राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे सिनेसृष्टीला वेध लागले असून, अत्यंत प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवासाठी भारतातर्फे  ‘तितली’ या चित्रपटाची निवड झाली आहे. यशराजसारख्या बडय़ा बॅनरचे नाव व राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिबाकर बॅनर्जी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मानवी नातेसंबंधांवर आधारित या चित्रपटात घरातून पळून गेलेला मुलगा नंतर गुन्हेगारी विश्वाकडे कसा ओढला जातो, याची  कहाणी आहे.
दिबाकर बॅनर्जी हे या चित्रपटाते निर्माते असले, तरी ‘खोसला का घोसला’ (२००६), ‘ओये लकी, लकी ओये’ (२००८) या चित्रपटांनी त्यांची स्वतंत्र ओळख बॉलीवूडमध्ये अगोदरच झाली आहे. या चित्रपटांचे ते दिग्दर्शक  होते. मध्यमवर्गीयाच्या जीवनाचे चित्रण असलेला खोसला.. मध्ये अनुपम खेर आणि बोमन इराणी यांनी काम केले होते. या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर बॅनर्जी यांचे नाव सर्वतोमुखी झाले. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन (एनआयडी) या प्रख्यात संस्थेतून पदवी घेतल्यानंतर बॅनर्जी यांनी काही काळ एका जाहिरात कंपनीत कॉपीरायटर म्हणून काम केले. येथेच त्यांना प्रदीप सरकार, जयदीप साहनी यांच्यासारखे सहकारी मिळाले. १९९७ मध्ये स्वत:ची कंपनी काढण्याचे ठरवले आणि नोकरीचा राजीनामा दिला. एनआयडीमधील आपल्या दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन ‘वॉटरमार्क’ या नावाने कंपनी सुरू केली. एमटीव्ही व अन्य एका चॅनेलसाठी प्रोमोज आणि जाहिराती बनवल्यानंतर ‘खोसला का घोसला’ त्यांनी बनवला आणि तेथून ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. अभय देओल आणि परेश रावळ यांना घेऊन बनवलेला ‘ओये लकी, लकी ओये’ हा तर पहिल्यांदा गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. न्यूयॉर्क टाइम्ससारख्या नामांकित वृत्तपत्रानेही त्याची नुसतीच दखल घेतली नाही, तर चित्रपटाची प्रशंसा केली. या चित्रपटाला मग पुरस्कार न मिळालाच तर नवल.
२०१० मध्ये बॅनर्जी यांनी ‘लव्ह, सेक्स और धोका’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. पूर्णपणे डिजिटल कॅमेऱ्याद्वारे चित्रित झालेला हा देशातील पहिलाच चित्रपट. जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तो दाखवला गेला आणि समीक्षकांनीही त्याचे कौतुक केल्याने बॅनर्जी यांचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले.
२०१२ मध्ये बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केलेला ‘शांघाय’ आला. इम्रान हाश्मी, अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपटही गाजला. कान महोत्सवाच अत्यंत  मानाचा असल्याने  दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘तितली’ची दखल तेथेही घेतली जाईल, यात शंका नाही.