मुंबईत कुतूहल कशाबद्दल वाटलं, मुंबईचे अनेक स्तर पाहताना इतिहासाचे, साहित्याचे आणि लोकचळवळींचे संदर्भ कसकसे महत्त्वाचे ठरले याची ही गोष्ट. एक इंग्रजी कवयित्री आणि एक ब्रिटिश छायाचित्रकार यांनी मेहनतपूर्वक सांगितलेली. इतकंच कुतूहल सर्वाना असतं आणि संदर्भ उलगडत बसायला वेळ नसतो, ते काम वाचकांसाठी या पुस्तकानं केलं आहे.
मुंबईबद्दलची सचित्र, मोठी कॉफीटेबल पुस्तकं म्हटलं की पहिल्यांदा ‘बॉम्बे द सिटीज विदिन’ (शारदा द्विवेदी/ राहुल मेहरोत्रा) आठवतं, ‘फ्रॉम बॉम्बे टु मुंबई’ किंवा अन्य पुस्तकं आठवतात.. या अन्य पुस्तकांमध्ये ख्रिस्टोफर लंडन यांच्या ‘बॉम्बे गॉथिक’पासून आयेशा तल्यारखानांचं ‘बॉम्बे बाल्कनीज’, नवीन रामाणींचं ‘बॉम्बे आर्ट डेको’ ही पुस्तकं मुंबईच्या एकेका वास्तुरचना-वैशिष्टय़ांचा अभ्यास करणारी आहेत. मुंबईविषयीचं गद्य म्हटलं की ‘मॅग्झिमम सिटी’, जीत थायिलचं ‘नॅक्रोपोलीस’ किंवा नायपॉलांची ‘मिलियन म्यूटिनीज’मधली प्रकरणं आठवतील, कल्पना शर्माचं ‘धारावी’ आठवेल.. गेल्या दशकात ‘१०० ईयर्स, १०० व्हॉइसेस : अ‍ॅन ओरल हिस्टरी ऑफ द मिलवर्कर्स ऑफ गिरणगाव’ हे नीरा आडारकर आणि मीना मेनन यांचं पुस्तक आलं, पुढे नीरा आडारकरांनी चाळींविषयी निराळं पुस्तक लिहिलं.. त्याखेरीज ‘पुकार’, ‘उड्री’ अशा संस्थांची वार्षिक प्रकाशनं असतातच. मग आता आणखी एक पुस्तक मुंबईबद्दलच कशाला? त्या पुस्तकाचा फोटोग्राफर परदेशी आणि लेखिका एक दक्षिण मुंबईत राहणारी कवयित्री! ही इंग्रजी कवयित्री.. हिला मुंबईशी देणं-घेणं काय? झोपडपट्टय़ांचं किंवा गरिबांचं तोंडदेखलं कौतुकच करणार की काय ही? ही काय निराळं सांगणार?
वाचकांना पडणाऱ्या याच प्रश्नांचा शोध जणू, लेखिका प्रिया सारुक्काइ-छाब्रिया आणि छायाचित्रकार ख्रिस्टोफर टेलर यांनी एकत्रितपणे घेतला आहे. त्यासाठी दोघांनी केलेल्या कामाचं स्वरूप काहीसं पत्रकारासारखं आहे. दोघेही पत्रकार नसूनसुद्धा!
ख्रिस्टोफर टेलर हे चाळिशीतले, पण स्वत:पेक्षा दुप्पट वयाचा एक रोलिफ्लेक्स कॅमेरा घेऊन मुंबईत नव्वदच्या दशकात पहिल्यांदा आले. ते ब्रिटिश, राहतात फ्रान्समध्ये (‘पत्नी प्रोफेसर आहे तिथं, आणि मी पॅरिसला सलूनमध्ये काम करतो पैशांसाठी,’ असं ख्रिस्टोफर यांनी त्यांच्या पहिल्या मुंबई-भेटीत सांगितलं होतं).. भारतातल्या ‘ब्रिटिश वास्तुवारशा’चे फोटो टिपणं हा त्यांच्या पहिल्या भारतभेटीचा उद्देश होता (सोबतचं, ‘फ्रीमेसन हॉल’चं छायाचित्र पाहा) पण मुंबईचं ‘मुंबईपण’ त्यांना दिसत राहिलं आणि उद्देशच बदलून गेला. त्या बदललेल्या उद्देशानं माणसांचे, त्यांच्या आयुष्यांचे फोटो ते टिपत राहिले, तेव्हा त्यांना प्रिया सारुक्काइ-छाब्रिया भेटल्या. दोघं बोरिवलीपर्यंत भरपूर फिरले आणि पुस्तक तयार झालं.
