आधी अडवाणी आणि आता जसवंत सिंह या ज्येष्ठांनी आपल्या ज्येष्ठत्वाचा पुकारा करीत पक्षाच्या पायात पाय घालण्याचा आततायीपणा केला आहे.  असे आत्मप्रौढ ज्येष्ठ अन् पक्षात आयात झालेले बिनबुडाचे आपमतलबी यांना घरचा रस्ता दाखविणेच योग्य ठरते.
एखादा ज्येष्ठ जर त्याचे ज्येष्ठत्व विसरून काम करू पाहणाऱ्याच्या पायात पाय घालून त्याला पाडू पाहात असेल, तर त्याच्या ज्येष्ठत्वाचा मान किती काळ सांभाळायचा हा प्रश्न असतो. अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या निमित्ताने भाजप नेतृत्वाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
निवडणुका आल्या की सगळ्यांचे शहाणपण आणि संयम यांचे बंध सुटतात असे दिसते. लालकृष्ण अडवाणी यांनी गेल्याच आठवडय़ात याचे प्रत्यंतर दिले. आता जसवंत सिंह. भाजपच्या राजकीय तत्त्वज्ञानावर काहींनी अतिक्रमण केल्याचे जसवंत सिंह यांना वाटत असून या अतिक्रमणाचा बंदोबस्त जनतेनेच करावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही, असे नाही. परंतु निवडणुकीत त्यांना हव्या त्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावरच कशी काय त्यांना या अतिक्रमणाची जाणीव झाली, हा प्रश्न आहे. कोणतीही अतिक्रमणे ही उच्चपदस्थांच्या काणाडोळ्यामुळेच होतात, हे जसवंत सिंह यांना अर्थातच ठाऊक असणार. इतके दिवस भाजपतील उच्चपदस्थांत जसवंत सिंह यांची गणना होत होती. तेव्हा या अतिक्रमणाकडे आपल्याकडूनही दुर्लक्ष झाले किंवा काय हा प्रश्न जसवंत सिंह यांनी स्वत:स विचारायला हवा. त्याचबरोबर हे कथित अतिक्रमण रोखण्यासाठी आपण काय करीत होतो, याचेही उत्तर त्यांनी द्यावे. वस्तुस्थिती ही आहे की काळाच्या ओघात नैसर्गिकपणे ज्येष्ठता वाढत जात असताना अनेकांचा गंडही मोठय़ा प्रमाणावर वाढतो. हा गंड कुरवाळणारे या ज्येष्ठांना मग आवडू लागतात. मग तो राजकीय पक्ष असो वा अन्य कोणतेही आस्थापन. केवळ वयानुसार येणाऱ्या ज्येष्ठतेस मान देत, त्यांच्या गंडाचा सत्कार करण्याने पक्ष वा अन्य कोणतेही आस्थापन वाढत नाही. हे या ज्येष्ठांना मंजूर नसते. परिणामी व्यवस्थेचे प्रवाहीपण जपण्यासाठी या ज्येष्ठांना बाजूला करून पुढे जाण्यास पर्याय नसतो. भाजपत हे होत असेल तर त्यात काही अयोग्य आहे, असे नाही. राजस्थानात भाजपची सत्ता येण्यात वा प्रसार होण्यात जसवंत सिंह यांचा काहीही वाटा नव्हता. असलाच तर तो उलट वसुंधरा राजे यांच्या पायात खोडा घालण्यापुरताच. राजे यांनी जिवाचे रान करून राजस्थानात काँग्रेसचे अशोक गेहलोत यांच्याकडून सत्ता खेचून आणली त्या वेळी जसवंत सिंह आपल्या ऑक्सफर्डी इंग्रजी शैलीत रुसून बसले होते. तेव्हा पुढे तिकीटवाटपात वसुंधरा राजे आणि भाजपमधील प्रचलित सत्ताकेंद्रांनी सिंह यांची उमेदवारी कापली असेल तर तो राजकारणाचाच भाग झाला. एखादा ज्येष्ठ जर त्याचे ज्येष्ठत्व विसरून काम करू पाहणाऱ्याच्या पायात पाय घालून त्याला पाडू पाहात असेल, तर त्याच्या ज्येष्ठत्वाचा मान किती काळ सांभाळायचा हा प्रश्न असतो. अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या निमित्ताने भाजप नेतृत्वाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हे झाले या पक्षात असलेल्या ज्येष्ठांबद्दल.
त्याच वेळी भाजप सध्या चर्चेत आहे तो अन्य क्षेत्र वा पक्षांमधून आयात केल्या जाणाऱ्या ज्येष्ठांबद्दलही. निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग हे अलीकडेच या पक्षात आले आणि लगेच त्यांना उमेदवारी देण्यात आली. जनरल सिंग हे कोणत्याही आदरणीय कारणासाठी ओळखले जातात असे नाही. एखाद्या दुय्यम नटीस अन्य कोणत्याही बाबींपेक्षा स्वत:चे वयच जसे महत्त्वाचे असते तसे या जनरल सिंग यांचे आहे. ते लढले ते स्वत:चे चोरलेले वय राखण्यासाठी. निवृत्तीनंतर अण्णा हजारे ते बाबा रामदेव अशा सर्वच बिनबुडाच्या मंडळींसमवेत ते बारा घरचे पाणी पिऊन आले. अशा उपद्व्यापी आणि आत्मकेंद्री व्यक्तीला उमेदवारी देऊन भाजपने काय साधले? तेव्हा त्यांच्या उमेदवारीविरोधात संबंधित मतदारसंघातील निष्ठावान भाजपवाल्यांनी निदर्शने केली असतील तर ते अयोग्य कसे म्हणणार? वास्तविक भाजपत सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या मुळाशी मूळचे आणि आयात केलेले हे कारण आहे. पक्ष विस्तारत असताना अनेक नवनवे घटक त्यात सहभागी होत असतात. ते किती सहभागी करू द्यायचे याचा निर्णय पक्षाने त्याच वेळी करावयाचा असतो. तसा तो केला नाही तर पुढे ही आयातसेना डोकेदुखी बनते. याचे साधे कारण हे की ही आयाती मंडळी येतात ती काही त्यांना पक्षाचे तत्त्वज्ञान वा विचारसरणी मंजूर असते म्हणून नव्हे. स्वत:च्या प्रतिमेस कोणता पक्ष न्याय देऊ शकेल याचे तत्कालीन उत्तर शोधून त्यानुसार या मंडळींचे येणेजाणे सुरू असते. उदाहरणार्थ माजी नोकरशहा एन के सिंग वा अभिनेता शत्रुघ्न सिन्हा वा पत्रकार एम जे अकबर. सिंग हे एके काळी नितीशकुमार यांच्या प्रेमात पडले, त्यांच्यावर आणि एकूणच बिहारच्या बदलावर त्यांना पुस्तक लिहावेसे वाटले आणि ज्या वेळी नितीशकुमार यांनी त्यांची राज्यसभेची फेरउमेदवारी कापली त्या वेळी त्यांना नितीशकुमार काहीही कामाचे नाहीत याचा साक्षात्कार झाला आणि भाजपच्या प्रेमाचे भरते आले. शत्रुघ्न सिन्हा यांचेही तसेच. कलावंत म्हणून ते किती भुक्कड होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु बिहारात भाजपला जेव्हा काहीही स्थान नव्हते तेव्हा हा पोकळ बिहारी बाबू पक्षाच्या कामाला आला आणि त्यालाही गरज असल्याने भाजपने त्याला आपले म्हटले. आता बिहारात पक्ष वाढीला लागलेला असताना या फालतू बिहारी बाबूला कुरवाळण्यात भाजप नेतृत्वाला स्वारस्य राहिले नाही. तेव्हा लगेच सिन्हा यांनी पक्षावर दुगाण्या झाडण्यास सुरुवात केली. तेव्हा पक्षविस्ताराची गरज आहे हे मान्य केले तरी भाजपने आपण कोणत्या लोकांना जवळ करीत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार एम जे अकबर यांना निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश देऊन भाजपने ही गरज अधोरेखित केली आहे. वर्तमानपत्रीय लिखाणातील हा अकबर राजकीय संधिसाधूपणा आणि कार्यालयीनोत्तर ‘उद्योगा’त नको इतका बिरबल आहे. अकबर हे बिहारमधून काँग्रेसचे खासदार होते आणि राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांत त्यांची गणना होत असे. राष्ट्रउभारणीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे त्या वेळी अकबर यांनी सांगितले होते. आज भाजपत प्रवेश करताना अकबर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रउभारणीच्या कार्यात झोकून देण्याची गरज व्यक्त केली. तेव्हा मधल्या काळात त्यांच्या राष्ट्रउभारणी प्रकल्पाचे काय झाले, हा प्रश्न पडू शकतो. अकबर यांच्याकडे आता भाजपचे प्रवक्तेपद दिले जाणार आहे म्हणे. याआधी त्यांनी काँग्रेसचे प्रवक्तेपण सांभाळले होतेच. तेव्हा ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी हे अर्थातच अकबर यांना माहीत असणार. कदाचित पुढेमागे मोदी यांचे माध्यम सल्लागारपद त्यांना दिले जाणारच नाही असे नाही. आपले निधर्मीपण मिरवण्याची तेवढीच मोदी यांना संधी! वास्तविक पत्रकार हा सल्लागार असल्यास काय होते याचे जिवंत आणि धगधगीत उदाहरण मोदी यांच्यापुढे अडवाणी यांच्या रूपाने आहे. तरीही ते तीच चूक करणारच नाहीत, असे मानायचे काहीही कारण नाही. कदाचित अकबर यांच्या भाजपागमनाने मूळ भाजपवासी माध्यमवीर आणि हे नवागत माध्यमवीर यांच्यात नवा संघर्ष सुरू होऊ शकतो. भाजपची सत्ता आल्यास त्या पक्षाची तळी उचलू पाहणाऱ्या या तळीरामांतील स्पर्धा हे मनोरंजनाचे आगामी आकर्षण ठरावे.  खरे तर जसवंत सिंह असोत, अडवाणी वा शत्रुघ्न सिन्हा वा एन के सिंग वा अकबर, या सगळ्यांच्या शिळ्या कढय़ांनासुद्धा ऊत येऊन ग्ेालेला आहे आणि त्यांचे उष्टी पातेली खरवडणे सुरू आहे. खरे तर या सर्वाना घरी पाठवायला हवे. वृद्धत्वी तारुण्य जपण्याच्या त्यांच्या या जरठकौशल्याकडे पाहून कै. गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदेची आठवण यावी. अशा लोलुप वृद्धांकडे पाहून शारदा म्हणते : जन खुळावले, सकल उलट चालले.. लग्न करिती जरठ जीर्ण अविवाहित फिरती तरुण.. जन खुळावले. आपल्याला याचाच प्रत्यय सध्या येतो आहे.