‘१६ हजार एकर जमीन बिल्डरांना आंदण’ ही बातमी (४ एप्रिल) वाचली. विरोधी पक्षात असताना अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवणाऱ्या मुलूखमदान तोफांचे सत्तेवर येताच (मतांसाठीच ना!) असे अवसान गळते याचा प्रत्यय आला. म्हणजे पुढील काळात कोणतेही बांधकाम करताना, नवीन इमारती बांधताना संबंधित खात्याची परवानगी आवश्यक नसणार असे समजायचे काय? कारण, सरकारच जर अनधिकृत बांधकामांचा पाठपुरावा करणार असेल व तेदेखील कोर्टाचा निकाल डावलून, तर पुढील काळात प्रतिभा , कॅम्पा कोला, आदर्शसारख्या इमारतींचे व सगळ्या खारफुटीच्या, आरे मिल्क कॉलनीसारख्या संरक्षित, वनजमिनींवर नवीन झोपडय़ांचे पेव फुटलेले पाहायला मिळणार हे नक्की. थोडक्यात, अनधिकृतांचा भविष्यकाळ (मग सत्तेत कोणताही पक्ष असो) उज्ज्वल आहे असेच आज तरी वाटते. सत्ताधारी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करीत आहेत व त्यांना रोखणारे कोणीही नाही असे विदारक दृश्य पाहायला लागणे यासारखे दुर्दैव दुसरे कोणते.
 गुड फ्रायडे नुकताच झाला. तेव्हा येशूच्या मारेकऱ्यांबाबत जे येशूने म्हटले होते ‘हे देवा तू त्यांना माफ कर, कारण ते काय करताहेत हे त्यांना समजत नाही’ तशा प्रकारचीच आम्हा सामान्य जनतेची भावना झाली आहे.   

जो जे वांछील तो ते लाहो
घुमान येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे भाषण वाचून ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या ओळीची आठवण झाली. संमेलन पंजाबमध्ये भरले म्हणून नामदेवांचा आणि त्यांच्या मागून वारकरी संप्रदायाचा, संत साहित्याचा उल्लेख अपरिहार्य होता. साहित्य संमेलनाच्या विरोधी मत नोंदवणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा आणि देशीवादाचाही उल्लेख हवाच. शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी बोलल्याशिवाय साहित्यिकांची संवेदनशीलता आणि दाहक वगरे वास्तवाचे त्यांना असलेले भान यांचे प्रतििबब अध्यक्षीय भाषणात कसे दिसणार? मग या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या संतसाहित्यात असलेल्या ‘मुळा’ची जाणीव करून देणे गरजेचे आहे, असे सांगत आपल्या मूळ सूत्राकडे ते येतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुळावर उठलेली भांडवलशाही, उत्तर भांडवलशाही वगरे शब्दांची पेरणी करून आधुनिकतेचा आवही छान आणला आहे. भगवद्गीतेप्रमाणे या भाषणातून प्रत्येकाला हवे ते तात्पर्य काढता येणे शक्य आहे. सर्वसमावेशक या प्रशंसेला पात्र असे हे अध्यक्षीय भाषण विद्यापीठातील भावी विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणून मोलाचे ठरणार आहे.
 – गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

संमेलनाध्यक्षांना शरद जोशींचे विस्मरण
‘सदानंदांचा येळकोट’ हे शनिवारचे संपादकीय आणि ‘विवेकवेलीची लावणी’ वाचून (४ एप्रिल) दोन शब्द लिहावेसे वाटले. आपण म्हणता शेतकऱ्याला त्याच्या मूळ स्वभावाची, तात्त्विक बैठकीची जाणीव करून देण्याची गरज आहे. हे काम साहित्यिकांचे आहे. सदानंदजी हे जाणूनबुजून विसरतात की हे काम महाराष्ट्रात तरी शरद जोशींनी पुरेपूर केले आहे. मोरे यांना प्रबोधनकार आठवतात, जवळकर आठवतात, परंतु शरद जोशी आठवत नाहीत हेच दुर्दैव म्हणावे लागेल. शरद जोशी प्रस्थापित साहित्यिक नसतीलही, परंतु त्यांच्या लेखनातून त्यांनी शेती व शेतकरी यांच्या समस्यांची, जाणिवांची, उपमांची एक तर्कसंगत विचारसरणी मांडली आहे. कृतीतून, आंदोलनातून जागृती केली आहे. फुल्यांची विचारसरणी अनुसरून भरपूर लिखाण केले आहे. देशभर त्यांना शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून नावलौकिक आहे. शेतीचे अर्थशास्त्र सोप्या व समजण्याच्या भाषेत मांडले आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी ते एकदा चाळून बघावे म्हणजे आपण ‘लिलिपुट’च आहोत हे त्यांच्या लक्षात येईल.
विशेष म्हणजे शरद जोशींनी  पंजाब व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंजाब राजभवनला शेतकऱ्यांसोबत वेढा घातला होता, त्याची माहिती सदानंद मोरे यांना नसावी हे दुर्दैव. नामदेवांच्या तोडीचे हे काम होते अध्यक्षमहाराज. जोतिरावांचे असूड हाती घेण्याचे काम सरकारी साहित्यिकांचे नाही. त्याला ‘जातिवंतच’ असावे लागतात. हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे.
 -रमेश  शिंदे,  मु. पात्रुड, ता. माजलगाव (बीड)

