धर्माला कालबाह्य़ औषध वगैरे ठरवून मोकळे झालेले गुलजारजी कालसुसंगत नसल्याचे खेदपूर्वक म्हणावे लागेल.. अन्यथा या  बहुगुण-हितकारी औषधमात्रेने अवघा बाजार फुललेला असताना तेथे रमायचे सोडून गुलजारजी असे काहीच्या बाही कविवर्तन करते ना !

आम्हाला नाइलाजाने म्हणावेसे वाटते, गुलजारजी आपणास काहीच कळत नाही. (पण म्हणूनच आपण कविता लिहू शकता, हे आम्हाला कळते. आपणही इतरांसारखे कळणाऱ्यांतले असता तर एव्हाना कोठल्या कोठे गेला असतात. असो.) खरे तर आपणास काही कळत नाही हे एव्हाना तरी तुम्हास कळले असेल. आपल्या मते धर्म म्हणजे कालबाह्य झालेले औषध. आणि औषध एकदा का कालबाह्य झाले की ते विष होते. त्या अर्थाने धर्म हे विष आहे, हा आपला सिद्धान्त. तुमचे ऐकायचे तर त्याचा अर्थ धर्मनामक औषधाच्या मात्रा घेणे बंद करावे लागेल. तुमच्याप्रमाणेच कलाकार डॉ. श्रीराम लागू यांनी काही वर्षांपूर्वी परमेश्वराला निवृत्त करण्याची हाक दिली होती. आता ते निवृत्त झालेले आहेत. पण धर्म मात्र चांगलाच तरुण झालाय. अहो, उलट उत्तरोत्तर तो तरुण होतोय हे आपल्यालाही जाणवले असेलच. तुम्हा दोघांच्याही आधी कार्ल मार्क्‍सनामक वेडय़ाने धर्माला अफूची गोळी ठरवले होते. आता मार्क्‍स जाऊनही बराच काळ लोटला. त्याने स्वत:च्या लेखणीतून बुद्धिवादी असा नवा धर्म जन्माला घातला होता, हे तुम्ही जाणताच. मार्क्‍सवाद म्हणतात त्याला. अलीकडे तोही तसा क्षीणच झाला आहे. म्हणजे मार्क्‍स म्हणाला होता ती अफूची गोळी दिवसागणिक मोठी होत आहे आणि त्या अफूच्या मात्रेचा एखाददुसरा वळसा तरी आपल्या ओठाला लागावा अशी इच्छा बाळगणाऱ्यांची संख्या उलट वाढतानाच दिसते. तेव्हा अशा वेळी धर्माला कालबाह्य औषध म्हणणे हे आपले विधान ऐकून काही जणांचे माथे भडकल्यास त्यांना दोष देता येणार नाही.
याचे कारण या कालबाह्य औषधावरच इतके दिवस आपल्या अनेकांची गुजराण सुरू आहे, अनेकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे आणि अनेकांच्या जगण्यास त्या कालबाह्य औषधानेच अर्थ दिला आहे. तेव्हा आता कसे करायचे? आपणास हेही ठाऊक असेल की नशा काय केवळ अमली पदार्थाचीच असते असे नाही. ती औषधाचीही असते. ते जरी कालबाह्य असले तरी. उदाहरणार्थ झोपेचे औषध. रेचकाचेही तेच. खरे तर ते औषध. पण त्याचीही सवय लागते. कोठा साफच होत नाही काहींचा ते घेतल्याखेरीज. तसेच ते या धर्मनामक आपल्या मते कालबाह्य झालेल्या औषधाचे नाही काय? इतके दिवस या औषधाचा किती मुबलक पुरवठा होत गेला आहे या भारतीयांना. तेव्हा त्याची सवय लागणार नाही तर काय? आणि खरे तर आपणाइतका या औषधाचा डोस घेणारे किती कमी असतील? आपला जन्म पंजाबातील. थेट रावी पारचाच. पण जन्मस्थळी जाण्याचा, राहण्याचा आनंद काही आपणास फार घेता आला नाही. फाळणीच झाली देशाची. आता आपणास हेही लक्षात आले असेलच की फाळणीच्या मुळाशीदेखील हे कालबाह्य औषधच होते. फरक इतकाच की आपल्याकडे अशी प्रामुख्याने दोन औषधे आहेत. त्यातील एक नियमितपणे घेणाऱ्यास हिंदू म्हणतात तर दुसऱ्यास मुसलमान. दोघांच्याही औषधाच्या बाटल्या पार जुन्या. परंतु इतके दिवस या दोन औषधांतील फरकाच्या आधारे राज्य करणाऱ्यांनी त्यातील दुसऱ्याच औषधाचे कौतुक केल्यामुळे पहिले औषध घेणारे नाराज आहेत. ‘भला तेरी दवा, मेरी दवा से मीठी कैसी’ असा त्यांचा प्रश्न. शिवाय त्याच्या जोडीला ख्रिश्चन, शीख वगरे अन्य औषधांच्या बाटल्याही आहेतच. यातील सर्वच औषधे कालबाह्य झालेली. परंतु राज्यकत्रे नावाच्या जमातीने इतक्या शिताफीने कधी यातील दोनच वेगळी काढ, कधी आणखी दोन एकत्र कर असे करत करत या औषधांची अशी काही सवय जनतानामक खंगलेल्या, सतत दुर्लक्षित, कंगाल रुग्णास लावली की त्यासही  समजले नाही आपण या औषधाच्या व्यसनात कधी अडकलो ते. नंतर तर हे व्यसन वाढले. तेव्हा ही औषधे दिली नाहीत तर हा जनतानामक रुग्ण त्यासाठी चक्क भोकांड पसरू लागला. त्याचे रडणे इतके वाढले की मग औषधांची टंचाई भासू लागली. मग पुन्हा एकदा राज्यकर्तानामक वैद्यकाने नवनवी औषधे तयार केली. त्यातील प्रभावी अशा एका औषधास जात असे म्हणतात. हे नवे औषध जन्माला येतानाच कालबाह्य होऊन जन्मले. परंतु तरीही त्याची सवय मुख्य औषधाइतकीच जनतानामक रुग्णास लागत गेली. कानामागून आलेल्याने तिखट व्हावे त्याप्रमाणे हे दुसरे जातनामक कालबाह्य औषध पहिल्या, अनुभवी, ज्येष्ठ अशा धर्मनामक औषधापेक्षाही अधिक प्रभावी ठरते की काय असे काही काळ वाटून गेले. गुलजारजी, आपण भले लिहून गेला असाल, ‘हमने देखी है इन आँखों की महकती खुशबू। हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम ना दो’ तरी जनसामान्यांस तसे चालत नाही. तो निराकाराची भक्ती करू शकत नाही, निर्गुणावर प्रेम करू शकत नाही आणि मानवी नाते कोणत्या ना कोणत्या नात्यांच्या क्रुसावर चढवल्याखेरीज त्याच्या जिवाचे समाधान होत नाही. त्यात पंचाईत ही की हा माणूस जोपर्यंत नुसता माणूस असतो, तोपर्यंत त्याचे बरे चाललेले असते. परंतु ज्या क्षणी त्याचे मतदारात रूपांतर होते तेव्हा त्यास कोणत्या ना कोणत्या रिश्ते का इल्जामला सामोरे जावेच लागते. आणि जोडीला वर ते औषध. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या सहाव्या वगरे बाटलीतले. ही औषधे घेण्यास काहींनी नकार दिला होता पूर्वी. मग त्यांना ती जबरदस्तीने पाजण्यात आली. गावच्या विहिरीत ती टाकून साऱ्या गावाला एकाच फटक्यात कधी ती देण्यात आली तर कधी ती न घेणाऱ्यांचे हालहाल करण्यात आले. ते पाहून बाकीच्यांचा विरोधच मावळत गेला. तेव्हा गुलजारजी तुम्हीच सांगा आता हा धोका कोणी आणि का पत्करावा?
शिवाय या औषधांचे म्हणून काही फायदे असतातच की. या औषधांचे घाऊक उत्पादन करून ते कालबाह्य होण्यासाठी जेथे ते मुरवले जाते, त्यास धर्मस्थाने असे म्हणतात. कोण कोणते, कोणत्या रंगाचे, किती मापाने औषध घेतो त्यावर त्याचे धर्मस्थळ अवलंबून असते. तेथून या औषधांच्या मोफत वितरणाची व्यवस्था होत असते. आता कितीही गरज म्हणून घ्यावे लागले तरी औषध हे औषधच असते. ते कडू लागले तरी गोड मानून घेता यावे म्हणून त्याच्याबरोबर काही गोडाधोडाचे दिले जाते. काही जण त्यास प्रलोभन असे म्हणतात. म्हणोत बापडे. पण त्यामुळे त्या औषधाची उपयुक्तता थोडीच कमी होते?
तेव्हा गुलजारजी तुमचे चुकलेच. तेसुद्धा दुहेरी. एक म्हणजे तुम्ही एका बाटलीतलेच औषध घेणे अपेक्षित असताना तुम्ही आपली बाटली बदललीत आणि दुसऱ्या बाटलीतल्या औषधाला आपले म्हटलेत. जन्माला आलात संपूर्णसिंग कालरा म्हणून. म्हणजे पहिल्या बाटलीतले औषध घेणे तुम्ही अपेक्षित. पण तुम्ही नाव घेतलेत गुलजार. म्हणजे दुसऱ्या बाटलीच्या जवळ जाणारे. याचा अर्थ असा की तुम्ही कालबाह्य अशी दोन दोन औषधे प्राशन केलीत. सर्वनाशासाठी एकच पुरेसे असताना दोन घेतल्यामुळे काय होत असेल याचा विचारच केलेला बरा. तेव्हा या सरमिसळीमुळे तुमचा गोंधळ झाला असावा.
पण आम्ही एकच करू शकतो. प्रार्थना. तीदेखील आपल्याच शब्दांत थोडा बदल करून.. इनको मन की शक्ती देना.. का?      तर आपणास हे औषध घेण्याचा धीर व्हावा यासाठी!

Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे
loksatta lokrang Language Pride Marathi Community Marathi Language Day
भाषागौरव कशाचा?