भारतीय वैद्यक व्यावसायिकांना ‘बाहेर’- म्हणजे परदेशांत मानमरातब मिळतो, तेव्हा देशही त्यांच्याकडे अभिमानाने पाहतो, यात नवल नाही. परंतु भारतीय नाक-कान-घसा तज्ज्ञांच्या संघटनेचा (एओआय) अत्यंत प्रतिष्ठेचा ‘डॉक्टर ज्यो. व्ही. डोसा पुरस्कार’ स्थापनेपासून, म्हणजे गेल्या दोन दशकांपासून परदेशी  डॉक्टरांनाच मिळत होता, तो चंडीगढचे डॉ. अशोक गुप्ता यांना मंगळवारी मिळाल्याने त्यांचा मान वाढला आहे. ‘एओआय’च्या (असोसिएशन ऑफ ओटोलॅरिंगोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया) परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला. नाक अथवा कानाच्या दुखण्यांमध्ये डोळय़ांचेही नुकसान कसकसे होते व स्टेम सेल तंत्रज्ञानाच्या आधारे ते टाळता येईल का, हा डॉ. गुप्ता यांच्या अभ्यासाचा विषय जगन्मान्य होता, पण त्यावर पुरस्काराची मोहोर उमटली नव्हती. चंदीगडच्या सरकारी पदव्युत्तर वैद्यकीय संशोधन-संस्थेतील डॉ. गुप्ता यांना याच संशोधनाने अमेरिकेच्या येल विद्यापीठाचे मानद प्राध्यापकपद मिळवून दिले. मात्र आता, भारतातील दोन हजार नाक-कान-घसा तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या संस्थेने डॉ. गुप्ता यांचे कार्य मान्य केले आहे. डॉ. अशोक गुप्ता यांनी आजवर १९५ निबंध सादर केले असून नऊ वैद्यकीय पुस्तकांत त्यांनी लिहिलेली प्रकरणे समाविष्ट आहेत. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ च्या संपादक मंडळात त्यांचा समावेश आहे, तसेच ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऱ्हायनोलॉजी’ या संशोधनपत्रिकेचे ते संस्थापक व प्रमुख संपादक आहेत. ‘ट्रॉमॅटिक ऑप्टिक न्यूरोपथी’ ही शाखा त्यांनी पुढील संशोधनाकरिता निवडली व स्टेम सेल तंत्रज्ञानाचे प्रयोग या संशोधनात केले. त्यामुळे अनेक रुग्णांना, केवळ नाकाच्या वा कानाच्या अतीव दुखण्यामुळे दृष्टी हळुहळू अधू होत जाण्याच्या शक्यतेपासून मुक्ती मिळाली. प्राध्यापक म्हणून गुप्ता यांचे काम मोठे आहेच, पण प्रत्यक्ष रुग्णसेवाही त्यांच्या संशोधनाने झाली आहे. ‘एओआय’च्या मुंबई शाखेने नाक-कान घसा क्षेत्रातील गुरुजनांच्या यादीत डॉ. तात्याराव लहाने यांच्यानंतर डॉ. अशोक गुप्ता यांचेच नाव आवर्जून घेतले आहे, यावरूनही त्यांच्या मोठेपणाची कल्पना यावी.