शाहू महाराज होते तोपर्यंत खुद्द ब्राह्मणेतरांमध्ये मोडणाऱ्या वेगवेगळ्या हितसंबंधांमधील संघर्ष दबून राहिले होते. सर्वानी मिळून सर्वाचा समाज प्रतिस्पर्धी वरच्या स्थानावरील जो ब्राह्मण त्याला कंसाबाहेर काढून  इतरांना कंसात टाकले होते. म्हणजेच ब्राह्मण विरुद्ध इतर सर्व असे या संघर्षांचे रूप होते. परंतु, नंतर कंसातील घटकांना त्यांच्या आपापसातील विरोधाची जाणीव व्हायला वेळ लागला नाही..
एखाद्या मोठय़ा समाजाला आलेल्या समाजांतर्गत विविध समूहांना आपल्या अस्तित्वाची जाणीव म्हणजेच अस्मिता प्राप्त झाल्याशिवाय तो समाज किंवा तद्अंतर्गत समूह आपापल्या हक्कांविषयी जागृत होत नसतात. आपल्यावर अन्याय होत असला, तरी ते तो निमूटपणे सहन करतात. त्या समाजावरच अन्याय होत असेल, तर त्याच्यातील घटक समूह आपापसातले संघर्ष, वाद इतकेच नव्हे तर एकमेकांना छेद देणारे हितसंबंध बाजूला ठेवून एकत्र येतात व त्या अन्यायाचा प्रतिकार करतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्रामधील राजकीय पक्षोपपक्ष असेच एकवटले होते. एका बाजूला कम्युनिस्ट तर दुसरीकडे जनसंघ, तर एकीकडे हिंदुमहासभा आणि दुसरीकडे रिपब्लिकन!
या सर्व समाजघटकांना एकत्र येण्याची प्रेरणा देणाऱ्यांमध्ये त्या वेळचे कलावंत आघाडीवर होते. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, वा. रा. कोठारी अशा वक्त्यांना व पत्रकारांना कलावंत म्हणायला काय हरकत आहे? अमर शेख, अण्णा भाऊ, गवाणकर अशा शाहिरांविषयी तर प्रश्नच उपस्थित होत नाही. जगातल्या सर्वच मानवांना एक समाज मानता येतो. त्याही पुढे जाऊन सर्व सजीवांनाही एक समाज मानता येईल. ज्ञानेश्वरांनी ‘भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे।।’ म्हटले, तेव्हा समाजाची कल्पनेने व्यापकपणाची सीमा गाठली. पण समाज जितका व्यापक तितकी त्याच्या अस्मितेची तीव्रता कमी. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात असताना आचार्य विनोबा भाव्यांनी ‘जय जगत्’चा नारा लावला, त्याला कोण दाद देणार?
प्राणिमात्रांचे घडीभर बाजूला ठेवू फक्त मानवी समाजापुरता विचार करता असे दिसते, की त्याची जास्तीत जास्त व्यापक समूहांमध्ये विभागणी कार्ल मार्क्‍सने केली. मानवी समाज हा आदिम साम्यवादाची अवस्था वगळता, नेहमीच वर्गाधिष्ठित राहिला असल्याचे मार्क्‍सने निदर्शनास आणले. वर्तमानकालीन भांडवलशाही युगात समाजाची उत्पादन साधनांची मालकी असलेले भांडवलदार आणि अशा मालकी हक्कापासून वंचित ठेवले गेलेले व त्यामुळेच शोषणाला बळी पडणारे श्रमिक असे दोनच वर्ग मार्क्‍सच्या मते शिल्लक राहतात.
पण असे समूह नुसते अस्तित्वात असून भागत नाही. त्यांना अस्तित्वभान असावे लागते. श्रमिकांपुरते बोलायचे झाले तर त्यांना तशी वर्गजाणीव पहिल्यांदा स्वत: मार्क्‍सनेच करून दिली. ‘जगातील श्रमिकांनो! एक व्हा’ असा जाहीरनामा काढला. भारतीय समाजरचना फार पूर्वीपासून वर्णजात्याधिष्ठित आहे हे आपण जाणतो. या रचनेत वरच्या जातींकडून खालच्या जातींवर अन्याय होणे अटळच होते. त्यानुसार तो होतही होता. तेथेही अशाच प्रकारच्या आत्मभानाची, अस्मितेची आवश्यकता होती. त्याशिवाय अन्यायग्रस्त खालच्या जातींनी अन्याय करणाऱ्या वरच्या जातींना आव्हान देऊन त्यांच्याविरुद्ध लढा उभारला नसता.
आता वर्ण किंवा जाती दोनच असत्या तर हे काम सोपे झाले असते. पण वर्ण चार आणि जाती तर असंख्य व विशेष म्हणजे सर्वात खालची जात वगळता, इतर सर्व जातींच्या खाली कोणती तरी जात असल्यामुळे प्रत्येक जातीला आपण कोणातरीपेक्षा श्रेष्ठ आहोत, असा टेंभा मारायची सोय होती. या मानसिक (काही प्रमाणातील भौतिक) लाभापोटी आपल्यावर वरिष्ठ जातींकडून होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करता येणे शक्य होते. याच प्रकाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रेणीबद्ध विषमता असे नाव दिल्याचे आपण जाणतो.
पण या रचनेत आणखीही एक प्रकार घडतो. जात जितकी वरिष्ठ तितकी तिच्या खालच्या जातीची संख्या अधिक व तिच्याकडून होणाऱ्या अन्यायाला व शोषणाला वाव अधिक. आता ब्राह्मण या श्रेणीबद्ध विषमतेच्या सर्वात वरच्या स्थानी असल्यामुळे त्यांना अशी आगळीक करण्याची संधी अधिक होती. विशेष म्हणजे त्यांचे धार्मिक वर्चस्व सर्वानीच मान्य केलेले असल्यामुळे (ते म्हणजे पुरोहितांचे वा धर्मगुरूंचे वर्चस्व सर्वच समूहांना मान्य असते) त्याबाबत कोणाची फारशी तक्रार नसायची, पण ते त्याच्या अनुषंगाने इतर दोघांतही हात-पाय पसरून त्याची व्याप्ती वाढत गेली, तशी इतर वर्ण-जातींची नाराजी वाढून त्या एकवटणे शक्य व सोपे झाले. महाराष्ट्रापुरते बोलायचे म्हणजे अशा जातींना ब्राह्मणांच्या विरोधात एकवटण्यासाठी आवश्यक असणारी आत्मजाणीव किंवा अस्मिता महात्मा जोतिराव फुले यांनी दिली. खरे तर कलियुगात नंद घराण्यानंतर ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण आहेत, अशी भूमिका घेऊन धर्ममरतडांनी जोतिरावांचे काम सोपे करून टाकले होते. जोतिरावांनी ब्राह्मण एकीकडे ठेवून दुसरीकडे शूद्रातिशूद्रांना उभे केले. पण पुढे-पुढे ‘शूद्रातिशूद्र’ हा शब्द (जसा पश्चिमेत निग्रो) निंदाव्यंजक किंवा हलकेपणा सूचित करणारा वाटल्यामुळे राजारामशास्त्री भागवतांनी त्याऐवजी ‘ब्राह्मणेतर’ शब्दाचा प्रयोग केला व पुढे तो चांगला रुळलासुद्धा. त्यामुळेच जोतिरावांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे रूपांतर ब्राह्मणेतर पक्षात होणे शक्य झाले. ही ब्राह्मणेतरी अस्मिता महाराष्ट्रात रुजवण्याचे श्रेय बऱ्याच प्रमाणात करवीर शाहू छत्रपतींना द्यावे लागते. ब्राह्मणेतर म्हणजे महाराष्ट्रातले ब्राह्मण सोडून इतर सर्व – म्हणजे क्षत्रिय मानले जाणाऱ्यांपासून तर अतिशूद्र अंत्यज मानले जाणाऱ्यांपर्यंत.
समाजाचे अशा दोन समूहांमध्ये ध्रुवीकरण होण्याची प्रक्रिया शक्य होण्याचे कारण तसे अवघड नाही. श्रेणीबद्ध विषम रचनेत सर्वात वरच्या स्थानी असलेल्याचा उपसर्ग खालच्या सर्वानाच कमी-अधिक प्रमाणात होणे स्वाभाविक आणि शक्य होतेच. त्यामुळे त्या सर्वाच्या प्रतिक्रियात्मक भावना त्या वरच्या स्थानावरील समूहाच्या रोखाने केंद्रिभूत करणेही शक्य होते आणि अगदी तसेच घडले. वर्गाधिष्ठित समाजात भांडवलदार आणि श्रमिक असे दोनच वर्ग उरतील, असे मार्क्‍स म्हणाला तसाच काहीसा हा प्रकार वर्णजात्याधिष्ठित समाजात घडला.
