या पुस्तकांचा शोध बरीच र्वष सुरू होता. अ‍ॅमेझॉनवरही ती मिळत नव्हती. पण नुकतीच ती गवसली. लंडनला झगझगत्या, सदातरुण ऑक्सफर्ड स्ट्रीटवर वॉटरस्टोन्स नावाचं भलंमोठं पुस्तकांचं दुकान आहे. विख्यात मार्क्‍स अँड स्पेन्सरच्या बरोबर समोर. थोरथोर अतिश्रीमंत अशा फॅशन ब्रँड्सच्या रांगेत पुस्तकांचं दुकान असणं हेही तसं थोरच. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्यांची श्रीमंतीच दिसते त्यातून. असो. पण जेव्हा या दुकानात शिरल्यावर समोरच आलेल्या विक्रेत्याला विचारलं ही पुस्तकं आहेत का? त्यानं सहज काढून दिली. पण त्याचा आविर्भाव असा होता की इतक्या लांब येऊन इतकीसहजसाध्य पुस्तकं काय मागताय..
बरोबरच होतं त्याचं तसं. कारण असं की तशी काही ही अत्यंत महत्त्वाची वगैरे पुस्तकं आहेत असं म्हणता येणार नाही. पण तरी त्याचं वाचनमूल्य अफलातून आहे, हेही नक्की. ती म्हणजे एक चतुर, अत्यंत वाचनीय अशी संकलनं आहेत. महत्त्व आहे ते याला. कारण ज्यांचं संकलन आहे ती माणसं जगाच्या इतिहासाला आकार देणारी ठरली. तेव्हा ती वागायची कशी, बोलायची कशी हे जाणून घेणं आवश्यकच असतं. त्यासाठी ही पुस्तकं महत्त्वाची. त्यांची नावं आहेत- ‘ऑनरेबल इन्सल्टस्’ आणि ‘डिसऑनरेबल इन्सल्टस्’. दोन्हींचा लेखकही एकच आहे. खासदार ग्रेग नाईट. ब्रिटिश पार्लमेंट जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या खासदारांनी, मंत्र्यांनी आपापल्या विरोधकांना वाग्बाणांनी किती आणि कसं घायाळ केलं याचा समग्र आढावा म्हणजे ही पुस्तकं. ती का वाचायची?
कारण राजकारणातली ही माणसं आपल्याला फार मर्यादित अर्थाने माहीत असतात. त्यांचं एखाद्दुसरा वाक्य, निर्णय तेवढा आपल्याला माहीत असतो. त्याच्यावरून आपलं त्या त्या व्यक्तीचं मूल्यमापन होत असतं. पण त्यांचं वाक्चातुर्य कितीतरी अधिक असू शकतं. त्यावरून त्यांची सांस्कृतिक, बौद्धिक उंची कळत जाते. म्हणजे क्लेमंट अ‍ॅटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते, भारताच्या स्वातंत्र्याचा निर्णय त्यांच्या काळात झाला, ते साधे होते, शांत असं काहीसं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं आणि त्यांचं आणि विन्स्टन चर्चिल यांचं चांगलंच वाकडं होतं हे आपल्याला माहीत असतं. या दोघांचे स्वभाव वेगळे. राजकीय विचारधारा वेगळी हेही माहीत असतं. परंतु या दोघांनी परस्परांना कसं हाताळलं हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे चर्चिल जेव्हा म्हणतात : पार्लमेंटसमोर एकदा एक रिकामी टॅक्सी आली आणि त्यातून अ‍ॅटली उतरले..तेव्हा आपल्याला ठो करून हसायला येतंच पण चर्चिल यांच्या कुत्सित स्वभावाचीही ओळख होते. नंतर जेव्हा अ‍ॅटली यांच्यावर चर्चिल यांचं वर्णन करण्याची वेळ आली, तेव्हा ते म्हणाले : फिफ्टी पर्सेट जिनियस, फिफ्टी पर्सेट ब्लडी फुल. द ट्रबल विथ विन्स्टन इज ही नेल्स हिज ट्राउजर्स टु द मास्ट आणि कान्ट क्लाइम्ब डाऊन.
