एकमेकांना पाण्यात पाहणारे देश परस्परांच्या अस्तित्वाचा, प्रगतीचा अर्थ कसा लावत गेले ते किसिंजर यांच्यासारख्या मुत्सद्दय़ाच्या नजरेतून समजून घेताना बरंच काही नवं कळतं. या रिअलपोलिटिकच्या रेटय़ामुळेच जर्मनीची एकी झाली आणि त्यानंतर तो देश जगातल्या बलाढय़ देशांत गणला जायला लागला, असं किसिंजर नमूद करतात आणि कसं तेही
समजावून सांगतात.
स्वर्ण सिंग आठवतात? आपले परराष्ट्रमंत्री होते इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात. त्यांच्या कामावरनं मत बनवावं असं तेव्हा वय नव्हतं. पण आता सरकारातले अनेक ज्येष्ठ अधिकारी, नोकरशहा सांगतात, स्वर्ण सिंग यांच्यासारखा मुत्सद्दी झाला नाही. त्या वेळी दोन देशांमधला कोणताही मुद्दा असो. चर्चेला स्वर्ण सिंग असायचेच. त्यांच्या हाताखाली काम केलेला एक अधिकारी मध्यंतरी सांगत होता, स्वर्ण सिंग यांच्या हाताखाली जेवढं शिकायला मिळालं ते आयएएस, आयपीएसच्या वर्गातल्या शिकण्यापेक्षा किती तरी पट अधिक होतं. स्वर्ण सिंग यांचं सगळ्यात कौशल्य होतं ते चर्चेत. म्हणजे एखाद्या गुंतागुंतीच्या, ताणतणावाच्या मुद्दय़ावर समजा दोन देशांत चर्चा असेल, तर स्वर्ण सिंग सुरुवात करायचे.. या प्रश्नाचे दोन भाग पडतात. त्यातला पहिला मुद्दा जर आपण चर्चेला आता घेतला तर तीन अंगांनी त्याचा विचार करता येईल.. या तीनपैकी पहिल्या मुद्दय़ाची दोन अंगं आहेत.. त्यातल्या एकाला जर आपण हात घातला.. तर आपल्याला दिसतं की त्याच्या काही उपप्रश्नांचा विचार केल्याखेरीज आपल्याला या प्रश्नाचा विचार करता येणार नाही.. वगैरे वगैरे.. असं त्यांचं अखंड चाललेलं असायचं. हा अधिकारी सांगत होता, हेच स्वर्ण सिंग यांचं वैशिष्टय़ होतं.
ज्या काळात जग शीतयुद्धानं विभागलेलं होतं, ज्या काळात अमेरिकावादी किंवा सोविएत रशियावादी असण्यासाठी दबाव असायचा, ज्या काळात आपली अर्थव्यवस्था तोळामासा होती त्या काळात स्वर्ण सिंग हे अशी चर्चेची गुऱ्हाळं रंगवत बसायचे. पण त्याचा फायदा भारताला बराच झाला. तो असा की हे प्रश्न कधीच मिटले नाहीत. कारण ते असे पटकन मिटणारे नव्हतेच. पण प्रश्न मिटले नाहीत म्हणून चर्चाच थांबलीये असं कधी झालं नाही. स्वर्ण सिंग यांचं कौतुक करणाऱ्या माझ्या या सरकारी अधिकारी मित्राचं म्हणणं हेच की आंतरराष्ट्रीय डावपेचात, मुत्सद्देगिरीत प्रश्न मिटला नाही मिटला तरी हरकत नाही.. पण चर्चेचा दरवाजा कधीही बंद होता नये.. मग तो सांगत गेला, चर्चा करणं.. ती निष्फळ होणार आहे हे माहीत असूनही ती करणं.. ती करताना डोकं शांत ठेवणं.. बोलत राहणं पण त्या बोलण्यातून काहीही हाती लागणार नाही असं कौशल्य विकसित करणं.. ही सगळी कौशल्यं चांगल्या म्हणवून घेणाऱ्या मुत्सद्दय़ाठायी असतात.. किंवा असायला हवीत. अशा मुत्सद्दय़ांत मग नाव निघालं अर्थातच हेन्री किसिंजर यांचं आणि त्यांच्या ‘डिप्लोमसी’ या भल्या थोरल्या