नुकतेच इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. या बदललेल्या नियमांनुसार आता सर्व डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर सुवाच्य अक्षरात औषधाच्या ब्रॅण्डनेमबरोबरच त्याचे जेनेरिक नाव (औषधी घटकाचे नाव) लिहिणे बंधनकारक होणार आहे. या निमित्ताने औषधांवरील ट्रेडमार्क्‍समध्ये साधम्र्य असल्याने ग्राहकांची  दिशाभूल कशी होऊ शकते  याची चर्चा करणारा लेख..
थोडासा घसा दुखतोय आणि खोकला झालाय म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाता. डॉक्टर तुम्हाला एक औषध लिहून देतात आणि ते घेऊन तुम्हाला बरे वाटू लागते. काही महिन्यांनंतर तुम्हाला परत तसाच त्रास होतो. या वेळी डॉक्टरकडे वेटिंग रूममध्ये तिष्ठत बसण्याचा धीर तुम्हाला नाही आणि त्यासाठी डॉक्टरची फी देण्याचीही गरज तुम्हाला वाटत नाही. तुम्ही या वेळी सरळ औषधाच्या दुकानात जाता. डॉक्टरने दिलेल्या औषधाचे नाव तुमच्या लक्षात असतेच. ते तुम्ही विकत आणता आणि घेऊ लागता. पण या वेळी औषधाने बरे वाटण्याऐवजी तुम्ही हैराण होता.. छातीत धडधड.. सारखा घाम.. वाढलेला रक्तदाब.. आणि रात्रीची झोप गायब. शेवटी तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागते. आणि मग उलगडा होतो तो असा की डॉक्टरने तुम्हाला खोकल्यासाठी दिलेल्या औषधाचे नाव होते एल्टोसिन आणि तुम्ही नंतर जाऊन स्वत:च्या डोक्याने आणलेत ते एल्ट्रोक्सिन. एल्टोसिनमध्ये होते खोकल्यावर काम करणारे एरिथ्रोमायसिन नावाचे अ‍ॅन्टिबायोटिक, तर एल्ट्रोक्सिनमध्ये होते हायपोथायरोइडिझममध्ये वापरले जाणारे औषध थायरोक्सिन. रोग होता वेगळाच आणि औषध घेतले गेले भलतेच.. त्यामुळे असे झाले.
हे का झाले? एक म्हणजे भारतात अजूनही  डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन न दाखवताही औषधे दुकानात बिनदिक्कत विकत मिळतात. दुसरे म्हणजे डॉक्टर औषधे त्यांच्या औषधी घटकाच्या नावाने (म्हणजे जेनेरिक नावाने, वरील घटनेत ‘एरिथ्रोमायसिन’ अशा नावाने) रुग्णाला न लिहून देता त्याच्या ब्रॅण्डनावाने (म्हणजे वरील घटनेत एल्टोसिन) लिहून देतात. आणि तिसरे कारण म्हणजे एकच औषधी घटक असलेले औषध इतक्या हजारो ब्रॅण्डनावांनी बाजारात उपलब्ध असते, की त्यातली काही नावे सारखी असतात आणि त्यामुळे गोंधळ होतो. औषधाचे ब्रॅण्डनेम ही बनविणाऱ्या कंपनीची बौद्धिक संपदा आहे.. ती ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत असते आणि ही नावे अनेकदा सारखी असू शकतात. कधी औषधांच्या ब्रॅण्डनावांचे उच्चार सारखे असतात (साऊंड अलाइक औषधे), तर कधी औषधांची ब्रॅण्ड नावे सारखी दिसतात किंवा वेष्टणे सारखी दिसतात (लुक अलाइक औषधे) आणि या लुक अलाइक-साऊंड अलाइक नावांमुळे औषधे देण्यात प्रचंड घोटाळे उद्भवू शकतात.
