भारतात अमाप तयार होणारा काळा पैसा स्विस बँकेत नाही. तो येथेच भारतीय मातीत पेरला गेला असून त्या काळ्या पैशाच्या विषवल्लीस आज उत्तुंग इमारतींची फळे लागली आहेत. शिवाय, स्वित्झर्लंडखेरीज काही अन्य देशांतील शून्यव्याज बँकांत पैसा साठवता येतोच.. मग अवघ्या तीन स्विस बँकांतील भारतीय खात्यांची माहिती मिळणार, म्हणून हुरळण्याचे कारण काय?

भारतीय राजकारण आणि समाजकारणात ज्या काही बावळट अंधश्रद्धा आहेत, त्यातील एक म्हणजे स्विस बँकेतील काळा पैसा. भारतीय उद्योगपती, धनदांडगे, विशेषत: राजकारणी, हे भ्रष्टाचार करतात आणि त्यातून निर्माण झालेला काळा पैसा स्विस बँकेत जाऊन भरतात, असे सर्रास सरसकटपणे सर्वाना वाटते. असे ज्यांना वाटते त्यांना मुळात काळा पैसा म्हणजे काय, याचेच आकलन झालेले नसते. त्यातील बऱ्याच जणांना हा काळा पैसा पोत्यात भरून तिकडे स्विस बँकेत पाठवला जातो, असे काहीसे भास होत असतात. या असल्या निराधार समजांना बळकटी दिली गेली ती अण्णा हजारे आणि त्यानंतर बाबा रामदेव यांसारख्या तद्दन भंपक मंडळींकडून. अण्णा काय वा बाबा काय, त्यांचे त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रांतील कार्य मोठे नाही असे त्यांचे विरोधकही म्हणणार नाहीत. ग्रामस्वराज्य, व्यसनमुक्ती आदीबाबत अण्णा हजारे यांनी जी चळवळ चालवली त्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. या अशा कार्यातून एक प्रकारचे नैतिकतेचे वलयही त्यांच्याभोवती निर्माण झाले. तीच गोष्ट बाबा रामदेव यांची. खरे तर योगाची लोकप्रियता बाबा रामदेव यांच्या आधीही होती. परंतु तोपर्यंत योगसाधना ही लब्धप्रतिष्ठितांसाठी होती. अत्यंत सुखवस्तू आयुष्यामुळे शरीराच्या गुरुत्वमध्याच्या परिघात जे काही चरबीचे थर जमा होतात त्यांचे काय करायचे या गहनगंभीर प्रश्नाच्या विवंचनेत रात्रंदिवस बिछान्यावर तळमळणाऱ्यांच्या तृप्त जिवास शांतता लाभावी यासाठी त्यांना योगक्रियेचा मार्ग दाखविला जात असे. त्यात महर्षी महेश आदींनी योग परदेशात नेला. त्यामुळे १९९१ च्या माहिती-तंत्रज्ञान क्रांतीच्या लाटेवर आरूढ होत जी काही नवभारतीयांची तरुण पिढी अर्थार्जनासाठी परदेशात गेली त्यांचा योगाशी परिचय साहेबाच्या भूमीत आणि भाषेत झाला. भारतीय मातीतील योग साहेबाच्या भूमीत विसावल्यावर योगा होतो आणि त्यामुळे भारतात शीर्षांसनास नाके मुरडणारा हा वर्ग परदेशात गेल्यावर इंग्रजीत आनंदाने हेडस्टँड म्हणत खाली डोके वर पाय करू लागतो. बाबा रामदेव यांचे मोठेपण हे की त्यांनी या योगास उच्च आणि अतिउच्च मध्यमवर्गीयांच्या लिव्हिंग रूम्समधून चाळीचाळींत आणले आणि खपाटीला गेलेल्या पोटांनाही स्नायू गरगरा फिरवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यात त्यांचा वेश भगवा. या वेशातील शर्विलकालाही प्रणाम करण्याची आपली संस्कृती. त्यामुळे बाबा रामदेव हे कमालीचे लोकप्रिय झाले आणि कपालभाती आदी क्रिया आपल्याला न जमल्यास हा मानवजन्म व्यर्थ आहे, अशी धारणा मूढजनांची झाली. या योगिक क्रांतीचे श्रेय निर्विवाद बाबा रामदेव यांचे. या त्यांच्या कार्याबद्दल आम्ही त्यांना शीर्षांसनवंदन करण्यास तयार आहोत. परंतु म्हणून त्यांनी अर्थशास्त्र सांगू नये. पण ते नेमके तेच करू लागले. त्यांनीही अण्णा हजारे यांच्या सुरात सूर मिसळत स्विस बँकेतील काळा पैसा परत आणण्याची मागणी सुरू केली. शक्य असते तर या बाबा आणि अण्णांनी आपल्या काही दोन-पाच कार्यकर्त्यांना स्वित्र्झलडदेशी धाडून तेथील बँकांत पैसे काढण्याचा अर्जही भरला असता. एखाद्या सहकारी बँकेतील आपल्या खात्यातून पैसे काढणे काय आणि स्विस बँकेतून पैसे काढणे काय. दोन्ही एकच. तेव्हा या बाबांचे म्हणणे असे की भारत सरकारने स्विस बँकेतील खात्याखात्यांत धरणातील गाळाप्रमाणे साचलेला काळा पैसा मोठमोठय़ा पेटाऱ्यांतून भारतात आणावा आणि जनतेच्या सर्व आर्थिक विवंचना मिटवाव्यात. वास्तविक उत्तर प्रदेशातील आपल्या योगाश्रमास लागू असलेला कर न भरून आपणही काळ्या पैशाच्या निर्मितीस हातभार लावीत असतो, याचा सोयीस्कर विसर योगाचार्य बाबा रामदेव यांना पडतो, हा भाग वेगळा. कदाचित आपल्याला कर भरावा लागू नये यासाठीच स्विस बँकांतील काळा पैसा येथे आणावा असेही त्यांच्या योगिक मनास वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारणे काहीही असोत. अण्णा, बाबा यांच्यासारख्या देशभक्तांची तळमळ अखेर स्विस सरकारला जाणवली आणि आपल्या बँकेतील काळा पैसाधारकांची नावे आपण भारत सरकारला देऊ, असे त्यांच्यातर्फे सांगण्यात आले. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या अंधo्रद्धाळूस अपचनाचा विकार जडल्यास कथित वास्तुगुरू घरातील स्वच्छतागृहाची दिशा बदलण्यास सांगतो आणि तशी ती बदलल्यावरही आपली पोटदुखी कायम असल्याचा प्रत्यय त्या रुग्णास येतो, तसेच या काळ्या पैशाबाबतही होणार आहे, यात तिळमात्रही शंका नाही.    
