जुन्या हिंदी चित्रपटांतील जगदीप जाफ्री हे विनोदी नट सतत आपले ‘खंबा उखाड के’ बोलतच असत. जेथे बोलायचे तेथे तर बोलतच; परंतु नको तेथेही बोलत व त्याने लोक हसत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही असा जगदीपी जिव्हाचाळा जडल्याचे दिसत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर. काही महिन्यांपूर्वी भारतीय नौदलाने पाकिस्तानी बोट उद्ध्वस्त केल्याप्रकरणात त्यांना जो शब्दखेळ मांडावा लागला होता, त्यातून ते सुज्ञ झाले असतील अशीही अपेक्षा होती. परंतु अलीकडेच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हातीच्या  बंदुकीतून सहजच वायबार काढावा तसे वक्तव्य केले आणि ते अडचणीत आले. मुंबईवरील वा संसदेवरील हल्ल्यासारखा प्रसंग पुन्हा घडला तर सरकारची प्रतिक्रिया कशी असेल, असे त्यांना त्या परिषदेत विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले, की दहशतवाद्यांच्या विरोधात दहशतवाद्यांचा वापर केला तर त्यात वाईट काय आहे? प्रत्येक वेळी आमच्या सनिकांनीच का दहशतवाद्यांना मारायचे? वरवर पाहता यात वावगे ते काय असा सवाल कोणासही पडेल. पाकिस्तान तर १९४७ पासून हेच करीत आहे. परंतु पहिली गोष्ट म्हणजे आज कोणताही देश स्वत:ला दहशतवाद्यांशी जोडून घेऊ इच्छित नाही. तसे करणे त्याला परवडणारे नसते. बलुचिस्तान किंवा सिंध प्रांतातील दहशतवादी हल्ल्यांमागे रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेचा हात असल्याचे आता पाकिस्तान सरकार अधिकृतपणे म्हणू लागले आहे. या मागील हेतू स्पष्ट आहे. नतिक वर्चस्वाच्या लढाईत त्याला भारताला स्वत:च्या पातळीवर आणायचे आहे. याबाबत पर्रिकर यांचे वक्तव्य आयतेच पाकिस्तानच्या उपयोगी पडू शकते. नव्हे, पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी, पíरकरांच्या या विधानामुळे भारत दहशतवादी कारवायांत सामील असल्याच्या शक्यतेला पुष्टीच मिळाली असल्याचे म्हटलेच आहे. काटय़ाने काटा काढावा याचा अर्थ सरकारने दहशतवादाच्या मागे उभे राहणे असा होतो हे पर्रिकर यांच्या लक्षात यायला हवे होते. असा प्रयोग कँाग्रेसच्या काळात झालेला आहे. काश्मीरमधील इखवान आणि छत्तीसगढमधील सलवा जुडूम ही त्याची उदाहरणे. पण बिघडलेली बंदूक चालवणाऱ्याच्या तोंडावरच फुटावी तसे त्यांचे झाले. आता पुन्हा एकदा सरकारला तोंड फोडून घेण्याची इच्छा झाली असल्याचे दिसते. सलवा जुडूम पुन्हा जिवंत करण्याचे घाटत असतानाच पíरकरांचे हे वक्तव्य यावे याचा अर्थ स्पष्ट आहे. या विधानाचे परिणाम लक्षात आल्यानंतर मात्र सरकारची चांगलीच धावपळ उडाली. सध्या देशात मोदी आणि अमित शहा यांच्यानंतरची प्रभावशाली व्यक्ती म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल. त्यांना पर्रिकर यांच्या बचावासाठी उतरावे लागले. मात्र थेंबातून जे जाते ते नंतर हौदातून परत येतेच असे नाही. उलट त्याने देशाच्या प्रतिमेला पोचा पडतो हे भान पíरकर यांनी बाळगायला हवे होते. बहुधा मोदींप्रमाणेच आपलीही छाती ५६ इंचांची आहे हे दाखविण्याच्या भरात ते बोलून गेले. परंतु एकंदरच मोदींच्या काही मंत्र्यांना हा जिव्हा अस्थिभ्रंशाचा आजार जडलेला आहे. तो जितक्या लवकर बरा होईल तितके बरे.