फ्रेडरिक फोर्सिथ या लोकप्रिय लेखकाच्या तेराव्या कादंबरीची-
‘द किल लिस्ट’ची ही ओळख, फोर्सिथच्या एकंदर पुस्तकांपैकी
हे एकोणिसावं असूनही त्याचा लेखकराव झालेला नाही तो कसा,
याचा उलगडा करू शकणारी..
आपण दोन कारणांसाठी वाचतो- एक निखळ आनंद आणि दुसरं म्हणजे काहीतरी मिळवणं. मग ती माहिती असेल वा अन्य काही. मराठीपुरतं बोलायचं तर माहिती देणारी पुस्तकं आनंद देणारी असतातच असं नाही. म्हणजे बऱ्याचदा लेखक वाचकाच्या डोक्यावर माहिती बदाबदा ओततो किंवा अशा पद्धतीनं ती देतो की सूर असा..घ्यायची तर घ्या. माहिती रंजक शैलीत देणं हे कौशल्य आहे. वाचकाला मजाही वाटली पाहिजे आणि हवी ती माहितीही दिली गेली पाहिजे. त्यात पुन्हा शैली ही वेगळीच समस्या. अनेक जण या शैलीच्या प्रेमात इतके पडतात की बाकीचं सगळंच विसरतात. शैली ठीकाय.. पण मजकुराचं काय हा प्रश्न अनेक लेखकांच्या बाबत विचारला जाऊ शकतो. असे लेखक मग मान्यवर बनतात, दोन पाच पुस्तकांत विरून जातात आणि नंतर केवळ शैली आहे म्हणून.. लिहीत राहतात. पण खरा भयंकर प्रकार म्हणजे काहींना उगाचच वाटत राहतं आपल्याला शैली आहे. मग तर भलतंच संकट. बाकीच्या उद्योगांमुळे वा अनेकांना उपकृत करायच्या कौशल्यामुळे अशांची खूप पुस्तकं येतात, ती गाजवायची व्यवस्थाही झालेली असते. अशांचं महागुरू होण्यापलीकडे दुसरं काही होत नाही. हे सर्व टाळून उत्तम लिहीतं राहायचं म्हणजे कसरत असते.
फ्रेडरिक फोर्सिथ ती चाळीसेक र्वष करत असतील. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या पुस्तकांची संख्या दीड डझनाचा टप्पा ओलांडून गेली असावी. ‘द डे ऑफ द जॅकल’ या पहिल्या पुस्तकात जसा या सगळ्याचा तोल सांभाळणं त्यांना जे काही जमलंय, ते अगदी आजतागायत. जॉन ल कार आणि अ‍ॅलन फर्स्ट हे त्यांचे समकालीन. ल कार यांची शैली दिलखेचक. वाचकाला मोहात पाडणारी. पण त्यांच्या लेखनीय वयाच्या पहिल्या काही वर्षांनंतर ते संपले. नंतरची पुस्तकं काही त्यांची तेवढी उठली नाहीत. अ‍ॅलन फर्स्ट हे संधीप्रकाशातला युरोप, जर्मनीची छाया वगैरेंच्या बाहेर कधी गेले नाहीत. फोर्सिथ यांचं तसं नाही. ल कार यांच्या तुलनेत त्यांना शैली नाही आणि फर्स्ट यांच्याप्रमाणे भौगोलिकता ही त्यांची हुकमत नाही.
पण फोर्सिथ यांच्याकडे जे काही आहे ते या सगळ्याच्या पलीकडचं आहे. विषयाचं ताजेपण, तो मांडत जाताना प्रचंड प्रमाणात भरला जाणारा तपशील आणि विशिष्ट भूप्रदेशात स्वत:ला अडकवून न घेणारी जग ही त्यांची व्यापक चौकट. ती पेलण्याची त्यांची ताकद केवळ स्तिमित करणारीच. फोर्सिथ आज वयाच्या पंचाहत्तरीत आहेत. पण विषयाचं वैविध्य आणि तो मांडण्यासाठी कष्ट करायची तयारी ही द..जॅकलच्याच तोडीची. त्याचमुळे एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत गेल्या पंधरवडय़ात त्यांच्या नवीन पुस्तकाचा उल्लेख आढळला आणि लगेचच ते मागवलं. हातात पडलं आणि.. नेहमीसारखंच त्यानं झपाटून टाकलं.
