स्वच्छतेबाबतची सार्वत्रिक जाणीव, भान, त्याबद्दलची खात्री, समाधान हे सौंदर्यजाणीव-समज याबाबतची पहिली पायरी असू शकते. या समाधानातून, अंतर्मनातून सौंदर्यजाणीव विकसित होऊ शकते..
स्वच्छता आणि सौंदर्य या दोन गोष्टी म्हटलं तर कधीच एकत्रित विचारात घेतल्या जात नाहीत. स्वच्छता हा आरोग्याशी संबंधित विषय असं आपण सवयीच्या विचाराने ठरवलं आहे. परिणामी सौंदर्य याविषयी विचार करताना आपण त्याला त्या विचाराच्या आवाक्यात घेत नाही. पण प्रत्यक्ष जीवनात तसं घडत नाही. साधी रांगोळी काढायची असल्यास आधी जमीन झाडून-पुसून घ्यावी लागते व मग त्या जमिनीवर सुंदर रांगोळी काढली जाते. लग्नादी समारंभात आधी वर-वधूसाठी ‘हळदी’चा कार्यक्रम, ज्यामागे आरोग्याचं तत्त्व नक्कीच आहे तो आधी होतो, मग मेंदी वगैरे.. रोजही आपण स्नानानंतरच स्वत:ला सौंदर्योपचारांनी ‘तयार’ करतो. त्यामुळे आपल्या विचारप्रक्रियेत जरी हे दोन विषय एकत्रित नसले तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र ते असतात. आजच्या लेखामागचा हेतूच हा आहे की विचारप्रक्रियेत या दोन विषयांना एकत्र आणणे. याची  गरज अशी की आज आपला सर्व भर हा वैयक्तिक स्वच्छतेवर आहे. फार फार तर, त्याचा विस्तार कुटुंबाच्या पातळीवर होतो. पण आपल्या घरापलीकडे जाऊन मोठय़ा पातळीवर होत नाही. परिणामी दरवर्षी आपण या दोन्ही विषयांबाबत अनेक विरोधाभास जगत असतो.
गंमत पाहा, मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर ‘भारत स्वच्छता अभियान’ चालू केलं, काही दिवस ते टीव्ही, वर्तमानपत्र आदी माध्यमांत चाललं.. आणि मग काही दिवसांनी स्वाइन फ्लू, तो पसरल्याच्या, त्यात किती माणसं मृत्युमुखी पडली, तो कसा अनेक राज्यांत पसरला याच्या बातम्या आल्या. दरवर्षी पावसाळ्यात महानगरपालिकांचे कर्मचारी संप करणार, मग कचऱ्याचे ढीग, मग डास, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया.. म्हणजे एका पातळीवर आपण मंगळावर, चंद्रावर यान पाठवणार आणि त्याच वेळेला आपल्या समाजाच्या एका वर्गाला अगदी पायाभूत अशी गोष्ट सांगावी लागते. (स्वाइन फ्लू पसरल्यानंतर) की खाण्यापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा किंवा सार्वजनिक ठिकाणी विशेष करून किंवा इतरही वेळी शिंक आल्यावर, खोकताना नाका-तोंडावर हात ठेवा; रुमाल ठेवा.. आला आता विरोधाभास लक्षात? आपला कुठलाही सण घ्या, गणपती, दिवाळी म्हटलं तर हे आनंदाचे, उत्साहाचे अनेक सौंदर्यपूर्ण वस्तूंनी भरलेले सण असतात. त्यामुळे हे सण संपले की, आपण कचऱ्याचे टनावारी ढीग तयार करतो. हवा, पाणी यांचं प्रदूषण करतो. त्यामुळेच स्वच्छता व सौंदर्य यांचा एकत्र विचार करूया! कमीतकमी प्रयत्न तरी..