ग्रंथाचं. आंतरराष्ट्रीय चर्चा, अर्थकारण वगैरे विषय आवडीचे असल्यामुळे मग हे पुस्तक मिळवून वाचणं ओघानं आलंच. तशी किसिंजर यांची वर्तमानपत्रीय ओळख होतीच. त्यांचं ज्यू असणं, निक्सन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या अनुषंगाने किसिंजर यांची कामगिरी, त्यांचा भारतद्वेष, चीनविषयक बदलती भूमिका.. आणि त्यांचं ग्रंथलेखन, वाक्चातुर्य आणि घनगर्द आवाजातलं ठाशीव बोलणं. या सगळ्यामुळे किसिंजर यांचा संदर्भ आला की आलिशान घरातल्या गुबगुबीत खुर्चीवर बसलेला आणि.. आसपासचं ऐश्वर्य हे जणू आपलंच आहे असे आविर्भाव चेहऱ्यावर असणारा पांढराशुभ्र बोकाच डोळ्यासमोर यायचा. सुरुवातीच्या काळात त्यामुळे किसिंजर यांच्याविषयी प्रेम नव्हतं. पण ताज्या जगाचा अभ्यास करताना ते प्रत्येक टप्प्यावर भेटत गेले. मग तो पश्चिम आशियातला वाद असो वा अन्य कोणता संघर्ष. त्यामुळे हळूहळू किसिंजर नकळतपणे आवडायला लागले. ‘डिप्लोमसी’ वाचलं आणि त्यांच्याबाबतच्या आवडण्याची जागा आदराने घेतली. हा आदर अर्थातच केवळ इतक्या पुस्तकांच्या नुसत्या लेखनासाठी नाही. तसं तर काय आपल्याकडे काही संगणक किंवा अर्थतज्ज्ञ वगैरे भाराभर पुस्तकं लिहीतच असतात.. अगदी आपल्या अभ्यासविषयाशी संबंध नसलेल्या विषयांवरही लिहीत असतात. म्हणजे त्यातले कोणी मानसशास्त्रावर लिहितो किंवा कोणी रवींद्रनाथ टागोरांच्या काव्यावर. पण किसिंजर हे अशा नेटाधारित लेखकांपैकी नाहीत. त्यांची गणना खऱ्या बापमाणसात. त्याचमुळे त्यांची सर्वच पुस्तकं वाचताना मजा येते. ती सगळी त्यांच्या अभ्यासविषयाशी संबंधित असतात आणि काही एक दृष्टिकोन देतात.
‘डिप्लोमसी’ याला अपवाद नाही. समग्र एकोणिसावं शतक मुत्सद्देगिरीच्या अंगानं त्यात चितारण्यात आलंय. पहिल्या महायुद्धाच्या आधी पुस्तकाची सुरुवात होते आणि ते संपतं ते अमेरिका आणि युरोपीय देशांतील संतुलनावर. अमेरिकी मुत्सद्देगिरीचा अर्क यात कोळून भरलाय. नव्या शतकाची सुरुवात. त्या काळच्या जगाची मांडणी सांगता सांगता किसिंजर मध्ये बिस्मार्क आणि नेपोलियनच्या काळातही फेरफटका मारून येतात. १८५९ सालचं फ्रान्स-ऑस्ट्रिया युद्ध, १८६६ ऑस्ट्रो-प्रशिया संघर्ष वगैरेतून वाट काढत काढत नव्या युरोपनं सत्तासमतोल कसा साधला ते आपल्याला कळतं. या काळात मुत्सद्देगिरीत महत्त्वाचा बदल झाला. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधांचं वर्णन करायला raison d’etat हा फ्रेंच संबंध वापरला जायचा. त्याचा अर्थ आहे देशासाठी आवश्यक. या शब्दाची जागा या काळात घेतली गेली जर्मन शब्दानं realpolitik. तत्त्व वा सिद्धांताऐवजी वास्तव आणि भौतिक गरजांचा विचार करणारी व्यवस्था. किसिंजर सांगतात या टप्प्यापासून मग मुत्सद्देगिरीचा चेहराही बदलला गेला. त्यामुळे काय आणि कसे बदल होत गेले, याची चिकित्साही ते करतात. एकमेकांना पाण्यात पाहणारे देश परस्परांच्या