शाळांना सुटय़ा अधिक आणि अभ्यासाचे दिवस कमी, अशी ओरड गेली अनेक दशके होते आहे. स्वत:च्या रजा आणि सुटय़ा यांव्यतिरिक्त लादली गेलेली अनेक कामे करता करता शिक्षकांना कमीत कमी दिवसांत विद्यार्थ्यांना सगळाच्या सगळा अभ्यासक्रम शिकवण्याची कसरत करावी लागते. शाळांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सुटय़ा देण्याची पद्धत बहुधा फक्तभारतातच अस्तित्वात असावी. त्यामुळे एखादा सण रविवारच्या सुटीच्या दिवशीच आला, तर मुले आणि त्यांचे पालक हिरमुसले होतात. २ ऑक्टोबर या महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी वर्षांनुवर्षे मिळणारी सुटी या वर्षी फक्त कागदोपत्री असणार आहे, या बातमीने ते सगळे जण पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. या दिवशी शाळांनी व महाविद्यालयांनी स्वच्छतेशी संबंधित कार्यक्रम करण्याबाबत केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना सूचना दिली आहे. शिक्षण हा विषय राज्याच्या अखत्यारीत असल्याने आदेश दिले गेले नाहीत, एवढेच. त्यामुळे ही सूचना हा आदेशच असल्याचे मानून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने २ ते ३१ ऑक्टोबर या काळात शाळांनी कोणकोणते कार्यक्रम आयोजित करावेत, याचे एक वेळापत्रकच तयार केले आहे. शाळांनी ते पाळणे एवढेच अपेक्षित नसून त्याबाबतच्या पूर्ततेचा अहवाल रोजच्या रोज सादर करण्याचा आदेश या वेळापत्रकासोबतच देण्यात आला आहे. महाविद्यालयांनीही गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छतेचे कार्यक्रम आयोजित करून त्याबाबतचा अहवाल दोन-तीन दिवसांत सादर करण्याची सूचना अनेक विद्यापीठांनी केली आहे. एवढे सगळे केल्यानंतरही शिक्षण खात्याचे म्हणणे असे, की त्या दिवशीची सुटी रद्द करण्यात आलेली नाही, तसेच कार्यक्रम पार पाडण्याची सक्तीही करण्यात आलेली नाही. असे म्हणणे म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखे आहे. शासनाने सरळ सुटी रद्द करून तो दिवस सत्कारणी लावण्यास काय हरकत आहे? सुटी रद्द करणे म्हणजे जनक्षोभ ओढवून घेण्यासारखे असल्याची ही भावना मुळात शिक्षण खात्यानेच दूर केली पाहिजे. जपानमधील शालेय विद्यार्थी रोजच्या रोज शाळा सुटल्यानंतर शिक्षकांसह शाळा स्वच्छ करण्याचे काम करतात, याबद्दल कौतुकमिश्रित उद्गार काढण्यापेक्षा आपल्याही विद्यार्थ्यांना गांधी जयंतीचे वेगळेपण समजावून सांगण्यात काय अडचण आहे? परंतु सुटीचा बाऊ करण्यात आता लोकप्रतिनिधीही पुढाकार घेऊ लागल्याने ‘कागदोपत्री सुटी आणि कार्यक्रमही स्वेच्छेने’ अशी भूमिका शिक्षण खात्याने घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शिक्षकांना हा कामाचा जादा भार कसा पेलवेल, या चिंतेने व्याकूळ होण्यापेक्षा त्यांच्यावर हा भार पडणारच कसा नाही, याची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे. शिक्षण ही केवळ ज्ञानदानाची क्रिया नसते. ती संस्कृती संक्रमण करण्याची प्रक्रियाही असते. स्वच्छता, टापटीप यासाठी पूर्वीच्या काळी परीक्षेत पाच गुण राखून ठेवले जात असत. आता तर तेही शिल्लक राहिलेले नाहीत. सुटीच्या दिवशी प्रत्यक्ष अभ्यासक्रमाऐवजी नवनवे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण प्रगतीसाठी हातभार लावणे अधिक उपयुक्त आहे. ज्या देशात सुटय़ांचे समर्थन जाहीरपणे केले जाते आणि त्यावरून रणकंदन माजते, त्या देशाचे भविष्य काय असेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. महात्मा गांधी यांचा जन्मदिन असो किंवा ५ सप्टेंबर रोजी पाळला जाणारा शिक्षक दिन, प्रश्न आहे तो संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांना योग्य तो कार्यक्रम देण्याचा. सुटी रद्द करून त्या दिवशी योग्य तो कार्यक्रम करणे, हेच आवश्यक असेल, तर राज्याच्या शिक्षण खात्याने केंद्रास सुटी रद्द करण्याची विनंती करून, नवा पायंडा पाडावयास हवा होता. ती संधी मात्र राज्याच्या शिक्षण खात्याने गमावली.