भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक आणि व्यासंगी प्राध्यापक असाच प्रा. डॉ. अशोक केळकर यांचा देशभरात नावलौकिक आहे. प्रारंभी आग्रा विद्यापीठामध्ये आणि त्यानंतर पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेज येथे सेवानिवृत्तीपर्यंत भाषाविज्ञान अध्यापनाचे कार्य करणारे केळकर यांची ऋजु व्यक्तिमत्त्व अशीच ओळख आहे. ‘भाषावैज्ञानिक’ ही ओळख असली तरी केळकर यांनी सौंदर्यशास्त्र, नृत्य, गायन, सुलेखन, नाटय़ या कलांचीही आवड जोपासली होती. चित्रकला अवगत असलेल्या केळकर यांचा कलामीमांसा, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांचा गाढा व्यासंग होता. भाषाविज्ञानाच्या क्षेत्रातील अध्यापन आणि संशोधन कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित केले आहे.
डॉ. केळकर हे मूळचे पुण्याचेच. २२ एप्रिल १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी फग्र्युसन महाविद्यालयातून इंग्रजी आणि तत्त्वज्ञान हे विषय घेऊन १९५० मध्ये मुंबई विद्यापीठाची बी. ए. (ऑनर्स) पदवी संपादन केली. पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि फ्रेंच हे विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात १९५६ ते १९५८ या कालावधीत भाषाविज्ञान आणि मानवसंस्कृतीविज्ञान या विषयामध्ये त्यांनी संशोधन करून पीएच. डी. संपादन केली. १९५८ ते १९६२ या कालावधीत त्यांनी आग्रा विद्यापीठामध्ये आणि त्यानंतर पुणे विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज येथे भाषाविज्ञानाचे अध्यापन केले. १९८९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले तरी जीवनाच्या अखेपर्यंत त्यांचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन कार्य सुरूच होते. इंग्रजी, हिंदूी आणि मराठी भाषांतील विविध नियतकालिकांतून त्यांनी भाषा आणि साहित्यविषयक विपुल लेखन केले.
‘मराठी व्याकरणाची नवी दिशा’ हा मराठीतील त्यांचा पहिला लेख १९६५ मध्ये ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झाला होता. ‘मराठी भाषेचा आर्थिक संसार’ (१९७८), ‘प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा’ (१९७९), ‘वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार’ (१९८३), ‘भेदविलोपन : एक आकलन’ (१९९५) आणि ‘मध्यमा : भाषा आणि भाषाव्यवहार’ (१९९६) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘भाषा अणि जीवन’ या नियतकालिकाचे अनेक वर्षे संपादन करणाऱ्या केळकर यांची ‘द फोनॉलजी अ‍ॅण्ड मॉफरेलजी ऑफ मराठी’ (१९५९), ‘स्टडीज इन हिंदूी-ऊर्दू : इंट्रोडक्शन अ‍ॅण्ड वर्ड फोनॉलजी’ (१९५८), ‘प्रोलेगोमेना टू अ‍ॅन अंडरस्टँिडग ऑफ सेमिऑसिस अ‍ॅण्ड कल्चर’ (१९८०) ही इंग्रजी पुस्तके आहेत. आपल्याच ग्रंथांचे त्यांनी हिंदूी आणि इंग्रजी अनुवाद केले आहेत. ‘रुजुवात’ या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. भाषाविषयक काम करणाऱ्या संस्थांसाठी योजना तयार करण्यापासून ते कार्यान्वित करण्यापर्यंत डॉ. केळकर यांचा सहभाग राहिला आहे. ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या केळकर यांच्या प्रेरणेतून १९८२ मध्ये ‘मराठी अभ्यास परिषद’ या संस्थेची स्थापना झाली.