आपले नातेवाईक परदेशात गेले की बहुतांश लोक हे इंटरनेटवरून मोफत फोन कॉल्सचा वापर करून त्यांच्याशी संपर्क साधत असतात. हे तंत्रज्ञान बीजरूपाने डॅन बोरिस्लो यांच्या संशोधनामुळे शक्य झाले होते. सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने अवघ्या ५२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मोफत फोन कॉल्स अधिक प्रभावीपणे होण्यासाठी त्यांनी मॅजिकजॅक या उपकरणाची निर्मिती केली होती. हा ‘जॅक’ संगणकाच्या यूएसबी पोर्टला किंवा राऊटरला जोडून आपण इंटरनेटमार्फत कुठेही मोफत फोन करू शकतो. यासाठी त्यांनी ‘मॅजिकजॅक व्होकलटेक लि.’ नावाची कंपनीही स्थापन केली होती.
प्रचंड कल्पक, कामाची ऊर्जा असलेले आणि कामाशी बांधीलकी मानणारे डॅन हे लहानपणापासूनच संशोधक वृत्तीचे होते. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी गवत कापण्यासाठी इतर यंत्रांपेक्षा जलद आणि स्वस्त यंत्र शोधून काढले. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९६१ रोजी फिलाडेल्फिया येथे झाले. त्यांनी विडेनेर विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. मॅजिकजॅकची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी वयाच्या २८व्या वर्षी ‘टेल सेव्ह होल्डिंग्ज’ ही कंपनी स्थापून, ‘एटी अँड टी’ या कंपनीला लांब पल्ल्याच्या दूरध्वनी कॉल्सची सुविधा पुरविणे सुरू केले. पुढे त्यांनी स्वत:च लांब अंतराच्या दूरध्वनी कॉल्ससाठीचे नेटवर्क उभे केले. हे जाळे त्यांनी १९९७मध्ये ‘एओएल’या अमेरिकेत सर्वदूर पोहोचलेल्या इंटरनेट सेवादारांमार्फत लोकांसाठी खुले केले. यामुळे अमेरिकन ऑनलाइनच्या ग्राहकांना लोकल, लांब अंतराचे कॉल, सेल्युलर सुविधा इंटरनेटमार्फत मोफत मिळू लागली खरी, पण बोरिस्लो यांची चांगला नफा कमाविणारी कंपनी १९९८मध्ये तोटय़ात गेली आणि १ जानेवारी १९९९ रोजी बोरिस्लोच तेथून पायउतार झाले.
पुन्हा २००५ मध्ये त्यांनी व्हॉइस ओव्हर आयपी व्यवसायाची कल्पना आणली. यासाठी त्यांनी टॉक फॉर फ्री नावाची कंपनी स्थापन केली. पण याच कंपनीचे नामकरण करून २००६मध्ये त्यांनी वायमॅक्स कम्युनिकेशन कॉर्पोरेशनची सुरुवात केली. या कंपनीचा नफा मॅजिकजॅक या छोटय़ा उपकरणाच्या माध्यमातून येऊ लागला. जानेवारी २००८मध्ये कंपनीने दर दिवशी किमान एक हजार मॅजिकजॅक्सची विक्री होत होती. ही विक्री अल्पावधीतच म्हणजे त्याच वर्षांच्या जून महिन्यात आठ ते नऊ हजारांपर्यंत पोहोचली. पुढे  २०१०मध्ये व्होकलटेक या इस्रायली कंपनीने वायमॅक्स कंपनी विकत घेतली आणि कंपनीचे नाव ‘मॅजिकजॅक व्होकलटेक लि.’ असे करण्यात आले, त्याहीनंतर जानेवारी २०१३ पर्यंत ते या कंपनीत होते. संशोधनाप्रमाणे अश्वशर्यतींचा जुगार आणि फुटबॉल यांत रमणारे हे रगेल व्यक्तिमत्त्व होते. त्यांची अखेर फुटबॉल खेळून आल्यावरच झाली.