विकार आणि वासनांची गुलामी संपवायचा एक मात्र उपाय म्हणजे उपासना. ती अस्सल मात्र असावी. ती सोडून जर आपण तिच्या अवडंबरात अडकलो तर धोका मोठा आहे. कारण उपासना खोलवर रुजत न जाता ती देखाव्यापुरती वाढत राहिली तर आपण कोणीतरी झालो, हा भ्रम निर्माण होतो. त्यातून आपण स्वतला त्यागी, शांत, संयमी, निस्वार्थी मानू लागतो. श्रीमहाराजांचं एक वाक्य आहे, ‘‘निस्वार्थीपणाचे फार सोंग आणू नये. ते शेवटपर्यंत टिकत नाही.’’ (बोधवचने, अनु. १४१). हे वाक्य माझ्या प्रत्येक सोंगाला लागू आहे. ‘आता मी निलरेभी झालो,’ असं मला वाटायचा अवकाश असे अनेक प्रसंग उभे ठाकतील की मी खरा किती लोभी आहे, हेच उघड होईल! जे खरं आहे, अस्सल आहे ते कधीच बदलत नाही आणि जे सोंग आहे ते उघडं पडल्यावाचून राहात नाही. तुकोबांनी म्हटलं आहे ना? ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’. जे आत खदखदत आहे ते उफाळून बाहेर आल्यावाचून राहणारच नाही. निस्वार्थीपणाचं, अक्रोधाचं, शांतीचं, विनयाचं, निष्कामतेचं, सात्त्विकतेचं कितीही सोंग मी वठवलं तरी अंतरंगातला स्वार्थ, क्रोध, अशांती, अहंकार, काम, तामसीपणा प्रसंग येताच उफाळून बाहेर आल्यावाचून राहणार नाही. तेव्हा ‘क्रोध जिंकला,’ असं वाटणं वास्तवात किती भ्रामक होतं, हेच श्रीमहाराजांनी दाखवून दिलं. त्याचबरोबर या विकारांवर ताबा यावा याकरिता उपासना हाच एक मात्र उपाय असल्याचं सांगितलं. आपल्या विकार-वासनांना आपल्या सामाजिक-आर्थिक स्थितीनुसारही वळण लागत असतं. आपल्या उपजीविकेचा, नोकरीतील आपल्या स्थानाचा आणि नोकरी वा उद्योगाच्या समाजातील प्रभावाचाही परिणाम आपल्या व्यक्तित्वावर व अर्थातच आपल्या विकार-वासनांच्या अभिव्यक्तीवर होत असतो. गोंदवल्यात काही ‘साहेब’ लोकही राहात होते. त्यातलेच एक होते इन्स्पेक्टर काळे. ते आणि त्यांची पत्नी श्रीमहाराजांच्या दर्शनास रोजच येत असत. त्यांची पत्नी मोठी सात्त्विक वृत्तीची व भक्तीमान स्त्री होती. एकदा काळेसाहेबांनी महाराजांना व गोंदवल्यातील आणखी काहीजणांना आपल्या घरी भोजनासाठी बोलाविले. जिथे महाराज तिथे आनंद आणि प्रसन्नता दरवळत असते. पानं वाढली जात असताना पंक्तीतही तसेच वातावरण होते. पाहुण्यांच्या सरबराईकडे बारकाईने लक्ष असलेल्या काळेंच्या लक्षात आले की तूप यायला उशीर होत आहे. त्यांनी एकदा पुकारा केला तरी तूप वाढायला कोणी पटकन आले नाही तसे ते संतापले आणि रागारागात बोलू लागले. त्यांच्या या क्रोधामुळे मंडळींचा एकदम विरस झाला आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांतही पाणी आले. तोच काळेंची आणि श्रीमहाराजांची नजरानजर झाली. श्रीमहाराजांच्या डोळ्यांतील भाव पाहूनच काळे वरमले आणि त्यांच्याही डोळ्यांत पाणी तरळले. संध्याकाळी ते श्रीमहाराजांच्या दर्शनास गेले असता महाराज त्यांना म्हणाले, ‘‘परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायचे नसतात. पण ते पूर्णपणे ताब्यात मात्र ठेवावे लागतात. क्रोधाने साधकाची फार मोठी हानी होते.’’