छत्तीसगड राज्यातील करवधा येथे झालेल्या िहदू संतांच्या धर्म संसदेत ‘साईबाबा देव तर नाहीच, पण संत किंवा गुरूही नाहीत’ असा ठराव करून खूप चांगले काम केले आहे. पण त्याचबरोबर या धर्म संसदेने देशभरातील स्वयंघोषित साधू-संतांबद्दलचाही निर्णय घेणे आवश्यक आहे. अशा साधू-संतांची धर्म संसदेने पाहणी करून त्यातील सत्यता पडताळून त्यांचाही एकदाचा निर्णय घेणे गरजेचे आहे. जेणेकरून समाजातील लोकांची उगीच फसवणूक तरी होणार नाही.
शिर्डीतील लोकांची गर्दी आणि त्यातून मिळणारा पसा हा नक्कीच चच्रेचा विषय आहे. कारण त्यातून समाजाला काय मिळते. कोणत्या सोयी-सुविधा पुरविल्या जातात. याचा हिशेब ठेवणे गरजेचे आहे. धर्म संसदेने यावरही चर्चा करणे अपेक्षित आहे. तसेच साधू-संतांनी कसे राहावे, कसे वागावे, अत्याधुनिक साधनसामुग्रीचा किती आणि कसा वापर करावा, प्रवचन देण्याचे किती पसे घ्यावेत याचीही धर्म संसदेने चर्चा करून रीतसर यादी करावी. जेणेकरून उगीच आयोजकांचीही फसवणूक होणार नाही.
साईबाबा देव किंवा संत नाहीत इथपर्यंत ठीक आहे. पण ते गुरू का होऊ शकत नाहीत? िहदू संस्कृतीमध्ये गुरू म्हणजे मार्गदर्शक. मग ते आई-वडील, शिक्षक, असा कोणीही जो आपल्याला मार्ग दाखवतो तो गुरू असू शकतो. त्यामुळे साईबाबांना गुरू मानून त्यांच्या अनुयायांनी, भक्तांनी साईबाबांप्रमाणेच साधी राहणी अनुसरून उच्च विचारसरणीचा अवलंब करण्यात गर ते काय? साईबाबांनी भुकेल्यांना जेवू घातले त्याप्रमाणे गाजावाजा न करता त्यांना मानणाऱ्यांनी हीच कृती करून आपल्या गुरूची महती आणखी मोठी करावी.

पूर्वग्रहदूषित विचार आणि वास्तवाचा विपर्यास
‘.. अयोग्य पायंडा’ या पत्रात (लोकमानस २६ ऑगस्ट) गार्गी बनहट्टी लिहितात, ‘ अंनिसने २० ऑगस्टच्या मोर्चात/मेळाव्यात सिने-नाटय़ क्षेत्रातील कलाकारांना सामील करून जाहिरातबाजीचा अयोग्य पायंडा पाडला.’ हे मत पूर्वग्रहदूषित म्हणावे लागेल, कारण या कलाकारांना त्यात कोणताही आíथक लाभ नव्हता हे उघड आहे.
‘गरीब, अशिक्षित समाजात अंधश्रद्धा अधिक आढळतात. ज्यांना गरज नाही, जे विज्ञानवादी आहेत अशा लोकांत अंनिसने जाहिरातबाजी केली.’ ही विधाने वास्तवाचा विपर्यास करणारी आहेत. भारतातील कुठल्याही समाजात अंधश्रद्धाळूंची संख्या किमान ८० टक्के आहे. गंडे-दोरे देणाऱ्या बुवा-बाबाच्या नादी लागणे ही जशी अंधश्रद्धा, तशीच अंगारकी चतुर्थीला गणेश मंदिरासमोर दर्शनासाठी रांग लावणे हीसुद्धा अंधश्रद्धाच. तिथे गरिबी-श्रीमंतीचा भेद नाही.
– प्रा. य. ना. वालावलकर

कोळसाखाणी यापुढे सरकारनेच चालवाव्यात
‘गाढव कायद्याचा शहाणा अर्थ’ या अग्रलेखात (२७ ऑगस्ट) सुरुवातीला ‘रद्द केलेल्या कंत्राटात भाजपने मंजूर केलेली किती आणि मनमोहन सरकारचा त्यातला वाटा किती’ यावरील चर्चा बालबुद्धीच्या द्योतक असल्याचे म्हटले आहे; पण पुढे (पाचव्या रकान्यात) ‘या पापात मनमोहन सिंग यांचा वाटा मोठा, कारण त्यांच्याच काळात जास्तीत जास्त कंत्राटे दिली गेली,’ असे म्हटले आहे, हे परस्परविरोधी वाटते.
आता ही कंत्राटे कोर्टाच्या निकालानुसार रद्द झालीच आहेत तर या परिस्थितीचा देशाला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल हे पाहणे आवश्यक आहे. कोळसा खाणीतून उत्पादन काढणे यासाठी काही फार उच्च दर्जाचे तंत्रज्ञान लागत नाही तेव्हा सरकारने स्वत:च खाणींचा ताबा घ्यावा आणि  जास्त उंच पगारमान न ठेवता अधिकारी आणि कामगारांची भरती करून उत्पादन खर्च कमीत कमी ठेवून कोळशाचे उत्पादन करावे. तसेच कोळसा देशांतर्गत वीज उत्पादनासाठी वापरून देशाच्या सर्व भागांत विनाखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. यंत्रे बसवण्यासाठी जो भांडवली खर्च खासगी कंपन्यांनी केला असेल त्यातून घसारा कमी करून जास्त कालावधीसाठी हप्त्यांनी परतफेड करावी. तसेच कामगार-सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. केंद्र-राज्य सरकारांनी कमाल पारदर्शकता आणि कार्यक्षमता दाखवून हे करून दाखवले तर एक चांगला पायंडा पडू शकेल.
– श्रीराम बापट, दादर, मुंबई.

