ज्ञान कशासाठी? याचे उत्तर ‘र्सवकष प्रबोधनासाठी!’ असे असले पाहिजे. भारतात अद्यापि प्रबोधनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने प्रबोधनाकडे नेणारे नवे ज्ञानशास्त्र रचले गेले पाहिजे. ज्ञान व माहिती यात नेमका विवेक करून ज्ञानाचे प्रेम विकसित करणाऱ्या शिक्षण क्षेत्राची रचना करणे गरजेचे आहे.
ज्ञान म्हणजे काय? हा प्रश्न प्राचीन भारतीय आणि प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी उपस्थित केला आणि विविध सिद्धांत मांडले. त्यांचा स्वतंत्र अभ्यास सखोलपणे करता येतो. मानवी ज्ञानाचे स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याला असलेल्या मर्यादा, प्रामाण्याचे निकष, ज्ञानाचा आणि समग्र अस्तित्वाचा संबंध या प्रश्नांचा विचार तत्त्वज्ञानाच्या ज्ञानशास्त्र या शाखेत केला जातो. ज्ञानाची साधने कोणती, ज्ञानाचे स्वरूप काय? ज्ञानाचा निकष कोणता? यथार्थ आणि अयथार्थ ज्ञानातील नेमका फरक काय? पुढे जाऊन ‘आपण जाणतो हे कसे जाणतो? म्हणजे एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते, याचे ज्ञान कसे होते?’ याचा विचार ज्ञानशास्त्रात होतो. ज्ञान ही मानवी संकल्पना असली तरी ती ईश्वरालाही लागू केली जाते. ईश्वर परम प्रज्ञानी मानला जातो. अर्थात हीसुद्धा मानवी धारणा असते.
ज्ञानशास्त्र ही ज्ञानविषयक समस्यांचा अभ्यास करणारी तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. इंग्लिशमधील एपिस्टेमॉलॉजी (Epistemology) या संज्ञेचे भाषांतर म्हणून ज्ञानशास्त्र ही संज्ञा उपयोगात आणली जाते. एपिस्टेमॉलॉजी ही संज्ञा जेम्स फेरिएर (१८०८-१८६४) या स्कॉटिश तत्त्ववेत्त्याने प्रथम सुव्यवस्थितपणे प्रचारात आणली. ग्रीक भाषेतीली episteme म्हणजे ज्ञान आणि ’logos  म्हणजे शास्त्र. म्हणून Epistemology चा अर्थ ज्ञानशास्त्र.
प्राथमिक पातळीवर ज्ञानशास्त्र, मानवी ज्ञानाचे वर्णन आणि मूल्यमापन करताना ज्ञान, भ्रम, प्रत्यक्ष ज्ञान, अनुमान, प्रतीती, विधान, सत्य इत्यादी संकल्पनांचे विश्लेषण करते. त्याचप्रमाणे या संकल्पनांचा आशय स्पष्ट करणे, त्यांचा परस्परसंबंध निश्चित करणे हे कार्य करते. दुसऱ्या पातळीवर विविध विज्ञानांचे स्वरूप, त्यांची ज्ञानविषयक उद्दिष्टे आणि विषय यांनुसार त्या त्या विज्ञानाची पद्धती आणि एकूण विज्ञान या ज्ञानरचनेची सामान्य पद्धती, तिचे प्रामाण्याचे निकष निश्चित करणे, हे काम करते. तिसरे म्हणजे, एखाद्या प्रस्थापित विज्ञानाच्या पद्धती व उद्दिष्टात गरजेनुसार बदल करणे, आणि वेगवेगळ्या विज्ञानांची गृहीतकृत्ये, त्यांच्या पद्धतीचा आधार असलेल्या मूलभूत संकल्पनांचा परस्परसंबंध स्पष्ट करून त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणे, हेही काम ज्ञानशास्त्र करते. त्यामुळे विविध विज्ञानांची एक सुसंगत व्यवस्था लागते. साहजिकच विज्ञान म्हणजे सुव्यवस्थित ज्ञान, अशी व्याख्या शक्य होते.    
 ‘ज्ञान’ या संकल्पनेचा अभ्यास का करावयाचा? नाही केला तर काय बिघडते? आता पाहा, ‘जाणणे’ आणि मत, विश्वास, श्रद्धा, समज होणे आणि अंदाज, ठोकताळे यांतील नेमका फरक स्पष्ट करण्याची क्षमता माणसात निर्माण होणे हा कळीचा मुद्दा असतो. वैज्ञानिकांचे निष्कर्ष, वैद्यांचे उपचार, न्यायालयीन कामकाज व अंतिम निर्णय या आणि यांसारख्या सर्व गोष्टी वस्तुस्थितीच्या ‘ज्ञानावर’ अवलंबून असतात, ठोकताळ्यांवर नाही. त्यासाठी ‘ज्ञान’ या संकल्पनेची तपासणी करणे गरजेचे ठरते.
सामाजिक अर्थाने पाहता, आपण जे काही करीत असतो, त्याचे समर्थन कशाच्या आधारे करतो आणि मानवी अनुभव व दृश्य जग याबाबतची सत्ये शोधताना आपण कोणते निकष पुरावे म्हणून स्वीकारले पाहिजेत, यांचा शोध घेणे आवश्यक असते, तो ज्ञानशास्त्रात घेतला जातो. सामाजिकदृष्टय़ा ‘ज्ञान होणे’ याचेच ज्ञान होणे, हे सुसह्य़ जगण्यासाठी गरजेचे असते.
ज्ञान म्हणजे काय? हा प्रश्न उपस्थित केला गेला तो प्रथम ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने. त्याला सामाजिक व राजकीय आशय लाभला तो आधुनिक प्रबोधन काळात. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे माणसाच्या विवेकशक्तीच्या स्वातंत्र्याची घोषणा आणि त्या शक्तीस दिलेले साक्षात उत्तेजन.
आता, विवेकशक्तीचे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? इमान्युएल कांट (१७२४-१८०४) हा गेल्या सहस्रकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ त्याच्या ‘व्हॉट इज एनलायटन्मेंट’ (प्रबोधन म्हणजे काय?) या निबंधात म्हणतो की, माणूस विविध दबावांमुळे आपल्या आकलन-सामर्थ्यांचा उपयोग करण्याची पात्रता आणि धर्य गमावून बसतो. पण प्रबोधन हा माणसाच्या विवेकशक्तीचा उद्भव आहे. म्हणूनच कान्टच्या मते, ‘स्वत:ची विवेकबुद्धी वापरण्याचे धर्य निर्माण करा!’ हीच प्रबोधनाची घोषणा बनते. ही भूमिका मूलत: सॉक्रेटिसने, त्यानंतर होरास (इ.स.पू. ६५-०८) या रोमन कवी तत्त्ववेत्त्याने ‘ज्ञान मिळविण्याचे धर्य निर्माण करा’ अशा घोषणेतून मांडली. तिचा पुनरुच्चार करून कान्टने तिला प्रबोधनाचे सूत्र हा दर्जा दिला.  
विसाव्या शतकात पारंपरिक ज्ञानशास्त्राच्या रचनेवर स्त्रीवाद्यांनी आक्षेप घेतला आणि नव्या स्त्रीवादी ज्ञानशास्त्राची संकल्पना पुढे आली. नंतर अन्रेस्ट सोसा (१९४०) या विद्यमान अमेरिकन तत्त्ववेत्ता आणि आघाडीच्या ज्ञानशास्त्रज्ञाने ‘सद्गुण दृष्टिकोनवादी ज्ञानशास्त्र’ मांडले. यानुसार बौद्धिक सद्गुणांचे ज्ञान हेच खरे ज्ञान. उदाहरणार्थ, कुतूहल, नम्रता, सेवाभाव, मनाचा खुलेपणा, रास्त असण्याचा मनाचा कल, बौद्धिक खंबीरता आणि धर्य. या मांडणीचा पुढे विकास केला तो लिंडा झागजेबस्की (१९४६-) आणि लॉरेन कोड (१९३७-) या अमेरिकन स्त्रीवादी ज्ञानशास्त्रज्ञ विदुषींनी.  
भारतीय ज्ञानशास्त्र विस्मयकारकरीत्या अत्यंत समृद्ध आहे; पण ते वर्ण-जाती-लिंगभेदात अडकले. भारतात ज्ञानासाठी ज्ञान ही मांडणी कधीही झाली नाही. अपरा-परा विद्या हा भेद स्पष्ट होता. मोक्ष हाच ज्ञानाचा एकमेव उद्देश बनला. ज्ञान आणि मोक्ष दोन्ही खासगी बनले. ज्ञान हा सामाजिक व्यवहार बनला नाही. ज्ञानबंदी हाच मुख्य व्यवहार होता. साहजिकच समाजाला शहाणे करण्याचे कारण उरत नाही.   
 परिणामी –
(१) आज भारतात ज्ञानाला महत्त्वच नसल्याने प्रत्यक्ष जगण्यात ज्ञानी माणसाचे महत्त्व शून्य आहे.
(२) भारतीय शिक्षणव्यवस्था आणि शिक्षण संस्था ज्ञान देण्याऐवजी माहिती देणारी ‘पोपटनिर्माण मॉल्स’ बनली.
(३) शुद्ध तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ज्या व्यक्ती किंवा विचारधारा ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात त्यांना येनकेनप्रकारेण शरणागती पत्करायला लावून त्यांच्या मानगुटीवर परतत्त्वाचे भूत बसविले जाते. न्याय-सांख्य, योग-वैशेषिक यांच्याबाबतीत असे दिसते.
 (४) माहिती आणि ज्ञान यांतील फरकाचेच ज्ञान नसल्याने समाजात ज्ञानाबद्दलची आसक्ती वाढू शकत नाही. पाच, ज्ञान व ज्ञानी माणसाला मूल्यच नसल्याने भारतीय प्रबोधन अपुरे राहिले आहे..
..आणखी बरेच काही..!       
दुसरीकडे समाज शहाणा व्हावा, ही संत ज्ञानेश्वर ते गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांची परंपरा ही सामाजिक व राजकीय ज्ञानातून लाभणाऱ्या शहाणपणाची गोष्ट आहे. पण संतांचेही लोक ऐकत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. अन्यथा ‘वारकऱ्यांची यादवी’ लिहिण्याची वेळ आली नसती. आणि संतांचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्यांकडून संतटीकेवर बंदी घालण्याची अवैज्ञानिक मागणी झाली नसती. ज्यांनी वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय भारतात कसा होईल, हे पाहिले पाहिजे; त्यांनी विज्ञान, वैज्ञानिक दृष्टी कशी मरेल, संतांचे सामाजिक प्रबोधन कसे रसातळाला जाईल, याकडे लक्ष द्यावे, हे भारतीय जनतेचे केवळ दुर्दैव आहे. नव्हे, हा तर कलियुगीन महिमा म्हणावा, असा वैदिक नियतीवादी सटवाईचा लेख म्हणावा लागेल.
म्हणूनच ज्ञानाला मूल्य देणारे नवे इहवादी ज्ञानशास्त्र रचणे आणि त्यावर आधारित शिक्षणव्यवस्था अमलात आणणे हा नवप्रबोधनाचा अजेंडा असला पाहिजे.
 तुकोबांचा ‘बुडती हे जन न देखावे डोळा’ हा अनंत कारुण्यभाव हे त्याचे अधिष्ठान असावे.
* लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.  ई-मेल: tattvabhan@gmail.com

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान