आपल्या राज्याप्रमाणेच तिकडे कॅलिफोर्नियासारखे राज्य दुष्काळाच्या खाईत पडलेले आहे. सर्वत्र बळीराजा नाडलेला असून समाजाची शेतीबाबतची अनास्था हे त्यामागील एक मोठे कारण आहे. दिवाळीसारखा कृषिसंस्कृतीची परंपरा सांगणारा सण साजरा करताना आपणांस हेच ध्यानी ठेवायला हवे की बळीराजाला आधार हवा असतो तो समाजाचा..
दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी हे ज्या सणाचे ‘जिंगल’, तो नक्कीच कृषिसंस्कृतीचा असणार हे काही वेगळे सांगायला नको. पशुपालन अवस्थेतून बाहेर पडत भटका माणूस स्थिर होतो, शेतात हवी ती पिके पिकवू लागतो हे मानवसमाजाने प्रकाशाकडे टाकलेले एक पाऊल. त्या प्रवासाचा, प्रकाशाचा महोत्सव म्हणजे दिवाळी. उपनिषदकाळात कोणा तत्त्वज्ञकवीला एक प्रार्थना सुचली होती. तमसो मा ज्योतिर्गमय. तेजाकडे जाण्याच्या त्या उत्कट उत्तुंग ध्येयाची आरती म्हणजे दिवाळी. हा ऋतुबदलाचा काळ. पावसाळा परतीच्या वाटेवर दूर गेलेला असतो. शरद सुरू होत असतो. उन्हाचा ताप आणि पावसाचा ताण हे सगळे विसरून नव्या धान्याच्या अलौकिक सुगंधाने गावशिवारे फुललेली असतात. अशा काळात हा आनंदोत्सव साजरा केला जातो. तो सरळच शेतकऱ्यांच्या वेळापत्रकाशी निगडित आहे. सवत्स गाईची पूजा, बळीराजाची पूजा, त्यातील इडापीडा टळून बळीचे राज्य येवो ही प्रार्थना हे सगळेच कृषिसंस्कृतीशी जोडले गेलेले आहे. म्हणूनच दिवाळीच्या काळात खरेदीसाठी उसळलेली गर्दी, फटाक्यांची आतषबाजी, त्यांपासून होणारे ध्वनी आणि वायू यांचे प्रदूषण, झालेच तर दिवाळी अंक अशा नेहमीच्या वार्ताविषयांच्या पलीकडे जाऊन शेती आणि शेतकरी यांची खबरबातही घ्यायला हवी. याचे आणखी एक कारण आहे. अतिप्रकाशात माणसाचे डोळे दिपतात, दृष्टी मंदावते. दिवाळीत नेमके हेच होते. आनंदाची पाऊसझाडे थुईथुई नाचू लागली की मागचा सारा आसमंत धूसर होतो. तशात आजचा काळ असा वेगवान की क्षणापूर्वीच्या घटनाही क्षणात शिळ्या होतात आणि दोनच महिन्यांपूर्वी राज्यातील पाच महसुली विभागांतील तब्बल १२३ तालुके दुष्काळात होरपळत होते हेही आठवेनासे होते. सालाबादप्रमाणे यंदाही तसेच होऊ नये म्हणून दिवाळीच्या तोंडावर, आनंदमदाचा अंमल चढू लागण्यापूर्वी एकदा त्या परिस्थितीचेही स्मरण करायला हवे.
दुष्काळ तसा महाराष्ट्राला नवा नाही. नेमेचि तो येत असतो. त्यातही अनेकांचे हितसंबंध अडकले असल्याने अनेकांना तर तो हवाही असतो. आता पावसाचे चक्र काही माणसांच्या हाती नाही. पर्यावरणवादी मंडळी त्यातील बिघाडासाठी माणसाला दोष देतात हा भाग वेगळा. पण पर्यावरणात माणसाचा एवढा प्रचंड हस्तक्षेप नव्हता तेव्हाही दुष्काळ पडतच होता. अगदी महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर दुर्गादेवीच्या दुष्काळाचे उदाहरण देता येईल. राज्यात साखर कारखाने आणि सरकारी सिंचन योजना नसतानाही सलग बारा वष्रे तो पडला होता. तेव्हा वैश्विक तापमानवाढ वगरेचा बागुलबुवा दाखवून लोकांना घाबरवून सोडण्यात फार काही हशील नाही. दुष्काळावर माणसाची मात्रा चालत नसली, तरी त्यावर मात कशी करायची हे मात्र त्याच्या हाती असते. त्याबाबत आपल्याकडे नेमकी बोंब आहे. अर्थात यात राजकीय आरोपांचा भाग किती आणि वस्तुस्थिती किती हेही एकदा नीट तपासून घेतले पाहिजे. याबाबत सरकारला सरसकट झोडपून काढणे सोपे असते. कारण त्याने समाज म्हणून आपली जी काही जबाबदारी असते त्यापासून आपसूकच सुटका मिळते. सरकार खरेच झोपलेले असते का? विदर्भ, मराठवाडा येथे सातत्याने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी तोंडावर फेकून कोणीही म्हणू शकेल की सरकार कुंभकर्णाचा अवतार आहे. कोणी त्यासाठी राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुर्दशेच्या कृष्णपत्रिका वाचून दाखवील. कोणी मंत्र्या-संत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे निर्देश करील. आणखी कोणी विद्वान दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खासच तिसऱ्या जगाचा रोग म्हणून तुच्छतेची एक िपक टाकील. हे सत्य आहेच. ते कोणालाही नाकारता येणार नाही. पण ते अध्रे सत्य आहे. तसे नसते तर आज अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशातील एका राज्याला दुष्काळाने त्राही माम् केले नसते.
