लोकशाही म्हणजे प्रत्येकास आपापले निर्णय अमलात आणण्याचा अधिकार नव्हे. हे किमान गृहीतक ज्यास कळत नाही त्यास आम आदमी पक्ष असे म्हणता येईल. त्यामुळेच, जनतेला भावेल असा चेहरा आणि दीर्घकालीन धोरण-विचार करू शकणारे धुरंधर असे दोघेही या पक्षाकडे असूनदेखील, स्वहस्ते विनाशाकडे त्याची वाटचाल सुरू आहे..
गाढव ज्याप्रमाणे अखेर उकिरडय़ावर जाते त्याप्रमाणे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मतभेदांचे उकिरडे जाहीरपणे फुंकायला अखेर सुरुवात केलीच. हे होणारच होते. फक्त अपेक्षेपेक्षा लवकर झाले इतकेच. या वेळी ‘आप’च्या आत्ममग्न नेत्यांनी पक्षांतर्गत लोकशाही हे मतभेदाचे कारण पुढे केले आहे. लोकशाही हा शब्द आणि संकल्पना याबाबत आपल्याकडे काही फारच भाबडे समज आहेत. ते प्रथम दूर करावयास हवेत. ते करताना हे ध्यानात ठेवावयास हवे की कोणत्याही व्यवस्थेत शंभर टक्के प्रत्यक्ष लोकशाही असूच शकत नाही. तशी ती असायला हवी असे म्हणणारे दांभिक तरी असतात किंवा भोंगळ समाजवादी. या दोघांच्याही हातून काहीही भरीव साध्य होऊ शकत नाही. याचे कारण कुटुंब असो वा राजकीय पक्ष. एक व्यवस्था म्हणून पुढे यावयाचे असेल तर लोकशाही पद्धतीने मतभिन्नतेस वाव दिल्यानंतर कोणा एका निर्णयावर ठामपणे यावे लागते आणि तो निर्णय अमान्य असला तरी त्याची अंमलबजावणी करावीच लागते. लोकशाही म्हणजे प्रत्येकास आपापले निर्णय अमलात आणण्याचा अधिकार नव्हे. हे किमान गृहीतक ज्यास कळत नाही त्यास आम आदमी पक्ष असे म्हणता येईल. दिल्लीतील यशामुळे या पक्षनेतृत्वाच्या कानात वारे गेले असून कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी स्थिती झाली आहे. केवळ एकाच विजयाने या पक्षाची अशी वाताहत झाली. तशी ती होणार याबाबत आमच्या मनात कधीच संदेह नव्हता. याचे कारण हा पक्ष आणि त्याचे नेतृत्व विजयी होऊन दीर्घकालीन विकास राजकारणासाठी जन्माला आलेलाच नाही. या पक्षाच्या आणि अर्थातच त्याच्या नेत्यांच्या जनुकांत विरोधाचे राजकारण वाहते हे वास्तव आहे. ते नाकारणे शहाणपणाचे नाही. काही व्यक्ती वा प्रवृत्ती या विरोधी पक्षाचे राजकारण करण्यासाठीच सुयोग्य असतात. उदाहरणार्थ जॉर्ज फर्नाडिस वा मधु लिमये आदी. जॉर्ज फर्नाडिस हे विरोधी नेते म्हणून जितके प्रभावी होते त्याच्या एक शतांशदेखील मंत्री म्हणून प्रभावी ठरले नाहीत. मंत्री म्हणून ते ओळखले जातात ते कशासाठी? तर आयबीएम आणि कोका कोलासारख्या कंपन्यांना भारतातून गाशा गुंडाळायला लावला यासाठी. म्हणजे पुन्हा ते सत्तेतील विरोधीपक्षीयच ठरले. लिमये यांनी प्रत्यक्ष मंत्रिपद कधी घेतले नाही. पण ते स्मरणात आहेत ते ‘आप’ल्याच कल्पनेतून आकारास आलेले सरकार पाडण्याच्या अतुलनीय कामगिरीसाठी. म्हणजे पुन्हा विरोधी पक्षनेत्याने जे करावयाचे ते करण्यासाठीच. आम आदमी पक्षाचे नेतृत्व हे या माळेतील आहे.
मुळात या पक्षाचा जन्म झाला तोच एका मोठय़ा नकारात्मकतेतून. नालायक काँग्रेस आणि अद्याप लायकी सिद्ध न झालेला भाजप या दोन प्रमुख पक्षांतील निर्वात पोकळीत ‘आप’ जन्मला. श्रेयच द्यावयाचे झाल्यास या दोघांतील काँग्रेसला त्याचे अधिक माप द्यावे लागेल. सत्तेवर असताना काँग्रेस नेतृत्वाने समाजसेवी म्हणवून घेणाऱ्यांना नको इतके मोकळे रान दिले. परिणामी सत्ताप्रमुख मनमोहन सिंग होते तरी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार परिषद ही पंतप्रधानांच्या डोक्यावर होती. अरुणा रॉय आदी अनेक मान्यवर या परिषदेचे सभासद होते. वैयक्तिक आयुष्यात यातील अनेक जण आदरणीय आहेत हे मान्य. परंतु सरकारी पातळीवर त्यांना सल्ला देण्याव्यतिरिक्त काहीही करावयाचे नव्हते. ‘आप’चेही तसेच होते. व्यवस्थेतील भ्रष्टाचार नष्ट करा या अमूर्त मागणीखेरीज त्यांच्याकडे दुसरा कार्यक्रम नाही. त्या वेळी सिंग सरकारने थोडे जरी चातुर्य दाखवले असते तरी ही ‘आप’ची पिलावळ वाढती ना. परंतु त्या सरकारने अज्ञान आणि राजकीय आळशीपणा दाखवला आणि त्यांच्यानंतर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने आडमुठेपणा. लोकसभा निवडणुकांत मदान मारले म्हणजे आता ‘आप’ला विजयाचा वारू कोणीच रोखू शकणार नाही या मस्तीत मोदी सरकार राहिले आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांत मोदी यांच्या नाकाखाली भाजपला ‘आप’ला लाजिरवाणा पराभव पाहावा लागला. त्या निवडणुकांत ‘आप’ला दणदणीत विजय मिळाला तो काही या पक्षावर दिल्लीतील जनतेचे अतोनात प्रेम आहे म्हणून नव्हे. ‘आप’ तेथे विजयी ठरला तो जनतेला काँग्रेसला लाथाडायचे होते आणि भाजपचा जमिनीपासून चार बोटे वर धावणारा विजयरथ जमिनीवर उतरवायचा म्हणून. ‘आप’ला राक्षसी बहुमत मिळाले आणि अरिवद केजरीवाल हा नाटकी आणि बेगडी गृहस्थ मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला.
