अनेक वर्षांची खडतर तपश्चर्या, कठोर मेहनत आणि त्याग यामुळेच प्रत्येक महान व्यक्ती आपली यशस्वी कारकीर्द घडवत असतो. पण ही यशस्वी कारकीर्द घडवताना आपण कुठल्या गोष्टींना, आनंदाला मुकलो आहोत, याची जाणीव त्यांना होऊ लागते आणि कारकीर्दीचा अखेरचा टप्पा जवळ येऊ लागतो. गेल्या काही दिवसांत सर अ‍ॅलेक्स फग्र्युसन आणि डेव्हिड बेकहॅम या फुटबॉल जगतातील दोन दिग्गजांच्या निवृत्ती मनाला चटका लावून गेल्या. कुटुंबाने आपल्यासाठी केलेला त्याग आणि कुटुंबासाठी आता सर्व काही करण्याची इच्छा, यामुळेच फग्र्युसन आणि बेकहॅम या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीचा समारोप केला. आणखी काही वर्षे खेळण्याची बेकहॅमची इच्छा होती. त्यासाठी एक वर्षांचा करार करण्याची तयारी पॅरिस सेंट जर्मेन क्लबने दाखवली होती, पण पत्नी व्हिक्टोरिया आणि मुलांना वेळ देण्यासाठी बेकहॅमला अखेर निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला. बेकहॅमने २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत आपल्या जादुई कामगिरीने जगभरातील चाहत्यांवर मोहिनी घातली. त्याने फक्त आपल्या संघाला जेतेपद पटकावून देण्यात मोलाचा वाटा उचलला नाही तर फुटबॉल खेळाला यशोशिखरावर नेण्याचे कामही केले. पेले आणि दिएगो मॅराडोना यांच्यानंतर तो फुटबॉलचा खरा अ‍ॅम्बेसेडर बनला. आपल्या केशरचनेचे अनुकरण करण्यास त्याने अनेकांना भाग पाडले. फुटबॉल हा श्वास, ध्यास आणि प्राण असलेल्या बेकहॅमने मँचेस्टर युनायटेड, रिआल माद्रिद, लॉस एंजलिस गॅलॅक्सी, एसी मिलान आणि पॅरिस सेंट जर्मेनसारख्या अव्वल क्लबचे प्रतिनिधित्व केले. इंग्लिश प्रीमिअर लीग, एफए चषक, चॅम्पियन्स लीग, स्पॅनिश प्रीमिअर लीग, सुपरकोपा चषक, लीग-१ अशा फुटबॉलमधील सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धावर बेकहॅम नावाची मोहोर उमटली. फुटबॉलची लोकप्रियता असलेल्या ब्रिटन, स्पेन, अमेरिका आणि फ्रान्स या चार देशांमध्ये जेतेपद पटकावण्याची किमया करणारा तो पहिला इंग्लिश फुटबॉलपटू ठरला. १९९८, २००२ आणि २००६च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत त्याने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. २०१०च्या फिफा विश्वचषकात दुखापतीने त्याची खेळण्याची संधी हिरावून घेतली; पण विश्वचषक उंचावण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील मध्यस्थ बनला. पण विश्वचषक जेतेपदाविनाच त्याची कारकीर्द संपुष्टात आली. वयाच्या ३८व्या वर्षीही सर्वाधिक कमाई करणारा आणि पक्का व्यावसायिक फुटबॉलपटू अशी बेकहॅमची ओळख होती. असे असतानाही सामाजिक कार्यासाठी सदैव धडपडणाऱ्या बेकहॅमने या मोसमातील सर्व मानधन स्वयंसेवी संस्थांना दिले होते. अखेपर्यंत बेकहॅमची जादू आणि लोकप्रियता ओसरली नाही. कारकीर्दीच्या बहरात असताना बेकहॅमने घेतलेला निवृत्तीचा निर्णय हा त्याच्या चाहत्यांसाठी पचवणे निश्चितच जड जाणार आहे. पण फग्र्युसन गुरुजींनी ज्याप्रणाने बेकहॅमला घडवले, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचे धडे गिरवण्याचे काम तो करणार आहे. १७५ दशलक्ष पौंडांचा धनी असलेल्या बेकहॅमची एखादा फुटबॉल क्लब विकत घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे भविष्यात बेकहॅमच्या फुटबॉल फॅक्टरीतून अनेक प्रतिभावान खेळाडू घडतील, ही अपेक्षा रास्तच ठरावी.