‘द किल लिस्ट’ हे त्यांच्या ताज्या, टवटवीत पुस्तकाचं नाव. अमेरिकेतल्या इदाहोत भरदिवसा एका काँग्रेसमनची हत्या होते. मारेकरी साधा तरुण. तोही मारला जातो. तसंच मग दुसऱ्या शहरांत घडतं. मग तिसऱ्या. एकात तर भर सकाळी गोल्फ खेळताना ज्येष्ठ निवृत्त लष्करी अधिकारी मारला जातो. यातल्या सर्वच प्रकरणांत मारेकरी मारला तरी जातो वा आत्महत्या तरी करतो. कोणीच जिवंत सापडत नाही. सुरक्षा यंत्रणा या अकाली हत्यांनी त्रस्त झालेल्या असतात. काही दिवसांतच अशा हत्यांचं सत्र इंग्लंडमध्येही सुरू होतं. त्याच वेळी सीआयएला एक वेगळाच प्रकार नजरेस येतो. इंटरनेटवरून एक बुरखाधारी इस्लामी पाश्चात्त्य जगाविरोधात अतिविखारी भाषणं देताना, प्रचार करताना आणि पाश्चात्त्यांच्या हत्येचंच आवाहन करताना आढळतो. या व्यक्तीला टोपण नाव दिलं जातं. द प्रीचर. प्रवचनकार. याला शोधून काढण्याची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली जाते. या कामासाठी लागणारे हवे ते सर्वाधिकार त्याला दिले जातात.. आणि हा अधिकारी कामाला लागतो.
त्यातली समस्या ही असते की ज्या इंटरनेट साइटवरून तो धर्मप्रचारक विखार पसरवत असतो ती साइट अदृश्य पत्त्यावरनं काम करत असते. म्हणजे दहशतवाद्यांच्या जगातला कोणी संगणक सुपरब्रेन ती हाताळत असतो. एरवी अशा इंटरनेट साइटचा पत्ता शोधणं हे तसं आपल्या पोलिसांनाही जमणारं काम. पण हे प्रकरण तसं नसतं. अनेक इंटरनेट साइट्सच्या प्रतिबिंबी पत्त्यांच्या आधारे दर वेळी नवा खोटा पत्ता तयार केला जात असतो आणि त्यावरून हा धर्मप्रचारक आपले उद्योग करत असतो. त्यामुळे एखादं भौगोलिक ठिकाण त्या संगणकासाठी शोधणं हे गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्याइतकं आव्हानाचं. त्याच कामगिरीवर असतो द ट्रॅकर. माग काढणारा. अनेक आघाडय़ांवर त्याचं काम सुरू होतं. त्यातली एक असते पाकिस्तान. दुसरी अफगाणिस्तान आणि तिसरी या दोघांच्या संयोगातून आणि तालिबान, अल कईदाच्या सहभागातून तयार होणारी भलतीच एक आफ्रिकी.त्या धर्मप्रचारकाच्या संगणक तज्ज्ञाप्रमाणे आपल्यालाही असाच कोणी वेडा इंटरनेट वेधी हवा, हे त्या ट्रॅकरला कळतं. स्थानिक एफबीआयच्या मदतीनं अशा वेडय़ा संगणकतज्ज्ञाचा शोध सुरू होता. त्यातून माहिती हाती लागते ती एका विद्यार्थ्यांची. विचित्र मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या या विद्यार्थ्यांला समुदायाची भीती असते. म्हणजे आईवडील यांच्याशिवाय जरा कोणी दुसरी व्यक्ती आली की त्याला असुरक्षित वाटत असतं. त्यामुळे घराच्या एका खोलीत त्यांनं स्वत:ला कोंडून घेतलेलं असतं. याचा छंद एकच. इंटरनेट वेध. ट्रॅकर त्याच्या घरी जातो. त्याच्याशी दोस्ती करतो. विचारतो, तुला संगणकातलं हवं ते थोर थोर दिलं तर काय करशील. तो म्हणतो, काहीही.. काहीही मी शोधून काढीन. त्याप्रमाणे त्याला अत्यंत अद्ययावत अशी संगणकप्रणाली, जोडणी आणि हवी ती साधनं पुरवली जातात. त्याच वेळी ट्रॅकर पाकिस्तानी आयएसआयमध्ये राहून अमेरिकेसाठी हेरगिरी करणाऱ्याला गाठतो. तिथून दुबई. इंग्लंड आणि मग पुन्हा अमेरिका हा त्याचा प्रवास. या प्रवासातून कोणाला शोधायला हवा याचा साधारण अंदाज त्याला येतो.
