‘लोकसत्ता’च्या  ३० ऑक्टोबरच्या अंकातील ‘गेली शान, तरी आलिशान’ या बातमीसंदर्भात माझा खुलासा खालीलप्रमाणे. सदरहू बातमीमधील माहिती अतिरंजित आणि विखार भरलेली आहे. माझ्या मुलांच्या मालकीची परवेज कन्स्ट्रक्शन ही बांधकाम व्यवसाय करणारी कंपनी आहे. त्यांनी आठ-दहा वर्षांपूर्वी भाडेकरू राहत असलेली खारमधील जागा घेतली. मुंबईत सर्वत्र ज्याप्रमाणे जुन्या इमारतींची पुनर्बाधणी करण्यात येते त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या नियमाधीन राहून येथेसुद्धा इमारत बांधली हेही खरे आहे. भाडेकरूंना या इमारतीमध्ये जागा द्यावयाची आहे. प्रत्येक मजल्यावर फक्त सुमारे ४०० चौ. फुटांचे ४ फ्लॅट्स आहेत. म्हणजेच प्रत्येक मजल्यावर १६०० चौ. फूट क्षेत्रफळ आहे. भाडेकरूंना त्यांचे फ्लॅट्स देऊन बाकीचे फ्लॅट्स विकावयाचे आहेत. तूर्त आम्हास राहण्यासाठी कुठेही पुरेशी जागा नाही म्हणून सदरहू इमारतीमध्ये आमच्या तीनही कुटुंबांनी तीन मजल्यावर राहावे असे ठरविले. आपण म्हणता तसा तो राजवाडा वगैरे नाही. सुसज्ज बार, थिएटर वगैरे काही नाही. अलीकडे प्रत्येक सोसायटीमध्ये जिम इत्यादी सोयी केलेल्या असतात, त्याप्रमाणे इथेसुद्धा त्यासाठी काही जागा सोडलेल्या आहेत. भोगवटा प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून महापालिकेकडे अर्ज सादर केलेला आहे.
आपण म्हणता त्या जागेची किंमत ५० हजार रु. प्रति चौ.फूट आहे. भाडेकरूंना द्यावयाची जागा सोडून मी आपणास उर्वरित जागा ३० हजार रु. प्रति चौ. फूट याप्रमाणे द्यावयास तयार आहे. आपण या घराची तुलना जगविख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टेलिया’ या इमारतीबरोबर करून अंबानी यांचा एवढा घोर अपमान करावा, हे बरोबर नाही.
माझे पूर्ण आयुष्य मुंबईत गेले आहे. माझी मुलेसुद्धा मुंबईत लहानाची मोठी झाली. काल मुंबईत आलेले लोक बांधकाम व्यवसाय करून मोठे झालेत. माझ्या मुलांनी असा व्यवसाय केला तर त्यात चुकीचे काय आहे? माझ्या विरोधात चुकीच्या आणि तथाकथित भ्रष्टाचाराच्या बातम्या छापून सतत बदनामी करण्याचा प्रयत्न आपल्यासारख्या प्रथितयश दैनिकास शोभत नाही.

दिव्यशक्तिहीन देव?
‘पोप यांचा साक्षात्कार’ हे संपादकीय  (३० ऑक्टो.) वाचले. देवाच्या हातात जादूची छडी नसेल तर त्याला ‘देव’ का म्हणावे हा प्रश्न शिल्लक राहतोच.
विश्वाचे सारथ्य करणाऱ्या देवाकडे या कामासाठी आवश्यक असलेली ‘दिव्य’शक्ती म्हणजेच मनुष्यादी प्राणिमात्रांना अज्ञात असलेली जादूची छडी. ती बाळगणाऱ्यालाच ‘देव’ म्हणून ओळखले जाते. ती छडी अस्तित्वात नाही म्हणजे देवच अस्तित्वात नाही असे पोपमहाशयांनी अप्रत्यक्षपणे सुचविले आहे. ‘देव’ याच पायावर उभा असलेला ‘धर्म’ हादेखील या गृहीतकावर वायफळ ठरतो, हेच तर विवेकवादाचे आणि विज्ञानवादाचे प्रतिपादन आहे.
क्रुसेड वा जिहाद ही हत्यारे अनुक्रमे ख्रिश्चन आणि मुस्लीम या धर्मात असली तरी िहदू धर्म हा फार काही पुरोगामी आणि सहिष्णू ठरत नाही. कारण ते काम आपल्याकडील काही सनातन विचारसरणीच्या संघटना इमानेइतबारे आणि सुखेनव करीत असतात.  
धर्म हा मोठा चलाख परंतु गतिमंद विद्यार्थी असतो हे विधान पटणारे आहे. विज्ञानाने परिश्रमपूर्वक मिळवलेले ज्ञान धर्म फुकटात वापरतो आणि जे विज्ञानाला अजून सापडायचे बाकी आहे त्या बाबतीत हा धर्म ‘देवाची इच्छा’ हे कारण सांगून विज्ञानाचे महत्त्व कमी करून स्वत:च्या भविष्यनिर्वाहाची सोय निश्चित करतो.    
-प्रमोद तावडे, डोंबिवली

