नगर जिल्ह्य़ातील पाथर्डीतील जवखेडे खालसा हे गाव. ऐन दिवाळीत तेथे दलित कुटुंबातील तिघांची हत्या झाली. मारेकऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाचे कटरने तुकडे केले. कोरडय़ा विहिरीत आणि िवधन विहिरीत ते फेकून दिले. मारेकरी अजून सापडलेले नाहीत. ही घटना अनतिक संबंधातून झाल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रे चघळत आहेत. सहा महिन्यांपूर्वी जामखेडमधील खर्डा गावातही अशीच घटना घडली. त्यात बळी गेला अकरावीतला नितीन आगे. तोही दलित. एका मातब्बर मराठा कुटुंबातील मुलीवर त्याचे प्रेम होते. त्याची ‘शिक्षा’ त्याला देण्यात आली.  वैयक्तिक भांडणातून त्यानेच आत्महत्या केल्याचा प्रचार त्या वेळी करण्यात आला. शिवाय मराठा समाजाला लक्ष्य करून सामाजिक स्वास्थ्य आणि जातीय सलोखा बिघडवणारी जातीयवादी मंडळी, नेते, पत्रकार यांची चौकशी करण्याची मागणी त्या वेळी संभाजी ब्रिगेडने केली. याही आधी सोनईत तीन वाल्मीकी तरुणांची हत्या करण्यात आली.  या हत्येमागेही प्रेमसंबंधाचे कारण होते. तेव्हा या सर्व घटना दोन कुटुंबांतील वादातून, प्रेमसंबंधातून झाल्या. त्याच्याशी जातीयवादाचा संबंधच काय, असा प्रश्न विचारला जातो. राज्यात सामाजिक पातळीवर सारे आलबेल आहे. लोकांना देणेघेणे आहे ते फक्त विकासाशी. समाजात जातिभेद राहिलेलाच नाही. अगदी निवडणुकांचे ताजे निकाल पाहा. लोकांनी जातीपातीचे राजकारण नाकारून मतदान केले आहे. तेव्हा उगाच वैयक्तिक भांडणाच्या राईचे जातीय हत्याकांडाच्या पर्वतात रूपांतर करू नका, असे काही लोकांचे म्हणणे दिसते. वरवर हा युक्तिवाद योग्यच वाटतो, पण वास्तव ते नाही. या तिन्ही हत्याकांडांमध्ये एक समान धागा आहे- क्रौर्याचा. अनतिक संबंध, प्रेमप्रकरण यातून हत्या होत नाहीत असे नाही, पण त्यातून सामूहिक हत्याकांडे क्वचितच घडतात. पाथर्डीतील घटनेत त्या युवकाबरोबर त्याच्या मातापित्यांचीही क्रूरपणे हत्या करण्यात आली. हा वर्षांनुवष्रे रक्तात भिनलेल्या रागाचाच परिणाम होता. खालच्या जातीचे लोक आपली बरोबरी करू पाहतात याचा तो संताप होता. त्या संतापाला कधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतून, तर कधी शेतीच्या वादातून, कधी प्रेमसंबंधातून, तर कधी अनतिक प्रकरणांतून तोंड फुटते इतकेच. तेव्हा अशी कुटुंबेच्या कुटुंबे कटरने कापली जातात तेव्हा त्यामागे केवळ अशी तात्कालिक कारणे असतात असे मानणे ही वास्तवाशी केलेली प्रतारणा ठरते हे नीट लक्षात घ्यायला हवे. एकटय़ा नगर जिल्ह्य़ात गेल्या वर्षी दलित अत्याचाराची १११ प्रकरणे घडली आहेत. यंदा आतापर्यंत ७९ घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकरणांचे मूळ वैयक्तिक भांडण हेच गृहीत धरण्याने आपल्या सामाजिक जाणिवा सुखावतील, पण मूळ प्रश्न तसाच पायातल्या कुरूपासारखा ठसठसत राहील. समस्या एवढीच की, ‘विकासाचे राजकारण’ यांसारख्या शब्दांची भूल देऊन ही ठसठस दाबून ठेवण्यातच सगळ्यांनाच रस असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे जातीयवादाहून धर्मवाद हा अधिक महत्त्वाचा या विचारप्रवाहालाही बळ देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विविध समाजमाध्यमांतून त्याचे दृश्य रूप स्पष्ट दिसते. आज ट्विटरवर सुनील जाधवच्या नावाचा हॅशटॅग शोधू गेल्यास निकाल शून्य येतो. मुंबईतील सेना गटनेता रमेश जाधव यांच्या हत्येनंतर त्यांच्या नावाचा हॅशटॅग शोधल्यास मात्र, या घटनेतील पाचही आरोपी मुस्लीम आहेत, याकडे लक्ष वेधणारे हजारो ट्विट दिसतात. दलितांबाबतच्या आपल्या सामाजिक जाणिवा कोणत्या पातळीवरील आहेत हेच यातून दिसते. सोनई, खर्डा, पाथर्डी अशा प्रत्येक ठिकाणी खऱ्या दुखण्याऐवजी तात्कालिक कारणांकडे बोट दाखविले जाते ते यातूनच. तो आपल्या याच सामाजिक दृष्टिकोनाचा उद्गार आहे.