रेल्वे खात्याचा अजब न्याय
दलालांकडून तिकीट विकत घेणाऱ्या प्रवाशांना शिक्षा करण्याच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेतून रेल्वेचा अजब न्यायच समोर येतो. मुळात कोणताही ‘सामान्य’ प्रवासी १२० दिवस आधी आपल्या प्रवासाची योजना आखण्याच्या परिस्थितीत नसतो. त्यामुळे ६० दिवस आधी मिळणारे आरक्षण १२० दिवस आधी मिळू लागल्यावर त्याचा फायदा एजंटनाच होणार. तरीही ते अमलात आणले, जे ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना रद्द करण्यात आले होते. आरक्षित तिकीट न मिळाल्याने प्रतीक्षा यादी वाढणार आणि त्यासाठीसुद्धा प्रवाशांना पूर्ण पसे भरावे लागतात. त्याचा फायदा रेल्वेलाच होणार. कारण १२० दिवस ते पसे रेल्वे वापरणार. परत प्रवाशाला तिकिटाची कोणतीही हमी नाही. एकंदरीत या धोरणात सामान्यांसाठी सुविधेपेक्षा १२० दिवस बिनव्याजी वापरायला मिळणाऱ्या पशांचाच जास्त विचार दिसतो. म्हणून प्रवाशांच्या हिताचा विचार करता आरक्षणाची मुदत पूर्वीप्रमाणे ६० दिवसांवर आणणे हेच योग्य ठरेल.
– अनिल करंबेळकर, बदलापूर

आता  ‘आरोग्यवर्धक’ तंबाखूच्या शेतीवर भर द्यावा !
नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी ‘तंबाखू पचनासाठी चांगला असतो’ हा नवीन शोध लावून मोठे उपकार केले आहेत. या नवीन शोधामुळे ‘तंबाखूमुळे कर्करोग होतो’ हा विज्ञानाने लावलेला शोध किती चुकीचा आहे हेच लक्षात येते.  खासदारांच्या या शोधामुळे माझे अज्ञान दूर झाले आहे. त्यामुळे मी लगेचच व्यसनमुक्ती केंद्राच्या सदस्यत्वाचा राजीनामादेखील दिला.  माझे जे मित्र तंबाखू खातात त्यांचे आज मला कौतुक वाटते. ते खरेच आपल्या पचनक्रियेबद्दल किती गंभीरपणे विचार करतात हे आज मला कळाले. घरातल्या सोप-सुपारीच्या डब्यात आता तंबाखूदेखील ठेवायला हरकत नाही. मला तर वाटते डॉक्टरांनीदेखील अपचनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना औषधांऐवजी एक एक तंबाखूची पुडी द्यावी. खासदारांनी हा शोध खूप आधीच लावला असता तर पोलिओप्रमाणे ‘अपचन’ हा आजारदेखील भारतातून पूर्णपणे नाहीसा झाला असता. असो उशिरा का होईना शोध लागला हे महत्त्वाचे. बाकीच्या देशांमध्ये तंबाखूमुळे कर्करोग होत असेल, पण भारतात तो आरोग्यवर्धक असल्यामुळे आता तंबाखूच्या शेतीवर भर द्यायला हवा.
 – जीवन आघाव, पुणे</strong>

उत्तम आदर्श
मरियम सिद्दिकी या मुस्लीम मुलीने गीता पाठांतर  स्पध्रेत बाजी मारून समाजापुढे एक उत्तम आदर्श घालून दिला आहे. आपल्या धर्माचे आचरण करीत असतानाच इतर धर्मीयांच्या  धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करण्यामुळे जर धार्मिक तेढ  कमी होण्यास मदत होत असेल तर ती चांगलीच बाब आहे. सर्व धर्माची ओळख होईल असे उपक्रम शाळांनीही राबवावेत.
– विवेक तवटे, कळवा