प्रिया यांच्या लिखाणात आम्ही कसे फिरलो, कोण भेटलं याची वर्णनं आहेत. दक्षिण-मध्य मुंबईच्या इतिहासाचे जाणकार रफीक बगदादी, शिवाजी पार्कला राहणाऱ्या स्मिता कुडवा यांच्यासह ते-ते भाग पाहतानाची संभाषणंही आहेत. त्यापेक्षा मोठं वैशिष्टय़ असं की, आधीच्या अनेक लिखाणांचे पुस्तकी संदर्भ प्रिया यांनी भरपूर वापरले आहेत, वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. सआदत हसन मण्टो हा उर्दू लेखक आणि अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ हे मराठी कवी मुंबई कशी पाहतात, हे कवयित्री म्हणून प्रिया यांना माहीत आहे. ढसाळांच्या ‘मुंबई, माझ्या प्रिय रांडे..’ या कवितेच्या यापूर्वीच झालेल्या इंग्रजी अनुवादातली दोन कडवी इथं आहेत. हे करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी चळवळ, दलित पँथर, दलित साहित्य, ‘अस्मितादर्श’, गंगाधर पानतावणे या सर्वाचे उल्लेख येतात. मध्य मुंबईकडे पाहण्यासाठी हे संदर्भ उपयोगी आहेत, असं लेखिकेला प्रामाणिकपणे वाटतं आहे. एखाद्या अभ्यासू मुलीनं तपशीलवार, सुसंगत अभ्यास करून निबंध लिहावेत, तसं हे वाटू शकेल. तरीही, संदर्भ बरेच आहेत आणि वरळीबद्दल लिहिताना ‘आचार्य प्रल्हाद केशव’ (अत्रे नाहीच!) अशा उल्लेखाची एखादी चूक वगळता ते बरोबरही आहेत.
लोकांच्या इतिहासाला आकार देणारे हे जे संदर्भ या पुस्तकात आहेत, त्यामागे आता कुठलीच कळकळ, कुठलीच लोकवादी भूमिका उरलेली नाही. राजकारणासाठी अधूनमधून या संदर्भाचा वापर होतो. पण एरवी या साऱ्या संदर्भाच्या संगतीतलं औचित्य हरवलेलंच आहे, त्यामुळे एकटय़ा प्रिया सारुक्काइ-छाब्रिया यांना दोष देण्याचं कारण नाही. पण हे पुस्तक का लिहिलं आहे?
लिखाण आणि चित्रं यांचा एकत्रित परिणाम पानोपानी होत राहतो. आपले मुंबईकर छायापत्रकार (फोटोजर्नालिस्ट) जशी टिपतात, तशीसुद्धा काही चित्रं आहेत. लोक टिपणं, हे ख्रिस्टोफर यांचं बलस्थान नव्हे. ते रचनाच (कॉम्पोझिशन्स) चांगल्या टिपतात. ख्रिस्टोफर टेलर यांनी टिपलेली उत्कृष्ट रचनाचित्रं, हे या पुस्तकाचं वैशिष्टय़ आहेच. शिवाय, ‘कमळं विकणारा अमित जाधव’ यांसारखी छायाचित्रं टेलर यांनी मुंबईत केलेल्या मेहनतीची निदर्शक ठरली आहेत. कॅमेऱ्यामागे ‘परका -फिरंगी’ माणूस आहे, याचा परिणाम छायाचित्रातल्या माणसांवर झालेला अधूनमधून दिसत राहतो. ‘गणपती घडवणारे रमेश पाटील’ या छायाचित्रात गणपतीची मूर्ती साईबाबांच्या रूपातली आहे. हे साईबाबा कोण, ते सांगण्यासाठी मागे कॅलेंडर आहे. कॅलेंडरवरलं मोठ्ठं नाव एका देशी दारूच्या कंपनीचं आहे आणि हे कॅलेंडर बहुधा मुळात तिथं नसावं.. ते कुणी तरी हातात धरून फोटोग्राफरला दाखवलंय!
मुंबईचा इतिहास अधूनमधूनच या पुस्तकात डोकावत राहातो, मात्र बॉलीवूडचं अधोविश्वच ठरेल असं ज्युनिअर आर्टिस्टांचं जग या पुस्तकातून पुढे येतं. एडवर्ड थिएटरसारखी म्हातारी चित्रपटगृहं टिपणारं हे पुस्तक गोरेगावातल्या मॉलपर्यंत पोहोचतं, ‘लॅटिन अमेरिकन पद्धतीचे नाच मुंबईत शिकवणारा माणूस संदीप सोपारकर’, ‘कुठल्याही गोष्टीवर सोन्याचा वर्ख लावून देणारे ‘गोल्डलीफिंग स्टुडिओ’ मुंबईत निघाले आहेत’ अशी एरवी तृतीयपर्णी ठरणारी माहितीसुद्धा पुस्तकात आल्यामुळे मुंबईकर धनिकांच्या खुशालचेंडूपणाचा नवा इतिहास टिपतं. मुंबईचा पैसा, समुद्र, वाहतूक व्यवस्था यांवर स्वतंत्र प्रकरणं आहेत.. अखेरचं प्रकरण बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावरलं आहे.
