपदाची स्वप्नेही पडू लागली आहेत. त्या दोघांतील सुप्त संघर्ष काही वेळा दिसून येत असून तो निवडणूक काळात तीव्र होण्याचीही भीती आहे. केंद्रात सत्ता मिळाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्याच्या तयारीतअसून त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेकडील काही जागा भाजपला निश्चितच लागतील. या नेत्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीची हमी दिली आहे. भाजपकडे आजच्या घडीलाच किमान २४० प्रबळ उमेदवारांची यादी तयार आहे. लवकरच हे पक्षप्रवेश सुरू होतील. त्यामुळे भाजपला हव्या त्या जागा शिवसेनेने दिल्या नाहीत, तर युती तोडावी लागेल, अशी भाजपची परखड भूमिका आहे. भावनिक बंध जपण्यापेक्षा आता शिवसेनेने व्यावहारिक शहाणपण दाखविण्याची भाजपची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे मात्र लवचीक भूमिका घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यांची तर प्रदेश भाजप नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी नसून ते केवळ राजनाथसिंह व मोदी यांच्याशीच चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांना महायुतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करावे, असा शिवसेनेचा प्रयत्न असून मुख्यमंत्रिपदासाठी भाजपनेही मोर्चेबांधणी केली आहे. मुंडे हयात नसल्याने भाजपमधील सत्तासंघर्ष टाळण्यासाठी मोदी यांच्या नावानेच प्रचार करून निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवावा, ही भाजपची भूमिका आहे. त्यामुळे जागावाटपच नव्हे, तर मुख्यमंत्रिपदावरूनही युतीमध्ये मतैक्य होणे अशक्य आहे. महायुतीतील सहकारी पक्षांच्या जागेच्या मागण्या मोठय़ा असून कोणी किती जागा द्यायच्या हा तिढा सोडविणेही कठीण आहे. भाजपने शिवसेनेची साथ सोडली, तर महायुतीतील अन्य पक्षांना अधिक जागा वाटय़ाला येतील.
या दृष्टीने भाजपने आता नियोजनपूर्वक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सर्व २८८ जागा लढविण्यासाठी राज्यात मेळावेही सुरू झाले आहेत. त्यानिमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांची भूमिका अजमावून व शिवसेनेला खेळविल्यानंतर युती तोडण्यासंदर्भातील भूमिका भाजप जाहीर करणार आहे. वेळ पडल्यास शिवसेनेतील काही आमदारांना फोडण्याची तयारीही भाजपने केली आहे. संघटना वाढविण्याकडे लक्ष दिल्याने आणि राज्यातही सत्तेची चाहूल लागल्याने भाजपची ताकद वाढत चालली आहे. आपला पक्ष वाढविणे हे कोणत्याही राजकीय पक्षाचे स्वाभाविक उद्दिष्ट असते. त्यामुळे भाजपची पुढील वाटचाल त्याच दिशेने होणार असून स्वबळाची मागणी सहजी थोपविता येणार नाही. दीर्घ काळ टिकलेली ही युती लगेच तोडणे शक्य नसल्याने ‘सुयोग्य वेळ व संधी’ पाहण्यासाठी मार्गक्रमणा सुरू आहे.