नरेंद्र मोदी सरकारातील वजनदार मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कोणीही चोरून पाळत ठेवायची गरज नाही. माणूस अगदी मोकळाढाकळा. जे मनात तेच, तशाच शब्दांत ओठांत हा त्यांचा खाक्या. तरीही इतक्या खुल्या दिलाच्या नेत्याच्या घरात हेरगिरी झाल्याच्या बातम्या येत असतील तर सरकारने त्याचे ठामपणे, पूर्ण शंकानिरसन होईपर्यंत खंडण करावयास हवे. याची कारणे अनेक. एक म्हणजे हे हेरगिरीचे वृत्त कोण्या ऐऱ्यागैऱ्या वर्तमानपत्राने दिलेले नाही. भाजपमध्ये अलीकडेच सामील झालेल्या एम. जे. अकबर यांच्या नियतकालिकाने ते अत्यंत आत्मविश्वासाने प्रकाशित केले असून गडकरी यांच्या शयनगृहातून छुप्या हेरगिरीची इलेक्ट्रॉनिक सामग्री जप्त करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. हा ऐवज आढळल्यानंतर संपूर्ण घराची तपासणी केली गेली आणि अन्यत्रदेखील हेरगिरी करणारी उपकरणे दडवून ठेवल्याचे आढळले, असे हे वर्तमानपत्र म्हणते. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सत्तावर्तुळात एकच खळबळ उडणे साहजिकच. दस्तुरखुद्द गडकरी यांनी असे काही घडल्याचे नाकारले असले तरी त्यामागील गांभीर्य लक्षात घेता मामला दिसतो तितका साधा नाही, अशी सगळ्यांचीच खात्री झाली आहे. अलीकडे अमेरिकेतर्फे अशा हेरगिरीची कबुली देण्यात आली होती. अमेरिकेची सीआयए ही गुप्तचर यंत्रणा भाजपच्या काही निवडक नेत्यांवर नजर ठेवून होती, ही बाब नुकतीच उघड झाली. पण ते झाले निवडणुकांच्या आधीचे. निवडणुका झाल्यानंतर आणि त्यातही पुन्हा भाजपस एकहाती सत्ता मिळाल्यानंतर कोणताही देश, निदान अमेरिका तरी, हे असले काही प्रकार इतक्या उघडपणे करण्याचा वेडपटपणा करणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिका यांच्यातले संबंध सुरळीत होतील अशी आशा आता कोठे निर्माण झाली आहे. त्यात आता मोदी पुढील महिन्यात अमेरिकेत जाणार आहेत. त्याच्या तोंडावर असला काही अगोचरपणा तो देश करण्याची शक्यता नाही. त्याचमुळे गडकरी यांच्या घरी हेरगिरी कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली याबद्दल तर्कवितर्क लढवले जात असून या मागे कोणी अंतर्गतच नाही ना, अशा प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे. ती अगदीच अस्थानी आहे, असे म्हणता येणार नाही. तेव्हा मुद्दा हा की, पक्षांतर्गत पातळीवरूनच समजा हा प्रकार घडत असेल तर त्यामागे कोण असू शकते? अधिकाराच्या पातळीवर पाहू गेल्यास एक गृहमंत्री आणि दुसरे पंतप्रधान यांनाच असे आदेश देण्याचा अधिकार आहे. परंतु गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशाला गडकरी यांच्यावर नजर ठेवण्याच्या फंदात पडतील? या तिघांचेही संबंध सौहार्दाचे आहेत, असे सांगितले जात असल्यामुळे या दोघांवर कोणीही संशय घेणार नाही. मग यामागे कोणी उद्योग समूह आहे किंवा काय? किंवा गृहमंत्री वा पंतप्रधान यांच्याखेरीज पक्षात अशी कोणती व्यक्ती आहे काय की जिला असे करण्यात रस असेल? या दोघांखेरीज पक्षातील तुल्यबळ व्यक्ती म्हणजे भाजपाध्यक्ष अमित शहा, हेच. भाजपचे हे नवनिर्वाचित अध्यक्ष गुजरातमधील एका तरुणीवर पाळत ठेवल्याप्रकरणी टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे परत या वेळी ते असे नक्कीच करणार नाहीत. खेरीज, त्यांचे आणि गडकरींचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. त्यामुळे ती शक्यताही मावळली. याचा अर्थ इतकाच की, अखेर पंतप्रधान मोदी यांनीच या प्रकरणी सत्य बाहेर यावे यासाठी जातीने लक्ष घालावे आणि जनतेच्या मनातील किल्मिषे दूर करावीत. तसे न झाल्यास हे संशयाचे जळमट समस्त मोदी सरकारला आपल्या जाळ्यात ओढेल. ते सरकारला परवडणार नाही. तेव्हा स्वत:हूनच या प्रकरणी निष्पक्षपाती चौकशीचे पाऊल मोदी सरकारने उचलावे. उगाच संशयाशी कशाला खेळा!