जगण्यात साहस नसेल, तर संस्कृतीचाच ऱ्हास होईल, असे आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड नावाच्या एका ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने म्हटले होते. वरवर पाहता त्याचे हे विधान हास्यास्पद वाटत असले, तरी साहस हा मानवी जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे, ही बाब खरीच आहे. भयाच्या सावलीखाली जगत राहिले, तर जगणे अवघड होईल, म्हणून साहसाचे वेड अंगी असले पाहिजे, या धारणेतून सळसळत्या रक्ताचे असंख्य तरुण साहसी खेळांकडे आकृष्ट होतात, इतकेच नाही तर खेळामध्ये प्रावीण्य मिळवून तेच ध्येय म्हणून निश्चितही करतात. साहसाचे वेड हा एक समंजसपणाने स्वीकारलेला मार्ग असतो. ‘अंगात रक्त सळसळत असताना संकटांना साहसी वृत्तीनं सामोरं गेलं नाही, तर आयुष्यात कोणत्याच गोष्टीला तोंड देण्याची धमकच अंगी येणार नाही,’ असे या साहसवीरांचे मानणे असते.  थोडक्यात, साहसाचे वेड हा एक समंजसपणाने स्वीकारलेला मार्ग असतो. याच धारणेतून पहाडी प्रदेशांतील तरुणांमध्ये साहसाचे वेड जाणीवपूर्वक जोपासले जात असताना, इकडे मुंबईसारख्या महानगरांत मात्र, वेडय़ा साहसांची स्पर्धा लागलेली दिसते. जगणं सुंदर करण्यासाठी, भावी आयुष्यातील संकटांना तोंड देण्याची धमक अंगी यावी म्हणून साहसी वृत्ती जोपासण्याचे पद्धतशीर प्रयत्न एकीकडे जगभरातील अनेक देशांमध्ये जाणीवपूर्वक राबविले जात असताना इकडे मात्र, आयुष्याचीच अखेर करून घेण्याचे वेडे साहस फोफावत असल्याचे विषण्ण करणारे वास्तव दिवसेंदिवस धगधगीत होऊ पाहात आहे. केवळ ‘इंप्रेशन’ मारण्यासाठी धावती रेल्वेगाडी पकडणे किंवा धावत्या रेल्वेच्या टपावर चढून कसरती करणे म्हणजे जिवावरचा खेळ आहे याची जाणीव वारंवार करून दिली जात असतानाही उपनगरी रेल्वेच्या टपावरून प्रवास करणाऱ्या ‘टपोरीं’च्या वेडय़ा साहसाला वेसण बसत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. सणासुदीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडून मित्रांसोबत उनाडपणा करताना केवळ मजेखातर मरणाला आमंत्रण देण्याचा असा अविचार चिंताजनक आहे. असे करून आपण साहसाला नव्हे, तर संकटाला आव्हान देत आहोत, हे समजण्याइतकीदेखील मनाची कुवत असू नये, हे आणखी दुर्दैव! मुंबईच्या उपनगरी गाडीच्या टपावरून प्रवास करणारा एक तरुण रविवारी अशाच संकटाचा बळी ठरला. याआधीही रेल्वेच्या टपावरून जीवघेण्या कसरती करत प्रवास करणाऱ्या अनेक तरुणांनी अशा अविचारामुळे आयुष्याची अखेर करून घेतली आहे. तरीही पुन:पुन्हा त्याच संकटाला सामोरे जाण्याचे वेडे साहस का केले जाते, याचे मानसशास्त्रीय विश्लेषणही व्हायला हवे. एक तर मुंबईच्या उपनगरी गाडीत गर्दीच्या वेळी चढणे हेच एक आव्हान असते. ते आव्हान पेलणे हे प्रत्येक प्रवाशाच्या दृष्टीने दैनंदिन साहसदेखील असते. अशा आव्हानाला तोंड देत दररोज प्रवास करताना असा काही दुर्दैवी प्रसंग डोळ्यादेखत पाहावा लागला, तर गाडीच्या गर्दीत चढण्याच्या आव्हानाला तोंड देण्याची त्याची हिंमतदेखील डळमळीत होऊन जाईल. मुंबईतच नव्हे, तर इतरत्रदेखील अशा वेडय़ा साहसाला बळी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. रविवारी मुंबईत उपनगरी गाडीच्या पेंटोग्राफचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने एका उमलत्या तरुणाने अकाली मरणाला कवटाळले, त्याच दिवशी, मुंबईशेजारच्या पेण शहरानजीक बाळगंगा नदीत मुंबईचेच तीन तरुण बुडून मरण पावले. साहसाचे वेड आणि वेडे साहस यांतील सीमारेषांची जाणीव तरुणाईमध्ये पुसली जात आहे की काय?

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!