निसर्गाचे गाणे शोधणे हाच ज्यांचा आयुष्यभराचा ध्यास आहे, अशा डॉ. माधव गाडगीळ यांना यंदाचा ‘टेलर’ पुरस्कार प्राप्त होणे ही केवळ अभिनंदन करण्याची गोष्ट नाही. प्रयोगशाळेत बसून पर्यावरणाचे संशोधन करण्यापेक्षा दऱ्या-खोरी धुंडाळून, डोंगरकपाऱ्यांत हिंडून निसर्ग अनुभवणे हा गाडगीळ यांच्या केवळ अभ्यासाचा भाग नसतो. ही सारी निरीक्षणे त्यांना निसर्गाची न उलगडलेली कोडी सोडवण्यासाठी उपयोगी पडतात. गाडगीळांचे वैशिष्टय़ हे, की ते या साऱ्याचा अभ्यास सर्जनशीलतेने करतात. वनस्पतींपासून ते प्राणी-पक्ष्यांपर्यंत अनेक जण त्यांना सतत खुणावत असतात, नवे सुचवत असतात. त्यांच्या सादाला आपल्या प्रतिभेने प्रतिसाद देणारे माधव गाडगीळ यांच्यासारखे संशोधक विरळा. जैववैविध्य टिकून राहणे निसर्गाच्या संतुलनासाठीच नव्हे, तर पृथ्वीवरील मानवजातीच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी आवश्यक असते, या आपल्या प्रमेयाची मांडणी गाडगीळ ललितसुंदर पद्धतीने करतात.
संशोधकाला कवीचे हृदय आणि लेखकाचे मन असले, की त्याचे संशोधन हीही एक कलाकृती होते. गाडगीळ यांनी अशा कलाकृतींच्या निर्मितीत जो सहभाग घेतला आहे, तो त्यांच्याएवढाच प्रत्येकासाठी आनंददायी ठरला आहे. वडील धनंजयराव गाडगीळ विख्यात अर्थतज्ज्ञ होते खरे; परंतु विविध क्षेत्रांतील रसिकदृष्टीही त्यांच्याकडे होती. पक्षी निरीक्षणापासून ते सामाजिक घटनांपर्यंत आणि सार्वजनिक हितसंबंधांपासून ते खगोलशास्त्र, इतिहास, वनस्पतिशास्त्र अशा अनेक विषयांतील धनंजयरावांचा रस माधवरावांकडे केवळ जैविक संबंधातून आला नाही. त्यांना स्वत:ला या सगळ्या गोष्टीत कमालीचा आनंद मिळत असतो, कारण त्यांना त्यातली कविता उमजते. त्या काव्यात दडलेले संगीत जाणवते. शिकण्याच्या वयात त्यांना भेटलेल्या इरावती कर्वे किंवा डॉ. सलीम अली यांनी त्यांच्या जगण्याचे ध्येयही नकळत ठरवून टाकले होते. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये  प्राध्यापक म्हणून काम करतानाही परिसरातील अनेक सुंदर गोष्टींची त्यांची ओढ सतत वाढत राहिली.
निसर्गाचे गूढ आणि अनाकलनीय कप्पे शोधता शोधता माधवराव अनेकदा रमून जातात. हे रमणे जेव्हा ते शब्दबद्ध करतात, तेव्हा त्या लेखनाला प्रतिभेची उंची प्राप्त होते आणि तो विषय एखाद्या कादंबरीसारखा रसरशीत होतो. भाषेवरील प्रभुत्व, विषयावरील पकड याच्या बरोबरीने जीवनातील स्वच्छ चारित्र्याचा कमालीचा आग्रह, यामुळे त्यांच्या जगण्याला जे टोक आले आहे, ते कुणालाही हेवा वाटायला लावणारे आहे. ‘टेलर’ पुरस्काराने हा हेवा पुन्हा एकदा जाहीर झाला आहे, एवढेच.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी