sam11
ही दोन्ही पुस्तकं छोटेखानी, वाचायलाही सोपी! इतिहासाऐवजी, आजच्या कॉपरेरेट नेतृत्वासाठीही
महत्त्वाच्या ठरतील, अशा गोष्टी सांगणारी..|

यशस्वी कसं व्हावं, उद्योजक कसं बनावं, सुखी आणि शांत आयुष्य कसं जगावं असे आशय असलेली अनेक पुस्तकं दर महिन्यात प्रकाशित होत असतात. आजच्या धकाधकी आणि स्पर्धा यांच्या जगात अशा पुस्तकांना मागणीही मोठय़ा प्रमाणात आहे. वीरेन्द्र कपूर यांचं ‘लीडरशिप : द गांधी वे’ आणि अनिल शास्त्री व पवन चौधरी यांचं ‘लाल बहादूर शास्त्री : लेसन्स इन लीडरशिप’ ही दोन्ही पुस्तकं याच पठडीतील असली, तरी वेगळी आहेत. चांगलं नेतृत्व कसं करावं हा या दोन्ही पुस्तकांचा मुख्य विषय आहे. महात्मा गांधी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे स्वातंत्र्यलढय़ावर झालेल्या परिणामांविषयी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीतील योगदानाविषयी अनेक अभ्यासकांनी लिखाण केलेलं आहे. ही दोन पुस्तकं मात्र महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वगुणांची चर्चा करणारी आहेत. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींसाठी तर ही पुस्तके उपयुक्त आहेतच पण कॉपरेरेट क्षेत्रातील व्यक्तींनाही या पुस्तकांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. दोन्ही पुस्तकांच्या लेखकांच्या मांडणीचा रोख अशाच वाचकवर्गाच्या दिशेला आहे.
सत्य-अहिंसा यांचा आग्रह, साधी राहणी, विचारांतील स्पष्टता, परमत-सहिष्णुता, वेळेचं योग्य नियोजन, वक्तशीरपणा, कामातील काटेकोरपणा ही दोन्ही नेत्यांच्या जीवनशैलीची काही ठळक वैशिष्टय़ं सांगता येतील. वीरेन्द्र कपूर आपल्या पुस्तकात म्हणतात- ‘कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या आणि यशस्वी होण्याची आस असणाऱ्या व्यक्तीसाठी ही वैशिष्टय़ं आवश्यकच असतात.’ गांधींच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना किंवा त्यांच्या लिखाणातील काही भाग लेखकाने आपल्या विवेचनासाठी समर्पकपणे वापरलेला आहे. ‘अहिंसात्मक सत्याग्रह करण्यासाठी उच्च कोटीची इच्छाशक्ती आणि आत्मिक ताकद असणं फार गरजेचं असतं. कोणत्याही परिणामांना सामोरं जाण्याची तयारी असावी लागते’- असं गांधीजी सांगतात. कॉपरेरेट क्षेत्रातही कधी कधी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला अशाच तऱ्हेनं- कोणत्याही परिणामांना सामोरं जाण्यासाठी- प्रचंड आत्मिक ताकद पणाला लावून काही निर्णय घ्यावे लागतात. आपण घेत असलेले निर्णय सहकाऱ्यांना पटवून द्यावे लागतात. यासाठी आवश्यक असतं ते संवादकौशल्य. महात्मा गांधी आपला कोणताही निर्णय किंवा आपलं धोरण लोकांना सांगण्याआधी स्वत: त्याप्रमाणे वागायला सुरुवात करीत. त्यांच्या कथनी आणि करणीत जराही तफावत नसे. आणि आपण जे करतो आहोत ते पूर्ण विचारांती करीत असल्यामुळे तो निर्णय कळेल अशा भाषेत ते सांगू शकत. आपण घेतलेल्या निर्णयांमुळे जे काही बरे-वाईट परिणाम होतील त्याची जबाबदारी ते स्वत: घेत. आपल्या प्रतिस्पध्र्याच्या (ब्रिटिशांच्या) ताकदीचं भान ठेवून आपली धोरणं आखत. कॉपरेरेट क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनेही या गोष्टी जर आत्मसात केल्या, तर त्याला अवघड अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यास निश्चितच मदत होऊ शकेल, अशी लेखकाची मांडणी आहे.
अनिल शास्त्री व पवन चौधरी यांनी ‘लालबहादूर शास्त्री : लेसन्स इन लीडरशिप’ या पुस्तकात शास्त्रीजींच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग दिले आहेत. प्रत्येक प्रसंगानंतर शेवटी तात्पर्यही दिलेलं आहे. या प्रसंगांना साजेशी चित्रं संपूर्ण पुस्तकभर आहेत. अनिल शास्त्री हे लाल बहादूर शास्त्री यांचे सुपुत्र. त्यामुळे त्यांनी काही खासगी आठवणीही या पुस्तकात दिल्या आहेत. शास्त्रीजींच्या आयुष्यावर गांधीजींच्या विचार आणि कार्याचा प्रचंड प्रभाव होता. त्यांना समाजातील दुर्बल घटकांविषयी सहानुभूती होती. सर्वाची मतं ऐकून घेणं आणि सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करणं हे कोणत्याही क्षेत्रात नेतृत्वस्थानी असणाऱ्या व्यक्तीला करावंच लागतं. लालबहादूर शास्त्री यांनी या अवघड वाटेवरून कशी वाटचाल केली, हे अनिल शास्त्री व पवन चौधरी यांनी आपल्या पुस्तकात अनेक उदाहरणं देऊन स्पष्ट केलं आहे. वानगीदाखल एका घटनेचा उल्लेख करता येईल. निर्णयक्षमता आणि कामांचा उरक याबाबतीत ‘पंडित नेहरूंच्या तुलनेत लालबहादूर शास्त्री हे फारच कमकुवत पंतप्रधान आहेत’ अशी टीका केली जात असे. संसदीय मंत्री विजयालक्ष्मी पंडित यांनी तर एकदा भडकून त्यांना ‘निर्णय न घेणारा कैदी’ असं म्हटलं होतं. पण १९६५ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी याच लाल बहादूर शास्त्री यांनी अतिशय ठामपणे निर्णय घेतले होते. आपल्यावर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी या ‘राष्ट्रीय संकटा’च्या वेळी सोबत घेतलं होतं. त्यांच्या अशा वर्तनामुळे प्रभावित झालेल्या विजयालक्ष्मी पंडित यांनीच, नंतर एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत लालबहादूर शास्त्री यांच्यावर केलेल्या टीकेबाबत खंत व्यक्त केली होती!
इतिहास हा ‘इतिहास’ म्हणून न सांगता त्यापासून धडे घेण्याचा प्रयत्न दोन्ही पुस्तकांतून दिसतो. दोन्ही पुस्तकं छोटेखानी असून सोप्या भाषेत लिहिलेली आहेत. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्वस्थानी असलेल्या आणि त्या स्थानाकडे वाटचाल करणाऱ्या अशा सर्वानाच ही दोन्ही पुस्तकं निश्चितच उपयुक्त ठरतील.

१ लीडरशिप द गांधी वे
– वीरेन्द्र कपूर,
रूपा पब्लिशिंग हाउस,
पृष्ठे : १२२, किंमत : १९५ रु.
२. लाल बहादूर शास्त्री : लेसन्स इन लीडरशिप – अनिल शास्त्री व पवन चौधरी,
विज्डम व्हिलेज पब्लिशिंग हाउस,
पृष्ठे : १५८, किंमत : १९५ रु.