 मुळात अमेरिका आणि दुष्काळ हे समीकरणच आपणांस पचायला अवघड आहे. याला कारण हॉलीवूडचे चित्रपट आणि रंगीबेरंगी वृत्तमाध्यमे. त्यांतून अमेरिकेची जी प्रतिमा आपल्यासमोर येते ती अगदी इस्टमनकलर आणि सिनेमास्कोपच असते. काश्मीरबाबत एक शेर सांगितला जातो. गर फिरदौस बर-रू-ए-जमीं अस्त, हमीं अस्तो हमी अस्तो हमी अस्त. हेच आज अमेरिकेला म्हटले जाते. धरतीवरचा स्वर्ग कोठे असेल तर तो अमेरिकेतच असे मानल्यामुळे मग माध्यमांचाही कल अमेरिकेतील वंगाळ सारे लपविण्याकडेच असतो. परिणामी कॅलिफोर्नियासारखे राज्य सलग तीन वष्रे दुष्काळाच्या खाईत पडलेले आहे आणि तरीही माध्यमांतून ते बेदखलच आहे. दुष्काळ अलाबामा, ओक्लाहामा या राज्यांतही आहे. पण कॅलिफोर्नियातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तेथील अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. नळाला पाण्याचे टिपूस नाही. तळी, विहिरी आटल्या आहेत. हिरव्याकंच शेतांची माळराने बनली आहेत. जनावरे मरत आहेत. पण अजून कोठे सरकारने चाराछावण्या उभारल्याच्या बातम्या नाहीत. गोरगरिबांकडे पाणी विकत घ्यायलाही पसे नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना विकत घ्यायला पाणी नाही. शहरांमधून पाणीकपात करण्यात आली आहे. कॅलिफोíनयातील सांता बार्बरा तहसिलातील मॉन्टेसिटो म्हणजे अतिश्रीमंतांचा भाग. माध्यमसम्राज्ञी ओप्रा विन्फ्रे, अभिनेता टॉम क्रूझ, दूरचित्रवाणी वाहिन्यांचा निर्माता-विनोदवीर एलेन डीजेनेरेस यांसारखे मातब्बर तेथे राहतात. तेथे पाण्याचे रेशिनग सुरू आहे आणि जास्त पाणी वापरणाऱ्यांना भरभक्कम दंड केला जात आहे. या दुष्काळाचा परिणाम अमेरिकेतल्या सणासुदीवरही झाला आहे. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला तेथे हॅलोविन हा एक दिवसाचा पितृपाट साजरा केला जातो. त्यात भोपळ्याला फार महत्त्व. अमेरिकेतील इलिनॉयनंतर सर्वाधिक भोपळा पिकतो तो कॅलिफोíनयात. पण दुष्काळाने त्या पिकालाही मार दिला आहे. यंदा अमेरिकन नागरिकांना त्यांचा पितृपाट भलताच महागात जाणार आहे. हे सगळे सुरू असताना ओबामांचे सरकार झोपले आहे का? जगावर सत्ता गाजविणारी अमेरिका या दुष्काळातून नागरिकांना दिलासा देऊ शकत नाही काय? सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नवनव्या पाणीपुरवठा, सिंचन योजना आखल्या जात आहेत. गावांना, शहरांना त्यासाठी अनुदाने दिली जात आहेत. ओबामा सत्तेवर आल्यापासून एकटय़ा कॅलिफोíनयाच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी ३१० दशलक्ष डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्च करण्यात आली आहे आणि तरीही तेथील अनेक भाग कोरडे आहेत. केवळ अमेरिकेतच अशी परिस्थिती आहे असे नाही. त्या खंडातील पनामा, कोलंबा, व्हेनेझ्युएला, ब्राझील, बोलेव्हिया अशा अनेक देशांत अवर्षण आहे. याचा परिणाम सर्वात आधी भोगावा लागतो तो शेतकऱ्यांनाच. सहा महिन्यांपूर्वी ‘न्यूजवीक’ने एक मुखपृष्ठकथा केली होती. तिचे नाव होते शिवारातले मृत्यू. अवर्षणातून येणारा कर्जबाजारीपणा आणि वैफल्य यांचा पहिला आणि खरे तर अखेरचाही बळी असतो तो बळीराजाच. हे चित्र जसे महाराष्ट्रात दिसते तसेच ते समृद्धीचे आगार असलेल्या अमेरिकेतही असते हेच त्या वृत्तलेखाने स्पष्ट केले.
 हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे सगळीकडेच बळीराजा नाडलेला आहे. त्याला कारण केवळ सरकार नाही. पण तसे ते सर्वस्वी बदलते हवामानही नाही. समाजाची शेतीबाबतची अनास्था हेही त्यामागील एक मोठे कारण आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसारखा कृषिसंस्कृतीची परंपरा सांगणारा सण साजरा करताना आपणांस हेच ध्यानी ठेवायला हवे की बळीराजाला आधार हवा असतो तो समाजाचा. शेतकऱ्यांच्या बहुसंख्य आत्महत्यांमागे वैफल्यग्रस्तता हे प्रमुख कारण आहे. ती इडापीडा टळू दे एवढेच त्याचे मागणे असते. तो तमस दूर करणाऱ्या दिवाळीची त्याला चारी काळ गरज असते.