एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस तर्कशास्त्राचाच तिरस्कार करू लागतो. विशेषत: मित्र असे करतात, तेव्हा सारेच भावविश्व उद्ध्वस्त होते! मग सारीच बुद्धिमान माणसे तर्काचा, तर्कशक्तीचा आणि तर्कशास्त्राचा असा दुरुपयोग करतात, असे त्याला वाटू लागते..
सॉक्रेटिसच्या मते प्रज्ञानाला विरोध होतो तो केवळ बुद्धिमत्तेकडून. तर्कबुद्धीला नीतीचा आधार नसेल तर बुद्धिमान तर्कज्ञ हाच समाजाला धोका असतो. तर्कबुद्धी विघातक कामासाठी वापरली की ती आत्म्याचा नाश करतेच पण समस्त मानवजातीचाही नाश करते.    
 ग्रीकांनी बुद्धिमत्ता आणि प्रज्ञान (Intellect आणि wisdom) यात फरक केला आणि प्रज्ञानाचे प्रेम म्हणजे तत्त्वज्ञान (Philosophy) अशी व्याख्या केली. आता एक प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. तो असा : Philosophy या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा कोणती? भारतीय परिभाषेत बोलायचे तर ‘दर्शन’ या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा कोणती?
  ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेतील Philosophy या संज्ञेच्या विरुद्ध अर्थाची संज्ञा म्हणजे misology आणि misosophy. तर भारतीय परंपरेतील ‘दर्शन’च्या विरुद्ध अर्थाची संज्ञा म्हणजे ‘अदर्शन’ (अदर्शनं लोप:) म्हणजे गुप्त, लुप्त होणे, न दिसणे; म्हणून त्याचे ज्ञान न होणे. पर्यायाने अज्ञान.
प्लेटोच्या फिडो (Phaedo) या संवादात philosophy च्या विरुद्ध misology  आणि philosopher च्या विरुद्ध misologist या  संज्ञा वापरल्या गेल्या आहेत. misology म्हणजे तर्काचा तिरस्कार (the hatred of logic) आणि misosophy  म्हणजे प्रज्ञानाचा तिरस्कार (the hatred of wisdom).  
misology ही संज्ञा नेहमीच्या वापरात नसते. आणि प्रज्ञानाचा तिरस्कार या अर्थाने  misosophy ही संज्ञा डेव्हिड कॉनवे (१९४७. विद्यमान ) या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने त्याच्या ‘रिडिस्कव्हरी ऑफ विस्डम : फ्रॉम हिअर टू अ‍ॅन्टिक्विटी  इन द क्वेस्ट ऑफ सोफिया, २०००) या ग्रंथात वापरली, असे थॉमस सोवेल (१९३० विद्यमान) हा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व राजकीय तत्त्ववेत्ता लक्षात आणून देतो. नंतर misosophy misosophist  misosophos हे शब्द हचिनसन शब्दकोशाने (२००८) स्वीकारले. तर्काचा व प्रज्ञानाचा तिरस्कार या अर्थाने कान्ट या जर्मन तत्त्ववेत्त्याने (१७८०) sology शब्द उपयोगात आणला. इंग्लंडमधील एक्स्टर युनिव्हर्सटिीच्या सामाजिक विज्ञान विभागात प्रॅग्मटिझम अ‍ॅन्ड इट्स एनिमीज या नावाचा अभ्यास विषय आहे. विसाव्या शतकातील फलवादी चळवळीचा चिकित्सक अभ्यास यात केला जातो.       
  फिडो हा संवाद अत्यंत हृद्य आहे, कारण हा सॉक्रेटिसचा अंतिम दिवस आहे. आपल्या  देहान्ताच्या दिवशी सॉक्रेटिस त्याच्या मित्रांना माणसाचा सर्वात धोकादायक शत्रू कोण, त्याच्यापासून का व कसे सावध राहावे, याचा उपदेश करतो. या संवादात ताíकक दुष्टावा हा अनतिक बौद्धिक दुष्टावा कसा बनतो, याची चर्चा आहे.   
  ज्ञान हाच सद्गुण हा सिद्धांत सॉक्रेटिसच्या जीवनाचा प्रकल्प होता. तो त्याने मृत्यूच्या क्षणापर्यंत अमलात आणला. ज्ञानाला नीतीचा, समाजहिताचा आधार नसेल तर असे ज्ञान व अशी ज्ञानी पण अनतिक माणसेच समाजाला धोकादायक असतात, हे सॉक्रेटिस या संवादातही स्पष्ट करतो.        
या संवादातील सॉक्रेटिस ही सारी चर्चा मानवता विरोधाशी जोडतो. त्याच्या मते एखाद्याचा लोकांवरील वर्तनातील चांगुलपणावर विश्वास असेल तर तो सर्वच लोक मुळातून सचोटीने वागणारे आणि प्रामाणिक आहेत, असे समजतो. पण एखाद्याने जरी फसवले तरी तो सर्वाचा तिरस्कार करू लागतो. म्हणजे वर्तनातील चांगुलपणाचे जसे सार्वकिीकरण होते, तसे दुष्टपणाचेही सार्वकिीकरण होते. अगदी असेच तर्काच्या व विचाराच्या बाबतीतही घडते. एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस तर्कशास्त्राचाच तिरस्कार करू लागतो. विशेषत: मित्र असे करतात, तेव्हा सारेच भावविश्व उद्ध्वस्त होते! मग सारीच बुद्धिमान माणसे तर्काचा, तर्कशक्तीचा आणि तर्कशास्त्राचा असा दुरुपयोग करतात, असे त्याला वाटू लागते. तेच त्याचे ‘ज्ञान’ बनते. मग असा माणूस त्या एका दुरुपयोग करणाऱ्या माणसाचा शत्रू होता होता साऱ्या मानवजातीचाच शत्रू होतो! कालांतराने त्याचे स्वत:चे विपरीत तर्कशास्त्र तयार होते. तो त्यावरच श्रद्धा ठेवतो, मग तेच त्याच्यासोबतच्या इतरांना शिकवितो. हे तर्कशास्त्र बुद्धीच्या नव्हे तर भावनेच्या अंकित होते. तर्कविरोध आणि मानवविरोध अशा रीतीने एकत्रच जन्माला येतात.
   प्लेटोच्या मते, अंध मत, विश्वास यांनाच सत्य मानणे आणि तर्क खरा न मानणे (युक्तिवाद अथवा चर्चा करण्यात सत्य नसते, अशी श्रद्धा बाळगणे) हा तर्काचा तिरस्कार आहे. अताíककता हा मानसिक आजार असून तो आत्म्याशी संबंधित आहे. हा अत्यंत निकडीचा, इमर्जन्सीचा रोग आहे. हा रोग झाला की लोकांना बोलण्यात, चर्चा करण्यात आत्मविश्वास वाटत नाही. काही काळाने त्यांना या रोगाची सवय होते, मग ते अज्ञानाच्या गुहेतील अंधारे आयुष्य जगू लागतात. शरीर आणि त्याच्या इच्छाच खऱ्या समजून ते जणू काही मद्यधुंद धूसर गोंधळलेल्या अवस्थेत जन्मभर राहतात. असा आत्मा रोगट बनतो. अशा रीतीने अताíककता हा आत्म्याचा रोग होतो. मग तो केवळ आत्मनाश करतो.         
    प्लेटोच्या या संकल्पनेतून दोन गोष्टी आढळतात, असे आज आपण म्हणू शकतो. माणूस बुद्धिमान प्राणी आहे, हे अ‍ॅरिस्टॉटलचे म्हणणे मान्य केले तरी समाजात सर्वच माणसे बुद्धिमान नसतात; बरीच माणसे साधी, भाबडी असतात. पण काही माणसे तरी बुद्धिमान असतात. प्लेटोच्या म्हणण्यानुसार या बुद्धिमान माणसांवर नतिक वागण्याची विशेष सामाजिक जबाबदारी असते. कारण असा बुद्धिमान, ज्ञानी माणूस जेव्हा साध्या-भाबडय़ा माणसाला फसवितो तेव्हा त्या भाबडय़ा माणसाचा माणुसकीवरील विश्वास संपतोच, पण त्या दुष्ट अनुभवातून त्या भाबडय़ा माणसाचे स्वत:चे स्व-तंत्र तर्कदुष्ट तर्कशास्त्र बनते. ते दुष्ट मानसिकता निर्माण करते. ते निर्घृण होण्याचा धोका संभवतो. तो सत्ताधीश झाला की साऱ्या मानवजातीलाच धोक्यात आणू शकतो. लोकशाहीत असे घडू शकते. या तर्कदुष्ट तर्कशास्त्राच्या वरवंटय़ातून बुद्धिमान, ज्ञानी माणसेही वगळली जात नाहीत!      
        ‘ज्ञानाचे प्रेमिक’च्या विरुद्ध ‘अज्ञानाचे प्रेमिक’ असे कधी नसते, हे खरे. पण ज्यांना हुशार बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखले जाते त्यांनी बुद्धीचा गरउपयोग केला की ते ‘अज्ञानाचे प्रेमिक’ बनतात. त्यांच्या स्वार्थामुळे साध्या-सरळ माणसाचा आधी बुद्धीवरील, तर्कावरील विश्वास उडतो आणि नंतर बुद्धिमान माणसावरील विश्वास लयास जातो. मग सारी माणसे अशीच स्वार्थी असतात, असे त्याचे ज्ञान पक्के बनते. ती श्रद्धा होते. हा भाबडा माणूस मग कशावरही विश्वास ठेवू लागतो. तो हळूहळू मानवताविरोधी बनतो. हे घडू नये, यासाठी बुद्धिमान असण्याबरोबर ज्ञानी माणसाने सद्गुणी असणेही अनिवार्य असते. बुद्धिमान पण दुर्गुणी माणसे, सॉक्रेटिसच्या मते खरी ज्ञानी नसतातच, ती केवळ ‘मिथ्या ज्ञानी’ असतात. तत्त्वचिंतनाचे, समाजाचे हेच शत्रू असतात.                       
 भारतात तर्काचे शत्रू असा काही प्रकार नव्हता, उलट तर्क हाच शत्रू मानला गेला. परिणामी तर्कशास्त्राचा प्रसार आणि प्रचार तर झाला नाहीच, पण लोक विचारशक्तीच हरवून बसले. इंग्रजी विद्य्ोच्या दबावामुळे विद्यापीठे व महाविद्यालयांत तर्कशास्त्र हा विषय सुरू झाला आणि आज अनेक ठिकाणी तो बंद पडला. खरे तर शालेय स्तरावर जिथे विचार कसा करावा, याचे शास्त्रशुद्ध शिक्षण द्यावयाचे असते तिथे हा विषय असावा तर तिथे तो बेपत्ता आहे.    
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.