फसव्या ट्रेडमार्क्‍सबद्दल आपण आधीच्या लेखांमध्ये विस्ताराने पाहिले आहे. जर तुम्ही तुमच्या ट्रेडमार्कची नोंदणी करायला गेलात आणि तुमचा ट्रेडमार्क आधी अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या ट्रेडमार्कसारखा दिसत असेल (visually similar), त्यांचा उच्चार सारखा असेल (phonetically similar) किंवा त्यामागची संकल्पना सारखी असेल (conceptually similar) तर असे ट्रेडमार्क्‍स दिले जात नाहीत. कारण ते ग्राहकाची दिशाभूल करतात, हे आपण विस्ताराने पहिले आहे. सारखेपणाचा हा निकष जेव्हा लावला जातो तेव्हा ट्रेडमार्क ऑफिसने साधारण बुद्धिमत्ता असलेल्या सर्वसामान्य ग्राहकाच्या (ordinary consumer with average intelligence) चष्म्यातून या ट्रेडमार्ककडे पाहणे अपेक्षित असते. म्हणजे तो ट्रेडमार्क देताना असा विचार ट्रेडमार्क ऑफिसने करणे अपेक्षित असते, की असे दोन ट्रेडमार्क साधारण बुद्धिमत्ता असलेल्या सामान्य ग्राहकाला वेगळे म्हणून ओळखता येतील की त्याची दिशाभूल होईल? आता एल्टोसिन आणि एल्ट्रोक्सिन ही नावे खरे तर वेगळी आहेत. डॉक्टर किंवा फार्मसिस्टला ती अगदीच वेगळी वाटतील. पण सर्वसामान्य ग्राहकांचा लसावि काढलात तर त्यांची दिशाभूल होणे अगदीच शक्य आहे आणि हा सर्वसामान्य ग्राहक ट्रेडमार्क देताना लक्षात घेणे गरजेचे आहे.
औषधांच्या बाबतीतली आणखी एक गोष्ट अशी की औषधांचा ग्राहक सर्व थरांतील, अगदी श्रीमंत किंवा अगदी गरीब, उच्चशिक्षित किंवा अशिक्षित कुणीही असू शकतो. इतर वस्तूंबाबत तसे नाही. म्हणजे समजा, दोन महागडय़ा परफ्यूमचे ट्रेडमार्क्‍स सारखे असतील तर त्यांचा ग्राहक अतिशय गरीब किंवा अशिक्षित असण्याची शक्यता अगदी कमी आहे आणि म्हणून असा ट्रेडमार्क देताना या वर्गाचा विचार करणे जरुरी नाही. औषधे मात्र सर्व प्रकारच्या लोकांना कधी न कधी घ्यावी लागणार आहेत आणि त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून सामान्यातील सामान्य ग्राहक डोळ्यांसमोर ठेवणे गरजेचे आहे.
दुसरी एक गोष्ट अशी की बाकी वस्तूंच्या बाबतीत ट्रेडमार्कने दिशाभूल केली तर फार तर ग्राहकाची थोडी गरसोय होईल किंवा आपण फसवले गेलो असे ग्राहकाला वाटेल. या पलीकडे फार काही होणार नाही. म्हणजे बाजारातून आणताना ‘टाटा’ मिठाऐवजी तुम्ही ‘टेटा’ मीठ ट्रेडमार्कमधील साधम्र्यामुळे चुकून आणलेत आणि वापरलेत तर फारसे काही बिघडणार नाही. औषधे म्हणजे मात्र जिवाशी खेळ आहे आणि तिथे अशी दिशाभूल जिवावर बेतू शकते. ‘औषधे म्हणजे विष आहे.. मिठाई नव्हे’ हे उद्गार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या औषधांशी संबंधित एका ट्रेडमार्क केसच्या संदर्भातील निर्णयामधले. औषधांच्या ट्रेडमार्क्‍सच्या संदर्भातील किती तरी खटले सध्या न्यायप्रविष्ट आहेत आणि कारण आहे औषधांच्या नावातील साधम्र्यामुळे होणारी ट्रेडमार्क हक्कांची पायमल्ली..