चर्चिल यांचे पंतप्रधान बाल्डविन यांच्याशीही तीव्र मतभेद होते. कोणत्याच मुद्दय़ावर त्यांचं कधी एकमत व्हायचं नाही. त्यात भारताचा विषय आला की दोघेही वाघनखं घेऊनच एकमेकांसमोर उभे ठाकायचे. एकदा अशाच तेजतर्रार चर्चेनंतर पार्लमेंटचं दिवसभराचं काम संपलं. सगळेच निघाले. पण त्या दिवशी नेमकं झालं असं की हाऊस ऑफ कॉमन्सला लागून असलेल्या मुतारीत बाल्डविन गेले. तिथे दोघांसाठीच जागा होती. एके ठिकाणी चर्चिल उभे होते. सुरुवातीला काही त्यांना ते लक्षात आलं नाही. ते पटकन पुढे आले. आता मागे जायचं तर बरं दिसणार नाही. म्हणून चर्चिल यांच्या शेजारच्याच जागेत उभं राहून त्यांना शरीरातला जलसाठा कमी करावा लागला. ती दोन तीन मिनिटं फारच अस्वस्थतेत गेली. कोणीच बोलेना. त्यात बाल्डविन यांचं काम आधी झालं. ते निघाले. जाताना विजारीची बटणं लावता लावता चर्चिलना ऐकू जाईल अशा आवाजात पुटपुटले : आय एम ग्लॅड दॅट देअर इज वन कॉमन प्लॅटफॉर्म अपॉन व्हिच वुई कॅन स्टिल मिट.
या पुस्तकांत असे अनेक दाखले आहेत. किंबहुना अशा दाखल्यांचीच तर ही पुस्तकं आहेत.
लॉर्ड कर्झन यांचा आणि आपला तसा चांगलाच परिचय. कर्झनसाहेब भारतमंत्री होते. माणूस अत्यंत बुद्धिमान. कुशाग्र. पण राजकीय विरोधकांप्रमाणे स्वत:च्याच पक्षातील स्पर्धकांना अगदी ओचकारे येतील इतकं ओरबाडणार. कर्झन हे पंतप्रधान बनणार हे अगदी जवळजवळ नक्की झालं होतं. पण ते काही जमलं नाही. त्यांची संधी हुकली. त्यांचं हे हुकलेलं पंतप्रधानपद स्टॅन्ले बाल्डविन यांच्याकडे गेलं. कर्झन आयुष्यभर या बाबत कडवट राहिले. ‘बाल्डविन यांच्या हाताखाली काम करण्याइतकं हृदय विदीर्ण करणारं दुसरं काहीही नाही. बाल्डविन म्हणजे प्रामाणिकता, निरागसता, अज्ञान आणि बरीचशी निर्बुद्धता यांचं सुरेख मिश्रण आहे. दुर्लक्ष करावं इतके मोठे आहेत ते.’, इतक्या शेलक्या शब्दांत लॉर्ड कर्झन यांनी आपल्याच पंतप्रधानांची संभावना केलेली पाहून त्यांच्या जिभेला किती धार असेल याचा अंदाज येतो.
राजकारणात बऱ्याच वेळा योगायोगांना भलतंच महत्त्व असतं. त्यामुळे योग्य व्यक्तींना हवं ते मिळत नाही असं घडतंच. पण अयोग्य, असमर्थ व्यक्तींनाही कधी कधी बरंच काही मिळून जातं. आपल्याकडे पंतप्रधानपदी राहून गेलेले देवेगौडा वा इंदरकुमार गुजराल किंवा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी बसून गेलेले बाबासाहेब भोसले यांची उदाहरणं या संदर्भात देता येतील. ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनून गेलेले अँड्रय़ू लॉ हे अशांपैकीच एक. व्यक्तिमत्त्व नसताना उच्चपदी बसलेल्यांचे लगेच खुशमस्करे तयार होतात. तसे ते यांचेही झाले. लॉ किती थोर आहेत असं ते सांगू लागले. त्यावर लॉ म्हणाले : इफ आय एम अ ग्रेट मॅन, देन अ गुड मेनी ग्रेट मेन ऑफ हिस्टरी आर फ्रॉड्स. इतका प्रामाणिकपणा सहसा कोणत्याच क्षेत्रात आढळणार नाही. राजकारणात तर नाहीच नाही. या स्ट्रॉ यांना माहीत होतं की आपण जरी पंतप्रधान असलो तरी पक्ष आणि अनुयायी काही तितकेसे आपल्या मागे नाहीत. आपल्या मनमोहन सिंग यांच्यासारखीच परिस्थिती. पण त्यावर भाष्य करताना लॉ म्हणाले : आय एम देअर लीडर. आय मस्ट फॉलो देम.
