सध्या इंग्रजीत ज्या प्रकारच्या, दर्जाच्या आणि वकुबाच्या कादंबऱ्या प्रकाशित होत आहेत, त्यांचे तीन प्रकार पडतात. चेतन भगत, सौम्या अली वगैरे आणि अमिष त्रिपाठी हे त्यातील अग्रेसर कादंबरीकार. ‘लिली’ या तिन्ही प्रकारांपेक्षा काहीशी वेगळी आहे. वरील प्रकारच्या कादंबऱ्या वाचून कंटाळा आलेला असेल आणि तो घालवायचा असेल, तर या कादंबरीच्या वाटेला जायला हरकत नाही.

भारतीय इंग्रजी कादंबरीची सध्या त्रिमार्गावरून विद्युतवेगी घोडदौड सुरू आहे. पहिलामार्ग कॅम्पस ते कॉलसेंटर या तरुणप्रिय घटकांना आवाक्यात घेणाऱ्या कादंबऱ्यांनी बनला आहे. दुसरा मार्ग प्रेमाच्या सुरस आणि चमत्कारिक कथांरतिबांमधून देशी ‘चिक लीट’ प्रकाराला मजबूत करत आहे. तिसरा मार्ग भारतीय मिथककथांचं जीर्णोद्धारी रूप घेऊन वाचणाऱ्यांचा नवा मजबूत गट तयार करीत आहे. आजघडीला बाजारात दाखल होणाऱ्या शंभरातील नव्याण्णव इंग्रजी कादंबऱ्या या त्रिमार्गापलीकडे जात नसल्या तरी त्यांना अफाट वाचककौल आहे. या साचेबद्ध वातावरणाच्या कोंडीमध्ये नीलेश कुष्टे या मराठी तरुणाची ‘लिली’ कादंबरी चवबदलाचे सुखद आनंदक्षण देऊन जाते. प्रचलित त्रिमार्गाला टाळून रहस्यातिरंजित प्रेमकथा, कॅम्पसगाथा किंवा मिथक जीर्णोद्धाराच्या जवळपासही न फिरकणाऱ्या आणि तत्त्वज्ञानाचा आधार घेणाऱ्या रोमांचक कथेचा नवा आराखडा कुष्टे यांनी तयार केला आहे. या आराखडय़ामधून वाचकाला वेळक्षतीचा मनस्ताप होत नाहीच, तर उलट अतक्र्य अनुभवक्षणांचा लाभ नक्की होतो.
‘लिली’ ही पारंपरिक कथाबद्ध कादंबरी प्रकारात मोडत नाही. यातला काळ हा १९९४ ते ९५ या दोन वर्षांशी निगडित आहे. मुंबई आणि काही प्रमाणात सॅनफ्रान्सिस्को या अमेरिकेतल्या शहरात यातील घटना घडतात. या काळाचा आवाका लक्षात घेतला तर उदारीकरणाची सुफळे देशाच्या सर्वागीण भागात पोहोचली नव्हती. एमटीव्ही, उपग्रह वाहन्यांची तरुण संस्कृती नुकतीच जन्माला येत होती. संगणकाची राक्षसभीती वाटावी इतकी ओळख नसल्यामुळे ई-मेल, सोशल नेटवर्किंग संकल्पना यांपासून प्रकाशवर्षे दूर अशी जगातील सर्वच तरुणपिढी होती अन् या घटकांअभावी सपाट जगाची कल्पनाही कुणी करणं अशक्य होतं असा तो काळ होता. याचबरोबर मुख्यत: आपल्या देशाची या पिढीसारख्या अमेरिकीकरणाची प्रक्रियाही सुरू झालेली नव्हती. त्यामुळे अमेरिकन आणि अमेरिका यांच्याबाबत मनात भव्यतेपलीकडे काही नसण्याच्या काळातील या कादंबरीचा नायक अरविंद आजगावकर जेड हंटर या अमेरिकी तरुणीच्या आयुष्यावर अतिक्रमण करण्याच्या प्रसंगापासून कादंबरीला सुरुवात होते. मुंबईतील गर्भश्रीमंत प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकासक  श्रीकांत आजगावकर यांच्या कुटुंबातील दिव्यरत्न अरविंद हा माणसांची मनं वाचण्याचं अद्भुत कौशल्य घेऊन जन्माला आलेला असतो. नुसतीच माणसांची मनं नाही तर त्यांच्या भूत-भविष्यात डोकावण्याची, योगसिद्धीतून परकाया प्रवेश करण्याची कला त्यानं आत्मसात केलेली असते. जेड हंटर या गौरवर्णी ललनेला बोलता-बोलता तो आपल्या कुटुंबातील सदस्याच बनवून टाकतो आणि त्यानंतर रोमांचकारी घटनांच्या विविध मालिका आणि पात्रांच्या वैविध्यपूर्ण रंगांनी कादंबरीचा आवाका घडवत नेतो.
