गार्सिया द ओर्टा हा भारतात पोर्तुगीज डॉक्टर म्हणून आला, इथे अनेक ठिकाणी फिरला आणि वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाला अनुभवाची जोड देऊन त्यानं एक ग्रंथ लिहिला! हा संवादरूप ग्रंथ केवळ वनस्पतींची नव्हे- माणसांची, आचारविचार आणि संस्कृतीची, नीतिमूल्यांचीही माहिती देतो. मुंबईत या गार्सियानं जी बाग फुलवली, ती आताच्या एशियाटिक सोसायटीच्या मागेच आहे.. पण या भागात कुणाला जाता येत नाही.. त्यानं फुलवलेली ‘ज्ञानाची बाग’- त्याचं ते पुस्तक- मात्र ‘एशियाटिक’मुळेच वाचकांसाठी पुन्हा उपलब्ध झालं आहे!

एके काळी निसर्गरम्य असणाऱ्या मुंबई बेटाच्या गेल्या पाचशे वर्षांच्या इतिहासाच्या पानांवर आरंभीच एका प्रेक्षणीय स्थळाची- बागेची- नोंद झालेली दिसते. ती म्हणजे आताच्या ‘टाऊन हॉल’ व ‘एशियाटिक सोसायटी’च्या मागे असणाऱ्या ‘मनोर हाऊस’ सभोवतीच्या बागेची! ही बाग व ते मनोर हाऊस यांची माहिती sam10वा आठवण आज फारशी कुणाला असणं कठीणच आहे. ती बाग होती गार्सयिा द ओर्टा या वनस्पतिशास्त्रज्ञाची! कोण होता हा गार्सयिा द ओर्टा? आणि त्याचं ते वैशिष्टय़पूर्ण पुस्तक- ‘कलोक्वीज ऑन द सिम्पल्स अ‍ॅण्ड ड्रग्ज ऑफ इंडिया’? त्याचं आणि ‘मनोर हाऊस’चं काय नातं? ब्रिटिशकालीन अमलाआधीचा, पोर्तुगीज अमलाखालील सोळाव्या शतकातील भारत म्हणजे गार्सयिाची कर्मभूमी! पाश्चिमात्यांनी केलेले अत्याचार, भारतीय अस्मितेचे खच्चीकरण, धर्मातराची जबरदस्ती या बाबींची आठवण कुणाही भारतीयाला क्लेशकारकच आहे, पण विविध ज्ञानशाखांची व ज्ञानसंपादनाच्या विविध साधनांची ओळख करून देणारे, स्वत: त्यासाठी अपार कष्ट करणारे पाश्चिमात्यही आपण आठवायला हवेत. या दृष्टीने पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृती, ज्ञान यांच्यात त्या काळी झालेल्या देवाणघेवाणीत कळत-नकळत महत्त्वाचे साधन ठरलेला हा ग्रंथ व त्याचा कर्ता गार्सयिा यांचे स्मरण म्हणूनच करावेसे वाटते.
जवळपास पाचशे वर्षांपूर्वी, १५३४ मध्ये पोर्तुगालमधून भारतात, गोव्यात आलेला पोर्तुगीज डॉक्टर व वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणजे गार्सयिा द ओर्टा! त्याला वेगवेगळ्या झाडाझुडुपांचा अभ्यास करणं, त्यांच्यातील औषधी गुणधर्म तपासणं यांची विलक्षण आवड होती. पोर्तुगीज इंडियाचा गव्हर्नर म्हणून १५४२ मध्ये मार्टनि अल्फॉन्सो द सूसा याची नेमणूक झाली आणि त्याचा वैयक्तिक डॉक्टर म्हणून त्याचा डॉक्टर मित्र गार्सयिा त्याच्याबरोबर राहू लागला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक बंदरांना त्याने भेटी दिल्या. दीव, दमण, काठियावाड, अहमदाबाद आदी अनेक ठिकाणी गार्सयिा िहडत असे. तेव्हाचा राजा बहादूर शहा याच्याशी त्याची वैयक्तिक मत्री होती. त्याचप्रमाणे बहादूर निजाम शहा याच्याशी त्याचे चांगले संबंध होते आणि त्याच्या राजधानीत, अहमदनगर येथे त्याचे बरेच येणे-जाणे असे.
गोव्यामधील त्याच्या घराभोवती त्याने अनेक औषधी झाडे लावून सुंदर बाग तयार केली होती. १५५४ मध्ये गव्हर्नर सूसाने गार्सयिालाच मुंबई बेट दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने दिले आणि गार्सयिाने तेथेही एक उत्तम बाग तयार केली. दुमजली घर बांधले. तेच हे मनोर हाऊस! ही बाग म्हणजे त्याची प्रयोगशाळाच होती जणू. येथे त्याने मुद्दाम अनेक झाडे लावली होती. त्या काळी मुंबईस (तेव्हाच्या बॉम्बेला) आताएवढे महत्त्व नसले तरी अनेक अंमलदार, विद्वान, लेखक, कलावंत इथे येत तेव्हा या मनोर हाऊसला त्यांनी भेट द्यावी असा शिरस्ता होता. तेथे गार्सयिाने स्वत:चे एक ग्रंथालयही ठेवलेले होते अशी नोंद आहे. आपल्या पुस्तकात येथील काही झाडांचा उल्लेख तो करतो. या बागेतील त्याने लावलेल्या आंब्यांना दोनदा फळे येत. एकदा डिसेंबरमध्ये व एकदा मेमध्ये असे सांगून तो पुढे निरीक्षण मांडतो की, मेमधील आंब्यांची चव डिसेंबरमधील आंब्यांना नसते. पुढे हे पोर्तुगीज ‘मनोर हाऊस’, ब्रिटिश ‘कॅसल’ झाले.
Mombain/ Bombain किंवा बॉम्बेविषयी एकोणिसाव्या शतकात लिहिणारे डॉ. जे. गर्सन डिकुन्हा यांनी या बागेचे, मनोर हाऊसचे सुंदर वर्णन केले आहे. तेथे आलेल्या प्रतिष्ठितांमुळे या जागेला प्राप्त झालेले महत्त्वही वर्णिले आहे.  
पुन्हा प्रकाशन..
भारतात आल्यावर येथील अनेक औषधी झाडापानांची माहिती करून घेत गार्सयिाने त्या साऱ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, त्यांच्या नोंदी ठेवल्या आणि इतरांशी चर्चा करीत सतत पडताळून घेतल्या. ही सारी माहिती व आपले निष्कर्ष त्याने ग्रंथबद्ध केले. ‘कलोक्वीज’ हे पुस्तक म्हणजे खरोखरी एक ग्रंथराजच आहे. तो १० एप्रिल १५६३ रोजी गोव्यात प्रथम प्रकाशित झाला. (म्हणजे कालच्या शुक्रवारीच या ग्रंथाचा ४५२ वा ‘वाढदिवस’ होता असे म्हणायला हरकत नाही). विशेष म्हणजे आताच १० दिवसांपूर्वी या ग्रंथाचे पुनर्मुद्रण ‘एशियाटिक सोसायटी’च्या ‘विमल शहा मेमोरियल पब्लिकेशन फंडा’तर्फे करण्यात आले आहे. एशियाटिक’चा आणि या पुस्तकाचा जुना संबंध आहे.. एशियाटिक सोसायटीचे मनोर हाऊसशी असणारे संलग्नत्व, भाषांतरकार सर मार्खम  यांना या पुस्तकाची दुर्मीळ लॅटिन प्रत सर जॉर्ज बर्डवूडनी एशियाटिकमध्येच देणे, त्यातील एक प्रत सोसायटीकडे असणे, सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर आणि विद्यमान अध्यक्ष शरद काळे यांनी पुनप्र्रकाशनासाठी या दुर्मीळ पुस्तकाचा विचार करणे यात आपोआप एक औचित्य आहेसे वाटते.  
लक्षात येते की, ‘कलोक्वीज ऑन द सिम्पल्स अ‍ॅण्ड ड्रग्ज ऑफ इंडिया’ हा ग्रंथ अनेक अर्थानी वैशिष्टय़पूर्ण आहे. ग्रंथलेखनासाठी, अभ्यासासाठी लॅटिन प्रचारात असल्याने मुळात हा ग्रंथ लिहिला गेला तो लॅटिन भाषेत. पण स्वत: गार्सयिानेच लगेच तो पोर्तुगीजमध्ये लिहिला व छापून घेतला. मुद्रणकलेचा शोध लागल्यावर खिळे छपाईचे तंत्र वापरणारा भारतातील पहिला छापखाना गोव्यात काढला गेला. तेथे छापलेले हे तिसरे पुस्तक. त्यात खूपच चुका राहिल्याने लगेच दुरुस्ती करून त्याच वर्षी ते पुस्तक पुन्हा छापले गेले. त्यानंतर स्पॅनिश, लॅटिन या भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले. इतरही युरोपियन भाषांमध्ये ते अनुवादित झाले. मात्र आश्चर्य म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचा अनुवाद होऊन तो प्रसिद्ध होण्यास १९१३ साल उजाडावे लागले. हा अनुवाद सर क्लेमेन्टस मर्खम  यांनी केला आहे. त्यांनी केवळ २५० प्रतीच छापल्या. आता एशियाटिकने आपल्याजवळील प्रतीवरून केलेले पुनर्मुद्रण मुळाबरहुकूम केले आहे. नवे तंत्रज्ञान व अक्षरांचे जुने वळण यामुळे पुस्तकाचे वेगळेपण मनावर ठसते. त्याचे श्रेय इंडिया िपट्रिंग वर्क्‍सचे.
संवादातून चिकित्सेकडे..
१५७० मध्ये वयाच्या साधारण ऐंशीव्या वर्षी गार्सयिा मृत्यू पावला (त्याची निश्चित जन्मतारीख व मृत्यूची तारीखही उपलब्ध नाही.) पौर्वात्य देशांमधील व भारतातीलही औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींच्या प्रचंड साठय़ाबद्दलची विशेष माहिती पाश्चात्त्यांना प्रथमच देण्याचे काम या पुस्तकाने केले. गार्सयिाने या पुस्तकासाठी रुआनो नावाचे एक कल्पित पात्र उभे केले आहे. मुळात पुस्तकाची मांडणी ही संवादरूप आहे. शास्त्रीय ज्ञान सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देताना ते अधिकाधिक सोपे कसे करता येईल याचा विचार ग्रंथकर्त्यांने केलेला असल्याने संवादरूप सोयीचे वाटते. डॉ. रुआनो हा नवशिका डॉक्टर असावा व त्याच्या रूपाने लोकांच्या मनातील शंकांना, प्रश्नांना वाचा फोडली असावी. तो जरी तरुण डॉक्टर असला तरी बराच िहडला-फिरलेला असल्याने व त्याचे वाचन बरेच असल्याने तो तत्कालीन अनेक प्रथितयशांचे उल्लेख करतो. यावरून गार्सयिाचा बहुश्रुतपणा लक्षात येतो. मध्येच आसपासची काही पात्रेही क्षणभर डोकावतात.
प्राचीन काळापासून ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेत संवादाला महत्त्व आहे हे आपण पाहतो. या पुस्तकावर लिहिणाऱ्यांनी गार्सयिापुढे प्लेटोचा आदर्श असावा, असे म्हटले आहे. आपल्याकडच्या गुरुशिष्य परंपरेतही संवाद आहेच. पाली ग्रंथ, उपनिषदे यात प्रश्न-उत्तरे अशी रचना दिसतेच. मौखिक परंपरेतून ज्ञानदान व ज्ञानप्राप्ती होत असल्याने ते आवश्यक होते. मात्र आपल्याकडे अधिकतर तत्त्वज्ञानात्मक विचार या रीतीने वर्णिलेले दिसतात. इथे गार्सयिाने वैद्यकीय स्वरूपाची माहिती या रीतीने दिली आहे.
गार्सयिा तत्कालीन हकीम, वैद्य यांच्याही संपर्कात होता असे निश्चित सांगता येते. त्याने एखाद्या विशिष्ट झाडाचे गुणधर्म सांगताना त्याला इतर भाषांमध्ये काय नाव आहे त्याचे संदर्भ दिले आहेत. मुस्लीम राजांशी त्याची असणारी जवळीक त्याला अशा प्रकारची माहिती मिळवण्यास साहय़कारी ठरत असावी. एक गोष्ट मात्र नक्की की, त्याला संस्कृतचे ज्ञान मुळीच नसावे. त्यामुळे जरी तो एक-दोन ठिकाणी चरकाचा उल्लेख करीत असला तरी सुश्रुताविषयी माहिती नसावी. प्रस्तुत पुनप्र्रकाशनासाठी अलोपॅथी व आयुर्वेद यांमध्ये सखोल ज्ञान व अधिकार असणारे डॉ. आर. डी. लेले यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी गार्सयिाची विद्वत्ता मान्य करूनही अधिकृत संस्कृत ग्रंथांमधून ही माहिती किती तरी आधीच्या काळापासून भारतीयांपुढे होती असे म्हटले आहे. ज्ञानसंपादनासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या गार्सयिाला भेटलेले वैद्यही त्याला याबद्दल काही सांगू शकले नसावेत का? असे मनात येतेच.
 ‘कलोक्वी’ याचा अर्थ संवाद, चर्चा आणि ‘सिम्पल्स’ म्हणजे औषधी वनस्पती. भारत व आजूबाजूच्या प्रांतांतील वनस्पतींचे वर्णन करताना गार्सयिाने एकेका वनस्पतीसाठी एकेक संवाद अशी विभागणी केली आहे. असे येथे एकंदर ५९ संवाद (प्रकरणे) आहेत. सर्वात आकर्षक भाग हा की, यात वैद्यकीय ज्ञान व वनस्पतिशास्त्र यांबरोबरच मोठय़ा प्रमाणावर दिसणारे तत्कालीन समाजाचे चित्रण. आपल्यासमोर येणाऱ्या रुग्णांचे पेहराव, सवयी, त्यांच्यामधील रूढी, परंपरा यांबद्दलची त्याची निरीक्षणे खरोखरी थक्क करणारी आहेत. तो अविवाहित होता. पण त्याच्या घरी भरपूर नोकरचाकर- गुलाम स्त्रिया, पुरुष होते. त्यांच्याकडून आपण काही गोष्टी शिकल्याचे तो सांगतो. त्याची स्वयंपाकीण सुपारी, काथ यांचा किती खुबीने वापर करी त्याचे उल्लेख आहेत. कोरफड, कापूर, धोत्रा, हस्तिदंत, अशा विविध गोष्टींबद्दल येथे वाचता येते.
बहुश्रुततेचा लाभ
या संवादांमधून तो तत्कालीन राजकारण, अर्थव्यवहार यांचेही विश्लेषण करतो. डॉ. रुआनोने एखाद्या औषधाविषयी मुसलमान काय म्हणतात, ते अमुक एका औषधाचा वापर का करीत नाहीत असे विचारले तर गार्सयिा ताडदिशी उत्तर देतो, ‘तू मला या नवीन लोकांचं काही सांगू नको. ते एकाला खाली आणण्यासाठी दुसऱ्याला वर चढवतील. ग्रीकांना खूश करताना अरबांना असंस्कृत म्हणतील.’ मध्येच गुजरात आणि दख्खन यांच्यातील राजकारणावर तो टिपणी करीत जातो. यामुळे सगळ्या तत्कालीन परिस्थितीचे भान आपल्याला येते.
या ग्रंथाचा आणखी एक विशेष लक्षात येतो की, कुठेही गार्सयिा ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ अशा वृत्तीची विधाने करीत नाही. त्याचा अनुभव, त्याची निरीक्षणे व विविध स्तरांतील अनेक रुग्णांवर उपचार केल्याने आलेला आत्मविश्वास यामुळे आपल्या विधानाबाबत तो ठाम आहे. पूर्वसूरींनी सांगितलेली एखादी गोष्ट त्याला चुकीची वाटल्यास तो ती सप्रमाण खोडून काढतो. त्या काळात- आणि आजही- असे म्हणणे हे धाडसाचेच होते व असते. ते धर्य गार्सयिा दाखवतो, हे विशेष.
 बागेत विविध गंधांची, रंगांची, प्रकारांची झाडे, फुले असावीत, तसेच येथील संवाद आहेत. वनस्पतिशास्त्राबरोबरच, वैद्यकीय माहिती, काही कथा, यात आढळतात. मुळात तत्त्वज्ञाचा िपड असणारा गार्सयिा मधूनच मानवी जीवनासंबंधीचा जो विचार सांगतो तो वाचताना, देशकालाचे अंतर मिटून गेल्यासारखे भासते. एशियाटिक सोसायटीने आपल्याजवळील दुर्मीळ व अनमोल पुस्तकांचे जतन, संरक्षण करताना केलेले हे पुनप्र्रकाशन वेगळा आनंद देते. आजच्या काळात नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळेच महाजालावर उपलब्ध असताना प्रत्यक्षात पुस्तकेच नकोत असा एक विचार ऐकू येतो. ते ऐकताना वाटते की पुस्तके ही पंचेंद्रियांनी ‘वाचायची’ असतात, तरच त्यांचा ‘खरा अर्थ’ कळतो- याचा अनुभव आपण विसरतो आहोत का? ‘कलोक्वीज’सारखे पुस्तक ‘वाचताना’ ते अधिक जाणवते.
 
(या इंग्रजी पुस्तकाची सर्व पाने मुद्दाम मुळाबरहुकूम पुनप्र्रतीत केली गेली असली, तरी ‘एशियाटिक सोसायटी’च्या संग्रहातील प्रतीला मुखपृष्ठ नव्हते. ते नव्याने करण्यात आले आहे. आतील चित्रे मात्र मूळ पोर्तुगीज आवृत्तीपासूनची!)