आपली ती कामगिरी करून तो अमेरिकेत परत येईपर्यंत त्या विद्यार्थ्यांनं एक दिशा दिलेली असते.
सोमालिया. त्या देशाच्या मोगदिशूमधल्या एका गोदामातून इंटरनेट संदेशांची अनाकलनीय देवाणघेवाण सुरू असल्याचं हा पोरगा निदर्शनास आणतो. मग केनियातल्या अमेरिकी तळावरून विमानांच्याही पेक्षा अधिक उंचीवरून उडून जमिनीवरची टाचणीही शोधू शकतील अशा क्षमतेची चार हेलिकॉप्टर्स या गोदामाच्या शोधासाठी उडतात. सलग ३५ तासांची प्रत्येकाची उड्डाणक्षमता. दरम्यान, एका स्वीडिश जहाजाचं एक वेगळंच नाटय़ सुरू असतं. त्याचाही संबंध या सगळ्याशी असतो.
हे सगळं नाटय़ वेगवेगळ्या प्रतलांवर घडत असतं आणि शेवटी या सर्व प्रतलांचं मिळून एक स्वतंत्र प्रतल तयार होतं आणि तिसरा अंक सुरू होतो.
काय होतं त्यात?
ते इथं सांगणं म्हणजे संभाव्य वाचकांवर अन्यायच. त्या पापाचं धनी होणं काही बरोबर नाही.
हे सगळं अतिवास्तव नाटय़ जिज्ञासूंनी वाचावंच. फोर्सिथ यांची कमाल असते ती त्यातल्या तपशिलात. एक हेलिकॉप्टर घेतलं तर त्यात इतकी माहिती असते की ते हेलिकॉप्टर बनवणाऱ्यांचं कौतुक करावं की देणाऱ्यांचं हा प्रश्न पडतो. तसंच त्यातल्या प्रवासाचं. पाकिस्तान, अफगाणिस्तान, दुबई आदींतला तपशील न् तपशील खरा आहे. या सगळ्यातलं राजकीय नाटय़ तेही भव्यच. पाश्चात्त्य देश आणि इस्लाम यांच्यातला एक अदृश्य संघर्षही फोर्सिथ त्यात शिताफीनं आणतात.
लेखक म्हणून केवळ कल्पना सुचली म्हणून वाटेल तसं अजागळपणे लिहीत न सुटता अभ्यासाच्या कष्टातून ती अधिक कशी फुलवायची हे फोर्सिथ यांच्याकडून शिकावं. तीन-चार दशकांच्या लेखनानंतरही फोर्सिथ जराही कालबाह्य वाटत नाहीत. त्यांचा लेखकराव काही झालेला नाही. आपल्या मठीत ते मस्त लिहीत बसतात. अठरा पुस्तकांनंतरही म्हणून तर ते ताजे, आजचे वाटतात.
 फ्रेडरिक फोर्सिथ- ब्रिटिश कादंबरीकार. रॉयटर्स, बीबीसीमध्ये पत्रकारिता केली. द डे ऑफ द जॅकल ही पहिलीच कादंबरी तुफान गाजली. द ओदेसा फाइल, द डेव्हिल्स अल्टर्नेटिव्ह आदी त्यांच्या कादंबऱ्याही वाचकप्रिय ठरल्या.

‘द किल लिस्ट’
फ्रेडरिक फोर्सिथ
* प्रकाशक : कॉर्गी बुक्स
* पृष्ठे ३५०
* किंमत ३०० रुपये