औद्योगिक क्षेत्रामुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. स्वच्छ हवा, पर्यावरण, स्वच्छ पाणी हे वातावरण आणि माणसाचे मूलभूत अधिकार हिरावले जात आहेत. पैशांच्या हव्यासापायी उद्योगजगत पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत असून हे आताच आटोक्यात आणले नाही तर ही वसुंधरा धोक्यात येईल.. अशी मांडणी साधारणपणे कोणी करू लागला तर आपण डोळे झाकून म्हणू की हा कोणी पर्यावरणवादी कार्यकर्ता दिसतो.. निव्वळ उद्योगांना-विकासाला विरोध.. आपण काही करायचे नाही आणि कोणी काही करत असेल तर नकारात्मक सूर लावायचा.. पण नाही. ही सारी मांडणी केली आहे, ती संपत्तीच्या निर्मितीत गुंतलेल्या एका कॉपरेरेट धुरीणाने. विकासदराच्या टक्केवारीचा आलेख, ‘फोर्ब्स’सारख्या यादीतील ‘नंबर रेस’ यातच गुंतलेल्या आणि पर्यावरण, निसर्गाच्या चर्चेला तुच्छतेने उडवून लावणाऱ्या तथाकथित भांडवलशाहीवाद्यांना गदागदा हलवण्याचे काम पवन सुखदेव या ‘कॉपरेरेट लीडर’ने केले आहे.
काय बोलले जात आहे, यापेक्षा कोण बोलत आहे यावरून मूल्यमापन करण्याची सवय असलेल्या जगात पवन सुखदेव यांचे ‘कॉपरेरेशन २०२०- ट्रान्सफॉर्मिग बिझनेस फॉर टुमारोज वर्ल्ड’ हे पुस्तक म्हणजे सोनारानेच कान टोचावेत या म्हणीचा प्रत्ययच.
२०१० मध्ये मेक्सिकोच्या आखातात तेल उत्खननाचे काम सुरू असताना भयंकर अशी तेलगळती झाली. तो अपघात नव्हता, पैसे वाचवण्यासाठी उत्खनन प्रक्रियेतील नियमांत सवलत देण्यात आली. परिणामी, तेलगळती झाली तेव्हा २० कोटी ६० लाख गॅलन तेल चोहीकडे पसरले. समुद्रकिनारे, मासे, वस्त्या, खाडी सारी तेलाने न्हाऊन निघाली. त्यापोटी बीपी अर्थात ब्रिटिश पेट्रोलियम या कंपनीला २० अब्ज डॉलरचे दावे निकाली काढावे लागले.. ‘सरकार’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक विधान आहे, त्याचा आशय असा- ‘अल्पकालीन लाभासाठी दीर्घकालीन तोटय़ाकडे दुर्लक्ष करू नये’. हाच विचार या पुस्तकातील मांडणीचा गाभा आहे. तेलगळतीच्या घटनेचे उदाहरण हे त्यासाठी पुरेसे बोलके आहे.
आपला विचार मांडताना सुखदेव यांनी मुळात उद्योगसमूह (कॉपरेरेशनच्या) कल्पनेचा आणि संस्थेचा जन्म कसा झाला याचा ऐतिहासिक मागोवा घेतला आहे. त्यासाठी प्राचीन भारत आणि रोमन साम्राज्यातील संदर्भ देत इतिहासातून छान फेरफटका मारला आहे. मौर्यकालीन भारतामधील ‘श्रेणी’ पद्धत आणि रोमन ‘सोसायटेट्स पब्लिकानोरम’ या व्यवस्थांचा परिचय करून दिला आहे. नंतर उद्योगसमूहांचा विकास, भरभराट आणि त्याला आलेले आजचे स्वरूप अशी सारी मुशाफिरी केल्यावर ते उपाययोजनेकडे वळतात.
सुखदेव यांची भाषा अत्यंत सोपी आहे. मांडणी थेट आहे व म्हणूनच प्रभावी आहे. अमुक एका पद्धतीने लिहिले म्हणजे ते शैलीदार होईल, असा आव आणि अविचार नाही.
जगातील वाढते प्रदूषण रोखून वसुंधरा वाचवायची असेल तर येत्या दशकातच युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी केवळ राष्ट्रीय पातळीवर काय करता येईल अशी स्थूलपातळीवर चर्चा करून उपयोगाचे नाही, तर प्रदूषणात मोलाचा वाटा उचलणाऱ्या उद्योगक्षेत्रात त्यासाठी बदल करावे लागतील असा विचार आहे. आमचे लक्ष्य केवळ धंदा करणे आणि पैसा कमावणे या उद्योगजगताच्या मनोवृत्तीत बदल घडवून देश, समाजाचे ध्येय-उद्दिष्ट आणि उद्योगक्षेत्राचे उद्दिष्ट हे एकाच पातळीवर आणावे लागतील, असे परखड आणि आग्रही विवेचन हे या पुस्तकाचे सार आहे.
कारखान्यातून निघणारा धूर, घातक वायू थेट हवेत सोडून दे, रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोड हीच सर्वसाधारण वृत्ती. त्यातून नफ्याची मालकी आमची आणि दुष्परिणामांची मालकी समाजाची असे सध्याच्या औद्योगिक कार्यप्रणालीचे स्वरूप आहे. याला सुखदेव ‘कॉपरेरेट १९२०’ अशी संज्ञा देतात. याच व्यवस्थेने वसुंधरेचा श्वास कोंडला आहे. आता ‘कॉपरेरेशन २०२०’ला हरित अर्थकारणाकडे वाटचाल करायची आहे. हा प्रवास खडतर असला तरी त्या दिशेने वाटचाल करावीच लागणार. त्याचा मार्ग सुखदेव यांनी दाखवला आहे.
या पुस्तकातील प्रकरणे २३५ पानांत संपतात. पुढे संदर्भसूची आहे. मेक्सिकोच्या आखातामधील तेलगळतीबाबत संभाव्य गळती रोखण्यासाठी प्रत्येकी पाच लाख डॉलर असा खर्च असलेली यंत्रणा बसवण्याची नियमांत तरतूद होती. पण ‘ही तरतूद उद्योगांवर अनावश्यक बोजा टाकणारी’ असल्याचे कारण देऊन ती काढून टाकण्यात आली. हे काम ज्या समितीने केले तिचे प्रमुख होते अमेरिकेचे उपाध्यक्ष डिक चेनी. यासारखी पडद्याआडचे सत्य सांगणारी माहिती या सूचीत मिळते. त्यामुळे ती चाळावीच.
उद्योग-व्यवसायातून निर्माण होणाऱ्या संपत्तिनिर्मितीची किंमत काय? पर्यावरणावर-समाजावर होणाऱ्या परिणामांचे काय आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी व्यावहारिक पातळीवर काय निर्णय घ्यावे लागतील याची चर्चा आणि मार्गदर्शन या पुस्तकात आहे. त्यामुळेच ‘टु टुडेज स्टुडंट, टुमारोज कॉपरेरेट लीडर्स, धिस इज युअर बुक मेक इट हॅपन’ ही अर्पणपत्रिका सार्थ आहे. म्हणूनच ‘उद्योग समूहांची मानसिकता बदलून, राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक, कायदे-नियमांत बदल करून देश-समाजाचे ध्येय आणि उद्योगक्षेत्राचे ध्येय यांच्यातील द्वैत संपवून ते एकच करण्यासाठी काय करता येईल आणि पर्यावरणपूरक अर्थकारण निर्माण करता येईल याची दृष्टी हे पुस्तक देते’ असा गौरव दस्तुरखुद्द रतन टाटा यांनी पुस्तकाला दोन शब्द लिहिताना केला आहे.