मार्क्‍सवादी आर्थिक विचारांना वास्तवात राजकीय परिमाण प्राप्त करून देण्याचे (म्हणजे क्रांती करून सोविएत रशियाची निर्मिती करण्याचे) काम लेनिनने केले. त्याप्रमाणे फुल्यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय विचारांना परिमाण शाहू महाराजांनी दिले. मार्क्‍स लेनिनला समांतर येथे फुले-शाहू आहेत. अर्थात तेव्हा आपला देशच ब्रिटिशांच्या गुलामीत असल्यामुळे या परिमाणाचे स्वरूप मर्यादित असणार हे उघड आहे. ते ब्रिटिश कायद्याच्या मर्यादेत होणाऱ्या निवडणुका लढवून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सत्तास्थाने पटकावण्याची एवढय़ापुरताच होता. परंतु, शाहू महाराजांच्या पश्चात हे मर्यादित यशसुद्धा धोक्यात आले. छत्रपती होते तोपर्यंत खुद्द ब्राह्मणेतरांमध्ये मोडणाऱ्या वेगवेगळ्या हितसंबंधांमधील संघर्ष दबून राहिले होते. सर्वानी मिळून सर्वाचा समाज प्रतिस्पर्धी वरच्या स्थानावरील जो ब्राह्मण त्याला कंसाबाहेर काढून (ु१ूं‘ी३्रल्लॠ  करून ) इतरांना कंसात टाकले होते. म्हणजेच ब्राह्मण विरुद्ध इतर सर्व असे या संघर्षांचे रूप होते. परंतु, नंतर कंसातील घटकांना त्यांच्या आपापसातील विरोधाची जाणीव व्हायला वेळ लागला नाही. महाराष्ट्रातील अस्पृश्य मानल्या गेलेल्या जाती या अर्थातच ब्राह्मण नसल्यामुळे त्यांचाही समावेश सुरुवातीला ‘ब्राह्मणेतर’ या कॅटॅगरीत केला गेला. परंतु, तेवढय़ाने त्यांची अस्पृश्यता आपोआप संपली किंवा त्यांचे व ब्राह्मणेतर सवर्णाचे हितसंबंध एकरूप झाले असे घडले नाही. हे लक्षात आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली म्हणजे दलितांची चळवळ ब्राह्मणेतर चळवळीपासून वेगळी केली.
ऋग्वेदातील पुरुषसूक्तातील रूपकाचाच आधार घेऊन बाबासाहेबांनी हा मुद्दा मांडला. त्यानुसार समाज पुरुषाच्या देहाचे अवयवघटक ब्राह्मण म्हणजे मुख, क्षत्रिय म्हणजे बाहू, मांडय़ा म्हणजे वैश्य आणि पाय म्हणजे शूद्र. पण यात अतिशूद्र अस्पृश्यांचा समावेशच नाही! अर्थ स्पष्ट आहे अस्पृश्यांचे हितसंबंध केवळ ब्राह्मणांच्याच नव्हे तर सर्व सवर्ण ब्राह्मणेतराच्या हितसंबंधांपेक्षा देखील वेगळे इतकेच नव्हे तर प्रसंगी परस्परविरोधी ठरतात! या समूहाला अस्मिता देण्याचे महान कार्य स्वत: बाबासाहेबांना करावे लागले. या संदर्भात शूद्र हे समाजपुरुषाचे पाय असतील, तर अतिशूद्राचे स्थान पायातील पायताणाप्रमाणे मानावे लागेल, असा या रूपकाचा विस्तार करावा लागला. पण याचा अर्थ सवर्ण किंवा स्पृश्य ब्राह्मणेतरांच्याच गटात सर्व काही आलबेल होते, असा मात्र नाही. त्यांच्यातही ब्रिटिश सरकारने मराठे आणि तत्सम अशी वर्गवारी करून मेख मारून ठेवली. विधिमंडळात मराठे आणि तत्सम यांच्यासाठी जागा राखीव ठेवायच्या तर मराठय़ांसाठी किती व तत्समांसाठी किती या आकडेवारीवर संघर्ष सुरू झाला.
थोडक्यात काय की ब्राह्मणांचे ‘ब्रॅकेटिंग’ करून थांबता येत नाही. कंसातल्या कंसातही ‘ब्रॅकेटिंग’ करावे लागते. विशिष्ट समूह कंसात की कंसाबाहेर हे नेहमीच सापेक्ष असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या समाजगतीचे विश्लेषण केले असता ती सहसा अशा ब्रॅकेटिंगवर आधारित असल्याचे दिसून येते. साहजिकच इथले राजकारणही ब्रॅकेटिंगचेच राहिले आहे.

*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन ’ हे सदर