श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधवचनाचा उत्तरार्ध असा – ‘आपण एकाग्रतेचा विचार करतो. पण तो विचारच एकाग्रता बिघडवतो’  याचा रोख काय असावा? आपण पाहिलं की प्रपंचात आपण व्यग्र आहोत पण एकाग्र मात्र नाही. प्रपंचात आपलं मन विखुरलं आहे आणि त्या विखुरलेल्या मनानंच भ्रामक ‘मी’ला अखंड सुखी करण्याची आपली धडपड सुरू आहे. प्रपंचाच्या व्यापात व्यग्र असलेल्या माझ्या मनात अनिश्चितता, अस्थिरता, भीती, चिंता यांचीही गर्दी असते. असा मी याच विखुरलेल्या मनानं जेव्हा भगवंताची भक्ती करू लागतो तेव्हा काय घडते, त्याकडे बोधवचनाचा उत्तरार्ध संकेत करतो. प्रेम म्हणजेच एकाग्रता आणि एकाग्रता म्हणजेच प्रेम, हे आपण पाहिलंच. त्यामुळे प्रपंचातही एकाग्र नसलेलं मन भगवंतावर प्रेम नसल्यानं तिथे तर एकाग्र होतंच नाही आणि मग ती भगवंताची तथाकथित उपासना म्हणजे शुष्क क्रिया होते. कारण उपासनेला बसलेलं मनही प्रपंचातच व्यग्र असतं. बाहेरून ध्यान सुरू आहे, जप सुरू आहे, स्तोत्र वाचलं जात आहे पण मनात? ते अमकं काम अजून झालं नाही, तो अमका भेटणार होता तो अजून आला नाही, पुढच्या महिन्यात अमकी गोष्ट घ्यायची आहे पण तेवढी रक्कम जमवणे साधेल का, अमक्याला तर एकदा वठणीवर आणलंच पाहिजे.. अनंत प्रापंचिक गोष्टींचा धुडगूस सुरू असतो. मग आपल्याला वाटतं, अरे भगवंताची भक्ती नीट नेमानं केली पाहिजे! मग ती भक्ती कशी करायला पाहिजे, याच्याच विचारात वेळ जात राहातो. साधं उदाहरण घ्या. तुमची अत्यंत प्रिय व्यक्ती आणि तुम्ही एकत्र आहात. त्या क्षणी तुम्ही, मी अमुक  तऱ्हेनं प्रेम करीन, मी अमुक तऱ्हेनं प्रेम व्यक्त करीन, असा विचार करीत बसता की प्रेम करता? प्रेम हे विचारापुरतं राहात नाही. कृतीशिवाय, व्यक्त झाल्याशिवाय ते राहात नाही. तेव्हा भगवंताची अशी भक्ती करीन, तशी भक्ती करीन, हा विचारच भक्ती बिघडवतो! आता तिसऱ्या बोधवचनाकडे वळू. श्रीमहाराज म्हणतात ‘प्रेमाला नेमाची गरज लागत नाही. वियोग सहन होत नाही ते प्रेम. प्रेम ठेवावे म्हणजे नेम आपोआप साधतो. प्रथम नेम पाहिजे परंतु फार नेम करू नये.’  आता या वाक्याचे तीन भाग ठळकपणे दिसतात. तिसरा भाग ‘प्रथम नेम पाहिजे परंतु फार नेम करू नये’ हा पाया आहे. ‘प्रेम ठेवावे म्हणजे नेम आपोआप साधतो’ हा मध्य आहे तर ‘प्रेमाला नेमाची गरज लागत नाही. वियोग सहन होत नाही ते प्रेम’ हा या वाक्याचा कळस आहे! आपण लांबवरून पाहातो तेव्हा देवळाचा कळस दिसतो. थोडं जवळ जातो तेव्हा देवळाचा आकार दिसतो. पण त्या देवळात शिरायचं असेल तर पायरीवर पाऊल ठेवावंच लागतं. तसं भगवत्प्रेमाचा कळस गाठायचा तर पायरीवर पाऊल ठेवावंच लागेल. ती पायाची पायरी आहे ‘प्रथम नेम पाहिजे परंतु फार नेम करू नये’! आता ‘फार नेम करू नये,’ या सांगण्यामागचा गूढार्थ काय?