मराठी कुटुंबाची अमेरिकन तरुणीला आकर्षित करू शकणारी अग्रेसर (फॉरवर्ड) जीवनशैली. जुहू येथील आलिशान व्हिलामधील त्यांचं गर्भश्रीमंत वास्तव्य, मरिन ड्राइव्हसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये चालणारी जारण-मारण विद्या कादंबरीची रंजकता वाढवते आणि क्षणोक्षणी चकित करते. यातील नायक हा विकारविरहित आणि अतिगुणसंपन्न असल्यामुळे फिल्मीशैली घटनांची या कादंबरीत कमतरता नाही. अडचणी आणि त्यावर नायकानं किंवा त्याला लाभलेल्या नायकत्वामुळे समोर येणारे चपखल उपाय, सुरुवातीचे काही प्रसंग ‘चहाच्या पेल्यातील वादळा’पलीकडे मोठे होत नाहीत. अंडरवर्ल्डच्या डॉनची कार्यपद्धती, दोन विकासकांमधील शत्रुत्व आदी प्रसंगांना त्यामुळे आवश्यक तितका विकास मिळत नाही. पण या त्रोटक दोषांना वगळलं तर १९९४-९५ या काळाचं अचूक वर्णन या कादंबरीमध्ये आलं आहे. बॉन जोव्हीच्या गाण्यापासून जन्माला आलेल्या एमटीव्ही-केबल व्यसनाचे सूक्ष्म घटक कादंबरीत डोकावतात तेव्हा लेखकाच्या कालदर्शनाच्या अचूकतेचं कौतुक वाटतं.
या कादंबरीत अरविंद आजगावकर आणि जेड हंटर या दोन तरुणांची प्रेमकथा येत नाही किंवा त्यांनी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी कोंबलेल्या वातावरणाची गर्दी होत नाही. कठोपनिषदापासून गीतेतील तत्त्वज्ञानाला ही कथा एकत्रित करण्याचा प्रयत्न करते. कर्मसिद्धांत, जन्म-मृत्यू, दु:ख आणि सक्ती-आसक्तीचे विविध रंग कादंबरीतून समोर येतात आणि कादंबरीत वाचकाला पुरते आकर्षून घेतात. कादंबरी रंजनासोबत त्यातील तत्त्वज्ञानानं अंतर्मुख बनवण्याचं आणि मनात जन्म-मृत्यू आणि कर्मसिद्धांत यांबाबत असलेली आपली समज विस्तारण्याचं कार्यही करतं. या गोष्टींची आजच्या प्रत्यक्ष जगण्यात कितपत व्यवहार्यता आहे किंवा नाही, याचा ज्याचा त्याने विचार करायला हवा, असं कादंबरीकारानं थेटपणे सुचवलेलं नसलं तरी तसं सूचित होईल याची मात्र काळजी घेतली आहे. मिथककथांच्या आजच्या अनैतिहासिक कादंबऱ्यांच्या काळात आणि कॅम्पस ते कॉलसेंटर या प्रेमकथांच्या गुळगुळीत वेटोळ्यात ‘लिली’ काहीतरी समाधान देऊन जातं, वाचून झाल्यावरही चांगल्या अर्थानं मनात रेंगाळत राहते, ती यामुळेच.
या कादंबरीत नायक-नायिका असले तरी ही प्रेमकथा नाही, यात वैचारिक चर्चा असली तरी ती बोजड नाही, अध्यात्म असलं तरी ते बहकवणारं नाही आणि भाषा ‘तरुण’ असली तरी ती थिल्लर म्हणावी अशीही नाही. एकंदर सगळ्याच गोष्टींमध्ये कादंबरीकारानं ताल आणि तोल साधायचा प्रयत्न केला आहे. ओघवती स्वच्छ व सुस्पष्ट भाषा ही आजच्या इंग्रजी कादंबरीचा अंतर्भूत घटक असला तरी ‘लिली’मधील शिवराळपणातही सभ्यता जपणारी शब्दरचना आवडून जाणारी आहे. वाक्प्रचार, शब्द यांची केलेली गंमतही तरुणांसोबत ज्येष्ठांनाही आवडेल अशी आहे.
पहिल्याच प्रयत्नात या साऱ्या कसरती बऱ्यापैकी जमणं, ही काही साधी गोष्ट नाही. पण त्या या कादंबरीकाराला जमल्या आहेत. त्यामुळे या कादंबरीकाराकडून भविष्यात चांगल्या लेखनाची अपेक्षा करायला हरकत नाही.
प्रसिद्धीच्या तंत्रानं सुमार कादंबऱ्यांनाही ‘बेस्ट सेलर’ शिक्का मिळण्याच्या युगात ‘लिली’सारखी भिन्नमार्गी कादंबरी अप्रसिद्धीमुळे लोकप्रिय होऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. आजच्या प्रवाहातील शंभरातून नव्याण्णव कादंबऱ्या टाळण्याची िहमत असली, तर या कादंबरीच्या वाटेला सुरुवातीलाच जाणं उपयुक्त ठरेल. नव्याण्णवांच्या वाटेवरील प्रवासी असाल, तर चवबदलीचा विलक्षण सुखद धक्का मिळेल, यात शंका नाही.
   

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

लिली : नीलेश कुष्टे,
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,
पाने : २४१, किंमत : २५० रुपये