मृणाल दत्त चौधुरी यांच्या निधनाने आपण एका जाणकार अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व धोरण सल्लागारास मुकलो आहोत. त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ांना प्रेरणा दिली. त्यांना प्रेमाने एमडीसी असे संबोधले जाई. निवृत्तीनंतर दिल्लीचे हवामान न मानवल्याने ते भाऊ मलय यांच्या आग्रहास्तव पुण्यात राहत होते. नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या समवेत शांतिनिकेतन येथे ते शिकले. उच्चशिक्षणासाठी ते कोलकात्यास (प्रेसिडेन्सी कॉलेज) गेले व अमेरिका (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) या संस्थेतून पॉल सॅम्युअलसन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. झाले. चौधुरी यांच्या संशोधनाचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नियोजनावर प्रभाव होता. १९९० च्या सुमारास त्यांनी सरकार व बाजारपेठांच्या अपयशाच्या पाश्र्वभूमीवर आर्थिक सुधारणांच्या आव्हानांचा अभ्यास केला. त्यानंतर सोविएत युनियनचे विभाजन झाले. मनमोहन सिंग व चौधुरी यांचे निकटचे संबंध होते. यूपीए सरकारचे ते धोरण सल्लागार होते. १९९१ मध्ये ज्या आर्थिक सुधारणा राबवण्यात आल्या त्यातील ते पडद्यामागचे एक सूत्रधार होते. व्यापार व उद्योग क्षेत्रात त्यांना २००५ मध्ये भारत सरकारने पद्मभूषणने गौरवले होते.
 दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ते संचालक होते व हार्वर्ड तसेच मिनसोटा विद्यापीठात अर्थशास्त्राचे अभ्यागत प्राध्यापक होते. त्यांनी अर्थशास्त्रासारखा कंटाळवाणा विषय अधिक रसरशीतपणे जिवंत करून विद्यार्थ्यांपुढे ठेवला. अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना समजून देण्यात ते यशस्वी ठरले, केवळ सैद्धांतिक अर्थशास्त्र त्यांनी शिकवले नाही तर त्याची व्यवहारातील उदाहरणेही दाखवून दिली, त्यामुळेच ते अर्थतज्ज्ञाबरोबरच एक प्रभावी प्राध्यापक होते. त्यांच्यात एक कार्यकर्ताही दडलेला होता व १९७७ मध्ये आणीबाणीनंतर त्यांना निवडणुकीसाठी उभे राहण्याकरिता सल्लाही मिळाला होता, पण शिक्षक म्हणून जे समाधान मिळते ते कशात नाही असे सांगून त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. त्यांचे अध्यापन हे वर्ग, चर्चासत्रे यांच्यापुरते मर्यादित नव्हते तर कॉफी हाउस व त्यांचे घर ही अनौपचारिक शिक्षण केंद्रे होती. १९७० ते १९९० या काळात त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. रीजनल डेव्हलपमेंट अँड चेंज, रीजनल डेव्हलपमेंट एक्सपीरियन्स अँड प्रॉस्पेक्ट्स इन साउथ अँड साउथईस्ट एशिया, लेबर मार्केट्स अ‍ॅज सोशल इन्स्टिटय़ुट्स ऑफ इंडिया या पुस्तकांत त्यांनी लेखन केले.
(चौधुरी यांचे अलीकडचे छायाचित्र उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांच्या काही चाहत्यांनी ट्विटरवर आदरांजली वाहताना चौधुरींचे तरुणपणीचे उपर्युक्त छायाचित्र देऊ केले आहे.)