वास्तविक जनतेने त्या पक्षाच्या बालिश नेत्यांना दिलेली ती सुवर्णसंधी होती. देशात आज मध्यिबदूच्या डावीकडे सबळ राजकीय ताकद नाही. पुराण्या, डागडुजी न झालेल्या गावाबाहेरच्या गढीप्रमाणे डाव्यांचे बुरूज पार ढासळून गेले आहेत. लोहियावाद्यांच्या वेडपट यादवी चाळ्यांना जनता विटलेली आहे आणि काँग्रेसचे नेतृत्व हतवीर्य आहे. अशा वेळी ‘आप’ या पक्षास ही पोकळी भरून काढण्याची सुवर्णसंधी होती. पण या अन्य पक्षांप्रमाणे जनतेला निराश करण्याचाच पण या पक्षाने केलेला दिसतो. वास्तविक गेले तीन दिवस ‘आप’ली पक्षांतर्गत खरकटी ज्या मुद्दय़ांवरून हा पक्ष जाहीरपणे धूत आहे ते मुद्दे अगदीच किरकोळ आहेत. खरे तर शालेय असेच त्याचे वर्णन करता येईल. अमुक माझ्याविरुद्ध असे बोलला, तमुकने अशी माझी चेष्टा केली या पातळीवरच्या या तक्रारी आहेत. परंतु त्याही हाताळण्याइतका प्रौढपणा या पक्षनेतृत्वाकडे नाही. त्यात सार्वजनिक नळावर कडाकडा भांडणे आणि राजकीय चर्चा यात फरक आहे का आणि असल्यास तो काय हेही न कळणाऱ्या अंजली दमानिया यांच्यासारख्या व्यक्तींचा त्या पक्षात भरणा असल्यामुळे नेत्यांमधील मतभेद कमी होण्याऐवजी वाढलेच. कोणत्याही पक्षास यशस्वी होण्यासाठी दोन घटक लागतात. एक लोकप्रिय, जनतेला भावेल असा चेहरा आणि दुसरा घटक म्हणजे लोकप्रियतेच्या मागे न लागता, मागे राहून, दीर्घकालीन धोरण-विचार करू शकणारे धुरंधर. ‘आप’कडे अनुक्रमे केजरीवाल आणि योगेंद्र यादव यांच्या रूपाने हे दोन्ही आहेत. हे घटक असल्यावर अट ही असते की या दोन्ही घटकांनी एकमेकांच्या गुणांचा आदर करून परस्परांच्या अवगुणांवर कुरघोडी न करण्याचा संयम दाखवणे. केजरीवाल येथे कमी पडतात. त्यांच्या लोकप्रिय चेहऱ्याविषयी कोणाचेच दुमत नाही. पण ते लाटेवर जगणारे नेते आहेत आणि कोणतीही लाट क्षणिकच असते. ती ओसरल्यानंतर आपले अस्तित्व टिकवणे अवघडच असते. हे लाटोत्तरी काळात टिकण्याचे कौशल्य, धोरणीपणा आणि राजकीय विचार यादव यांच्याकडे आहे. परंतु ते केजरीवाल यांना अमान्य असावे. त्यामुळे त्यांनी यादव यांच्या कृतीस आक्षेप घेण्यास सुरुवात केली आणि त्यातून विद्यमान मतभेद उद्भवले. वर उल्लेखलेल्या दोन गुणांचा आदर परस्परांनी केला नाही तर काय होते हे शिवसेना आणि मनसे यांच्या उदाहरणावरून समजून घेण्यासारखे आहे. परंतु दुसऱ्याच्या चुकांवरून शिकण्याचे शहाणपण ‘आप’ नेतृत्वात नाही. कारण ते सगळेच स्वत:ला स्वयंभू मानतात आणि त्यांचे गंड हे त्यांच्या राजकीय ताकदीच्या व्यस्त प्रमाणात आहेत. स्वयंभू असणे वाईट नाही, पण या स्वयंभूततेस विवेकाची जोड नसेल तर ही स्वयंभू मंडळी विनाशदेखील स्वहस्तेच करून घेतात. त्यांना शत्रूची गरज नसते.
तेव्हा ‘आप’चे हे असे होण्याचीच शक्यता अधिक. मिळालेली संधी ही मंडळी अशीच वाया घालवणार असतील तर त्यांचे वर्णन करण्यास एकच शब्द योग्य ठरेल. कर्मदरिद्री.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Narendra Modi ANI
“…तर देशभरात मोठा गदारोळ माजेल”, स्वतःच्या डीपफेक व्हिडीओचं उदाहरण देत पंतप्रधान मोदींचं AI बद्दल वक्तव्य