डेव्हिड लॉईड जॉर्ज हे ब्रिटनचे पहिल्या महायुद्धकालीन पंतप्रधान. एकूण १७ र्वष ते या पदावर होते. मोठं आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचं वक्तृत्वही जबर. जीभ चांगली दुधारी होती आणि मेंदू अत्यंत तल्लख. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना, विरोधकांना जे काही शालजोडीतले हाणलेत त्याला तोड नाही. लॉर्ड डर्बी म्हणून एक खासदार होते. त्याचं वर्णन जॉर्ज यांनी कसं केलं. तर ते म्हणाले : लॉर्ड डर्बी गादीसारखे आहेत. तीवर शेवटी जो बसून गेला असेल त्याच्या खाणाखुणा राहतात. चर्चिल यांनी ‘नेपोलियन वाचून स्वत:चं नुकसान करून घेतलं’, असं त्याचं मत होतं तर पुढे पंतप्रधान झालेले नेव्हिल चेंबरलेन म्हणजे अ रिटेल माइंड इन अ होलसेल बिझनेस.
बेंजामिन डिझरेली यांच्याबाबतही आपण ऐकलं वाचलेलं असतं. पण त्यांची वाग्कला किती अद्वितीय होती, हे या पुस्तकांतून कळून येईल. पंतप्रधान ग्लॅडस्टोन यांच्याशी त्यांचे चांगलेच मतभेद होते. दुर्दैव आणि आपत्ती यांच्यातला फरक समजावून सांगताना ते म्हणाले : जर समजा समोरच्या थेम्स नदीत ग्लॅडस्टोन पडले तर ते दुर्दैव आणि त्यांना कोणी पाण्यातून बाहेर काढलं तर ती आपत्ती..रॉबर्ट पिल या खासदाराचं स्मित डिझरेली यांच्या मते शवपेटिकेच्या कडांना असलेल्या चांदीच्या वेलबुट्टीसारखं. डिझरेली यांची वाक्यं काळाच्या पटलावर कोरली गेली आहेत. झोपडीत जर आनंद नसेल तर महाल सुरक्षित नाहीत असं समजा, असं ते आर्थिक स्थितीविषयी बोलताना एकदा म्हणून गेले..मला जेव्हा कादंबरी वाचावीशी वाटते तेव्हा मी लिहायलाच घेतो..असं म्हणण्याइतका अधिकार त्यांचा होता.
ही पुस्तकं अत्यंत वाचनीय आहेत, ती यासाठी. बरंच काही लागतं आपल्या हाती.
खरं तर आपल्याकडे संसदेत राम मनोहर लोहिया, पिलु मोदी, अटलबिहारी.असे अनेक वाक्पटू होऊन गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेतही केशवराव धोंडगे, गोपीनाथ मुंडे ते आताचे दिलीप सोपल यांच्यापर्यंत समृद्ध भाषावैभवाचे आणि वैविध्याचे अनेक जण होते. आहेत. पण त्यांच्या या अशा वाक् ताडनांचा संग्रह करावा असं काही कधी आपल्यातल्या कोणाला वाटत नाही. भाषा जिवंत ठेवण्यासाठी, तिचे विविध विभ्रम पाहण्यासाठी, त्यांचा आनंद घेण्यासाठी ते आवश्यक असतं.
ही पुस्तकं आपल्या या उणिवेचीही आठवण करून देतात. वाङ्मयीन अर्थाने अपमानही कधी कधी कसे आदरणीय असू शकतात, हे ही पुस्तकं सांगतात. त्यासाठीच ती वाचायची.

ऑनरेबल इन्सल्ट्स – अ सेंचुरी ऑफ पोलिटिकल इन्व्हेक्टिव :  ग्रेग नाईट
प्रकाशक : अ‍ॅरो,
पृष्ठे : २२४, किंमत : ६.९० पौंड.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

डिसऑनरेबल इन्सल्ट्स – अ कँटकरस कलेक्शन ऑफ पोलिटिकल इन्व्हेक्टिव :
ग्रेग नाईट,
प्रकाशक : द रॉब्सन प्रेस,
पृष्ठे : २७१, किंमत : ८.९६ पौंड.