अस्तित्वाचा, प्रगतीचा अर्थ कसा लावत गेले ते किसिंजर यांच्यासारख्या मुत्सद्दय़ाच्या नजरेतून समजून घेताना बरंच काही नवं कळतं. या रिअलपोलिटिकच्या रेटय़ामुळेच जर्मनीची एकी झाली आणि त्यानंतर तो देश जगातल्या बलाढय़ देशांत गणला जायला लागला, असं किसिंजर नमूद करतात आणि कसं तेही समजावून सांगतात. पहिलं महायुद्ध, नंतरचा व्हर्सायचा तह, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जन्मकळा, त्याला जबाबदार असणारी मुत्सद्देगिरी वगैरे इतके तपशील यात भरलेत की तो सगळा इतिहास माहीत असतानाही त्यातले इतके दिवस सुटून गेलेले मुद्दे आपल्या समोर येतात. या महायुद्धानंतर अमेरिकेच्या काहीशा जबाबदारी झटकण्यामुळे फ्रान्स हा जर्मनीच्या विघटीकरणासाठी कसा प्रयत्न करत होता, हे वाचून आजच्या पाश्र्वभूमीवर आश्चर्य वाटतं. पूर्णपणे लष्करी ताकद काढून घेतलेलं ऱ्हाईनीश प्रजासत्ताक वसवावं असा फ्रोन्सचा प्रयत्न होता. परंतु ब्रिटन आणि अमेरिकेने डोळे वटारल्यावर फ्रान्सला तो नाद सोडावा लागला. पण तरी जर्मनीपासून ऱ्हाईनलँड वेगळा काढला जावा असा त्या देशाचा आग्रह होता. पण ही मागणीही मान्य होत नाही हे दिसल्यावर नाराज झालेल्या फ्रान्ससमोर एका नव्या कराराचं गाजर ब्रिटन आणि अमेरिकेनं धरलं होतं. हा सगळा तपशील भलताच रंजक आहे. पुढे अर्थातच हिटलरचा उदय, ब्रिटनचं अशक्त होत जाणं आणि नंतर शीतयुद्धाचा जन्म असा सगळा सविस्तर प्रवास आहे. किसिंजर या काळात चांगले सक्रिय होते. त्यामुळे याबाबतच्या त्यांच्या लिखाणाला प्रत्यक्ष अनुभवाची धार आहे. हा काळ तसा एका बाजूने आपल्या समोर आलेला. त्याची दुसरी बाजू किसिंजर यांच्या लिखाणातून आपल्या समोर येते, तेव्हा एकाच सत्याचे किती विभ्रम असू शकतात हे जाणवतं आणि त्यातनं वाट काढत जाणारा मुत्सद्देगिरीचा मार्ग उजळून निघतो.
किसिंजर किंवा अमेरिकेची मुत्सद्देगिरी आवडते तरी किंवा आवडत नाही तरी. पण तिच्याविषयी असं अलिप्त राहता येत नाही. त्याचमुळे ‘डिप्लोमसी’ अधिक वाचनीय.. आणि शिकवणारंही.. ठरतं. शेवटी प्रश्न उरतोच. मुत्सद्देगिरी म्हणजे काय? या कलेची भाषा काय असते? त्याचं सर्वोत्तम उत्तर विन्स्टन चर्चिल यांनी देऊन ठेवलंय- ‘डिप्लोमसी इज द आर्ट ऑफ टेलिंग पीपल टु गो टु हेल इन सच अ वे दॅट दे आस्क फॉर डायरेक्शन्स.’ व्यक्त अव्यक्ताच्या या कलेत आपण कुठे आहोत हे देवयानी खोब्रागडेबाईंच्या प्रकरणामुळे कळलंच. म्हणूनच ‘डिप्लोमसी’ वाचायचं.
(समाप्त)
डिप्लोमसी : हेन्री किसिंजर,
प्रकाशक : सायमन अँड शुश्टर पेपरबॅक्स,
पाने : ९१२, किंमत : १५.२५ डॉलर्स.
हेन्री किसिंजर, शांततेचे नोबेल विजेते अमेरिकन मुत्सद्दी. ‘द व्हाइट हाऊस इयर्स’, ‘इयर्स ऑफ अपहिव्हल’, ‘इयर्स ऑफ रिन्यूअल’ ही आठवणीपर आणि परराष्ट्रीय धोरणाविषयीची काही पुस्तके प्रकाशित.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता