हैदर अल अबिदी यांच्या हाती इराकची सूत्रे जाणे ही त्या देशासाठी अखेरची संधी मानली जाते. अतिरेकी गट लिबिया, सीरिया, नायजेरिया या देशांनाही ग्रासत असताना इराकचे तर तुकडेच पडणार, अशी स्थिती आहे. देशातील अस्वस्थ सुन्नी आणि बंडखोर कुर्द यांना चुचकारून शांत ठेवणे एवढेच अबिदींच्या हाती आहे.

सुमारे एक तपाचा काळ, तब्बल ६० लाख कोटी रुपयांचा खुर्दा आणि ४५०० अमेरिकी नागरिक इतके खर्च करून अमेरिकेने इराकमध्ये नक्की मिळवले काय हा प्रश्न त्या देशाप्रमाणे साऱ्या जगालाच पडलेला आहे. याचे कारण म्हणजे इतके सगळे होऊनही इराकच्या स्थिरतेची कोणतीही लक्षणे वातावरणात नसून आता नवे पंतप्रधान हैदर अल अबिदी सत्ता ताब्यात घेत असताना हा देश तिभंगतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. इराक आणि अर्थातच आसपासच्या अनेक देशांसाठी ब्याद ठरलेले नूरी अल मलिकी हे पंतप्रधानपदावरून गेल्या आठवडय़ात पायउतार झाले. त्यांची अत्यंत भ्रष्ट, अकार्यक्षम राजवट संपुष्टात येणे ही काळाची गरज होती. त्यांनी २००६ साली पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यापासून इराकला ग्रहण लागलेले होते. ते सुटले. शियापंथीय मलिकी हे पंतप्रधान जरी इराकचे होते तरी ते ओळखले जात होते ते इराणच्या तालावर नाचणारा नेता म्हणून. मलिकी यांचा कारभार त्याचमुळे बगदादमधून नव्हे तर तेहरानमधून चालवला जात होता. अमेरिका आणि इराण या दोघांकडून एकाच वेळी आपला स्वार्थ साधण्याची कला त्यांना अवगत होती. आपल्या नातेवाइकांची मिळेल त्या ठिकाणी वर्णी लावणे, जास्तीतजास्त कंत्राटे आपल्यालाच कशी मिळतील ते पाहणे आणि अन्य वंशीयांच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करणे हे सर्व त्यांनी केले. तेव्हा त्यांच्या काळात इराक उलट एक दशकभराने मागेच गेला. तेव्हा या असल्या बेजबाबदार माणसाच्या हाती इराकचा कारभार सोपवून त्या देशातून पाय काढण्याचा अमेरिकेचा विचार होता. तो चांगलाच अंगाशी आला. इतका की आता पुन्हा एकदा त्या देशात अमेरिकेस हस्तक्षेप करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या आठवडय़ात याची चुणूक दिसली. २००१ नंतर पहिल्यांदा अमेरिकेस इराकवर बॉम्बफेक करावी लागली. या पाश्र्वभूमीवर दवा पक्षाचे अल अबिदी यांनी इराकच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली असून त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा व्यक्त होतात.
याचे कारण असे की अबिदी हेदेखील शिया असले तरी कट्टरपंथीय नाहीत. अन्य इराकी नेत्यांप्रमाणे ते ग्रामीण भागातून आलेले नाहीत. ते मूळचे बगदादचे. उच्चशिक्षाविभूषित. त्यांच्या हाती इराकची सूत्रे जाणे ही त्या देशासाठी अखेरची संधी मानली जात असून ती साधण्यासाठी अल अबिदी यांच्या हाती फार वेळ आहे, असे नाही. इराक हा एकेकाळी सांस्कृतिकदृष्टय़ा उत्तम स्थितीत होता. आधुनिक काळात आधी ब्रिटन आणि मग अमेरिका आदी देशांनी हस्तक्षेपास सुरुवात केली आणि तो देश पाहता पाहता रसातळाला जाऊ लागला. १९७९ साली शेजारील देशात, इराणमध्ये अयातोल्ला रूहल्ला खोमेनी यांची राजवट सत्तेवर आल्यापासून इराकच्या वेदना अधिकच वाढल्या. त्या वेळी या देशात सद्दाम हुसेन याची राजवट होती. जगासाठी तो क्रूरकर्मा आदी असला तरी त्या देशातील जनतेसाठी त्याची राजवट आधुनिक होती. महिलांना बुरख्यात राहावे लागत नसे आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार होता. हे शेजारील इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांना मंजूर नव्हते. या आधुनिक चेहऱ्याच्या इराकमुळे धर्म भ्रष्ट होईल अशी त्यांची भीती होती. याचे कारण असे की इराक हा शियाबहुल होता तरी त्या देशावरील राजवट ही सुन्नींच्या हाती होती. इराण हा शियापंथीयांचा सर्वात मोठा देश. त्यामुळे शेजारील देशातही शिया राजवट असावी यासाठी खोमेनी यांनी उचापती सुरू केल्या. यातील जागतिक लबाडी ही की त्यात अमेरिकेने या दोघांनाही मदत सुरू ठेवली. म्हणजे खोमेनी आणि सद्दाम या दोघांनाही अमेरिका एकाच वेळी पोसत