बर्मन पिता-पुत्रांमधील हृद्य नात्याचे वर्णन आणि पंचम-आशा भोसले यांच्या (नाममात्र) लग्नाबाबतची स्फोटक माहिती ही या पुस्तकाची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. पंचमच्या सहायकांचा तसेच समकालीन संगीतकारांचा अनुल्लेख मात्र या बखरीला उणेपणा आणतो.
बहुचर्चित आणि लोकप्रिय संगीतकार राहुलदेव बर्मन उर्फ पंचमच्या अष्टपैलुत्वाविषयी, त्याच्या गाण्यांविषयी, त्या गाण्यांच्या जन्मकथांविषयी आजवर बरेच लिहून-बोलून झाले आहे. या पुस्तकात त्या सर्व गोष्टी आहेतच, मात्र बर्मन गोतावळ्यातील या लेखकाचा पंचमशी व्यक्तिगत घनिष्ठ संबंध होता. साहजिकच त्याने अतिशय अधिकारवाणीने पंचमच्या आयुष्यातील सर्व टप्पे तपशीलवार उलगडले आहेत.
या पुस्तकाची सुरुवात पंचमच्या शैशवाने झाली आहे. सचिनदा कोलकात्याहून मुंबईत आले ते १९४४ मध्ये, पंचम त्यावेळी पाच वर्षांचा होता. मात्र, चित्रपटसृष्टीत जम बसेपर्यंत कुटुंबाला येथे ठेवण्यात अर्थ नाही, या निर्णयापर्यंत ते आले आणि त्यांनी माय-लेकांना पुन्हा कोलकात्याला धाडले. कोलकात्यात लहानाचा मोठा झालेल्या पंचमला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याचा दिवस सायकल चालवणे, पोहणे, मित्रांसोबत भटकणे यातच संपत असे. कुठेही न शिकता त्याने माऊथ ऑर्गनवर प्रभूत्व मिळवले. वेळ काढून कोलकात्यात येणारे सचिनदा मुलाच्या करामती पाहून काळजीत पडत. हा मुलगा तर फारच उनाड झाला आहे, मोठेपणी तो काय करणार.. असा त्यांचा नेहमीचा सूर. सचिनदांचा हा दृष्टिकोन बदलला तो पंचमच्या शाळेतील बक्षिससमारंभामुळे. या कार्यक्रमात सचिनदांच्या प्रमुख उपस्थितीत पंचमने व्यासपीठावरून सफाईदारपणे माऊथ ऑर्गन वाजवून दाखवला. दुसऱ्या दिवशी सचिनदांनी त्याला विचारले, पुढे काय करायचे ठरवले आहेस, यावर ‘मला तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार व्हायचे आहे’ हे पंचमचे उत्तर सचिनदांसाठी अनपेक्षित होते. या प्रसंगानंतर सचिनदांनी त्याला प्रथम ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला व पुढे उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद शिकण्यासाठी धाडले.
पंचमचा यानंतरचा झपाटा खिळवून ठेवतो. वयाच्या १६व्या वर्षी मुंबईत दाखल झालेला पंचम लगेचच वडिलांचा सहाय्यक म्हणून काम करू लागला. एवढेच नव्हे तर त्या वयात त्याने स्वरबद्ध केलेल्या ए मेरी टोपी पलटके आ (फंटूश) आणि सर जो तेरा चकराए (प्यासा) या चालींचा सचिनदांनी उपयोग केला. सचिनदांचा भर लोकगीतांवर तर पंचमला कोणताही संगीतप्रकार वज्र्य नव्हता, साहजिकच ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटापासून पंचमच्या करामतीमुळे सचिनदांच्या गाण्यांची शैली कमालीची बदलल्याचे योग्य निरीक्षण लेखक नोंदवतो. मात्र सचिनदांना सहाय्य करण्यात त्याची उमेदीतील अनेक वर्षे वाया गेली. सचिनदांनी नाकारलेला भूत बंगला (छोटे नबाब नव्हे) हा चित्रपट त्याला मिळाला, परंतु मेहमूदने त्यापूर्वी ‘छोटे नबाब’ची निर्मिती सुरू केली आणि तो पंचमचा पहिला सिनेमा ठरला. त्याला ‘तिसरी मंझिल’ कसा मिळाला वगैरे पूर्वी अनेकदा चर्चिली गेलेली माहिती यातही आहे. पंचम आपल्या वडिलांच्या कॅम्पमधून कधी व का बाहेर पडला, याचे वर्णन मात्र वाचण्यासारखे आहे. ‘आराधना’च्या गाण्यांच्या निर्मितीत पंचमचा सिंहाचा वाटा असूनही त्या गाण्यांच्या तबकडय़ांचे अनावरण सचिनदांच्या निवासस्थानी झाले, तेव्हा पंचमचे कोणीही कौतुक केले नाही, पूर्ण कार्यक्रमभर तो एका कोपऱ्यात उभा होता. स्वतंत्रपणे संगीत देण्याची हीच वेळ आहे, या निर्णयापर्यंत तेव्हा तो आला.
वडील आणि मुलगा आता स्पर्धक झाले. पंचम एकेक शिखर सर करत असताना सचिनदा मात्र झाकोळले जाऊ लागले. पंचमचीच एक मुलाखत यात वाचण्यास मिळते. या बाप-लेकांचे हृद्य नाते त्यातून ठळकपणे समोर येते. पंचम लिहीतो, ‘१ ऑक्टोबर १९७४, सचिनदांचा वाढदिवस. रात्री न चुकता घरी फेरी मार, असे आईने मला बजावले होते. मी रात्री अकरा वाजता तेथे पोहोचलो. दाराची बेल वाजवणार तोच माझ्या कानावर आप की कसम आणि अजनबी या चित्रपटांतील गाणी पडली. वडील माझी गाणी ऐकतायत हे कळल्यानंतर मी संकोचून बाहेरच थांबणे पसंत केले. गाण्यांचा आवाज थांबल्यानंतर मी घरात शिरलो. मात्र त्यावेळी आमच्यात विचित्र तणाव निर्माण झाला, कोणीच कोणाशी बोलत नव्हते. ही गोष्ट आईच्या लक्षात आली. तिने सचिनदांना थेट विचारले, तो यायच्या आधी त्याच्या गाण्यांवर तुम्ही उडय़ा मारत होतात, त्याला शाबासकी देत होतात, मग आता गप्प का आहात.. यावर बाबा म्हणाले, तुला माझ्याच तोंडून ऐकायचाय का, तर मग ऐक, पंचम माझ्यापेक्षा मोठा संगीतकार झाला आहे हे मी मान्य करतो, असा मुलगा लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे. गुणवत्तेच्या कसोटीवर मुलगा वडिलांपेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही..!

कारकीर्द अशी बहरात असताना पंचमच्या वैवाहिक जीवनात मात्र पानगळ सुरू होती. रीटा पटेल या तरुणीशी झालेला प्रेमविवाह त्याला लाभला नाही. १९६५मध्ये ते विवाहबद्ध झाले, १९६९पासून वेगळे राहू लागले आणि १९७३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, अशी माहिती लेखक पुरवतो. पंचमने नव्याने संसार मांडला तो आशा भोसलेंसोबत. ते दोघे विवाहबद्ध झाले होते, हे सर्वज्ञात आहे. मात्र या मोघम माहितीपलीकडे आपल्याला काहीच ठाऊक नसते. या पुस्तकातील याविषयीचा लेखाजोखा गौप्यस्फोट करणारा आहे. ओ. पी. नय्यरसोबतचे नाते संपल्यानंतर आशा आणि पंचम जवळ आले. (योगायोगाने ओपीची कारकीर्द तेव्हा उतरंडीला लागली होती) आशाच्या या धोरणीपणाचा उल्लेख लेखकाने ‘कॅलक्युलेटेड गेम’ असा केला आहे. मात्र लग्नाच्या बेडीत अडकण्यात पंचम टाळाटाळ करतोय, अशी शंका आल्याने मंगेशकर कुटुंबीय अस्वस्थ झाले. अशातच एका अज्ञात व्यक्तिने पंचमला दूरध्वनीवरुन धमकी दिली. या अज्ञाताने पंचमला सांगितले की त्याने जर आशाशी लवकरात लवकर लग्न केले नाही तर १) आशा आणि लता त्याच्या संगीत दिग्दर्शनात गाणे म्हणणे थांबवतील. २) त्याच्या कॅम्पमधील गायक, वादकांवर मंगेशकर भगिनी बहिष्कार घालतील. ३) हा इशारा गांभिर्याने घेतला नाही तर या कलमांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल..!
यावेळी किशोरकुमारने पंचमला सुवर्णमध्य सांगितला. ‘आशाशी लग्न करुन टाक, मात्र कागदोपत्री कोणताही पुरावा सोडू नकोस’. यानुसार ७ जुलै १९७९ (काहींच्या मते १९८०) या दिवशी पंचमच्या सांताक्रूझच्या निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय या समारंभाला उपस्थित होते, तर वरपक्षाचे प्रतिनिधीत्व केवळ किशोरकुमार, पंचमचा मित्र बादल भट्टाचार्य व सहाय्यक सपन चक्रवर्ती यांनी केले. या दिवशी घरातील सर्व नोकरांना सुटी देण्यात आली होती. मनोविकार जडलेल्या व अंथरुणाला खिळलेल्या मीरादेवींना या लग्नाची कल्पना असणे शक्यच नव्हते. या लग्नाची छायाचित्रे काढण्याची जबाबदारी सपनवर होती, मात्र, किशोरकुमारने रोल नसलेला कॅमेरा त्याच्या हाती दिला होता! हा सर्व तपशील मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे. पंचम आणि आशा एका छताखाली फारसे राहिले नाहीत, असेही लेखक सांगतो. (या तथाकथित लग्नामुळे पंचमचा कायदेशीर वारस कोण, याचा निर्णय न्यायायलायत अद्याप प्रलंबित आहे!) पुढे १९८९मध्ये पंचमने लंडनला जाऊन ‘बायपास’ करुन घेतली तेव्हा आशा त्याला भेटायला गेली. मात्र ‘मी अमेरिकेला निघाल्ये, लंडनला उतरुन तुला भेटून जाईन’ असे तिने दूरध्वनीवरुन सांगितले तेव्हा पंचमला बसलेला धक्का वाचकांनाही जाणवल्याशिवाय रहात नाही. हा एकाकीपणा व्यावसायिक आघाडीवरही होता. स्पर्धेत टिकण्यासाठी करावे लागणारे छक्के-पंजे त्याला ठाऊक नव्हते. अस्तित्व टिकवण्यासाठी पंचमने काय चुका केल्या, याचे अचूक निरीक्षणही लेखकाने नोंदवले आहे. १९८०च्या दशकात स्पर्धा वाढल्यानंतर पंचमने मानधन कमी केले, वाटेल ते चित्रपट तो स्वीकारू लागला. यातील अनेक चित्रपटांत चांगल्या गाण्यांना वावच नव्हता. हे कमी म्हणून (खास करुन १९८५नंतर) त्याचा सूरही हरवला. १९८० ते ८५ या कालावधीत त्याचे तब्बल १०४ चित्रपट आले, मात्र त्यातले हीट झाले केवळ १४! सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यातील सलग २३ चित्रपट कोसळले. पंचमवर अनलकीचा शिक्का बसला. (‘१९४२ ए लव्ह स्टोरी’मुळे चित्रपटसृष्टीला त्याचे वेगळेपण नव्याने जाणवले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता) पुरस्कार मिळ(वि)ण्यासाठी करावी लागणारी मोर्चेबांधणीही त्याला कधी जमली नाही.
पंचमवरील प्रेमापोटी लेखकाने अनेक ठिकाणी सत्याचा अपलाप केला आहे. पंचमने ‘सर जो तेरा चकराये’ (प्यासा) या गाण्याद्वारे हिंदी चित्रपटगीतांत सर्वप्रथम रॉक अँड रोलचा प्रयोग केला, असे लेखक म्हणतो. प्रत्यक्षात सी. रामचंद्र यांनी त्यापूर्वी ‘आना मेरी जान मेरी जान संडे के संडे’ (शहनाई-१९४७) हे रॉकगीत दिले आहे. सत्तरच्या दशकात पंचमसमोर केवळ लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि कल्याणजी आनंदजी यांचा टिकाव लागला, असेही लेखकाने ठासून म्हटले आहे. मात्र साधारण १९६७ पासून लक्ष्मी-प्यारे (चित्रपट-मिलन) जे टॉपला गेले ते मागे हटलेच नाहीत. पंचम त्यांना गाठू शकला नाही, हे वास्तव आहे. याशिवाय ‘हम किसीसे कम नही’मधील ‘क्या हुआ तेरा वादा’ या गाण्यामुळे मोहम्मद रफींना नवसंजीवनी मिळाली, अशी पंचमस्तुती लेखक करतो, प्रत्यक्षात ‘आराधना’नंतर संख्या आणि दर्जा या निकषांवर रफींना सर्वाधिक गाणी कोणी दिली असतील तर ती लक्ष्मी-प्यारेंनीच. पंचमच्या यशामध्ये त्याच्या अनेक सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. बासू चक्रवर्ती, मनोहरी सिंग, मारुतीराव कीर, केरसी लॉर्ड, भूपेंद्र, उत्तम सिंग आदी असंख्य सहाय्यकांनी, वादकांनी पंचमला सावलीसारखी सोबत केली. लेखकाने या स्नेहबंधाकडे पाठ फिरवली आहे. पंचमच्या समकालीन संगीतकारांचा, त्यांच्यातील स्पर्धेचा मागोवा घेणेही लेखकाने टाळले आहे. या कारणांमुळे ही बखर एकांगी, एकसूरी वाटते, तरीही पंचमच्या चाहत्यांसाठी हे पुस्तक एक पर्वणीच आहे आणि पंचमची प्रतिभा मान्य न करणाऱ्या संगीतप्रेमींनी तर हा दस्तावेज आवर्जून वाचावा असाच आहे.
aniruddha.bhatkhande@expressindia.com

> आर. डी. बर्मन : द प्रिन्स ऑफ म्युझिक
लेखक – खगेश देव बर्मन
प्रकाशक – रुपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली
पृष्ठे – ५४३ किंमत- ७९५ रु.