‘‘शिष्याच्या मनात भाव असावा, पण गुरूने शिष्यांची सेवाही विशेष कारण नसताना घेऊ नये. या सर्व भावनाच असतात आणि आपल्याला तर भावातीत व्हावयाचे आहे,’’ असं स्वामी स्वरूपानंद यांनी ज्यांना सांगितलं त्यांच्या मनाचा भाव खराच उच्च होता. त्यामुळे वरकरणी हे त्यांना सांगितल्याचं दिसत असलं तरी प्रत्यक्षात हा बोध या मार्गावर पहिली पावलं टाकत असलेल्या आणि मानवी देहात सद्गुरू लाभलेल्या प्रत्येक साधकासाठीच आहे. सेवाभाव हा श्रेष्ठ आहे आणि मनात भाव असल्याखेरीज खरी सेवा साधूच शकत नाही. मग, ‘‘या सर्व भावनाच असतात आणि आपल्याला तर भावातीत व्हावयाचे आहे,’’ असं स्वामीजी सांगतात त्याचा खरा रोख काय असावा? तर, मनात भाव नसतानाही इतरांना दिसेल आणि आपण सद्गुरूंच्या जवळचे आहोत हे भासेल, अशा तऱ्हेनं सेवा करण्याचा भावही मनात अलगद शिरकाव करू शकतो. हा भाव संपूर्ण साधनेवरच सात्त्विक अहंकाराचा वज्रलेपन करतो. या भावातूनच ‘मीच खरा आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ गुरूभक्त’ हा अहंकार नसा-नसांतून प्रवाहित होऊ लागतो. ‘मी’पणा आला की ‘अगर्वता करावे, दास्य सकळ’ कसं साधेल? त्यामुळे सेवाभाव असलाच पाहिजे, पण सेवेचं ढोंग, सेवेचा दिखाऊपणा त्या भावात कालवला जाऊ नये. यासाठीच स्वामींचा हा भावातीत होण्याचा बोध आहे. ‘श्रीगुरूगीता अन्वय आणि अर्थ’ (मनोरमा प्रकाशन, दादर) या पुस्तकात श्री. अनिल जयराम बेडेकर यांनी एक आठवण सांगितली आहे. ते लिहितात : माझे स्वामी अमलानंद यांच्याकडे त्यांचे एक शिष्य सेवेसाठी नेहमी येऊन राहात असत. सेवाही ते अत्यंत मनोभावे करीत असत असे वाटे. आम्हा शिष्यांना त्यांच्याविषयी प्रेमादराची भावना तर होतीच, परंतु त्यांचे कौतुक वाटण्याबरोबरच आश्चर्यही वाटत असे. आपल्याला एक दिवस सद्गुरूंकडे जायचे असल्यास नोकरी धंद्यामुळे, कौटुंबिक परिस्थितीमुळे किती प्रकारच्या अडचणी येतात याची सगळ्यांनाच कल्पना आहे. आणि हे गृहस्थ सगळा व्याप सोडून पंधरा-पंधरा दिवस येऊन राहात असत. एकदा असाच गुरुचरणांशी बसलो असताना हेच विचार चालले होते. काहीही करून तीन-चार दिवसांची रजा टाकून आपणही गुरुसेवेला यायचेच, असा विचार करीत होतो. मुंगीचेही मनोगत जाणणाऱ्या सद््गुरूंना माझ्या मनातले हे विचार समजणे अशक्य का होते? ते सद्गृहस्थ काही कामासाठी आत गेलेले बघून स्वामी अमलानंद मला म्हणाले, ‘‘अरे हा माझी शारीरिक सेवा खूप करतो, पण त्याचं मन माझ्याकडे नाही. त्यामुळे त्याचं कल्याण करायची इच्छा असूनदेखील मला काही करता येत नाही. त्याला सांगूनदेखील उपयोग नाही’’ (पृ. २०). तेव्हा सेवेइतकाच आंतरिक शुद्ध सेवाभावही महत्त्वाचा. तो नसेल तर सेवा म्हणजे निव्वळ दिखाऊ उपचार होईल. श्री. म. वि. केळकर म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘बाह्य़ उपचारांना महत्त्व असतेच, पण त्याहीपेक्षा ते करताना भक्ताचे अंतरंग लीन होणे महत्त्वाचे असते!’’ सेवा ही दृश्यात असते, भाव आंतरिक असतो. या दोहोंत एकलयता असेल तरच अंतर्बाह्य़ सेवा साकारते.