याचे कारण भारतात अमाप तयार होणारा काळा पैसा स्विस बँकेत नाही. तो येथेच भारतीय मातीत पेरला गेला असून त्या काळ्या पैशाच्या विषवल्लीस आज उत्तुंग इमारतींची फळे लागली आहेत. आजमितीला कोणताही किमान बुद्धीचा काळा पैसाधारक स्विस बँकेत पैसे ठेवावयास जात नाही. तो जातो असे ज्यांना वाटते, त्यांना अज्ञानातील सुखाची अनुभूती घेऊ देण्यास काहीच हरकत नाही. परंतु ते वास्तव नाही. स्विस बँकांतील ठेवींवर व्याजदर शून्य असतो. तेव्हा आपली काळी संपत्ती आल्प्स पर्वताच्या हिमराजीत कुजवण्यापेक्षा भारतात तिच्यावर आधारित इमले उभे करण्यास हे काळा पैसाकार प्राधान्य देत असतात. खेरीज, मॉरिशस, लिचेस्टाईन आदी प्रदेशांतील करशून्य व्यवस्थेचा लाभ घेत हा काळा पैसा राजमान्य मार्गाने अधिकृतपणे पांढरा होऊन पुन्हा भारतात येतो. त्यावर आपले नियंत्रण नाही. पूर्णाशाने असूही शकत नाही. तेव्हा हा पैसा केवळ स्विस बँकांतून ठेवला जातो, असे मानणे केवळ अज्ञांनाच जमणारे नाही. तरीही या स्विस बँकांचा धोशा लावला जात असून अशा मंडळींच्या समाधानासाठी समजा स्विस सरकारने अशी खाती जाहीर जरी केली तरी ती १०० टक्के धूळफेक असेल. मुळात स्विस कायद्यानुसार आपल्या खातेधारकांची ओळख उघड करणे त्या देशातील बँकांवर बंधनकारक नाही. तरीही बाबा आणि अण्णांच्या नैतिक तेजाने डोळे दिपून त्यांनी हा तपशील जरी जाहीर केला तरी त्यात काहीही तथ्य असणार नाही. कारण अशा प्रकारचा पैसा काही कोणाच्या नावावर ठेवला जात नाही. तेव्हा जी काही नावे जाहीर होतील आणि त्यांच्या रकमांचा जो काही तपशील असेल तो क्षुल्लक म्हणावा इतकाच असेल. याचे साधे कारण असे की आता जी काही मागणी केली जात आहे, त्याप्रमाणे माहितीचा पुरवठा करण्याचे सरकारने मान्य जरी केले तरी ती मागणी तीन स्विस बँकांनाच लागू होईल. या तीन स्विस बँकांखेरीज करशून्य देशात अशा अनेक बँका असून अशा प्रत्येक बँकेमधील खात्यांचा तपशील घेत बसणे सरकारला शक्य नाही. तेव्हा ज्यांना या काळ्या पैशाबाबत खरोखरच आच आणि चाड आहे, त्यांनी ती देशांतर्गत व्यवस्थेत तयार होणाऱ्या काळ्या पैशाविषयी दाखवावी. भारतातील बांधकाम व्यवसायात तयार होणाऱ्या काळ्या पैशास सरकार कसा आळा घालणार, यातील अनेक कंपन्यांच्या उलाढालीत वर्षांवर्षांला काही शतकी टक्क्यांची कशी वाढ होते हे प्रश्न या संदर्भात उपस्थित व्हायला हवेत. परंतु अण्णा आणि बाबा याबाबत बोलत नाहीत. या त्यांच्या मौनामागे असे काही बिल्डर्स नसतील असे छातीठोकपणे सांगता येणार नाही.
याचा अर्थ इतकाच की आपल्या भूमीत तयार होणारा काळा पैसा आपल्याच भूमीत जिरवला जात असून काळ्या पैशाची ही जिरायती शेती कशी रोखायची याची चिंता या मंडळींनी वाहायला हवी. ते न करता उगाच काळ्या पैशाच्या नावाने स्विस खुळखुळा वाजवण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे दोन घटका मनोरंजन तेवढे होईल. हाती काहीही लागणार नाही.