एका जुगाराच्या अड्डय़ावर दोघे खेळत आहेत. एकजण हरत गेला आणि कंगालही झाला. तरी पुढची खेळी आपणजिंकूच, या आशेनं अड्डय़ावरून कर्ज घेत तो खेळू लागला. दुसरा जिंकत गेला त्यामुळे आणखीजिंकत जाण्याची त्याची आशा बळावली आणि मोहाने तो खेळू लागला. दोघं त्या अड्डय़ावरच अडकले. एक कंगाल पण कर्जबाजारी. ते कर्ज चुकतं केल्याशिवाय त्याला पाय काढता येईना. दुसरा सधन पण मोहग्रस्त. त्यामुळे त्याचा पाय तिथून निघेना! पापकर्मानी नरकयातना भोगत अनेक जन्म पायपीट करीत राहिलेला जीव काय आणि पुण्यकर्मामुळे स्वर्गसुख भोगत आणि ते क्षीण झाल्यावर पुन्हा जन्मचक्रात भिरभिरत राहिलेला जीव काय; दोघांचा या चक्रातून पाय निघत नाही. तो निघावा याची संधी म्हणून मनुष्य जन्माचा अमूल्य लाभ होतो. गर्भावस्थेत असताना जिवाला त्याच्या जन्मोजन्मीच्या कर्माची आणि दुखांची जाणीव असते. (मृतश्चाहं पुनर्जातो जातश्चाहं पुनमृत:। नारायोनि सहस्राणि मया दृष्टान्यनेकथा।। – पद्म पुराण) त्या जाणिवेनं होरपळणारा जीव निश्चय करतो की, आता मनुष्यजन्मात मी माझं श्रेयस प्राप्त करीन. त्यामुळे जन्ममृत्यूच्या चक्रातून माझी कायमची सुटका होईल. (अधुना जातमात्रोऽहं प्राप्त संस्कार एव च। तत: श्रेय: करिष्यामि येन गर्भे न सम्भव:।। – पद्म पुराण) मात्र जन्म घेताच एक दाई या जिवाला अलगद आपल्या हातात झेलून घेते आणि त्याला आपल्या प्रभावाच्या दुलईत लपेटते. कोण आहे ही दाई? ततस्तु वैष्णवी मायाऽऽवृणोत्यत्यमोहिनी।। (गरुड पुराण) ही दाई म्हणजे वैष्णवी माया! ती जिवाला आवृत्त करून टाकते. तिच्या प्रभावामुळेच मुळात ज्या पशुयोनीत मला जन्म लाभणार होता त्या पशूच्या सवयी जोपासण्यासाठी मी मानवी क्षमतांचा वापर करू लागतो! सवयी पशूच्या आणि क्षमता माणसाच्या, या संयोगानं मी पशूला लाजवेल इतकं पशुत्व जोपासू लागतो! मी कुत्राच असतो तरी फारसं बिघडलं नसतं. एखादी वस्तीच ‘माझी’ मानून मी ती राखत राहिलो असतो. पण माणसाची बुद्धी, कल्पना व विचारशक्ती आदी क्षमतांची जोड मिळाल्याने मी ‘माझे’पणाचा परीघ वाढवतच राहतो आणि तो टिकवून ठेवण्याच्या धडपडीत भुंकतही राहतो. मी पक्षीच असतो तरी फारसं बिघडलं नसतं. मी एखादंच घरटं बांधलं असतं, चोचीतून जितकं पिल्लांसाठी आणता येईल तितकंच आणलं असतं. पण माणसाच्या क्षमतांची जोड मिळाल्यानं मी एकापेक्षा चार घरं घेण्याची स्वप्नं बाळगू लागतो. सात पिढय़ांना पुरेल इतकी संपत्ती साठवू पाहतो. मी पशू असतो तर भूक लागेल तेव्हाच खाद्यासाठी भटकलो असतो पण माणूस होताच माझी भूक कधीच संपत नाही. साठवण्याची वृत्ती घटत नाही. तेव्हा श्रीगोंदवलेकर महाराज जे सांगतात, ‘‘मनुष्य म्हणून जन्मलेला माणूस, माणूस म्हणून मेला तर खरा.’’  त्याचा अर्थविस्तार इतका व्यापक आहे.