धाडस आणि शौर्य या भारतीय सैन्याच्या अविरत सुरू असलेल्या परंपरेला नव्याने कोंदण घालण्याचे काम कर्नल मुनिंद्रनाथ राय यांनी आपल्या बलिदानातून केले आहे. प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्काराने सन्मानित मुनिंद्रनाथ यांना दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आले.
 कोणतीही लष्करी कारवाई असो, ज्या तुकडीचे आपण नेतृत्व करतो, तिथे धडाडीने आघाडीला राहणे हा या अधिकाऱ्याचा स्वभावगुण. त्यांच्या नसानसात धाडस भिनलेले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी लष्कराने राष्ट्रीय रायफल्सची (आर.आर.) स्थापना केली आहे. गोरखा रायफल्स त्याचाच एक भाग. तणावग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये सदैव युद्धजन्य स्थिती असते. अतिरेकी गनिमी कावा युद्धतंत्राचा वापर करत असल्याने त्याला नेटाने तोंड देण्यासाठी राष्ट्रीय रायफल्सच्या अधिकारी व जवानांना खास प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुनिंद्रनाथ हे राष्ट्रीय रायफल्समध्ये दाखल झाले. या ठिकाणी कर्नल मुन्ना राय म्हणून ते ओळखले जायचे. मागील वर्षी दक्षिण काश्मीरमधील कारवाईत त्यांनी अतुलनीय शौर्य केले. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान प्रजासत्ताक दिनी युद्धसेवा पदक देऊन करण्यात आला. याआधी त्यांना धाडसी कामगिरीबद्दल गौरविण्यात आले होते. युद्धसेवा पदकाने झालेला गौरव त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुन्हा सार्थ ठरविला. परंतु, ही त्यांची अखेरची लढाई ठरली.
काश्मीरमधील हंडुरा गावात हिजबुल मुजाहिदीनचे दोन अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईची योजना आखली. या मोहिमेचे नेतृत्व नेहमीप्रमाणे मुनिंद्रनाथ यांनी आपल्या शिरावर घेतले. या वेळी उडालेल्या चकमकीत ते शहीद झाले. त्यांच्या तुकडीने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण, मुनिंद्रनाथ यांच्यासारखा उमदा व तडफदार अधिकारी गमवावा लागला. मुनिंद्रनाथ यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. घरी आई आजारी असताना तसेच लग्नाचा १४वा वाढदिवस अवघ्या चार दिवसांवर आला असतानाही केवळ देशसेवेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या गौरवाचा आनंद त्याच्या कुटुंबीयांना फार काळ मिळू शकला नाही. कोणत्याही सैनिकाचे बलिदान हे त्याच्या कुटुंबीयांसाठी एक आघात असतो. राय कुटुंबीयही या आघातातून निश्चितच सावरेल. अखेर देशसेवेपुढे सारे काही फिके असे मानणाऱ्या योद्धय़ाचे ते नातलग आहेत.