आक्रमक भाजप नेत्यांची आता सबुरीची भाषा
गेली दोन-तीन वष्रे भाजपचे प्रमुख नेते घसा फोडून सांगत होते की परदेशात बेकायदेशीरपणे ठेवलेला काळा पसा आम्ही या देशात आणल्यावर आपली अर्थव्यवस्था एवढी मजबूत होईल की जनतेवर कोणतेही कर लादायची गरज पडणार नाही. आज भाजपचे सरकार केंद्रात आहे. ज्यांची खाती स्विस बँकेत आहेत, त्यांची यादी सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता तांत्रिक समस्यांचे वास्तव समोर येत आहे. हा पसा परत आणण्यासाठी त्या खातेदारांविरुद्ध सर्व पुरावे परदेशातील कोर्टापुढे मांडावे लागतील. त्या देशांच्या कायद्यानुसार कोर्टात त्या पुराव्यांची विश्वासार्हता सिद्ध झाल्यावर कोर्ट आपला निर्णय व आदेश संबंधित बँकांना कळवेल. ही पूर्ण प्रक्रिया एवढी क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे की त्याला अनेक वष्रे लागू शकतात. हा साक्षात्कार झाल्यामुळे एकेकाळचे आक्रमक भाजप नेतेही आता सबुरीची भाषा बोलू लागले आहेत. यापेक्षा आपल्याच देशात निर्माण होणारा काळा पसा शोधून काढणे व त्या गुन्हेगारांना सजा देणे हा त्यामानाने जास्त  सोपा पर्याय आहे. देशांतर्गत निर्माण होणाऱ्या काळ्या पशाची कारणे, व्यवहार आणि त्याचे जनक या सर्वाची कुंडली सरकारकडे आहे. तो पसा उजळपणे आपल्या अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी कठोर उपाय योजण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. केंद्र सरकार प्रामाणिकपणे हे आव्हान स्वीकारेल का, हा खरा यक्षप्रश्न आहे.
 -अनिल रेगे, अंधेरी (पू), मुंबई</strong>

भाव स्थिर ठेवण्यासाठी उपाय तरी सुचवा
भाववाढ झाली की जनतेच्या भावनांना चिथावत सरकारवर चिखलफेक करायची आणि भाव कोसळले की शेतकऱ्यांची बाजू घेत हमी भावाचा आग्रह धरायचा हा माध्यमांचा आणि विरोधकांचा आवडता खेळ झालाय!
कांद्याचे भाव वाढले तेव्हा ‘कांद्याने रडवले’ असे मथळे देणारी वृत्तपत्रे आणि वाहिन्या आता टॉमेटोचे भाव कोसळल्यावर शेतकऱ्यांची कड घ्यायला धावतात तेव्हा समाजाच्या भावनांशी खेळणे एवढाच त्यांचा उद्योग असल्याचे स्पष्ट होते. पराभव झाल्यावर आपले अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा अट्टहास करणारे राज ठाकरे आता एकदम उसाला तीन हजार रुपयांच्या दराची हमी द्यावी असे पत्र राज्यपालांना लिहितात तेव्हा उसाच्या भावाचे अर्थकारण त्यांना समजते का, असा प्रश्न मनात येतो. हीच माध्यमे आणि विरोधक रास्त भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारला काही उपाय सुचवतील तरच त्यांच्या अस्तित्वाला खरा अर्थ प्राप्त होईल.
-राजीव मुळ्ये, दादर, मुंबई

हा वायफळ खर्च नाही ?
मोदी सरकारने सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यासाठी ३,००० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा खर्च पूर्णपणे वायफळ वाटतो. हाच पसा इतर विधायक कामांसाठी वापरता येऊ शकतो. या आधी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी १०० कोटी रुपयांचा प्रकल्प मांडण्यात आला होता. त्यावेळी अनेकांनी त्यावर टीकेची झोड उठवली होती. हा पसा इतर विधायक कामांसाठी वापरण्याचे सल्ले दिले होते, जे नक्कीच योग्य होते. मोदी सरकारने तर आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली.  परंतु त्याच न्यायाने पटेलांच्या पुतळ्यासाठी होणाऱ्या वायफळ खर्चाबद्दल कोणीही  मोदी सरकारवर टीका करीत नाही.
-गौतम पाटील, सोलापूर

कर्वे यांचा प्रभावी युक्तिवाद
‘देव दयाळू आहे?’ या लेखात (प्रबोधन पर्व, २९ ऑक्टोबर) उद्धृत केलेला र.धों. कर्वे यांचा युक्तिवाद बिनतोड आहे. आस्तिकांना निरुत्तर करणारा आहे. देवासंबंधीचे ‘दुर्जनं प्रथमं वन्दे।’ हे विधान प्रथमवाचनी धक्कादायक वाटते. पण थोडय़ा विचारांती त्याची सत्यता पटतेच.
 हे लेखन आज पुस्तक रूपात उपलब्ध नाही. ते ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध करून हजारो वाचकांना उपकृत केले आहे. संपादकीय विभागातील ‘प्रबोधन पर्व’ सदराशी संबंधितांना शतश: धन्यवाद! महर्षी धोंडो केशव कर्वे, प्रा.र.धों.कर्वे, प्राचार्य दि.धों.कर्वे-डॉ. इरावतीबाई कर्वे, डॉ.भा.धों.कर्वे हे सर्व कर्वे कुटुंबीय तसेच महर्षी कर्वे यांचे मामेभाऊ रँग्लर र.पु.परांजपे हे अंतर्बाह्य़ बुद्धिप्रामाण्यवादी, चार्वाकवादी होते.
– प्रा. य. ना. वालावलकर