आपण शहरी लोकांना, मी असं म्हणतोय कारण मी जन्मापासून मुंबईत वाढलोय.  वर्तमानपत्र, टीव्हीतून पर्यावरण, कचरा याबद्दल भान येतं. कचरा हा बहुतांशी मानवनिर्मितच असतो. निसर्गातले घटक हे निसर्गचक्रात सामावून जातात. ते निरुपयोगी निसर्गचक्राच्या ‘बाहेरचे’ ठरत नाहीत. मानवनिर्मित वस्तू या बहुतांश निसर्गचक्राशी मिसळून जात नाहीत. आपण आता कुठे ‘रिसायकलेबल’ वस्तू बनायला शिकलोय. त्यामुळे बहुतांश कचरा ही मानवाचीच निर्मिती आहे. आपण ओला-सुका कचरा वेगळा करतो. कचरा घराबाहेर कचऱ्याच्या पेटीत टाकतो, इत्यादी.. मग एके दिवशी आपल्याला कळतं की आपण वेगळा केलेला कचरा शेवटी एकत्र होतो.. टीव्हीवरच्या जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे आपला चेहरा, शरीर, कपडय़ावरील घाण आपण काढून टाकतो. ती शेवटी आपल्याच समुद्रात जाते.. असं भान आलं की आपल्या क्रियाशीलतेतून समाधान मिळत नाही. आपला स्वच्छताविषयक विचार तिथे थिजून जातो. आपल्याकडे सार्वजनिक पातळीवर कचरा व्यवस्थापनेबाबत व्यवस्था नसल्याने अनेकांचा स्वच्छतेविषयीचा विचार असाच थिजून जात असेल. सौंदर्याचंही असंच आहे. आपण सुंदर आहोत व ते कसे, का याची आपल्याला स्वत:ची जाणीव असायला हवी. याविषयी आपल्यावर संस्कार होतच नाहीत. परिणामी केस, त्वचा, डोळे, ओठ, नखं, काख, संपूर्ण चेहरा, शरीर यांना सुंदर बनवण्यासाठी साधनं विकणारे; आपल्याला सतत काही सांगत राहतात. आहार, व्यायाम, साधनांचा वापर याबाबत. हे सांगणं इतक्या प्रमाणात होतं की आपण आपल्या दिसण्याबाबत नेहमी असमाधानी राहतो. थोडक्यात आपण स्वच्छता व सौंदर्य दोन्हीबाबत कधीही खात्रीलायकरीत्या समाधानी नसतो. त्यामुळे स्वच्छता व सौंदर्य याबाबत आपण कधीही समूहात बोलायची वेळ आली की, आपण दुसऱ्यांपेक्षा कसे जास्त जागरूक आहोत, कसे जास्त प्रयत्न, काळजी करतो, घेतो, अशा पद्धतीचं तुलनात्मक चढाओढीने बोलतो.sam03
सर्वसाधारणपणे प्रगतीची कल्पना ही शहरीकरण होणं अशी आहे आणि आपल्याकडे बरीच शहरं कुठच्याही नियोजनाशिवायच वाढतात. नियोजन फक्त कुठे रस्ते, इमारती, शाळा, मैदानं, बागा इतकंच नाही तर पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन अशाचंही आणायला हवं. ते बऱ्याच वेळा नसतं. त्यामुळे स्वच्छता व सौंदर्य दोन्हीबाबतचे प्रश्न शहरीकरणाबरोबर वाढत जाणार आहेत.
बरं टीव्ही, वर्तमानपत्र, इंटरनेट सगळीकडे जाहिराती अशा की, त्यातून नकळतपणे असं सुचवलं जातं की तुम्ही सतत तरुण दिसायला हवं. शक्य झालं तर परदेशी पद्धतीचे कपडे व इतर साधनं वापरावी; शक्य झालं तर सतत खरेदी करत राहावी. त्याबद्दल जागरूक असावं व सतत श्रीमंत, जास्तीतजास्त श्रीमंत होण्याची स्वप्नं बघावीत, प्रयत्न करावे. कारण श्रीमंत, तरुण, परदेशी कपडे वापरणारे, शहरात राहणारे, सर्व जाहिरातींत दाखवणारी अनेक साधनं वापरणाऱ्या लोकांनाच स्वच्छता व सौंदर्य याचं भान असतं, ते काय असतं ते कळतं. हे तर फारच अजब आहे! स्वच्छता, स्वच्छ पर्यावरण, परिसर, हवा-पाणी हे सर्व मानवांचे मूलभूत हक्क नाहीत का?
