काहीही कर पण भाऊसाहेब फॉरेस्टांना राग आण, असं ऐकताच रूपलख भाऊसाहेब फॉरेस्टांच्या खोलीकडे गेला. ते तुकोबांच्या गाथेतून काही अभंग लिहून घेत होते. रूपलख खोलीबाहेरच बसला आणि मोठमोठय़ानं बोलू लागला. म्हणाला, ‘‘काय थेरडा आहे पाहा, काही काम ना धंदा नुसता अभंग खरडत बसला आहे’’. स्वतवर पूर्ण ताबा ठेवत भाऊसाहेब फॉरेस्ट बसल्या जागेवरून शांतपणे म्हणाले, ‘‘हे बघ रूपलख तुझा नि माझा काही संबंध नाही. मी अभंग लिहितो त्यात तुझं काय गेलं?’’ त्यावर रूपलख आणखीच जोरात म्हणाला, ‘‘जा रे, कवडीची अक्कल नाही आणि म्हणे परमार्थ करतो..’’ खरं तर परमार्थाची आठवण करून देणारी ही विचित्र रीतच होती! पण भाऊसाहेब फॉरेस्ट तिरिमिरीत उठले आणि गरजले, ‘‘खबरदार जास्त बोलशील तर!’’ त्यावर त्याने एक शिवीच हासडली. ती ऐकताच तर भाऊसाहेब फॉरेस्ट यांचा सर्व संयम संपला आणि सोटा घेऊन त्याच्या दिशेने ते धावतच खोलीबाहेर आले. त्यांना पाहताच तो धावतच महाराजांच्या खोलीत आला आणि म्हणाला, ‘महाराज हे पाहा लचांड येत आहे.’ भाऊसाहेब फॉरेस्टांना पाठोपाठ ओरडत खोलीत शिरताना पाहून श्रीमहाराज त्यांना शांत करीत म्हणाले, ‘‘काय झाले तरी काय?’’ भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणाले, ‘‘महाराज याला बजावून ठेवा. माझा राग फार वाईट आहे.’’ लगेच श्रीमहाराज म्हणाले, ‘‘अरे भाऊसाहेब पण तुम्ही तर राग सोडला आहे ना?’’ हे ऐकताच डोक्यावर बर्फाचं पाणी ओतल्यागत भाऊसाहेब फॉरेस्ट तात्काळ शांत झाले आणि म्हणाले, ‘‘खरंच की महाराज, मी ते विसरूनच गेलो होतो!’’ हा प्रसंग वाचताना या जागी भाऊसाहेबांचा मोठेपणाही जाणवतो. आपल्या कृतीचं कोणतंही लंगडं समर्थन न करता त्यांनी लगेच चूक मान्य केली. श्रीमहाराज त्यांना समजावणीच्या स्वरात म्हणाले, ‘‘भाऊसाहेब राग जिंकणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. स्वार्थ सुटायला आणि विकार ताब्यात यायला उपासनेचं बळ लागतं. मी मी म्हणणाऱ्या तपस्व्यांनासुद्धा क्रोध आपल्या तावडीत पाहता पाहता पकडतो. मग आपल्यासारख्यांनी किती सावध राहायला पाहिजे ते बघा. म्हणून जो नाम घेईल त्याची सावधानता टिकेल आणि विकारांवर स्वामित्व चालेल.’’ श्रीमहाराजांच्या या सांगण्यात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे सावधानता आणि दुसरी म्हणजे विकारांवर स्वामित्व! सावधानतेचा विचार आपण नंतर ओघानं, तपशिलात आणि वेळोवेळी करणारच आहोत, पण ‘विकारांवर स्वामित्व’चा थोडा विस्तारानं विचार करू. इथे श्रीमहाराजांनी विकारांवर स्वामित्व मिळवायला सांगितलं आहे. याचाच अर्थ जीवनातून विकार नष्ट झाले पाहिजेत किंवा नष्ट करा, असं सांगितलं नाही. तर विकार असतीलच फक्त तुम्ही त्यांचे गुलाम बनू नका, मालक बना, असं सांगितलं. आज अनवधानानं आपण विकारांच्या गुलामीत अडकले आहोत. अवधान येईल तेव्हा ही वेठबिगारीही संपवता येईल. त्यासाठीचा एक मात्र उपाय उपासना!