या सदराच्या अखेरीस, उरल्यासुरल्या पाच प्रश्नांची ही चर्चा..
आपल्याला शब्द कळतात आणि चित्रं कळत नाहीत, हे गृहीत धरून ‘कलाभान’ या सदराची सुरुवात झाली होती. यातले ‘आपण’ म्हणजे महाराष्ट्रात पिढय़ान्पिढय़ा राहणारे मराठी भाषक, याची आठवणही या सदरातून वारंवार करून दिली गेली. चित्रकलेत (कोणत्याही अन्य कलेप्रमाणे) फक्त परंपरांचा अभिमान बाळगून चालणार नाही, तर आज काय चाललं आहे हे पाहून आजच्या चित्रकलेला आपल्याकडून कसा प्रतिसाद हवाय याची जाणीव वाचकांना झाली पाहिजे. ती जाणीव देण्यासाठीचा प्रवास, असं या सदराचं स्वरूप राहिलं.
आज आपण पाच प्रश्नांचा विचार करू. या प्रवासाचे आधार काय होते, प्रत्यक्ष ‘कलेबद्दल’ (म्हणजे मराठीत : चित्रातले रंग- रेषा- आकार- अवकाश- पोत यांबद्दल!) बोलण्याचं टाळून या सदरानं काय साधलं आणि मुख्य म्हणजे, हे सदर काही जणच वाचायचे (ते बऱ्याचदा आवडीनंच वाचायचे, विचार करायचे, वगैरे..) पण बरेच जण वाचायचे नाहीत म्हणजे हा या सदराचा पराभव ठरतो का, हे तीन प्रश्न या सदराबद्दलचे. आणखी दोन प्रश्न प्रत्यक्ष कलेबद्दलचे आपल्याकडले त्रिकालाबाधित : (१) दृश्यकलेच्या जवळ जाण्यासाठी काय करावं लागेल. (२) नैतिकतेला कितपत महत्त्व द्यायचं.
कहाण्या पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होतात. तसं व्हायला कलाभान हे सदर म्हणजे काही कहाणी नाही, हे लक्षात असलेलं बरं. इथं उत्तरं शोधण्यासाठी पुन्हा, या सदरातच गेल्या साडेअकरा महिन्यांतून काही सापडतंय का, हे पाहिलं जाणार आहे.
तेव्हा प्रश्न पहिला- प्रवासाचे आधार. मराठीत कलेबद्दलचं बरंचसं लिखाण ‘निर्मितीकेंद्री’ असतं. त्यामुळेच, कलासमीक्षक म्हणून एखाद्यानं बारा र्वष काम केलं तरी ‘तो स्वत: चित्रं काढत नाही’ असा शिक्का मारून त्याला नापास करू पाहण्याचा असफल, अयशस्वी आणि कोता प्रयत्न अनेक जण मराठीत तरी करतात. असे लोक आपापल्या जागी बरोबरच ठरले, कारण कला म्हणजे निर्मितीचं कौशल्य या विचारातून आपण बाहेर पडलो नव्हतो. त्याउलट, कलेबद्दल बोलताना प्रेक्षककेंद्री भूमिका घेणं आवश्यक आहे, अशा विचारातून ‘कलाभान’ची वाटचाल झाली. हा प्रेक्षककेंद्रित्वाचा आधार अनेक लेखांच्या अस्तित्वाचं कारण ठरला. ‘आस्वाद आणि भोग’, ‘कौशल्य आणि संदेश’ असे ते लेख, फेब्रुवारीच्या उत्तरार्धात ‘कलाभान’मध्ये होते. यापैकी ‘आस्वाद आणि भोग’मध्ये, कला केवळ निर्मितीच्या अंगानं (चित्रातलं कौशल्य, त्याचं निराळेपण, ‘ओरिजिनॅलिटी’ वगैरे) समजून घेण्याचं बंधन नसलेले लोक चित्रासमोर उभं राहून चित्राचा ‘आस्वाद’ घेत नाहीत, ते चित्राचा ‘भोग’ घेत असतात आणि नग्न चित्रं किंवा मानवी शरीरदर्शनाबद्दल हे फारच खरं असतं, असा मुद्दा होता. म्हणजे एक प्रकारे, निर्मितीकेंद्री विचार बरा अशी सूक्ष्म कबुलीही होती. पण सूक्ष्मच. कारण श्रीधर अंभोरे आणि ज्याँ डय़ुबफे या दोघांची रेखाचित्रवजा कलानिर्मितीदेखील ‘प्रेक्षका’ला त्यामागचे सांस्कृतिक संदर्भ माहीत असल्यामुळे भिडते, असं स्पष्टीकरण पुढल्याच लेखात आलं. निर्मितीकेंद्री विचाराच्या ऐवजी, कलावंताचे आणि/ किंवा कलाकृतीचे संदर्भ आणि ते