तेल-नासाडीचा खेळ..
तेल-निरक्षरांची  ‘रॅली’बाजी हे  विनोद कापसे यांचे पत्र वाचले (लोकमानस, २६ ऑगस्ट). त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. इंधन-तेलाची नासाडी आणि त्यामुळे आपल्या देशाची होणारी अपरिमित हानी हा अतिशय काळजीचा विषय आहे, हे निर्वविाद.
याच विषयाचा जागतिक स्तरावर विचार केल्यास आणखी एक, यापेक्षा किती तरी गंभीर, गोष्ट सर्वाच्या लक्षात यावी. दरवर्षी अनेक वेळा कित्येक ठिकाणी मोटारी आणि मोटारसायकलीच्या शर्यती नियमितपणे होत असतात (आपला देशही त्याला अपवाद नाही ) त्यांतील विजेत्यांना भरघोस बक्षिसे मिळतात, लाखो लोक बेभान होऊन त्या प्रत्यक्ष बघतात आणि कोटय़वधी लोक चित्रवाणीवर ! अमुक ग्रां प्री, तमुक ग्रां प्री, एफ-वन इत्यादी प्रकारांत अत्यंत उच्च प्रतीच्या इंधन-तेलाची किती प्रचंड नासाडी- उधळपट्टी होते, याचा विचार किती जणांनी केला आहे?
महाप्रचंड आíथक उलाढाल, जीवघेणी स्पर्धा, विजेतेपद मिळवल्यावर श्ॉम्पेनचे फवारे, तुफान, जबरदस्त धुंदी! या सगळ्यात माणूस निसर्गाने दिलेल्या या अमूल्य ठेव्याचा विनाश करीत आहे, असा किती जण विचार करतात?
– डॉ राजीव देवधर, पुणे</strong>

ही फक्त सामुदायिक आठवण..  
अंनिसचा पुण्यामध्ये २० ऑगस्टला जो मेळावा झाला त्यावर ‘अंनिसची जाहिरातबाजी, व्यक्तिपूजा, एक इव्हेंट..’ अशी टिप्पणी केली आहे, ती सर्वथा चुकीची आहे. गेल्या वर्षी याच तारखेला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची म. िशदे पुलावर हत्या झाली होती, तेव्हापासून दर महिन्याच्या २० तारखेला महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून कुणी ना कुणी तिथे जाऊन दाभोलकरांना आदरांजली वाहातच असते. या महिन्यात एक वर्ष झाले म्हणून त्या ठिकाणी नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी इ. कलावंत मंडळी तिथे आली होती. ही मंडळी आधीपासून अंनिसच्या कार्याची समर्थक आहेत, यापूर्वीही त्यांनी अंनिसच्या कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे. अशा प्रसंगी प्रबोधनासाठी पथ-नाटय़े, गाणी सादर करणे म्हणजे जाहिरातबाजी कशी काय ठरते ? कशालाही ‘इव्हेंट’ म्हणणे, अज्ञानाचे लक्षण नाही काय ?
अंनिसने गावा-गावांत, अगदी आडगावातही शाखा उघडल्यात आणि आजमितीला अशा २५० शाखा कार्यरत आहेत. तिथेही प्रचारासाठी सभा, गाणी, पथ-नाटय़े इ. कार्यक्रम होतच असतात आणि समाजाभिमुख अशा नामवंत कलावंतांसह अन्य व्यक्तीही सहभागी होत असतात. दुसरे असे की ज्या व्यक्तीने आपला उत्तम चाललेला वैद्यकीय व्यवसाय गुंडाळून समाजसेवेचे व्रत घेतले, संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचले आणि शेवटी आपले बलिदान दिले, अशा महनीय व्यक्तींची आठवण सामुदायिकरीत्या केली तर ती व्यक्तिपूजा होते? बनहट्टी यांचा मराठी शब्दकोश काही वेगळाच असावा!
– चंद्रसेन टिळेकर, अंधेरी-पूर्व (मुंबई)

राजविषादयोग!
‘‘राज’कीय गोंधळाचे भारुड (अन्वयार्थ 26 ऑगस्ट) वाचले. रणांगणावर ऐन वेळी अर्जुनाचे अवसान कसे गळाले याचे वर्णन भगवद्गीतेच्या अर्जुन विषादयोग या पहिल्या अध्यायात आले आहे. अर्जुनाच्या  झालेल्या त्या अवस्थे सारखी सांप्रत राज ठाकरे यांची अवस्था झाली असावी.
 ‘मला आपल्याशी काही बोलायचे आहे’ असे जाहीर करून राज यांनी जमविलेल्या सभेत ‘मी विधान सभा निवडणूक लढविणार ’ असे म्हणत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव झाकण्यासाठी फोडलेला बार अगदीच फुसका निघाला. फरक इतकाच की, भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन युद्धाला तयार झाला;  पण राज हे सर्व महाराष्ट्रच माझा आहे,  मी कोणत्याही एका ठिकाणावरून निवडणूक कशी लढू, असे म्हणत युद्धाला तोंड फुटण्या आधीच रणछोडदास झाले.
– चिदानंद पाठक, पाषाण (पुणे)

‘लोकमानस’साठी ईमेल loksatta@expressindia.com या पत्त्यावर पाठवा. pratikriya@expressindia.com हा ईमेल-पत्ता यापुढे  लोकसत्ता इंटरनेट आवृत्तीशी संपर्क साधण्यासाठी वापरात राहील.