कुठलाच राजकीय-सामाजिकच काय पण आर्थिक आणि व्यावसायिकही हितसंबंध नसताना, केवळ लेखकीय कुतूहलापायी हे पुस्तक लिहिण्यात आल्याचं अनेक  वेळा जाणवतं. लेखिका ‘मैत्रिणीच्या लिमोझिनमधून उतरून स्टेशनवर जाते’ हा प्रसंग तर लेखकानं लिहिण्याआधी काय काय केलं पाहिजे, याबद्दलची तिची भूमिकाही सांगून जाणारा आहे. स्वत:वर प्रयोग करणं, अनुभव घेणं आणि आधीचे संदर्भ कोळून पिणं, अशी लेखिकेची कार्यपद्धती दिसते.
मुंबईत कुतूहल कशाबद्दल वाटलं, मुंबईचे अनेक स्तर पाहताना इतिहासाचे, साहित्याचे आणि लोकचळवळींचे संदर्भ कसकसे महत्त्वाचे ठरले याची ही दोघांनी सांगितलेली गोष्ट. पण इतकंच कुतूहल सर्वाना असतं आणि संदर्भ उलगडत बसायला वेळ नसतो, ते काम वाचकांसाठी या पुस्तकानं केलं आहे.
पुस्तक का लिहिलं आहे, याचं एक उत्तर पुस्तकाच्या उप-शीर्षकातून मिळतंच : इमर्शन्स! विसर्जन.. याचा संबंध मिरवणुकांशी नसून, मुंबई कशाकशाचं विसर्जन करायला तयार होती आणि यापुढेही कशाकशाची विसर्जनं होऊ शकतात, याच्याशी आहे.
मुंबई हे ‘आपल्या कामाशी काम’ या न्यायानं वागणाऱ्या माणसांचं शहर असूनही इथं प्रत्येक थरातल्या माणसाला अन्य कोणत्याही थरांतल्या माणसांशी वागणं भागच पडतं.. त्यामुळे सर्व थरांना केवळ सामावून न घेता, त्या थरांना एकमेकांत मिसळायलाच लावणारं शहर ही मुंबईची ओळख आहे. ती थोडय़ाफार प्रमाणात आजही कायम आहे. पण या आर्थिक सहजीवनाचं अवडंबर मुंबईबद्दल लिहिताना माजवलं जातं. गेल्या काही महिन्यांत वॉल स्ट्रीट जर्नलमधल्या एका मुंबईविषयक लेखात  ‘प्रादा या डिझायनर ब्रॅण्डचे कपडे मिरवणाऱ्या महिलादेखील इथे रस्त्याकडे उसाचा रस पितात’ असं वर्णन होतं. हे लिखाण अतिरंजितच म्हणावं लागेल आणि एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकात तरी, मुंबईतला वरचा थर खालच्यांना भरडणार अशीच चिन्हं दिसली आहेत, ती दुसऱ्या दशकातही कायम आहेत. अशा वेळी या थरांचा विचारच न करता अगदी पातळ पापुद्रे पाहत राहण्याचा मार्ग स्वीकारणारं, अत्यंत अनाग्रहीपणे मुंबईचे केवळ पापुद्रेच पाहणारं हे पुस्तक आहे.
मुंबई प्रत्येक मराठी माणसाला परिचित आहेच आणि त्यामुळे ती आपलीही आहेच, पण मुंबई अनेकांची कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक मराठी वाचकांनाही उपयुक्तच ठरेल.
ख्रिस्टोफर टेलर यांची या पुस्तकातील काही छायाचित्रे – धारावीतील झोपडी (खाली), मूर्तिकार रमेश पाटील  (शेजारी), फ्रीमेसन हॉल  (मध्यभागी), फॉकलंड रोड  (पुस्तकाच्या मुखपृष्ठालगत) आणि भुलेश्वरमधील फ्रेमवाल्याचे दुकान  (वर, उजवीकडे)

बॉम्बेमुंबई- इमर्शन्स : प्रिया सारुक्काइ-छाब्रिया  
ख्रिस्टोफर टेलर
प्रकाशक : नियोगी बुक्स, नवी दिल्ली,
पाने : २७८, किंमत : १४९५ रुपये.