‘अमूर्तचित्रात कसली आल्येय शैली न् फैली? आकारच नाहीत, रेषा नाहीत, तर शैली येणार कुठून चित्रात?’ हा प्रश्न जरा बाजूला ठेवून मुंबईनं अमूर्तचित्रांच्या शैलीत आणि या शैलीच्या आस्वाद-रीतीत जी काही भर घातली ती काय आहे, याचा विचार करावा लागेल..

निराकारातून अमूर्तचित्र घडू देणं, त्यातून आध्यात्मिक अमूर्तभावाकडे जाणं या प्रेरणा (अखिल) भारतीय आहेत. तरीदेखील ‘ही शैली मुंबईची’, असं आपण म्हणतो ते चित्रं जशी ‘घडतात’ त्याआधारे. या ‘मुंबई शैली’चा संबंध ढोबळमानानं जेजे स्कूल ऑफ आर्टशी असला तरी अमूर्तचित्रांच्या अमक्याच पद्धतीचं ‘प्रशिक्षण’ जेजेत कधीच देत नव्हते. जेजेच्या आसपास तयार झाली, ती या चित्रांशी संवाद साधण्याची भाषा. ती भाषा आजच्या लेखांकात अपरिहार्यपणे वापरावी लागणार आहे, कारण त्या भाषेखेरीज आपण (शब्दांतून तरी) या चित्रांच्या अनुभवाजवळ पोहोचू शकणार नाही.
अमूर्तचित्रात ‘मी काही केलं’ की ‘माझ्याकडून काहीतरी केलं गेलं’ ही दुविधा मुंबईच्या अनेक चांगल्या अमूर्तचित्रकारांनी कायम ठेवली आहे. फक्त मुलाखतीतलं टाळीचं वाक्य नाही हे- खरोखरच अशा काही चित्रकारांची चित्रं दाखवून, ‘हे त्यांच्याकडून घडलं असावं’ असं सांगता येतं. म्हणजेच असं की, ‘चित्रकार चित्र काढते (किंवा काढतो)’ याच्याऐवजी ‘चित्रकार चित्र होऊ देते/ देतो’ असं आपल्याला म्हणावं लागणार. ‘चित्र काढण्या’बद्दलच्या आपल्या कल्पनांना नकार मिळाला, तोही या चित्रकारांनी नकार देण्याचं ठरवलं म्हणून नव्हे, तर त्यांनी चित्र ‘होऊ देण्याचं’ ठरवलं, म्हणून! म्हणजे या चित्रकारांनी होकार कशाला दिला? स्वीकार कशाचा केला?
त्यांनी चित्राच्या घडत्या क्षणाला होकार दिला. एका मनोवस्थेतून घडणारी चित्रं लोकांना भले वरवर पाहून एकसारखी वाटोत, पण त्या प्रत्येक चित्राचं वेगळेपण आपण जाणतो आहोत, असं स्वत:त रुजण्याचा स्वीकार केला.
 हे खूप शाब्दिक वाटत असेल, प्रवचनासारखं किंवा प्रथितयश वक्त्याच्या व्याख्यानासारखं भुलवणारं भासू लागलं असेल, तर मुंबई शैलीची अमूर्तचित्रं पाहायला सुरुवात करा. त्यातही मुद्दाम कधीतरी शीतल गट्टाणीची जुनी अमूर्तचित्रं पाहा. ती सध्या चाळिशीत असेल आणि तिला कोणी ज्येष्ठबिष्ठ म्हणत नाही. अमूर्तचित्रकार अशी तिची ओळख मात्र आजही आहे. तिला स्केचेस करता येतात, पण ‘हे माझं चित्र’ म्हणून रेखाटनं दाखवावीशी वाटत नाहीत. कागदावर रंग लावायचा, त्यावर दुसरा कागद ठेवायचा, हा दुसरा कागद काढून टाकायचा, त्याचे अवशेष पहिल्या कागदावर राहू द्यायचे, मग पुन्हा दुसऱ्यावर तिसरा कागद.. असं करत करत भिंतीवरच्या शेवाळासारखा दिसणारा- पण ज्याचा रंग शेवाळापेक्षा निराळय़ा छटांचाही असू शकतो, असा जाडच्या जाड कागद ती करायची. हे तिचं चित्र : अमूर्तचित्र.
किंवा ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते. रंगानं सुरुवात. रंगानंच शेवट. या रंगप्रवासात रेषा, आकार वगैरे नेहमीचं काहीच नाही. मात्र कोलते यांची मनोवस्था, त्या मनोवस्थेतून होणारा चित्रप्रयोग, चित्राबाबत ‘पाहून करण्याऐवजी करून पाहावं’ या शिकवणीवर आणि स्वत:ला खोदून पाहण्यावर त्यांचा असलेला विश्वास.. खोदताखोदता काही वेगळं आढळलं तर तिथं थांबून त्या वेगळाईभोवती रुंजी घालण्याची त्यांची रीत.. हे एवढेच व्यक्तिगत घटक कोलते यांच्या चित्रांच्या घडण्यावर परिणाम करतात. बाकी ‘चित्र काढणं/ दृश्यकलाकृती घडवणं ही निर्णयांची मालिका असते’ वगैरे ठीक आहे, पण कोलते यांना ‘इथं हा रंग असू दे का’ असा प्रश्न पडून त्यावर मुद्दाम विचार करावा लागला, तर चित्र आज जमलं नाही असं ते खुशाल मानतात. कोलते यांची चित्रं वरवर पाहिल्यास एकरंगी दिसली, तरी या एकरंगीपणाच्या आत भरपूर रंग असतात, त्या रंगांचा कल्लोळ शांत करणारा ‘अवघा रंग एकचि’ येतो, त्या मुख्य रंगानंही (एखाद्या समारंभात यजमान दाम्पत्य सगळीकडेच फिरून साऱ्यांनाच भेटत असलं तरी कुणाला किती वेळ आणि कुणाशी किती सलगी यांत फरक असतो, तसं) खालच्या रंगांशी किती संग करायचा याचा एक अंगभूत आब राखलेला असतो.
किंवा एकाच रंगापासनं सुरुवात करणारे दिवंगत ज्येष्ठ चित्रकार व्ही. एस. गायतोंडे. त्यांच्यावर सुनील काळदातेनं केलेल्या फिल्ममध्ये ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यांचं चित्रदेखील त्यांच्या मनोवस्था आणि त्याखालचे कल्लोळ दाखवत नाहीत. अवकाश एकरंगी, त्यातून निरंगीपणाकडे जाताना दिसणारे काही आकार. एवढंच चित्राचं थेट वर्णन करता येईल बहुधा. बाकी चित्र समजून घ्यायचं ते गायतोंडे यांच्या मुकेपणातून ऐकू येईल तितकं. या गायतांेडे यांच्याविषयीच्या कितीही सत्यकथा किंवा आख्यायिका ऐकल्यात किंवा वाचल्यात, तरी तुम्हाला त्यांचं चित्र कळेलच असं नाही, इतक्या ‘स्व-स्थ’पणाकडे ही चित्रं गेली आहेत. स्वत:तच वसली आहेत.
ही वर्णनं, अशा शब्दांमधली वर्णनं म्हणजे कुणाला बुवाबाजी वाटेल. पण अमक्या चित्रकाराची अनेक चित्रं समोर आहेत, चित्रकाराची चित्र घडू देण्याची पद्धत त्यातून स्पष्ट होते आहे आणि चित्रकाराच्या बोलण्यातून या पद्धतीबाबतच्या अनुमानांना दुजोराच मिळतो आहे. म्हणजे ‘प्रचीती’ येते आहे.. मग अशी प्रचीती आल्यावर बुवाबाजी कसली?
या प्रश्नानं काही जणांची चरफड होईल. काही जणांना खूप बरं वाटेल. शिवाय हा प्रतिसाद इथेच संपत नाही. जे आपोआप आहे, ते ‘शेवाळलेल्या भिंतीसारखं’ असतं, की ‘नाना पाटेकरच्या आवाजासारखं, खूप राग किंवा खूप प्रेमसुद्धा एकाच खर्जात व्यक्त करू शकणारं’ असतं, की ‘अंतध्र्वनीचे कवडसे वाटावेत’ असं काहीतरी असतं, याचा फैसला हा अखेर शब्दांचा खेळच राहणार. चित्र एकाकडून घडलेलं आहे. दुसऱ्यानं ते आणखी घडवायचं आहे.
असं कसं घडणार?
‘मी फक्त चित्रच असेन असं नाही’ असं समोरची कलाकृती तुम्हाला जेव्हा सांगू लागेल, तेव्हा ते घडेल. त्यासाठी तुम्हाला फक्त विश्वास ठेवावा लागेल. नंतर काहीच करावं लागणार नाही.
ही बुवाबाजी नाही, कारण इथं मुद्दा संवेदनांच्या संवादाचा आहे. कलाकाराचा संवाद त्याच्या ‘श्रेयसा’शी, त्यातून आलेल्या सिद्धतेचा संवाद कलाकृतीशी, कलाकृतीचा श्रोत्याशी वा प्रेक्षकाशी, प्रेक्षकाचा परत कलाकृतीशी संवेदनासंवाद होऊन कलाकृती आणि प्रेक्षक समपातळीला येणं, हे या चित्रांचं फलित किंवा व्यावहारिक शब्दांत, ‘चित्राचा अर्थ’.  
ही अर्थनिर्मिती अनेकदा होत नाही. अनेकदा अर्धीमुर्धीच होते. याचं कारण, चित्रकार चांगल्या अर्थानं सराईत असेल, तिचं किंवा त्याचं विचारविश्व प्रगत/ सखोल/ रुंदावलेलं यापैकी सगळं किंवा काहीतरी एक असेल; दुसरीकडे प्रेक्षकही अनेक चित्रांना सामोरे गेलेले असतील, तर हा संवेदनासंवाद होऊ शकतो आणि चित्र ‘घडतं’ कसं याबाबतच्या माहितीसाठी चित्रकाराची तंत्रं प्रेक्षकाला माहीत असली पाहिजेत.
या सर्व अटी, शर्ती सांभाळून गेली काही र्वष मुंबई शैलीच्या अमूर्तचित्रांचा प्रेक्षकांशी संवाद जुळला आणि कायम राहिला.  
 इथं तीन उदाहरणं घेतली म्हणून हे तिघेच चांगले, असं नाही. चित्रप्रक्रियेचा विचार लोक कसा करतात हे या तिघांच्या संदर्भात भरपूर बोललं गेलेलं आहे, म्हणून ही उदाहरणं. या उदाहरणांच्या बाहेरचे असे अनेक चित्रकार आहेत. त्यांपैकी प्रफुल्ला डहाणूकर, विनिता गुप्ता, सेजल क्षीरसागर, राजश्री करकेरा, नितीन दादरावाला, संजय सावंत, सतीश वावरे ही काही नावं ‘मुंबईच्या अमूर्तकला शैली’साठी महत्त्वाची आहेत. दक्षिणेतले आदिमूलम्, विश्वनाधन, अच्युतन कुड्डालूर असे चित्रकार ‘घडण्या’च्या अधिक जवळचे आहेत.
भोपाळमध्येही अमूर्तचित्रकारांची मांदियाळीच आहे, हे खरं. पण मुंबईच्या अमूर्तकला शैलीत ‘घडण्या’ला जे महत्त्व आहे ते भोपाळच्या अमूर्तकला शैलीमध्ये नाही, असं भोपाळ शैलीच्या प्रसिद्ध चित्रकारांची- अखिलेश, युसूफ आणि सीमा घुरय्या यांची चित्रं सांगतात. सततचं काम, ‘लगन’ आणि त्यात अभिप्रेत असलेली भक्तीची भावना, यांना भोपाळची अमूर्तचित्रं प्राधान्य देताहेत असं वाटतं हे यामागचं महत्त्वाचं कारण. मुंबई शैलीचे अमूर्तचित्रकार कोऱ्या कॅनव्हासला थेट भिडतात, तसं भोपाळचे अमूर्तचित्रकार करत नसावेत, असं त्यांच्या चित्रांमधून दिसतं. दिवंगत चित्रकार नसरीन मोहम्मदी यांनी आणखी निराळय़ा अमूर्तचित्र शैलीत काम केलं होतं, त्यांच्याबद्दल ऑगस्टच्या शेवटच्या सोमवारी.