आपल्याला कळणं असा भागही अनेक चित्रांमध्ये महत्त्वाचा असतोच, याचं स्पष्टीकरण पुढल्या काही लेखांमध्ये होतं. मार्चमधले ते तीन लेख सरळसरळ ‘हा चित्रकार नक्कल करतो’ वगैरे आरोपांशी संबंधित होते. सुबोध गुप्ता या भारतीय (तो स्वत:ला बिहारी म्हणवतो) शिल्पकारानं एकदा ब्रिटिश दृश्यकलावंत डॅमिएन हर्स्ट याच्यासारखीच मानवी कवटी आपल्या परीनं बनवली आणि गुप्ताकृत कवटी कलेची एक राजधानी मानल्या जाणाऱ्या व्हेनिसमध्ये अगदी प्राधान्यानं प्रदर्शित झाली, याची गोष्टही यापैकी एका लेखात होती. ‘चित्र-ढापणे’, ‘नक्कलदाढ’ आणि ‘अनुकरणाला फुटले विचाराचे पाय’ अशा शीर्षकांच्या त्या लेखांमधून नक्कल की अस्सल हा मुद्दा कसा बिनमहत्त्वाचा आहे आणि हेतू, विचार यांचं वेगळेपण कलावंताकडे आहे की नाही हेच का महत्त्वाचं आहे, याची चर्चा होती. या प्रकारची चर्चा मराठीत सहसा होत नाही.
कलाकृतीतला विचार प्रेक्षकाला कळू शकतो. हेतू प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. थोडय़ाथोडक्याच का होईना, पण शब्दांच्या आधारानिशी चित्रं दाखवली जाणं ही कल्पना आजघडीला अक्षरश: जगन्मान्य आहे. त्यामुळे मराठीतली ‘माझं चित्रच बोलेल’ वगैरे वाक्यं आता झूठ ठरतात. इतकं स्पष्टपणे नाही, पण या अर्थाचं लिखाण इथं झालं. पण ‘निर्मितीकेंद्री विरुद्ध प्रेक्षककेंद्री’ या सामन्यातली खरी कसोटी पुढे होती. अमूर्तचित्रं- जिथे निर्मितीचाच विचार महत्त्वाचा आहे, तिथे ‘प्रेक्षककेंद्री’ भूमिकेचं काय काम?
इथे आपण दुसऱ्या प्रश्नापाशी येतो. रंग- रेषा आदी चित्रघटकांचं ‘विश्लेषण’ करायच्या फंदात कलाभानचे लेख कधी पडले नाहीत. अमूर्तचित्रांबद्दलही, व्ही. एस. गायतोंडे रोलर वापरत हा, किंवा तत्सम बारकावे महत्त्वाचे नव्हते. ते चित्र आपल्या- प्रेक्षकांच्या- नजरेत कसं ‘घडतं’ आहे, हे अधिक महत्त्वाचं होतं. ही पद्धत बरोबर की चूक, असा प्रश्न अर्थातच मराठीत लेखकाचं बखोट धरून विचारला जाणार होता, पण २००७ सालच्या डॉक्युमेंटा नामक नियत-कालीन महाप्रदर्शनात नसरीन मोहम्मदी नावाच्या अमूर्त-चित्रकर्तीची चित्रं आफ्रिकेत बाराव्या शतकापासून टिकून असलेल्या घोंगडीच्या डिझाइनसोबत मांडली गेलेली पाहिली तेव्हा अमूर्तचित्रांचाही विचार प्रेक्षककेंद्री असतो हे लक्षात आलं होतं. तो अनुभव ‘अमूर्ताचा मानव्यविचार’ या लेखात नमूद आहे.
निर्मितीकेंद्री विचाराकडे प्रेक्षक जाणारच असतो. त्या विचाराकडे गेलं की तिला/ त्याला कलाकृतीची मौज अधिक कळणार असते. पण आजकाल कलाकृतीच इतक्या विविध प्रकारच्या आहेत की, निव्वळ निर्मितीकेंद्री विचार टिकू शकत नाही. शिवाय, मराठीपुरतं बोलायचं तर, निर्मितीकेंद्री विचार खूप झाला आहे. पण जरा निराळ्या कलाकृती ‘अनुभवानं समजून घ्यायच्या’ असतात, हे मराठीत कमी आहे. उदाहरणार्थ, जेम्स टरेलच्या प्रकाशरचनांचा अनुभव काय असतो, याबद्दल मराठीत लिहिलं गेलं नव्हतं. अनुभवाबद्दल प्रेक्षकांनीच विस्तारानं बोलल्यास, मराठीत ज्याला(च) ‘प्रत्यक्ष कलेबद्दल बोलणं’ समजलं जातं, त्याचा बडिवार कमी होऊ शकेल. प्रेक्षक अनुभवाबद्दल बोलतात, तेव्हा कलेचा प्रत्यक्षपणा धसाला लागत असतो.
हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण जरा नंतर बघू. आधी थेट कलेबद्दलच्या दोन प्रश्नांकडे जाऊ : (१) दृश्यकलेच्या जवळ जाण्यासाठी काय करावं लागेल, (२) नैतिकतेला कितपत महत्त्व द्यायचं, हे ते प्रश्न आहेत. त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर ‘पाहावंच लागेल’ इतकं साधं आहे, पण ‘पाहिलं त्याचा विचार आपणच करावा लागेल’ हे जरा प्रेक्षकांची जबाबदारी वाढवणारं आहे.
पाहिलं त्याचा विचार आपण करत असतोच, एरवीही. आपण प्रवासात एखादी वयस्कर बाई पाहतो आणि ती फार परक्याच भाषेत आपल्याशी काही तरी बोलली तरी, या महिलेनं किती कष्ट केले असतील, ती किती थकली आहे, याचा अंदाज आपल्याला ‘पाहून विचार करण्या’च्या अंगभूत सवयीतूनच आलेला असतो. दृश्यकलेबद्दल मात्र, आपण इतिहास आणि निर्मिती यांच्याशी अदब ठेवून वागायचं असतं. ‘माझंच खरं’ असं प्रेक्षकानं म्हणू नये, पण जे निराळंच पाहतोय त्याबद्दल विचारही निराळाच करावा लागेल आणि त्यासाठी (सांस्कृतिक, बिगरशाब्दिक) संदर्भ शोधणं, दृश्याची संगती निरनिराळ्या प्रकारे लावणं ही प्रक्रिया उपयोगी पडेलच. एवढं जरी लक्षात ठेवलं, तरी आपण आत्ता आहोत त्यापेक्षा दृश्यकलेच्या जास्त जवळ जाऊ. फार तर काय होईल? आपलं चुकेल! पण काही कादंबऱ्या लहानपणी वाचून कळल्या नव्हत्या त्या मोठेपणी जास्त नाहीत का कळत आपल्याला?
नैतिकतेचं महत्त्व. हा मुद्दा वादाचा ठरू शकतो. कला आणि नैतिकता या गोष्टी भिन्न ठेवणं, हीदेखील ‘स्वातंत्र्यवादी’ आणि ‘कलेला न्याय देणारी’ नैतिकताच आहे. तरीही बहुसंख्य लोकांना जे ‘अनैतिक’ वाटतं, ते चित्रकारानं करूच नये, असं दरडावणारी अनेक उदाहरणं मुस्लीम किंवा हिंदू कट्टरतावादामुळे गेल्या दशकात अनेक घडली आहेत. इथं ज्या समूहांची नावं घेतली, त्यांना आजही आपापल्या नैतिकतेबद्दल इतकी ठाम खात्री असते की त्या उदाहरणांची आठवण कुणी काढतच नाही. पण आपण ज्या नैतिकतेची अपेक्षा कलेकडून ठेवायला हवी, ती निराळीच. आज मानवावर, समाजावर आणि मानवी व्यवहारांवर इतकी बंधनं, इतके काच, इतक्या बेडय़ा (‘बाजारशरणता’ पासून ते ‘दाखवेगिरी’पर्यंत) असताना कलाकारांनी किमान आपणा गुलामांना, आपल्या गुलामीची जाणीव तरी करून द्यावी (मग भले आपण बंड करून उठणारच नाही, तरीही), शहाणिवेचा झरा कलावंतांनी कायम ठेवावा, ही ती अपेक्षा.
आता सदर कमी लोक वाचायचे हा पराभवच नाही का, या (आजतागायत कुणीही, कुठेही वाच्यता न केलेल्या) स्वयंघोषित प्रश्नाचं स्वयंघोषित उत्तर :
पराभव वगैरे काही नाही. लोकांना जगण्याचे इतके व्याप असतात, इतकी भानं सांभाळावीच लागतात, त्यात हे कलाभान कुठे आणखी? त्या व्यापांपुरतंच जगायचं नसतं हे ज्यांना कळतं, त्यांना निराळं पाहता येतं. निराळं वाचताही येतं. उदाहरणार्थ, ‘भान हरपून तर पाहा..’ या शीर्षकातून सुरुवातीला ‘हातावर मारून तर पाहा..’ असा सूर ऐकू येत असेलही; कारण आपण रोज खमकेपणानंच जगतो.. पण हे खमकं भान जरा हरपलं की मग ‘पाहणं’ सुरू होईल, असं वाटतं.     (समाप्त)