गेली. या देशाचा निर्लज्जपणा इतका की १९८१ साली अमेरिकी अध्यक्षांचे सल्लागार या नात्याने डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी खुद्द बगदादमध्ये जाऊन सद्दाम हुसेन यांच्या हाती जैविक रसायनांचा साठा सुपूर्द केला. नंतर तीच अस्त्रे सद्दामने दक्षिणेकडील कुर्द वंशीयांच्या विरोधात वापरली. इराकमध्ये मोठय़ा प्रमाणावर नृशंस नरसंहार झाला तो याच अस्त्रांच्या साह्य़ाने. पश्चिम आशियाच्या आखातात सौदी अरेबियाच्या खालोखाल तेलसाठा असलेला इराक पुढे अधिकाधिक बेमुर्वतखोर होत गेला आणि अखेर थेट सौदी अरेबियास तो आव्हान ठरू लागला. कुवेतचा घास घेण्याचा सद्दामचा प्रयत्न त्याच्या याच उद्देशाचा भाग होता. तसे झाले असते तर स्वतंत्र बुद्धीचा सद्दाम हा अमेरिकेच्या ताटाखालील मांजर असलेल्या सौदीस आव्हान ठरला असता. सौदी सुन्नी तर इराण शिया. याच जोडीला इराकदेखील सुन्नी झाला असता तर पश्चिम आशियातील सत्तासंतुलन बदलले असते. त्यामुळे आणि सौदीस आव्हान निर्माण होऊ नये या उद्देशाने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष थोरले जॉर्ज बुश यांनी बनाव रचला आणि कुवेत वाचावे यासाठी सद्दामच्या विरोधात मोठी आघाडी उघडली. अमेरिकेचे त्या वेळचे वर्तनदेखील संशयास्पद होते. कारण सद्दामचा पुरता नि:पात न करता अमेरिकेने काढता पाय घेतला आणि पुढे माजलेल्या सद्दामच्या विरोधात दशकभरानंतर धाकल्या जॉर्ज बुश यांना २००३ साली युद्ध छेडावे लागले. या युद्धात अमेरिकेने सद्दामला नष्ट केले खरे परंतु इराकची दशा केली आणि आज हा देश अनेकांगी फुटीच्या उंबरठय़ावर आहे. इराक युद्धाने अमेरिकेचेदेखील कंबरडे मोडले. त्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली. एक लाख कोटी डॉलर इतका प्रचंड खर्च अमेरिकेचा त्या देशावर झाला. इतके करूनही इराक नियंत्रणात राहिला असेही नाही. त्याचमुळे बुश यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या बराक ओबामा यांनी इराकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे इराक स्थिरावलेला नाही आणि तरीही त्या उद्देशाने इराकमध्ये ठाण मांडून बसलेली अमेरिका मात्र माघार घेणार. याचमुळे मलिकी यांच्यासारख्यांचे फावले.
आज परिस्थिती अशी की या बजबजपुरीत इराक हा अनेक वांशीयांत विभागला गेला असून कुर्दिस्तान जणू स्वतंत्रच झाला आहे. आयएसआयएस या नव्या दहशतवादी संघटनेने इराकमधील मोसुल आदी शहरे घेतल्यापासून कुर्द मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटत असून आपले स्वतंत्र कुर्दिस्तानचे स्वप्न साकार होणार अशी जणू त्यांची खात्री पटली आहे. कुर्द, शिया, सुन्नी, याझिदी, अत्यल्प प्रमाणात असलेले पण उपद्रवी सीरियन आदींमध्ये इराक विभागला गेला असून या प्रत्येकास आता स्वातंत्र्याची आस लागली आहे. मलिकी यांनी शेजारील सीरियाच्या यादवीत सक्रिय सहभाग घेतला. त्या देशातील क्रूरकर्मा असाद यांना मलिकी यांनी मदतच केली. त्या वेळी त्यांना आवरण्यासाठी अमेरिकेने काही केले नाही. परिणामी सीरियाची समस्याही चिघळली. त्या परिसरात इराण, इराक आणि सीरिया असे अभद्र त्रिकूट तयार झाले आणि त्याने संपूर्ण परिसराची आणि परिणामी जगाचीच शांतता धोक्यात आणली. सुन्नी अतिरेक्यांचा इराकी इस्लामिक पक्ष हादेखील या काळात सक्रिय झाला आणि त्यानेही इराकच्या अस्थिरतेस हातभार लावला. आता हे सर्व अबिदी यांना निस्तरावे लागणार आहे. अबिदी हे शियापंथीय अरब आहेत. परंतु देशातील अस्वस्थ सुन्नी आणि बंडखोर कुर्द यांना चुचकारणे हे त्यांचे पहिले आव्हान असेल. इराक हा लीबिया, सीरिया आणि नायजेरिया अशा तीन देशीय संकटांचा एकत्रित प्रतीक बनला आहे. त्याचमुळे अशा या अस्वस्थ आणि अत्यवस्थ शापित भूमीस शांत करणे हे अबिदी यांचे लक्ष्य असेल.    
अबिदी हे पेशाने अभियंते. लंडनमध्ये त्यांचे बराच काळ वास्तव्य होते. उद्वाहने.. लिफ्ट.. दुरुस्ती हा काही काळ त्यांचा व्यवसाय होता. आता या समरप्रसंगी सर्वसामान्य इराकी जनतेच्या मनात त्यांच्याविषयी लिफ्ट करा दे.. अशीच भावना असेल.