आपल्याकडे आता रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, घाण करणे, लघुशंका करणे आदींसाठी दंड केला जाईल. अशा जाहिराती, कायदे केले गेलेत. कायदा, शिक्षा हे एक सामाजिक भान निर्माण करायचं साधन आहे. पण त्याच वेळेला सार्वजनिक सुविधा पुरवायला हव्यातच हव्यात व त्या लोकांना हव्या तिथे, तशा हव्यात. मुंबईच्या उपनगरी रेल्वेस्थानकांवरचे पूल पाहा! ते कितीही असले तरीही लोक रेल्वेरूळ ओलांडून, कुंपणाच्या भिंतींना भगदाडं पाडून किंवा भिंतीवरून, रेलिंगवरून जातातच. मग लोकांना स्टेशनातून बाहेर पडायला कुठून जास्त सोयीचं आहे, हेच त्याचं वर्तन सुचवतंय असा विचार करून तिथे पूल का नाही बांधायचे? पुलांची उंचीही अशी की, अपंग, वृद्धांनी, हार्ट पेशंटनी चढायची हिंमत करूच नये! पण ते असो.
कचरा, घाण व्यवस्थापनाच्या पर्यावरणदृष्टय़ा योग्य, कमी खर्चीक सुविधा ज्यांचा वापर लोकांना करता येईल अशा सगळीकडे हव्यात, तरच स्वच्छतेबाबतची कृती-भान, सजगता प्रस्थापित होईल. त्या बाबतचा आत्मकेंद्रितपणा बंद होईल! हो, आपण आत्मकेंद्रित आहोत स्वच्छतेबाबत! जर का गप्पा मारणारे ग्रुप्स बघाल तर लक्षात येईल की, ते गप्पा मारता मारता पटकन बाजूच्या जागेत थुंकतात, कचरा सरकवतात, टाकतात. कारण ‘त्या’ ‘बाजू’च्या जागेत ते उभे नसतात. ही आपल्या अवकाशाची, पर्यावरणाची जाणीव, आपल्या आत्मकेंद्रितपणामुळे तयार झालेली..
मुद्दा असा की स्वच्छतेबाबतची सार्वत्रिक जाणीव, भान, त्याबद्दलची खात्री, समाधान हे सौंदर्यजाणीव-समज याबाबतची पहिली पायरी असू शकते. या समाधानातून, अंतर्मनातून सौंदर्यजाणीव विकसित होऊ शकते.
सौंदर्यजाणिवेतून होणाऱ्या सौंदर्यनिर्मितीत स्वत:च्या हाताने केलेली कृती असते. ती खूप कलात्मक पद्धतीने कदाचित मांडली जाणार नाही. कदाचित ती प्रथमदर्शनी आकर्षकही नसेल. पण ती स्वत: केलेली असेल. बाहेरून, तयार आणलेली नसेल. आजकाल दुसऱ्याने बनवलेली सौंदर्यपूर्ण गोष्ट विकत आणून वापरण्याचीच सवय आपल्याला लागलीय. जर का स्वत:च्या हाताने, स्वत:च्या सौंदर्यजाणिवेसह वस्तू बनवायची सवय असेल तर कमीतकमी विकतची वस्तू आणल्यानंतर ती कशी बनलीये, बनवणाऱ्याने काय पद्धतीने, कष्टाने बनवलीय हे तरी लक्षात येते. आकर्षकपणाचं विश्लेषण करून पाहता येते. पण आजकालच्या जीवनात स्वत:च्या हाताने गोष्टी बनवायला फुरसत आहे कुठे! व ‘तयार’ वस्तू बनवणारा ग्राहकाला ती विकत घेऊन वापरायची असल्याने, बनवणारा ती सौंदर्यपूर्णतेपेक्षा आकर्षक बनवतो व या सवयीमुळे आकर्षकपणा यालाच आपण हळूहळू सौंदर्य मानायला लागलोय.. त्यामुळे सौंदर्याचा स्वच्छता या मूल्याशीही संबंध असतो याचा आपल्याला कधीच विसर पडलाय..

महेंद्र दामले – mahendradamle@gmail.com
*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
congress not responsible for the defeat of babasaheb ambedkar in 1952 election as well by election in 1954
आचारसंहितेचे बंधन तपासयंत्रणांवरही असू शकते…
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?