‘उचल्या’ आलं, ‘उपरा’ आलं, पण ‘बलुतं’ काही इंग्रजीत आलं नव्हतं. तेही अखेर आलं आहे.
इतक्या उशिरा इंग्रजीत आलेल्या पुस्तकाचं काय कौतुक राहणार?
हे ‘कौतुक’ समजून घेण्यासाठी दोनच मार्ग आहेत :
एक तर हे इंग्रजीतलं पुस्तक स्वत:च अख्खं वाचायचं. मराठीत वाचलं असलं तरी मुद्दाम पुन्हा किंवा मराठी अजिबात न येणाऱ्या एखाद्या वाचकमैत्रीण वा वाचकमित्राला हे पुस्तक भेट द्यायचं आणि सहज म्हणायचं, ‘वाचून काय वाटलं, सांग मला’.
अमराठी मित्राला पहिला प्रश्न पडलेला असेल.. ‘हे सारं खरं होतं का?’ तोच प्रश्न मराठीतही निराळ्या पातळीवर पडला होता. ही पातळी हेत्वारोपांची होती. मराठीजनांनी ‘बलुतं’चा धक्का १९७८ सालच्या डिसेंबरात पेलला. ‘बलुतं’नं काय वादळ उठवलं होतं, याबद्दलचं पुस्तक मराठीत निघालं आहे. याला जवळपास ४० र्वष होत असतानाचे आपण सगळे, जणू ‘बलुतं’सारखी वाङ्मयीन घडामोड मराठीत झालीच नव्हती अशा थाटात जगू लागलो आहोत. आजही पायरेटेड स्वरूपात मराठी ‘बलुतं’ रस्त्यावरसुद्धा मिळतं किंवा ग्रंथालीचा स्टॉल कुठे लागलेला असल्यास त्याची नवी आवृत्ती मिळते. पण ‘बलुतं’मधलं जे सत्यकथन आहे, ते ‘आता इतक्या वर्षांनी’ वाचताना केवळ एक दलित आत्मचरित्र न ठरता ‘समाजदर्शन’ ठरतं. एक माणूस स्वत:विषयी इतकं स्पष्टपणे लिहू शकतो, याचं वाचकाला आश्चर्य वाटत राहातं.
महाराष्ट्राचं हे समाजदर्शन ‘बलुतं’मुळे जेव्हा इंग्रजीत येतं, तेव्हा काहीसा अनर्थही होऊ शकतो. म्हणजे, हे सारं ‘एग्झॉटिक’ किंवा ‘कित्ती वेग्ळंच्चाय नै?’ अशा सवंग प्रतिक्रिया मिळवणारं ठरू शकतं.. ही भीती खुद्द अनुवादक जेरी पिंटो यांनी त्यांच्या चार पानी ‘अनुवादकीय’ प्रस्तावनेच्या शेवटी, अगदी जाता जाता एक-दोन वाक्यांपुरती का होईना, पण व्यक्त केली आहे.. ‘तसं झालं तर दोष माझा. केवळ माझा.’ असं पिंटो म्हणतात.
पण तसं होणार नाही, हा दिलासा ज्येष्ठ लेखिका (रीटा वेलिणकर, त्या वर्षी..) आणि समीक्षक शांता गोखले यांची छोटेखानी प्रस्तावना देते. या पुस्तकाच्या निमित्तानं दलित जाणिवांच्या साहित्याचा आणि त्यानं स्वत:सकट सर्वच मराठी वाचकांना दिलेल्या धक्क्यांचा ऊहापोह केल्यानंतर गोखले म्हणतात की, ‘लेखक दया पवारांचा ‘आवाज’ अनुवादक या नात्याने जेरी पिंटो यांनी अगदी लक्षपूर्वक एकतानतेनं ग्रहण व धारण केला आहे.’ आजचा काळ हा खेडोपाडीच्या दलितांसाठी १९७८ पेक्षा अधिकच असंवेदनशील म्हणायला हवा, याची जाणीव गोखले यांना आहे, तशीच पिंटो यांनाही. पण या मतामुळे अनुवादाला काही धक्का पोहोचलेला नाही.
मराठीत ‘कोसला’, ‘वासूनाका’ आणि ‘बलुतं’ वाचलेली पिढी आज वयाच्या पन्नाशीत आहे. त्यांच्या पुढल्या पिढीनं किंवा येणाऱ्या पिढीनं ही तीन पुस्तकं वाचल्याशिवाय त्यांना ‘आधुनिक काळा’तल्या शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या आतल्या गाठी उकलणारच नाहीत कधी. त्यात ‘बलुतं’चं इंग्रजीतही टिकलेलं महत्त्व असं की, स्वत:च्याच चुका, स्वत:ची प्रेमप्रकरणं, स्वत: ‘जादा’ वागल्याचे प्रसंग यांची थेट कबुली देणारं हे आत्मचरित्र माणूस स्वत:शी कसा वागतो याचं अभिजात पातळीवरलं उदाहरण आहे. येणारी पिढी मराठी वाचेलच असं नाही, म्हणून तरी हे इंग्रजीतलं ‘बलुतं’ संग्रही असायला हवं.

‘बलुता’ (इंग्रजी)
मूळ लेखक : दया पवार,
अनुवादक : जेरी पिंटो
प्रकाशक : स्पीकिंग टायगर
पृष्ठे : ३००,
किंमत : ३५० रु.