पण औषधांच्या ट्रेडमार्कच्या बाबतीत बनविणाऱ्या कंपनीची एक समस्या अशी असते की औषधाचे ब्रॅण्डनेम हे एक तर औषधातल्या औषधी पदार्थाशी संबंधित असले पाहिजे (म्हणजे ‘अमॉक्सिसिलिन’ या औषधाच्या गोळ्यांचे ‘मॉक्स’ असे ब्रॅण्डनेम किंवा सायनोकोबालमिन नावाच्या औषधाचे ‘मेकोबालमिन’ असे ब्रॅण्डनेम) किंवा मग ते औषध ज्या रोगावर आहे त्याच्याशी संबंधित असले पाहिजे (उदा. सर्दीच्या औषधाचे नाव कोल्डअ‍ॅक्ट किंवा व्हर्टिगोवरील औषधाचे नाव व्हार्टनि). कारण तरच ते डॉक्टरला लिहून देताना लक्षात राहणार आणि म्हणून या अटीत बसणारी आणि तरीही दिशाभूल न करणारी ब्रॅण्डनेम्स शोधणे औषधी कंपन्यांसाठी फारच अवघड होऊन बसते. एकीकडे औषध कंपन्यांची ब्रॅण्डनेम्सच्या बाबतीतली अशी समस्या आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने मात्र औषधांच्या ब्रॅण्डनेम्सच्या बाबतीत वेळोवेळी अशी सूचना केली आहे, की या बाबतीतले ट्रेडमार्क्‍स देण्याचे ट्रेडमार्क कार्यालयाचे निकष अधिक कडक असावेत, जेणेकरून पेशंटची दिशाभूल होऊ नये.
या गोष्टीचे गांभीर्य न्यायालयांना केव्हाच समजले आहे. फार पूर्वी १९६३ मध्ये जेव्हा बौद्धिक संपदा कायदा भारतात बाल्यावस्थेत होता तेव्हा ही ‘लक्ष्मणधारा’ असे औषधाचे नाव ‘अमृतधारा’ या औषधाशी साम्य असल्यामुळे नाकारण्यात आले होते. जेव्हा की खरे तर ही नावे बऱ्यापकी वेगळी आहेत. कडीला हेल्थकेअर विरुद्ध कडीला फर्मास्युटिकल्स हा २००१ मधील खटला हा या बाबतीत फार महत्त्वाचा समजला जातो. कडीला ग्रुपचे विभाजन होऊन या दोन कंपन्या बनविण्यात आल्या. कडीला हेल्थकेअर ही कंपनी फल्सिगो या नावाने फल्सिपेरम मलेरियावरील एक औषध विकत होती. यातील औषधी पदार्थ होता आत्रेसुनेट. कडीला फर्मास्युटिकल या कंपनीला फल्सिटॅब नावाचा ट्रेडमार्क यानंतर देण्यात आला. हे औषधही फल्सिपेरम मलेरियावरचेच. पण यातला औषधी घटक वेगळा होता.. मेफेलोक्वीन नावाचा. आणि कडीला हेल्थकेअरचे म्हणणे असे की त्यांच्या फल्सिगो या ट्रेडमार्कमध्ये आणि फल्सिटॅबमध्ये इतके उच्चाराचे साधम्र्य आहे, की ते ग्राहकांची दिशाभूल करेल  म्हणून तो दिला जाऊ नये. याच खटल्यात सुप्रीम कोर्टाने सांगितले की औषधांबाबत ट्रेडमार्क्‍स देताना विशेष काळजी घ्यावी. विशेषत: जेव्हा औषधांची ब्रॅण्डनेम सारखी आणि त्यातील औषध वेगवेगळे असेल तर अधिक काळजी घेतली जावी.
आता औषधी कंपन्यांना वैशिष्टय़पूर्ण नावे शोधणे अवघड म्हणून ट्रेडमार्क देण्याचे नियम औषधांच्या बाबतीत थोडे शिथिल करायचे, की दिशाभूल झाल्यास औषधांच्या बाबतीत धोका जास्त म्हणून हे नियम अधिक कठोर ठेवायचे हा यक्षप्रश्न आहे. परत एकदा प्रश्न आहे तोल सांभाळण्याचा.. बौद्धिक संपदा हक्कआणि रुग्णांचे हित यातला तोल..
*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.